नितीन गडकरींना पुन्हा वाहतूक खात्याची जबाबदारी देण्यामागचं कारण काय?

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारारम्यान नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्यावरून असा अर्थ काढला जात होता की गडकरी हे मोदींना आव्हान ठरू शकतील.

इतकंच नाही तर भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही तर नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाचे दावेदार होतील असंही म्हटलं जात होतं. अशा गडकरींना पुन्हा वाहतूक खात्याचीच जबाबदारी का देण्यात आली?

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने काल शपथ घेतल्यावर आज खातेवाटप जाहीर झालं. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय, निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्रालय तर एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि भूपृष्ठवहन खात्याची पुन्हा एकदा जबाबदारी देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी नितीन गडकरी यांच्या कामाचं वारंवार कौतुक केलं होतं. पण त्यांच्याकडून गंगाशुद्धीकरण खातं काढून घेण्यात आलं. त्या ऐवजी त्यांच्याकडे लघु-उद्योगाची जबाबदारी देण्यात आली आहे.

2014 साली प्रतिदिन 12 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात येत होते. नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात प्रतीदिन 30 किमी अशा गतीने रस्ते तयार होऊ लागले. तसेच सागरमाला प्रकल्प आणि गंगाशुद्धीकरण प्रकल्प त्यांनी हाती घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अनेकदा कौतुकही केले होते.

भाजपचे ट्रबलशूटर

2017 साली गोव्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वांत जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून सत्तास्थापनेकडे वाटचाल करत होता. या निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा घटल्या तसेच भाजपच्या मुख्यमंत्र्यांचाही पराभव झाला होता. मात्र नितीन गडकरी यांनी तात्काळ चक्रे फिरवून गोव्यात आघाडी स्थापन केली.

घटकपक्षांच्या मागणीनुसार मनोहर पर्रिकर पुन्हा गोव्यात येण्यास तयार झाले. या सर्व प्रयत्नांमुळेच भाजपने सत्तास्थापनेचा दावा सादर करून मनोहर पर्रिकर यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही सोपविली.

या सर्व प्रयत्नांचे श्रेय नितीन गडकरी यांना देण्यात येते. गेल्या पाच वर्षांमध्ये रस्ते वाहतूक मंत्रालयातील कामगिरीबरोबरच गोव्यात सत्ता स्थापन करणे हा त्यांचे मोठे यश मानले जाते. भाजपचं बहुमत घटून आघाडीचे सरकार स्थापन करावे लागले तर नितीन गडकरी सर्वसमावेशक चेहरा होऊ शकतात अशी चर्चा होत होती.

'नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारा सध्या तरी मंत्री नाही'

नितीन गडकरी यांना पहिल्या चार महत्त्वाच्या खात्यांमधून बाहेर ठेवण्यामागे कोणते कारण असावे याचं उत्तर त्यांनी केलेल्या कामातच आहे असं मत नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांनी व्यक्त केले.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "नितीन गडकरी यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या कामातून भूपृष्ठवहन मंत्रालयात मैलाचे दगड स्थापन केले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाची गती कायम राहावी यासाठीच आणि हे खाते सांभाळण्यासाठी त्यांच्यापेक्षा दुसरा पात्र उमेदवार सापडणं अशक्य असल्यामुळेच त्यांच्याकडे हे खातं देण्यात आलं आहे."

ते पुढे म्हणाले, "नितीन गडकरी यांना काम करण्याची संधी मिळावी असं खातं हवं होतं. त्यांची कृषी आणि पाटबंधारे खात्यातही काम करण्याची इच्छा होती मात्र त्यांच्या सध्याच्या खात्याची गरज पाहून त्यांना तेच मंत्रालय पुन्हा मिळाले असावे."

मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती समजली जाणाऱ्या गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र खात्यांमधील संधीबाबत विचारले असता जोशी म्हणाले, "नितीन गडकरी यांना गृह खाते मिळणे अपेक्षितच नव्हते, त्यासाठी राजनाथ सिंह आणि अमित शाह यांच्यामध्ये स्पर्धा होती. अर्थ खाते हे त्यांच्या कामाचे क्षेत्र नव्हते आणि परराष्ट्र खात्यासाठी विशेष व्यक्ती (एस. जयशंकर) यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे या चारही खात्यांपेक्षा वेगळे खाते त्यांना देण्यात आले असावे."

निवडणुकांच्या काळामध्ये नितीन गडकरी पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतात अशी चर्चा सुरू होती. त्याबाबत बोलताना लक्ष्मणराव जोशी म्हणाले, "सध्या नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकेल अशी कोणतीही व्यक्ती भाजप आणि सरकारमध्ये नाही."

'गडकरींना रस नव्हता'

गडकरींना अर्थ, परराष्ट्र आणि संरक्षण खात्यात रस नव्हता असं ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके सांगतात.

"गडकरींना अर्थ खातं नको होतं. कारण हे खातं डोकेदुखीचं आहे तसंच लोकांच्या टीकेचा भडिमार या खात्याच्या मंत्र्यावर होतो. संरक्षण मंत्रालयात त्यांना स्वारस्य नव्हतं. परराष्ट्र मंत्री ते होऊ शकत नव्हते. निर्मला सीतारमण यांच्याआधी संरक्षण मंत्रालयाची ऑफर गडकरींना आली होती पण त्यांनी नाही म्हटलं होतं," चावके सांगतात.

"या खात्यांऐवजी काही दृश्य बदल ज्या क्षेत्रात दिसतील अशा क्षेत्रात त्यांना अधिक रस होता. जे लघु-उद्योग मोडकळीस आले आहेत त्याच्या पुनर्बांधणीची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे असं मला वाटतं," असं चावके सांगतात.

राजकीय स्थिती अशी असती तर...

नितीन गडकरी यांना पहिल्या चार खात्यांऐवजी जुनेच खाते मिळण्याबद्दल बोलताना पत्रकार संजय मिस्किन म्हणाले, "गडकरी यांचं सध्या त्यांच्या खात्यात वेगानं काम सुरू आहे. त्यांच्या कामाचा एक रोडमॅप तयार झाला आहे. त्यांना कदाचित डिस्टर्ब करायचे नसेल. तसेच त्यांच्या प्रकृतीचंही कारण असावं."

जर निवडणुकीत भाजपच्या जागा 250 किंवा बहुमताच्याखाली आल्या असत्या आणि आघाडीचे सरकार स्थापन करावं लागलं असतं तर नितीन गडकरी यांना सर्वसमावेशक चेहरा म्हणून संधी मिळाली असती. अशा स्थितीत त्यांना शरद पवार, चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना पाठिंबा दिला असता, असं मिस्किन सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)