मरेपर्यंत जेलमध्येच राहणार आसाराम

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयानं आध्यात्मिक गुरू आसाराम बापूंना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 2013 सालच्या या प्रकरणात आज सकाळीच कोर्टात त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले होते.

शिल्पी आणि शरतचंद्र यांना 20 वर्षांचा कारावास सुनावण्यात आला आहे.

ज्या छिंदवाडाच्या आश्रमात बलात्काराचं प्रकरण घडलं त्या आश्रमाचे शरतचंद्र हे संचालक होते. तर शिल्पी वॉर्डन होत्या.

तर प्रकाश आणि शिवा यांची कोर्टानं सुटका केली आहे. घटना घडली तेव्हा प्रकाश आश्रमाचे आचारी होते, त्याचवेळी शिवा हे आसाराम यांचे स्वीय सहाय्यक होते.

अकोल्यात तोडफोड

अकोल्यामध्ये वाशिम रोडवर असलेल्या आसाराम बापूंच्या आश्रमाची तोडफोड करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे.

पण पोलिसात मात्र अजूनही यासंदर्भात तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे नेमकी तोडफोड कुणी केली हे स्पष्ट करता येत नसल्याचं अतिरीक्त पोलीस अधीक्षक व्ही. एम. सागर यांनी म्हटलं आहे.

दुपारी 3.46 : जोधपूरच्या पोलीस उपायुक्तांनी व्यक्त केलं सामाधान

दुपारी 3.30 वाजता : मुंबई आश्रमातील अनुयायी बाहेर पडण्यास सुरुवात

दुपारी 3. 23 वाजता : मुंबईतील आश्रमाबाहेरील स्थिती

आसाराम यांना शिक्षा सुनावल्यानंतर मुंबईतील आश्रमाबाहेरील त्यांचे अनुयायी.

नेमकं काय घडलं होतं?

77 वर्षांच्या आसाराम बापूंवर 2013 मध्ये 16 वर्षांच्या मुलीवर जोधपूरजवळच्या एका आश्रमात बलात्कार करण्याचा आरोप आहे. मुलीचे आईवडील आसारामचे अनुयायी होते.

15 ऑगस्ट 2013 रोजी पीडित मुलगी शाळेत पडली, तेव्हा तिच्यावर उपचार करण्यासाठी तिचे आईवडील तिला आसारामांच्या आश्रमात घेऊन गेले. पोलिसांच्या मते तेव्हाच आसाराम यांनी तिच्यावर बलात्कार केला होता.

त्यानंतर आसाराम बापूंना इंदूरमध्ये अटक करण्यात आली. अटकेनंतर समर्थकांनी गोंधळ घातला आणि निदर्शनं केली.

अटकेनंतर त्यांची पौरुषत्व चाचणी घेण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली आणि मग 2 सप्टेंबर 2013ला त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत.

आसाराम यांच्याकडून आतापर्यंत 12 वेळा जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यातला एकही अर्ज कोर्टाने स्वीकारला नाही.

2014 मध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली तेव्हा अनेक साक्षीदारांवर आसाराम यांच्या समर्थकांनी हल्ला केला होता.

सकाळी 11.45 : 'आम्ही प्रार्थना करत आहोत'

आम्हाला देवावर आणि देवाच्या न्यायावर विश्वास आहे, असं संदीप मिश्रा या आसाराम यांच्या अनुयायाने मुंबईत म्हटलंय. त्यांच्यासह इतर पाठीराखे गोरेगावातल्या आश्रमात जमले आहेत.

सकाळी 11.35 : 'ढोंगी बाबा ओळखा'

"आता तरी निदान लोकांना खरे संत आणि ढोंगी बाबांमधलं अंतर कळायला हवं. कारण याने भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर वाईट प्रतिमा तयार होते," असं काँग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी म्हटलंय.

सकाळी 11.25 : गुजरात कडेकोट

आसाराम यांचा मुख्य आश्रम अहमदाबादेत आहे. तिथे त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कडक बंदोबस्त लावला आहे.

सकाळी 11.19 : मुंबईतही बंदोबस्त

मुंबईतल्या गोरेगावच्या आश्रमा बाहेरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळी 11.10 : 'आम्हाला न्याय मिळाला'

'आसारामला दोषी ठरवलं आहे. आम्हाला न्याय मिळालाय. या लढ्यात आम्हाला ज्यांनी साथ दिली त्यांचे आम्ही आभार मानतो. त्याला आता कडक शिक्षा मिळेल अशी मला आशा आहे. ज्या साक्षीदारांचं अपहरण झालं किंवा हत्या झाली त्यांनाही न्याय मिळेल अशी आशा आहे,' असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलंय.

सकाळी 11.06 : आसारामचे प्रवक्ते म्हणतात...

आसाराम यांच्या प्रवक्त्या नीलम दूबे यांनी म्हटलंय की आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहोत.

सकाळी 10.50 : कडेकोट सुरक्षा

या निकालाच्या पार्श्वभूमीवर जोधपूरला छावणीचं स्वरूप आलं असून कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी तिथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

या सुनावणीवेळी जोधपूरमध्ये त्यांचे अनेक समर्थक पोहोचण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जोधपूरमध्ये 30 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

सकाळी 10.45 : युक्तिवाद सुरू

शिक्षेचा निर्णय थोड्या वेळात येण्याची शक्यता आहे. आत्ता कोर्टात शिक्षेसाठी युक्तिवाद सुरू आहे.

कोण आहेत आसाराम बापू?

त्यांची पूर्ण कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा :

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)