You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राम रहीमला चार महिन्यात दुसऱ्यांदा पॅरोल, आता 40 दिवसांसाठी बाहेर येणार
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला पुन्हा एकदा 40 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. गुरमीत राम रहीम ला हत्या आणि बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षांती शिक्षा झाली आहे.
पीटीआय ने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.
वृत्तसंस्था एएनआय ने पोलिसांच्या हवाल्याने सांगितलं की पॅरोलशी निगडीत कागदपत्रांची पूर्तता होणं अद्याप बाकी आहे. 21 जानेवारीला राम रहीमची सुटका केली जाईल.
सध्या तो रोहतकच्या तुरुंगात आहे.
गेल्या चार महिन्यात राम रहीमला दुसऱ्यांदा पॅरोलवर सोडण्यात आलं आहे. याआधी ऑक्टोबरमध्येही त्याला 40 दिवसांचा पॅरोल देण्यात आला होता.
हरियाणाचे तुरुंग मंत्री रंजीत सिंह चौटाला एएनआयशी बोलताना म्हणाले, "डेराच्या प्रमुखान तुरुंग अधिकाऱ्यांना राम रहीमला एक महिन्याचा पॅरोल देण्यासाठी निवेदन दिलं होतं. मात्र किती दिवसाचा पॅरोल द्यायचा हे आयुक्त ठरवतील."
डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाला हरियाणाच्या पंचायत समितीच्या निवडणुका आणि आदमपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या दरम्यान पॅरोल मिळाला होता.
राम रहीम 17 जून ला एक महिन्याच्या पॅरोलवर बाहेर आला होता.
राम रहीम त्याच्या दोन महिला शिष्यांवर बलात्काराच्या आरोपाखाली 2017 पासून अटकेत आहे.
गुरमीत राम रहीमचं वादांशी जुनं नातं राहिलेलं आहे.
15 ऑगस्ट 1967 ला राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये जन्मलेले राम रहीम 1990 मध्ये डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बनले होते.
डेराची स्थापना 1948 मध्ये शाह मस्ताना यांनी केली होती. आज संपूर्ण देशात त्यांचे 50 पेक्षा अधिक आश्रम आणि लाखोंच्या संख्येनं अनुयायी आहेत.
डेराचं प्रमुख काम सामाजिक कार्य, रक्तदान आणि गरिबांसाठी मदत गोळा करणं अशा प्रकारचं आहे. एवढंच नाही तर, डेरा प्रमुखांनी चित्रपटांत क्षेत्रातही नशीब आजमावलं आहे.
गुरमीत राम रहीम यांच्या मुलाचा विवाह काँग्रेसचे सदस्य हरमिंदर सिंग जस्सी यांच्या मुलीबरोबर झाला आहे. मात्र, यापूर्वीच्या हरियाणातील निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पार्टीला साथ दिली होती.
डेरा सच्चा सौदाशी संबंधित 11 मोठे वाद
सिरसा येथील आश्रमात डेराचं रुग्णालय असून त्या ठिकाणी लोकांवर स्वस्तात उपचार केले जातात.
डेरा प्रमुख बनल्यानंतर राम रहीम अनेक वादांमध्ये अडकले आहेत.
राम रहीम यांच्याशी संबंधित पहिला सर्वाधिक चर्चा झालेला वाद 1998 मध्ये समोर आला होत. त्यावेळी बेगू गावातील एक लहान मुलगा डेराच्या जीपखाली आला होता. त्या ठिकाणच्या वृत्तपत्रामध्ये हे वृत्त प्रकाशित झालं. त्यानंतर डेराच्या लोकांनी वृत्तपत्राच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला होता. नंतर डेरानं याप्रकरणी माफी मागितली होती.
हत्या, लैंगिक शोषणाचं प्रकरण
2002 मध्ये एक मोठं प्रकरण समोर आलं. एका तथाकथित साध्वीनं तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना एक पत्र लिहून गुरमीत राम रहीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडं सोपवण्यात आली.
त्याचवर्षी राम रहीमवर डेरा सच्चा सौदाबाबत बातम्या देणाऱ्या रामचंद्र छत्रपती नावाच्या एका पत्रकाराच्या हत्येचा आरोप लागला. तसंच डेराचेच व्यवस्थापक रणजित सिंग यांच्या हत्येचाही आरोप लागला. सिसरा येथील सायंदैनिक 'पूरा सच'चे संपादक असलेल्या रामचंद्र छत्रपती यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या.
गुरू गोविंद सिंगांच्या वेशातील फोटो
2007 मध्ये डेरा सलावतपुरामध्ये डेरा प्रमुख गुरमीत सिंग यांनी गुरुगोविंद सिंग यांच्या वेशात फोटो काढले. त्याच्या विरोधात भटिंडामध्ये डेरा प्रमुखांचा पुतळा जाळण्यात आला.
आंदोलक शिखांनी डेराच्या अनुयायांवर हल्ला केला. त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. शीख आणि डेराचे अनुयायी यांच्यात ठिकठिकाणी झटापटी झाल्या. त्यात कोमल सिंग या शीख तरुणाचा मृत्यू झाला.
त्यानंतर डेरा प्रमुखांच्या पंजाबमध्ये जाण्यावर बंदी लावण्यात आली. मात्र डेरा सच्चा सौदा या प्रकरणी माघार घ्यायला तयार नव्हते. अखेर गंभीर स्थिती पाहता संपूर्ण पंजाब आणि हरियाणामध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले.
नामचर्चेत हिंसाचार
त्याचवर्षी सिरसामधील एका गावात बंदी असतानाही, डेरा सच्चा सौदानं नामचर्चा आयोजित केली. नामचर्चेत सहभागी होण्यासाठी डेरा प्रमुख ताफ्यासह पोहोचले. शिखांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला. पाहता-पाहता गर्दीनं भयावह रुप धारण केलं. दोन्ही बाजुंनी दगडफेक सुरू झाली. डेरा प्रमुखांना नामचर्चा अर्ध्यातच सोडून पळावं लागलं.
त्यानंतर मल्लेवाला गावात नामचर्चेच्या मुद्दयावरून पुन्हा वाद सुरू झाला. डेराच्या एका अनुयायानं बंदुकीनं गोळ्या झाडल्या, त्यामुळं तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह आठ शीख जखमी झाले. त्यामुळं पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
शिखांनी डेराच्या अनुयायांच्या विरोधात ठिक-ठिकाणी आंदोलनं केली. पंजाबचे तत्कासीन उप मुख्यमंत्री सुखबीर बादल यांनी जखमींची माहिती घेत, हरियाणा सरकारला शिखांना सुरक्षा प्रदान करण्यास सांगितलं.
न्यायाधीशांनी मागितलं संरक्षण
सीबीआयनं डेरा प्रमुख गुरमीत सिंगला न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले. त्यावेळी डेराने सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांनाही धमकीचं पत्र पाठवलं, त्यामुळं न्यायाधीशांनाही संरक्षण मागावं लागलं.
न्यायालयानं हत्या आणि बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणातील मुख्य आरोपी डेरा प्रमुख गुरमीत सिंग यांना जामीन मंजूर केला. मात्र, त्यांचे दोन सहकारी हत्येच्या आरोपात तुरुंगातच होते.
ही प्रकरणं सध्या पंचकुलामधील सीबीआयच्या विशेष न्यायालयात विचाराधीन आहेत.
2007 पासून आतापर्यंत या तिन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयीन कारवाईवर दबाव आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
2007 मध्ये सीबीआय न्यायालय अंबालामध्ये होतं. त्यावेळी सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्यानं, डेरा प्रमुखांनी हजारो समर्थकांना गोळा करून, शक्तीप्रदर्शन केलं. न्यायालयावर सातत्यानं दबाव निर्माण करण्यासाठी गर्दी जमावण्याचं धोरण राम रहीमनं अवलंबलं.
फकीरचंद हत्या प्रकरण
2010 मध्ये डेराचेच माजी कर्मचारी राम कुमार बिश्नोई यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून डेराचे माजी व्यवस्थापक फकीरचंद बेपत्ता असल्याच्या प्रकरणाच्या सीबीआय तपासाची मागणी केली. डेरा प्रमुखांच्या आदेशावरून फकीरचंदची हत्या करण्यात आल्याचा आरोप, बिश्नोई यांनी केला होता.
या प्रकरणातही उच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिले. मात्र, सीबीआय चौकशी दरम्यान या प्रकरणी पुरावे मिळाले नाही त्यामुळं सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला. बिश्नोई यांची उच्च न्यायालयात या क्लोजर रिपोर्टलाही आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं.
विराटपासून विजेंदरपर्यंत अनेकांनी घेतलं ट्रेनिंग
गुरुमित राम रहीम बाबाने एक व्हीडिओ प्रसिद्ध केला होता. "अनेक मुलं भारतासाठी पदकांची कमाई करत आहेत. विजेंदरनं देशाची मान उंचावली आहे. विराट कोहलीनंही यश मिळवलं आहे. ते आमच्याकडे आले होते. आमच्याकडून कसे शिकले, याचे आमच्याकडे व्हीडिओ आहेत. आता हीच मुलं देशाचं नाव मोठं करत आहेत, असं त्यांनी व्हीडिओत म्हटलं.
साधुंना नपुंसक बनवल्याचा आरोप
फतेहाबाद जिल्ह्याच्या टोहानामध्ये राहणारे हंसराज चौहान (डेराचे पूर्वाश्रमीचे साधू) यांनी जुलै 2012 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी डेरा सच्चा सौदा प्रमुखांवर 400 साधुंना नपुंसक बनवल्याचा आरोप केला होता.
न्यायालयासमोर 166 साधुंची नावासह माहिती सादर करण्यात आली. हे प्रकरणही न्यायालयात विचाराधीन आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)