आसारामपुत्र नारायण साई यांचं काय होणार?

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात आसाराम बापूंना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यांचा मुलगा नारायण साई यांच्यावरही साक्षीदारांना धमकावल्याचे आणि त्यांच्या हत्येचे आरोप आहेत. त्यामुळे नारायण साईंचं आता काय होणार हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

आसाराम यांच्याबरोबर या प्रकरणात शिवा, शरतचंद्र, शिल्पी आणि प्रकाश हे देखील आरोपी होते. न्यायालयानं शिल्पी आणि शरतचंद्र यांना 20-20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शिवा आणि प्रकाशला न्यायालयानं निर्दोष सोडलं आहे.

शरतचंद्र हे छिंदवाड्याच्या आश्रमाचे संचालक होते जिथं पीडिता राहत होती. शिल्पी या छिंदवाडा आश्रमाच्या वॉर्डन होत्या.

दरम्यान, आसाराम बापूंचा मुलगा नारायण साईचं काय सुरू आहे? ज्यावेळी आसाराम बापूंवर जोधपूरमध्ये सुनावणी सुरू होती त्याचवेळी बलात्कार प्रकरणी साई यांच्यावर सुरतमध्ये सुनावणी सुरू होती.

सुरतमध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. गुरुवारी नारायण साईंना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

50 दिवस होते फरार

50 दिवस फरार झाल्यानंतर नारायण साईंना दिल्ली पोलिसांनी 2013मध्ये अटक केली होती. या प्रकरणात 34 आरोपी आहेत त्यापैकी नारायण साई एक आहेत.

सुरत पोलिसांनी या प्रकरणात दोन तक्रारी दाखल केल्या आहेत. एक आसाराम यांच्याविरोधात आणि दुसरी साई यांच्याविरोधात आहे.

6 ऑक्टोबर 2013मध्ये त्या दोघांविरोधात बलात्कार, लैंगिक शोषण आणि डांबून ठेवणे हे गुन्हे दाखल केले गेले होते.

त्यानंतर आसाराम बापूंना अहमदाबादला पाठवण्यात आलं होतं. पीडित दोन बहिणींपैकी छोट्या बहिणीनं नारायण साईंविरोधात तक्रार दाखल केली होती.

मोठ्या बहिणीनं आसाराम बापू यांच्याविरोधात तक्रार केली होती. 1997 ते 2006 मध्ये आपलं लैंगिक शोषण करण्यात आलं होतं असा आरोप तिनं केला होता.

आजारी आईला भेटण्यासाठी साईंनी अर्ज केला होता. गुजरात उच्च न्यायालयानं नारायण साईंना तीन आठवड्यांचा जामीन दिला होता. त्यावेळी त्यांच्या आईला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

29 एप्रिलला मात्र त्यांचा दुसरा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. आईच्या हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे यासाठी त्यांनी जामीन मागितला होता. ज्यावेळी डॉक्टर ऑपरेशनची तारीख जाहीर करतील त्यावेळी जामीन दिला जाईल असं न्यायालयानं म्हटलं.

निवडणूक लढवण्यासाठी मागितला होता जामीन

जानेवारी 2017मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी नारायण साईंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जामीन मागितला होता.

उत्तर प्रदेशातून दोन जागांवर निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असून निवडणुकीच्या तयारीसाठी जामीन देण्यात यावा असं त्यांनी न्यायालयाला म्हटलं होतं. न्यायालयानं त्यांची ही मागणी फेटाळली होती.

बलात्कार प्रकरणाशी संबंधित साक्षीदारांना धमकावण्याचे आणि त्यांच्या हत्येचे आरोप देखील साईंवर आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)