You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
साप उन्हाळ्यात घरांमध्ये का शिरतात? साप घरात येऊ नयेत म्हणून 'हे' करा
- Author, झेवियर सेल्वाकुमार
- Role, बीबीसी तामिळ
"मी एकट्यानंच आज 5 साप पकडले आहेत. मी पकडलेल्या सापांपैकी ग्लास वायपर आणि कोब्रा हे विषारी साप आहेत. मांजऱ्या साप (कॅट स्नेक) हा मध्यम स्वरुपाचा किंवा सौम्य विषारी साप असतो.
"तर इतर दोन साप बिनविषारी आहेत. माझ्याप्रमाणेच कोईंबतूरमधील काही सर्पमित्रांनी 4 किंवा 5 साप पकडले आहेत. नेहमीपेक्षा ही संख्या थोडी जास्त आहे."
कोईंबतूरमध्ये गेल्या 27 वर्षांपासून सर्पमित्र किंवा साप पकडण्याचं काम करणारे अमिन बीबीसीला सांगत होते.
सर्पमित्रांकडून मिळालेली माहिती या गोष्टीला बळ देते की, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप घरांमध्ये शिरतात. मात्र, संशोधकांचं म्हणणं आहे की उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये साप घरात शिरण्याची शक्यता अधिक असते, याचा आकडेवारीवर आधारित कोणताही पुरावा नाही.
तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की, जर साप दिसले तर वनविभाग किंवा अग्निशमन दलाला त्यासंदर्भात कळवलं पाहिजे.
भारतात सापांच्या 362 प्रजाती आढळतात. या प्रजाती पश्चिम घाट, पूर्व घाट आणि मैदानी प्रदेशामध्ये प्रामुख्यानं आढळतात.
तामिळनाडूमध्ये त्यापैकी 134 प्रजाती आहेत, असं आय. विश्वनाथ म्हणतात. ते सरपटणारे प्राणी आणि प्राणी संवर्धन समितीचे संस्थापक (फाऊंडर, रेप्टाईटल नेचर अँड ॲनिमल कॉन्झर्व्हेशन कमिटी) आहेत.
"तामिळनाडूत सूचीबद्ध करण्यात आलेल्या सापाच्या 134 प्रजातींपैकी फक्त 17 साप अत्यंत विषारी आहेत. तर सापाच्या 11 प्रजाती विषारी नसलेल्या मात्र विषारी साप म्हणून ओळखण्यात आल्या आहेत."
"सापाच्या 20 प्रजाती अशा आहेत ज्या निरुपद्रवी आणि विषारी अशा दोन्ही स्वरुपाच्या आहेत. याव्यतिरिक्त सापाच्या 86 प्रजाती बिन-विषारी म्हणून नोंदवण्यात आल्या आहेत," असं विश्वनाथ म्हणतात.
साप हा शीत रक्ताचा प्राणी
मनोज, कृष्णगिरीमधील ग्लोबल स्नेकबाईट एज्युकेशन अँड रिसर्च ऑर्गनायझेशनचे संस्थापक आणि मुख्य वैज्ञानिक आहेत. ते म्हणतात की दक्षिण भारतात सर्पदंशाच्या प्रकरणांमध्ये तामिळनाडू आघाडीवर आहे.
सर्पदंशावरील संशोधनात त्यांनी डॉक्टरेट केली आहे. सध्या ते इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) बरोबर संशोधन करत आहेत.
"भारतात दरवर्षी 10 लाख लोकांना साप चावतात आणि त्यात 58,000 लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं दिली आहे. भारतात होणाऱ्या 100 सर्पदंशांपैकी 95 सर्पदंश बिन-विषारी सापांचे असतात आणि फक्त 5 सर्पदंश, '4 मोठे' विषारी साप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सापांचे असतात," असं मनोज म्हणतात.
सर्पमित्र म्हणून काम करणाऱ्या विश्वनाथ यांचं म्हणणं आहे की नाग, घोणस, मण्यारसारखे विषारी साप सर्वसाधारणपणे रहिवासी वस्त्यांजवळ राहतात. ते म्हणतात की कर्ली वायपर हा साप फक्त उष्ण खडक असलेल्या भागात राहतो.
ते असंही लक्षात आणून देतात की अनेकजण जे या सापांच्या नैसर्गिक अधिवासाच्या जवळ राहतात किंवा शेजारी राहतात, त्यातील बरेचजण कर्ली वायपर साप चावल्यामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.
विश्वनाथ म्हणतात की उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये रहिवासी भागात अधिक साप येतात. ते यामागचं कारणदेखील सांगतात. इतर सर्प संशोधकदेखील हेच कारण असल्याचं सांगतात. ते असंही म्हणतात की अन्नाचा तुटवडा हे त्यामागचं प्रमुख कारण आहे.
"साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे. तो अवतीभोवतीच्या वातावरणानुसार शरीराचं तापमान जुळवून घेत असतो. त्यामुळे उन्हाळ्यात जेव्हा तापमान आणि उष्णता वाढलेली असते, तेव्हा साप तुलनेनं थंड जागी जातात. ज्यावेळेस आसपासचं हवामान थंड असतं, तेव्हा साप तुलनेनं उबदार ठिकाणी जातात," असं विश्वनाथ म्हणतात. ते सापांना वाचवण्याच्या कामातील तज्ज्ञ आहेत.
ते पुढे म्हणतात, "घरात शिरणाऱ्या सापांमध्ये कोब्रा, बँडेड वायपर आणि ग्लास वायपर या विषारी सापांचा समावेश असतो. मैदानी प्रदेशात आढळणाऱ्या सापाच्या 24 बिनविषारी प्रजातींनी घराकडं किंवा निवासी भागाकडं जाणं स्वाभाविक आहे."
"उन्हाळ्यात सापाची पिल्लं अंड्यांमधून बाहेर पडतात. त्यामुळे या काळात आम्ही सापांची अधिक पिल्लं वाचवत आहोत."
सापाच्या कोणत्या प्रजाती कुठे राहतात?
विश्वनाथ म्हणतात की सर्वसामान्यपणे आढणारे साप, सामान्यत: आढळणारे अजगर, कंदंगंगदाईसारखे पाण्यातील साप, मैदानी प्रदेशात राहणारा कलियांगुट्टी आणि ऑईल पाम साप, लीफ स्नेक, वर्म स्नेक, सँड स्नेक, रेड सँड स्नेक, रिंग्ड स्नेक, रनिंग स्नेक आणि हिरवा साप यासारखे बिनविषारी साप उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरात किंवा निवासी भागात येण्याची शक्यता अधिक असते.
"त्याचप्रमाणे डोंगरांमध्ये आणि डोंगर पायथ्याशी आढळणारे किंग कोब्रा किंवा राजा नागम, पिट वायपर, बांबू पिट वायपर आणि पश्चिम घाटात आढळणारे मलबारी चापडा (मलबार पिट वायपर), उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त आर्द्रता असलेल्या ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात."
"नाकाड्या चापडा (हम्प-नोज्ड पिट वायपर) हा साप बागांमध्ये, विशेषकरून चहाच्या मळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतो. या प्रकारचा साप रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो," असं विश्वनाथ म्हणतात.
सिराजउद्दीन, वाईल्डलाईफ अँड नेचर कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक आहेत. ते ही गोष्ट मान्य करतात की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गारव्याच्या शोधात साप रहिवासी भागांमध्ये शिरतात. मात्र ते म्हणतात की या काळात जंगलात उंदरासारख्या सापाच्या अन्नाचा तुटवडा असल्यामुळे, अनेक साप निवासी वस्त्यांमध्ये येतात.
"उन्हाळ्यात थंड ठिकाणी साप असणं आणि पावसाळ्यात, हिवाळ्यात गरम किंवा उबदार ठिकाणी साप असणं ही सामान्य बाब आहे. साप मानवी वस्त्यांमध्ये येत आहेत असं म्हणण्याऐवजी आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सापांचा नैसर्गिक अधिवास नष्ट किंवा कमी होत आहेत. त्यामुळे अन्नाच्या शोधात ते मानवी वस्त्यांकडे येत आहेत," असं सिराजउद्दीन म्हणतात.
ते पुढे म्हणाले, "बेडूक आणि उंदीर हे सापाचं मुख्य अन्न असतात. मोठ्या संख्येनं बेडकं असलेली तळी, तलाव मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहेत. त्यामुळे उंदीर हेच सापाचं मुख्य अन्न बनले आहेत."
"ज्या ठिकाणी अन्न, किंवा अन्नाचा कचरा टाकला जातो, तिथे उंदीर मोठ्या संख्येनं येतात. साहजिकच त्या उंदरांच्या शोधात सापदेखील येतात. साप रहिवासी भागांमध्ये येण्यामागचं हे देखील एक प्रमुख कारण आहे."
साप घरात येऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे?
घरात साप येऊ नयेत यासाठी सर्वसामान्य लोकांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, यासाठीच्या अनेक उपायांची यादी सर्प संशोधकांनी दिली आहे. या गोष्टी फक्त उन्हाळ्यातच नाहीतर नेहमीच अंमलात आणाव्यात, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर घरात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याचीही यादी त्यांनी दिली आहे.
सर्पमित्र किंवा सापाचा बचाव करण्यातील तज्ज्ञ असलेल्या विश्वनाथ यांनी बीबीसीला सांगितलं की, "उन्हाळ्यात हवेशीर वाटावं म्हणून अनेकजण जमिनीवर झोपतात. त्यावेळेस मच्छरदाणीसारख्या संरक्षक गोष्टींचा वापर करणं महत्त्वाचं आहे."
"काही साप घरात दारातून येतात. ते स्वयंपाकघरातील सिंकच्या पाईपमधूनदेखील आत येऊ शकतात. आम्ही काही साप अशाच प्रकारे पकडले आहेत. त्यांना झाकणं महत्त्वाचं असतं."
विश्वनाथ सल्ला देतात की, "बूट घराबाहेर तसेच ठेवण्याऐवजी भिंतीवरील खिळ्यावर टांगणं किंवा एखाद्या स्टँडवर ठेवणं चांगलं. नाहीतर छोटे साप त्यात शिरतील आणि आत लपून बसतील. जरी ते बूट हलवले तरी त्यातील साप बाहेर येणार नाहीत."
"तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये साप कारच्या आत शिरतात. दिवसा डांबरी रस्ते उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती उष्णता सोडतात. त्यामुळे साप रस्त्यावरच असतात. म्हणून रात्री बाहेर जाताना टॉर्चशिवाय बाहेर जाणं टाळलं पाहिजे."
सिराजउद्दीन म्हणतात की साप इमारतींच्या कोपऱ्यात, विटांच्या बांधकामात जिथे उन्हाळ्याच्या दिवसात थोडं थंड वाटतं अशा ठिकाणी लपतात. त्यामुळे अशा ठिकाणी वावरताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. ते म्हणतात की घराभोवती लाकूड, पुठ्ठ्याचे खोके आणि अनावश्यक वस्तूंचा ढीग करण्याचं टाळलं पाहिजे.
मात्र या गोष्टीला पाठबळ देणारी कोणतीही संशोधनात्मक माहिती नाही असं गणेशन म्हणतात. ते चेन्नई स्नेक पार्कचे प्रशासक आहेत आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे संशोधक आहेत. उन्हाळ्यात साप घरांमध्ये, रहिवासी भागात येतात आणि इतर काळात कमी येतात असा एक सामान्य समज आहे.
"कोणताही ऋतू असला तरी घरांकडे, निवासी वस्त्यांकडे साप जाणं ही सामान्य बाब आहे. जेव्हा साप घरात शिरतात तेव्हा त्यांना मारण्याचा किंवा हाकलण्याचा प्रयत्न करू नये. तर अशावेळी जवळच्या वन विभागाला किंवा अग्निशमन दलाला त्याची माहिती द्यावी. घराच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे," असं गणेशन पुढे सांगतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.