जगातील 10 सर्वांत विषारी आणि धोकादायक साप कोणते?

    • Author, भरत शर्मा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

संपूर्ण जगात साप आढळतात आणि त्यांच्या प्रकारानुसार काही विषारी तर काही बिनविषारी असतात. भारतात साप चावल्यामुळे दरवर्षी अनेकांचे मृत्यू होतात.

आज आपण जगातील सर्वात धोकादायक आणि विषारी साप, त्यांच्या विषाचे प्रकार, शरीरावर होणारे परिणाम, तसंच भारतात साप चावल्यामुळे होणाऱ्या मृत्यूमागील कारणं आणि अँटी व्हेनमबाबतची माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, जगभरात दरवर्षी साप चावल्यामुळे सुमारे 81,410 ते 1,37,880 लोकांचा मृत्यू होतो.

तर भारतात दरवर्षी साप चावल्यामुळे 60 हजारहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागतात.

दरवर्षी जगभरात साप चावण्याच्या साधारण 50 लाख घटना घडतात. त्यापैकी सुमारे 4 लाख जणांना शरीराचा एखादा भाग कापावा लागतो किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व येतं.

ही सर्व आकडेवारी खरंच भीतीदायक आहे ना? आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे, साप.

जगातील अनेक संस्कृतींमध्ये आणि समाजांमध्ये सापाला महत्त्वाचं स्थान आहे. काहीजण त्याची पूजा करतात, तर काहीजणांना त्याची भीती वाटते.

काही साप खरोखरच खूप धोकादायक असतात, पण काही साप माणसाला अजिबात इजा करत नाहीत.

काही साप नुडल्ससारखे बारीक आणि पातळ असतात, तर काही इतके लांब असतात की ते जिराफच्या उंचीपेक्षाही मोठे असतात आणि पूर्ण शेळी किंवा डुक्करही गिळून टाकतात.

बीबीसी अर्थमध्ये सोफिया क्वाग्लिया लिहितात की, सुमारे 17 कोटी वर्षांपूर्वी साप हे प्राचीन पालींपासून उत्क्रांत झाले आणि नंतर त्यांनी आपले पाय गमावले.

जेनेटिक (अनुवांशिक) संशोधनानुसार, सापांचे खरे पूर्वज हे लांब आणि बारीक अशा पालींसारखे प्राणी होते. त्यांच्या मागील बाजूला छोटे पाय आणि बोटं होती. हे प्राणी लॉरेशिया नावाच्या उष्ण जंगलांमध्ये राहत होते.

हा तोच खंड आहे, जो पुढे विभागून आजचा उत्तर अमेरिका, ग्रीनलँड, युरोप आणि आशिया बनला आहे.

जगभरात सुमारे 3900 प्रजातीचे साप आढळतात. त्यापैकी फक्त 725 साप विषारी आहेत. त्यातीलही सुमारे 250 प्रजाती इतक्या धोकादायक आहेत की त्यांच्या एका चाव्याने माणसाचा जीव जाऊ शकतो.

जे साप विषारी नसतात, तेही माणसाचा जीव घेऊ शकतात, परंतु असे प्रकार फारच दुर्मिळ आहेत, म्हणजे वर्षाला एक-दोन मृत्यू इतकेच. उदा. अजगर, जो आपल्या शिकारभोवती वेटोळं घालून त्याला गुदमरून मारू शकतो.

जगातील सर्वात धोकादायक 10 साप

जेव्हा आपण विषारी सापांबद्दल बोलतो, तेव्हा त्याचे दोन अर्थ निघू शकतात.

पहिला अर्थ म्हणजे, असा साप जो माणसांना सर्वात जास्त मारतो. दुसरा अर्थ म्हणजे असा साप, ज्याच्या विषात सर्वात जास्त ताकद असते. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.

हे शक्य आहे, कदाचित सर्वात विषारी साप माणसांच्या जवळ राहत नसेल किंवा तो आक्रमक नसेल.

साप चावल्यामुळे मृत्यू शिवाय शरीरावर गंभीर जखमा देखील होतात. काही वेळा टिश्यू नेक्रोसिसमुळे शरीराचा एखादा भाग कापून टाकावा लागतो.

'बीबीसी वाइल्डलाइफ मॅगझिन डिस्कव्हर वाइल्डलाइफ'मध्ये प्राणीवर्तन संशोधक (हर्पेटोलॉजिस्ट) आणि विज्ञान लेखिका लिओमा विल्यम्स यांनी जगातील दहा सर्वात धोकादायक आणि विषारी सापांची यादी दिली आहे.

1. सॉ-स्केल्ड वायपर - फुरसे

सॉ-स्केल्ड वायपर हा साप मध्य पूर्व आणि मध्य आशियामध्ये आढळणारा साप आहे आणि तो खूप आक्रमक स्वभावाचा असतो.

दरवर्षी सर्वाधिक लोकांना मारणारा हा साप दाट लोकसंख्या असलेल्या भागांत आढळतो. त्यामुळेच तो माणसांसाठी खूप धोकादायक ठरतो.

भारतात हा साप दरवर्षी सुमारे पाच हजार लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो.

2. इनलँड टायफन

जेव्हा सर्वात विषारी सापाची चर्चा होते, तेव्हा इनलँड टायफन सर्वात पुढे असतो. हा साप मध्य आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येतो आणि मुख्यतः तो उंदरांची शिकार करतो.

असं म्हटलं जातं की, या सापाच्या एका चाव्यामुळे शंभर लोकांचा जीव जाऊ शकतो. पण सॉ-स्केल्ड वायपरसारखा तो मृत्यूंसाठी जबाबदार नसतो.

याचं कारण म्हणजे, हा साप मानवी वस्त्यांपासून दूर, दुर्गम भागात आणि जमिनीखाली जास्त राहतो.

3. ब्लॅक माम्बा

ब्लॅक माम्बा हा साप इतका भयानक आहे की, जंगलाचा राजा सिंहही त्याच्यासमोर हार मानतो. हा साप सब-सहारा आफ्रिकेत आढळतो आणि टायपनपेक्षा अतिशय आक्रमक असतो.

साधारणपणे माणसांपासून दूर राहणारा हा साप धोक्याची जाणीव झाल्यावर उभा राहतो आणि विजेच्या वेगानं हल्ला करतो.

वेळेवर उपचार न मिळाल्यास, त्याच्या चाव्याने अर्ध्या तासात माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

4. रसल वायपर - घोणस

इंडियन कोब्रा, कॉमन क्रेट, सॉ-स्केल्ड वायपर आणि रसल वायपर हे चौघं एकत्रितपणे 'बिग फोर' म्हणून ओळखले जातात. भारतीय उपखंडात सर्वाधिक मृत्यूंसाठी हे चार साप जबाबदार आहेत. रसल वापरला मराठीत घोणस म्हणतात.

रसल वायपर चावल्यावर तीव्र वेदना होतात. हा साप खूप आक्रमक आणि वेगवान असतो. भारतात साप चावण्याच्या 43 टक्के घटनांमागे हा साप असतो.

5. कॉमन क्रेट - मण्यार

बिग फोरमधील हा साप खूप विषारी आहे आणि त्याच्या चाव्यामुळे मृत्यूची शक्यता 80 टक्के आहे.

या सापाच्या विषात न्युरोटॉक्सिन असतात, जे मांसपेशी सून्न (अर्धांगवायू) करतात, श्वास घेण्यात अडचण आणि मृत्यूसारखे गंभीर परिणाम करू शकतात.

कॉमन क्रेटला मराठीत मण्यार म्हटले जाते.

हा साप प्रामुख्याने इतर साप, उंदीर आणि बेडूक खातो. माणसांच्या समोर तो क्वचितच येतो, परंतु अंधारात त्याच्यावर पाय पडल्यास तो नक्की हल्ला करतो.

6. इंडियन कोब्रा - नाग

भारतातील सर्वात धोकादायक सापांमध्ये इंडियन कोब्राचाही समावेश होतो. पूर्वी भारतात गारूडी या सापासह गल्लोगल्ली फिरायचे.

हा साप विषारी आणि आक्रमक दोन्ही आहे. तो माणसांच्या वस्त्या किंवा जवळपास राहतो, कारण त्याची मुख्य शिकार उंदीर आहे, जे मानवी वस्तीच्या भागात जास्त आढळतात. त्यामुळे माणसांशी याचा अनेकवेळा सामना होतो.

7. पफ ॲडर

भारतीय उपखंडापासून दूर, आफ्रिकेत मोठा आणि भयानक असा पफ अ‍ॅडर साप आढळून येतो. वायपर प्रजातीतील हा साप इतर सर्व आफ्रिकन सापांच्या तुलनेत जास्त लोकांचा जीव घेतो.

धोक्याची जाणीव झाल्यावर हा साप पळत नाही, तर सामोरं जातो. तो बर्‍याचदा त्याच ठिकाणी आराम करताना दिसतो, जिथून लोक ये-जा करतात.

हा साप हल्ला करण्यापूर्वी इशारा देतो. तो आपलं शरीर फुगवतो आणि 'हिस्स' असा आवाज काढतो.

8. कॉमन डेथ अ‍ॅडर

हा साप ऑस्ट्रेलियाच्या जंगलात आढळतो. तो पानांमध्ये लपून बसतो आणि शिकार जवळ आल्यावर हल्ला करतो.

हा साप खास करून त्यांच्यासाठी धोकादायक ठरतो, जे अशा भागात फिरत असताना चुकीने पाय ठेवतात. त्याचं विष प्राणघातक आहे आणि 60 टक्के प्रकरणांमध्ये माणसाचा मृत्यू होतो.

9. किंग कोब्रा

सुमारे चार मीटर लांबीच्या या सापाने 5.85 मीटरचा विक्रम केला आहे. इंडियन कोब्रासारखा, किंग कोब्रा भारतीय उपखंडात सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे.

माणूस त्याच्या प्रदेशात अतिक्रमण करत आहे आणि पारंपरिक चिनी औषधांमध्ये वापरण्यासाठी त्याची शिकार केली जात आहे. भारतात किंग कोब्रा मारल्यास तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

10. ईस्टर्न डायमंडबॅक रॅटलस्नेक

हा उत्तर अमेरिकेतील सर्वात धोकादायक साप आहे. तरीही, आशियातील सापांशी तुलना करता तो कमी धोकादायक वाटतो आणि दरवर्षी अमेरिकेत सुमारे पाच लोकांचा याच्या चाव्याने मृत्यू होतो.

हा साप खूप मोठा आणि जड आहे. त्याचं वजन 15 किलोपेक्षा जास्त असू शकतं. त्याच्या विषात हेमोटॉक्सिन असतं, जे लाल रक्त पेशींवर हल्ला करतं.

या दहा सापांशिवाय टायगर स्नेक, कोस्टल टायपन आणि ईस्टर्न ब्राउन स्नेक सुद्धा धोकादायक सापांमध्ये गणले जातात.

सापांचे विष वेगवेगळं असतं का?

सापांमध्ये दोन प्रकारचे विष आढळतं. न्युरोटॉक्सिक विष नर्व्हस सिस्टिमवर (मज्जासंस्था) परिणाम करतं आणि त्यामुळे मांसपेशी सुन्न (पक्षाघात) होऊ शकतात. हेमोटॉक्सिक विष रक्ताभिसरण प्रणालीवर परिणाम करतं, ज्यामुळे रक्त आणि टिश्यूला (ऊती) हानी पोहोचते.

"कोब्रा, माम्बा आणि क्रेट्स या सापांमध्ये न्युरोटॉक्सिक विष असतं, तर रॅटलस्नेक आणि अ‍ॅडरसारख्या वायपर सापांमध्ये हेमोटॉक्सिक विष असतं. तरीही काही अपवादही आहेत, काही सापांचे विष दोन्ही प्रकारचे म्हणजेच संमिश्र परिणाम करू शकतात. काही वायपर सापांमध्ये न्युरोटॉक्सिक घटक असतात, तर काही सापांचे विष मिश्रित प्रकारचे असतात.

आता प्रश्न असा पडतो की, भारतात सर्पदंशामुळे इतके मृत्यू का होतात? 'स्नेकबाइट हीलिंग अँड एज्युकेशन सोसायटी'च्या अध्यक्ष आणि संस्थापक प्रियंका कदम सांगतात की, भारतात जैवविविधता खूप समृद्ध आहे आणि लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे साप चावल्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण इथंच सर्वाधिक नोंदवले जातात.

प्रियंका यांनी बीबीसीला सांगितलं की, "वायपर प्रजातींच्या सापांचं विष हेमोटॉक्सिक असतं, जे रक्तावर परिणाम करतं. त्यामुळे रक्त पातळ होतं, आतून रक्तस्त्राव होतो, ज्याला इंटर्नल हॅमरेज म्हणतात. रक्तवाहिन्या फुटू लागतात आणि त्याचा किडनीवरही परिणाम होतो.

एखाद्या व्यक्तीचा साप चावल्यामुळे लगेच मृत्यू होत नाही, परंतु त्याच्यामुळे गुंतागुंत होऊ शकते. जर हेमोटॉक्सिक विष शरीरात शिरलं तर एखादी व्यक्ती जगू शकते, परंतु मूत्रपिंड खराब होऊ शकतं, अंतर्गत समस्या उद्भवू शकतात, अवयव प्रभावित होऊ शकतात."

त्यांनी सांगितलं की क्रेट आणि कोब्रासारख्या सापांमध्ये न्युरोटॉक्सिक विष असतं. हे विष नर्व्हस सिस्टिमवर परिणाम करतं, ज्यामुळे मांसपेशी काम करणं थांबवतात. हे विष एवढं घातक असतं की, माणसाला श्वास घेणंही अशक्य होतं.

म्हणून असे साप चावल्यावर जर लवकर उपचार मिळाले नाहीत, तर माणसाचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.

अँटी व्हेनम न मिळणं ही मोठी समस्या आहे का, यावर प्रियंका कदम म्हणतात की, "भारतात अँटी व्हेनम प्रामुख्यानं बिग फोर सापांसाठी तयार केले जातात. परंतु, आपल्या देशात विशेषतः ईशान्यमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळतात.

उदा. बंगालमध्ये ग्रेटर ब्लॅक क्रेट आणि लेसर ब्लॅक क्रेटसारखे साप आहेत. जेव्हा हे साप चावतात, तेव्हा योग्य वेळी योग्य अँटी व्हेनम उपलब्ध नसल्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता खूप वाढते."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.