You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एका वर्षाच्या मुलानं घेतला सापाचा चावा, सापाचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
- Author, सीटू तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बिहारमधील बेतियामधून एक वेगळंच प्रकरण चर्चेत आलं आहे. इथल्या एका वर्षाच्या मुलानं कथितरित्या एका सापाला दातानं चावलं. त्याच्या या चावण्यामुळे सापाचा मृत्यू झाला आहे.
या मुलाच्या कुटुंबीयांचा असा दावा आहे की, हा विषारी असा कोब्रा साप होता.
गेल्या गुरुवारी घडलेल्या या घटनेनंतर हा एक वर्षांचा मुलगा आकर्षणाचा विषय ठरला आहे. हा मुलगा सध्या बरा आहे.
हे प्रकरण बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील आहे, ज्याचं बेतिया हे मुख्यालय आहे.
बेतियाच्या माझौलिया ब्लॉकमध्ये मोहछी बनकटवा नावाचं गाव आहे. या गावामध्ये सुनील साह नावाचे व्यक्ती आईस्क्रीम विकून आपला उदरनिर्वाह भागवतात.
सुनील साह यांचा गोविंद कुमार नावाचा एक वर्षाचा मुलगा आहे. या गोविंद कुमारनेच कथितरित्या सापाला दातानं चावलं आहे.
गोविंद कुमारची आज्जी मतिसरी देवी सांगतात की, "याची आई घराच्या मागे काम करत होती. ती लाकडे व्यवस्थित करत होती. तेव्हा तिथून साप निघाला. गोविंद तिथेच बसून खेळत होता. त्याने सापाला पाहिलं आणि त्याला पकडून दाताने चावलं, तेव्हा आमची नजर त्यावर पडली. तो कोब्रा साप होता."
"सापाला दातानं चावल्यानंतर काही वेळातच तो बेशुद्ध झाला. त्यानंतर आम्ही त्याला मझौलिया प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेलो. तिथे त्याला बेतिया हॉस्पिटलसाठी (गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जीएमसीएच) रेफर करण्यात आलं. आता मुलगा बरा आहे."
मझौलियातील स्थानिक पत्रकार नेयाज सांगतात की, "हा मुलगा शनिवारी सायंकाळी घरी आला होता. त्याच्याबद्दल सातत्याने चर्चा होत आहे. श्रावण महिन्यात अशा प्रकारे साप येणं ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, या प्रकारची घटना आमच्या परिसरात पहिल्यांदाच घडली आहे."
काय आहे कारण?
गोविंद कुमारला गुरुवारी सायंकाळी बेतिया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आलं. त्याच्यावर उपचार करणारे डॉ. कुमार सौरभ बालरोग विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत.
ते सांगतात की, "या मुलाला जेव्हा भरती करण्यात आलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर सूज होती. खासकरुन तोंडाच्या आसपास. त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं की, त्याने सापाला तोंडाजवळ चावलं आणि त्याचा काही भाग खाल्ला."
"माझ्याकडे एकाचवेळी दोन प्रकारच्या केसेस होत्या. एक असा मुलगा ज्याला कोब्राने चावलं होतं आणि एक असा ज्याने कोब्राला चावलं होतं. आता ही दोन्हीही मुलं पूर्णपणे बरी आहेत."
डॉ. कुमार सौरभ यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "कोब्रा जेव्हा माणसाला चावतो तेव्हा त्याचं विष आपल्या रक्तात भिनतं. रक्तात विष गेल्याने न्यूरोटॉक्सिसिटी होते. त्यामुळे, आपली नर्व्हस सिस्टीम प्रभावित होते आणि मृत्यूची शक्यता वाढते."
पुढे डॉ. सौरभ सांगतात की, "दुसऱ्या बाजूला, जेव्हा एखादा मनुष्य कोब्राला चावतो, तेव्हा तोंडावाटे हे विष आपल्या पचनसंस्थेपर्यंत पोहोचतं. मनुष्याचं शरीर त्या विषाला निष्क्रिय करुन टाकतं आणि हे विष बाहेर पडतं. याचा अर्थ, विष दोन्ही ठिकाणी काम करतं. मात्र, एका प्रकरणात विषाचा परिणआम नर्व्हस सिस्टीमवर होतो तर दुसऱ्या प्रकरणात मनुष्याचं शरीर विषाला निष्क्रिय करुन टाकतं. "
मात्र, डॉ. कुमार सौरभ सांगतात की, जेव्हा एखादा माणूस सापाला चावतो तेव्हा त्याचा वाईट परिणाम देखील होऊ शकतो.
डॉ. कुमार सौरभ स्पष्ट करतात की, "जेव्हा एखाद्या माणसाला साप चावतो तेव्हा अन्ननलिकेमध्ये अल्सरसारखा ब्लीडिंग पॉईंट असल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते."
'स्नेक बाईट कॅपिटल'
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी 80 हजार ते 1 लाख 30 हजार लोक सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडतात.
यापैकी भारतात दरवर्षी सरासरी 58 हजार लोकांचा मृत्यू होतो. यामुळे भारताला 'स्नेकबाईट कॅपिटल ऑफ द वर्ल्ड' हा दर्जा मिळाला आहे.
बिहार राज्याच्या हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (HMIS) कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2023 ते मार्च 2024 दरम्यान राज्यात साप चावल्यामुळे 934 मृत्यू झाले.
या कालावधीत, 17,859 रुग्ण सर्पदंशामुळे उपचारासाठी सरकारी रुग्णालयात आले.
परंतु केंद्र सरकारच्याच एका अहवालानुसार, देशभरात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 'कमी नोंदवली' गेली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालात असं नमूद केलं आहे की सर्पदंशाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, खूप कमी रुग्ण रुग्णालयात पोहोचू शकतात, ज्यामुळे सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी नोंदवली जाते.
शिवाय, सर्पदंशामुळे होणाऱ्या 70 टक्के मृत्यू बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि गुजरातमध्ये होतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)