You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेव्हा आसारामच्या हिंसक समर्थकांऐवजी पोलिसांनी शांत पत्रकारांना ताब्यात घेतलं...!
- Author, अंकुर जैन
- Role, संपादक, बीबीसी गुजराती
ही गोष्ट 2008 सालची आहे. आसाराम बापूंच्या आश्रमातून दोन मुलं गायब झाल्याचं प्रकरण ताजं होतं. या मुलांचे मृतदेह आश्रमाजवळच सापडले होते.
मांत्रिकाने केलेल्या कर्मकांडात मुलांचे जीव गेले, असा आरोप दोन्ही मुलांच्या पालकांनी केला होता.
अहमदाबाद शहरात तरुण पत्रकार म्हणून काम करत असताना अनेक आंदोलनं, निषेधाचे मोर्चे यांचं वृत्तांकन केलं. सरकारला त्रासदायक ठरतील, अशा अनेक बातम्या दिल्या. पण पोलिसांनी मलाच ताब्यात घ्यावं, असं पहिल्यांदा घडलं ते आसाराम बापूंच्या बातमीमुळे!
शहरातल्या प्रसिद्ध मोटेरा क्रिकेट स्टेडियमजवळच्या आसाराम बापूंच्या आश्रमापासून आम्ही साधारण तीन किलोमीटरच्या अंतरावर होतो.
पालकांनी आसाराम बापूंवर आरोप केल्यामुळे बापूंच्या समर्थकांनी धुडगूस घालायला सुरुवात केली. या धिंगाण्यादरम्यान एका महिला पत्रकारासह दहा जण जखमी झाले. आश्रमाजवळ पत्रकारांना मारहाण करण्यात आली. समर्थकांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी पत्रकारांना आश्रमाजवळच्या घरांमध्ये आश्रय घ्यावा लागला.
पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून साबरमती नदीच्या काठी आम्ही पत्रकारांनी मोर्चा काढायचं ठरवलं. शेकडो पत्रकारांसह मीही मोर्च्यात सहभागी झालो. पत्रकारांमध्ये एकजूट आहे आणि आसाराम यांचे समर्थक मीडियावर दादागिरी करू शकत नाहीत, हे दाखवून देण्यासाठी आम्ही एकत्र जमलो होतो. मात्र आम्ही आश्रमात जाण्याआधीच पोलिसांनी आम्ही अडवलं.
आश्रमाकडे जाणारे सगळे रस्ते पोलिसांनी अडवून धरले होते. 2002 मध्ये गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर पहिल्यांदाच पोलिसांचा एवढा मोठा जत्था मी राज्यातल्या रस्त्यांवर पाहत होतो.
आसाराम यांचे समर्थक भडकल्याचं पोलिसांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे त्यांना आश्रमाजवळ जाणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेबाबत काळजी वाटत होती. मोर्चादरम्यान तुम्हाला सुरक्षा पुरवू, असं आश्वासन पोलिसांनी दिलं होतं.
पण हिंसक झालेल्या आसाराम समर्थकांविरोधात पोलिसांना असहाय्य होते असं आम्हाला जाणवलं. त्या दिवशी त्यांनी आम्हाला आश्रमाजवळ फिरकू दिलं नाही.
मात्र आम्ही त्यांचं ऐकलं नाही आणि आश्रमाच्या दिशेने चालत राहिलो.
काठ्या आणि बंदुका
पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावले होते. आम्ही ते पार केले. बॅरिकेड्सपुढचा परिसर गच्च वस्तीचा होता पण तिथे गूढ शांतता होती. पोलिसांनी डेंजर म्हणून सांगितलेल्या घरातली माणसं आमच्याकडे रोखून बघत होती.
आम्हाला काही होणार नाही, याची आम्हाला खात्री वाटत होती, कारण तोपर्यंत अहमदाबाद पोलीस एन्काऊंटरसाठी कुप्रसिद्ध झालं होतं. अहमदाबाद पोलिसांकडेच शहराच्या रक्षणाची जबाबदारी असल्याने आम्हाला आधार वाटत होता.
आमच्या सुरक्षेसाठी तैनात तुकडीचं नेतृत्व आर.बी. ब्रह्मभट यांच्याकडे होतं. 2001 मध्ये अहमदाबादच्या प्रसिद्ध अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला, तेव्हा ब्रह्मभट यांनी अख्खी रात्र सशस्त्र कट्टरवाद्यांविरोधात लढा दिला होता.
मात्र आम्हा पत्रकारांचा अंदाज खोटा ठरला.
पांढऱ्या कपड्यातली आणि हातात काठ्या घेतलेली माणसं आमच्या दिशेने चालून येत असल्याचं आम्ही पाहिलं! अवघ्या काही क्षणात वातावरण तापलं आणि तितक्यातच आम्ही बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकला!
अनेक गाड्या आमच्या समोर येऊन उभ्या राहू लागल्या, पण आम्ही चालतच राहिलो. कुठल्याही क्षणी आमच्यावर दगडफेक होऊ शकते, याचा अंदाज आमच्यापैकी काहींना आला होता. मात्र त्यापासून कसं वाचावं याची उपाययोजना कुणाकडेही तयार नव्हती.
चोर सोडून...
हे सगळं घडत असताना पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. चिडलेल्या समर्थकांना पोलीस पांगवतील याची आम्हाला खात्री होती. मात्र घडलं भलतंच. कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी पोलिसांनी पत्रकारांनाच ताब्यात घेतलं!
पोलिसांची अगतिकता बघून माझ्यातला पत्रकार अस्वस्थ झाला. हातात काठ्या घेतलेले, दगडफेक करणारे समर्थक दिवसाढवळ्या फिरत होते. मात्र शांततेत आंदोलन करणाऱ्या शस्त्रविरहित पत्रकारांना ताब्यात घेण्यात आलं.
ही घटना दहा वर्षांपूर्वीची आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी असूमल थाऊमल हरपलानी उर्फ आसाराम यांना न्यायालयाने दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यावेळी आमच्यावर शस्त्र उगारणाऱ्या आसाराम यांच्या समर्थकांना आता पत्रकारांबद्दल काय वाटतं, असं मनात आलं.