You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नितीन गडकरी : नरीमन पॉइंटला थेट दिल्लीशी जोडणार आणि एसटीच्या तिकिटांत मेट्रोची सफर
केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यात एका उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी मुंबईतील नरीमन पॉईंटला थेट दिल्लीशी जोडणार असल्याचं सांगितलं.
नितीन गडकरी यांनी त्यांच्या खात्यांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची माहिती देतानाच पुण्याच्या विकासासाठी काही सल्लेदेखील दिले.
जवळच्या शहरांतर्गत मेट्रो सुरू करण्यासाठी अगदी स्वस्तातला पर्याय गडकरी यांनी यावेळी सांगितला.
त्या माध्यमातून एसटीच्या तिकिटदरात मेट्रोची सफर शक्य असल्याचं गडकरी म्हणाले.
त्याचबरोबर प्रदूषण आणि प्रवासी वाहतुकीच्या इतर पर्यायांबाबतही गडकरी यांनी यावेळी माहिती दिली.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे नरीमन पॉईंट ते दिल्ली असा करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला.
नरीमन पॉइंट थेट दिल्लीशी जोडणार!
मुंबई आणि दिल्लीला जोडणाऱ्या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे या मार्गाचं सध्या काम सुरू आहे. या एक्सप्रेस वेमुळे दिल्ली ते मुंबईतील प्रवासाचा वेळ अर्ध्यावर येणार आहे.
मुंबईतील जेएनपीटीपासून ते थेट दिल्लीपर्यंतचा हा मार्ग असणार आहे. मात्र जेएनपीटीऐवजी नरीमन पॉईंटपासून दिल्लीपर्यंत हा मार्ग करण्याची तयारी गडकरी यांनी यावेळी बोलून दाखवली.
यासाठी जो मार्ग वाढवावा लागणार आहे, त्यासाठी खर्चाची तयारी असून मुख्यमंत्र्यांशी बोलून याबाबत लवकरच चर्चा करणार असल्याचं आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिलं.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा मुंबईला थेट देशाच्या राजधानीशी जोडणारा 1350 किलोमीटरचा महामार्ग आहे. या एक्सप्रेस वेचं 70 टक्के काम पूर्ण झालं असल्याची माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली. या एक्सप्रेस वेमुळे दिल्ली ते मुंबईचा प्रवास 24 तासांवरून 12 तासांवर येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
एसटीच्या तिकिटात रेल्वे
नितीन गडकरी यांनी यावेळी नागपूरमध्ये हाती घेतलेल्या मेट्रोच्या एका नव्या प्रकल्पाबाबत माहिती दिली. पुण्यातही तसं करण्यासाठी अजितदादांनी पुढाकार घ्यावा असं गडकरी म्हणाले.
रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा वापर करून शहरापासून इतर छोट्या शहरांना जोडणाऱ्या मेट्रो सुरू करणार असल्याचं गडकरी म्हणाले.
यासाठी 100 मेट्रो विकत घेत असल्याचंही गडकरींनी सांगितलं. या मेट्रोमध्ये अगदी विमानासारखी सुविधा देणार असल्याचा दावा गडकरींनी केला.
विशेष म्हणजे नागपुरातील या मेट्रो खासगी बेरोजगार तरुणांना, केटरींगचा व्यवसाय असणाऱ्यांना चालवण्यासाठी देणार असल्याचं गडकरींनी सांगितलं. यामुळं एसटीच्या खर्चात मेट्रोचा प्रवास करणं शक्य होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
पुण्यातही ट्रॅव्हल्स वाल्यांना अशाप्रकारे एक-एक मेट्रो चालवण्यासाठी देऊन वाहतुकीवरचा ताण कमी करणं शक्य असल्याचं गडकरी म्हणाले.
यासाठी केंद्र किंवा राज्याचा एक रुपयाही लागणार नाही असंही गडकरी म्हणाले. त्यामुळं रेल्वेच्या उपलब्ध पायाभूत सोयीसुविधाही अधिक चांगल्या होतील असंही गडकरी म्हणाले.
प्रदूषणावरून कानपिचक्या
प्रदूषणाच्या मुद्द्यावरूनही गडकरी यांनी यावेळी इशारा दिला आहे. प्रदूषणामध्ये झपाट्यानं वाढ होणाऱ्या देशातील आघाडीच्या शहरांमध्ये पुण्याचा नंबर लागत असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
ध्वनी प्रदूषणावरही काही पर्याय काढणार असल्याचं गडकरी म्हणाले. रुग्णवाहिका किंवा इतर गाड्यांचे हॉर्न कर्कश असतात. त्याऐवजी आकाशवाणीची ट्यून या रुग्णवाहिकांना लावण्याचा प्रस्ताव दिल्यास गडकरींनी सांगितलं आहे.
तसंच गाड्यांच्या हॉर्नच्या आवाजाऐवजी तबला, बासरी अशा आवाजाचे हॉर्न तयार करण्याच्या सूचना कंपन्यांनादेखील केल्या असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
पुण्याच्या विकासासाठी इतरही अनेक सल्ले यावेळी गडकरींनी दिले. पुणे बंगलोर महामार्ग तयार केला जाणार आहे. त्याच्या आजुबाजुला नवीन पुणं वसवण्याचा सल्लाही गडकरींनी दिला.
बाळासाहेबांची आठवण...
नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरेंचा जोर हा काम करण्यावर असायचा. त्यांनीच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेसाठी प्रेरणा दिली असं गडकरी म्हणाले.
यावेळी बाळासाहेबांची एक आठवणही त्यांनी सांगितली. मला काम पूर्णत्वास नेणारे लोक आवडतात, अशा आशयाचं एक वाक्य लिहिलेलं अॅक्रॅलिकचं शीट, त्यांनी मला भेट दिलं होतं, असं गडकरींनी सांगितलं.
अशाच प्रकारची भेट मी देशातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना देतो असं गडकरींनी सांगितलं. मात्र त्यात काही वाक्य मी माझीही जोडली आहेत, असं गडकरी म्हणाले.
त्यात, 'मला कामं पूर्णत्वास नेणारे प्रामाणिक लोक आवडतात', आणि 'मला कामं पूर्णत्वास नेणारे अप्रामाणिक लोकही आवडतात' यांचा समावेश असल्याचं गडकरी म्हणाले.
त्याहीपुढं जाऊन एकवेळ चुकीचे निर्णय घेतले तरी हरकत नाही, पण निर्णय घ्या असं गडकरी म्हणाले. निर्णय न करता केवळ फाईलवर बसून राहणं योग्य नसल्याचं गडकरी म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)