You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊत विरुद्ध चंद्रकांत पाटील : हे भांडताहेत की एकमेकांना मदत करताहेत?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
हल्ली एक दिवस जात नाही जेव्हा संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातले एकमेकांवरचे शाब्दिक वार मुख्य माध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमांमध्ये येत नाहीत. काही काळापूर्वी जे वाग्युद्ध अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांचं दिसायचं, आता ते पाटील आणि राऊत यांच्यात दिसतंय.
अगदी आज सकाळीसुद्धा (22 सप्टेंबर 2021) संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली, त्यांना टोले हाणले, त्यांच्यावर सव्वा रुपयांचा दावा करणार असल्याचंसुद्धा सांगितलं.
"आम्ही हे असले फालतू धंदे करत नाही. यांची बँक खाती पाहा. आम्ही नोकरदार मध्यमवर्गीय माणसं आहोत. हे घोटाळ्याबिटाळ्यात असतो तर इतके वर्षं राजकारणात राहिलो नसतो. चंद्रकांतदादा पाटलांना माझी कायदेशीर नोटीस जाईल. नुसती नोटीस जाऊन थांबणार नाही. त्यांना संपूर्ण कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. लोक 100 कोटींचा दावा लावतात, 50 कोटींचा दावा लावतात. पण यांची तेवढी लायकी नाही. यांच्यावर मी सव्वा रूपयांचा दावा लावणार आहे. यांची किंमत सव्वा रूपया,"एबीपी माझा'ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.
त्यावर "Any publicity is good publicity! संजय राऊत हे माझ्यावर सातत्यानं टीका करुन मला भरपूर प्रसिद्धी मिळवून देत असतात. राजकारणात 'निगेटिव्ह पब्लिसिटी'चाही उपयोग असतो. फक्त तशी टीका योग्य ठिकाणांहून व्हावी लागते. सज्जनांनी टीका केली की धोका असतो. राऊतांसारख्या टीकेचा फायदाच होतो,"असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटीलांनी दिलंय.
राऊतांवर टीका करणारं पाटील यांचं पत्र 'सामना'नं छापलं आणि त्यानंतर कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्या पत्रावरुनच बदनामी केलीत म्हणून कायदेशीर कारवाई करण्याचं जाहीर केलं.
काही दिवसांपूर्वी चंद्रकात पाटील आता सक्रीय राजकारणातून निवृत्त होणार असून ते नागालँडचे राज्यपाल होणार असल्याच्या चर्चा ऐकतो आहे, असं राऊत यांनी उठवून दिल्यावर चंद्रकांत पाटील यांनीही त्यांना वेळ न दवडता 'मी तर राऊत यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार असल्याचं ऐकतो आहे' असं म्हणून प्रत्युत्तर दिलं.
शिवसेनेकडून राऊत आणि भाजपाकडून पाटील यांची रोज नवनवी, कधीकधी टोकाची वक्तव्यं धुरळा उडवत राहतात. पाटील यांनी नुकतंच 'देवेंद्र फडणवीस असे दबंग नेते आहेत की 100 अजित पवार खिशात घेऊन फिरत असतात' असं म्हणून मोठीच चर्चा घडवून आणली होती.
पण राऊत आणि पाटील यांच्या या अथक शब्दयुद्धा मागचा हेतू काय असावा? कधीकधी निव्वळ विनोद, तर कधीकधी झोंबणारी, कायदेशीर कारवाईपर्यंत घेऊन जाणारी टीका यानं राजकारणात काय साध्य होतं? चंद्रकांत पाटील यांनीच त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटल्याप्रमाणे 'कशीही मिळालेली प्रसिद्धी ही चांगलीच असते' या नियमानं दोघेही एकमेकांवर टीका करुन प्रसिद्धी पदरात पाडून घेत आहेत का?
टीकेनं प्रसिद्धीचा झोत टिकवता येतो?
एक नक्की होतं की संजय राऊत असतील वा चंद्रकांत पाटील, यांच्या वक्तव्यांची चर्चा भरपूर होते. समाजमाध्यमांवर ती बहुतांशानं होते आणि राजकारणाबाहेरचे अनेक जण त्यावर व्यक्त होतात, शेअर करतात.
समाजमाध्यमं रोजच्या राजकारणातलं 'नरेटिव्ह सेट करण्यामध्ये' सध्या महत्त्वाची भूमिका बजावत असल्यानं, मग मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमधलाही मोठा भाग या वक्तव्यांनी व्यापला जातो. परिणामी चंद्रकांत पाटील म्हणतात त्याला प्रसिद्धी मिळते.
एकमेकांवर टीका करुन रोजच्या चर्चेची सगळी जागा व्यापणं हे राजकारणात अनेकदा वापरली जाणारी क्लृप्ती आहे. सत्तेच्या राजकारणात एकमेकांचे मित्र असलेल्यांकडूनही ती वापरली जाते. महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचं आघाडी सरकार असतांना हे सत्तेतले भागीदार अनेकदा एकमेकांवर टीका करायचे आणि तेव्हा सरकारच्या स्थिरतेवरही प्रश्नचिन्हं निर्माण होत असे.
पुढे शिवसेना आणि भाजपा यांची एकत्र सत्ता असतांना टीकाच काय तर भांडणं म्हणता येतील असे वाद झाले. 'शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतात' असं कायम म्हटलं गेलं. पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही.
पण याचं विश्लेषण कायम असं केलं गेलं की टीकेची चर्चा सर्वाधिक होते, त्यामुळे कायम प्रसिद्धी मिळते. चर्चेत राहिल्यानं पॉलिटिकल स्पेस मिळवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. त्यामुळेच टोकाची, प्रसंगी अतर्क्य वाटणारी वक्तव्यं, वाद राजकीय नेत्यांकडून घातले जातात. परिणामी माध्यमांमधली जागाही व्यापता येते.
2019च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जवळपास रोज सातत्यानं होणाऱ्या संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदा या असंच रोजचं पोलिटिकल नरेटिव्ह ठरवत होत्या, असंही निरीक्षण अनेकदा नोंदवलं गेलं आहे. त्यामुळेच आता सध्या रोज सुरु असलेली चंद्रकांत पाटील आणि राऊत यांची वक्तव्यांची देवाणघेवाण अशाच प्रकारचा प्रयत्न आहे का?
'माझ्याशी तुलना होऊ शकत नाही, मग खुलासा का?'
राजकीय विरोधकांची एकमेकांवरची टीका हे नवीन नाही. पण ती कशा प्रकारे होते त्यावरुन त्यामागचा राजकीय हेतू काय ते पाहता येतं.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या मते संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये सध्या जे सुरु आहे ते ठरवून होतं आहे असं नाही.
"हे सगळं जाणीवपूर्वक केलं आहे असं वाटत नाही. पण संजय राऊतांना रोज सकाळच्या पत्रकार परिषदेची जणू सवय लागली आहे. पण आज चंद्रकांतदादांनी 55 लाखांचा जो आरोप केला त्यावरुन मात्र राऊत चिडलेले वाटले. वास्तविक पाटील यांनी उल्लेख केलेलं प्रकरण जुनं आहे. ते पूर्वीही चर्चेत आलं होतं. पण गेले 2-3 महिने या दोघांमध्ये अक्षरश: युद्ध सुरु आहे," देसाई म्हणतात.
देसाई हाही प्रश्न सोबत विचारतात की, चंद्रकांत पाटील रोज प्रत्युत्तर का देतात?
"एकीकडे पाटील म्हणतात की मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, माझं स्टेचर वेगळं आहे. म्हणजे तुमची माझी तुलना होऊ शकत नाही असं त्यांना म्हणायचंय. पण मग एवढा खुलासा का केला? एवढं मोठं पत्रं 'सामना'ला का लिहिलं? मला वाटतं की राऊत रोज आरोप करतात त्यामुळे त्यांना उत्तर द्यावं लागतं.
याअगोदरही जेव्हा हे दोन्ही पक्ष एकत्र होते तेव्हा भाजपाच्या अनेक नेत्यांनी सामनाच्या भाषेवर आक्षेप घेतला होता. तेव्हा सेना नेत्यांनी राऊत यांना समजावलं आहे. पण आता राऊतच सेनेचा आवाज आहेत. उद्धव ठाकरे आणि राऊत हेच दोघे सेनेकडून बोलतात," हेमंत देसाई म्हणतात.
पण राऊत-पाटील शब्दयुद्धावर देसाई असंही मत मांडतात की संजय राऊतांना टार्गेट करणं ही भाजपची रणनितीही असू शकते.
"दुसरं कारण असं आहे की संजय राऊत हे शरद पवारांच्या जवळचे आहेत. त्यांच्यावर टीका करून भाजप एका प्रकारे हे सांगायचा प्रयत्न करतेय की त्यांची भाषा ही सामान्य शिवसैनिकाची भाषा नाही आहे. उदाहरणार्थ अनंत गिते जे बोलले ती खरी भावना आहे. राऊत हे पवारांच्या समर्थनार्थ बोलतात असं सुचवण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे," देसाई सांगतात.
'चंद्रकांतदादांना प्रसिद्धी मिळत असेल, पण त्याने पक्ष वाढत नाही'
'लोकमत'चे संपादक (डिजीटल न्यूज) आशिष जाधव हे अनेक वर्षं राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांच्या मते संजय राऊत जे बोलताहेत ते त्यांचं कामच आहे, पण चंद्रकांत पाटील मात्र प्रदेशाध्यक्ष असतांना प्रवक्ता म्हणून का प्रत्येक बातमीवर प्रतिक्रिया देत आहेत ते समजत नाही.
"चंद्रकांतदादा पाटील हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पण ते प्रवक्त्याचं काम करतात. एकीकडे किरीट सोमय्या हे आघाडी सरकारविरुद्ध हे भ्रष्टाचाराचं परसेप्शन तयार करतात. अशा वेळेस पाटील उठसूठ अशी वक्तव्य करतात त्याचं मला आश्चर्य वाटतं. त्यांचं काम पक्षाला कार्यक्रम द्यायचा आहे.
पण दिवसभरात ते जवळपास प्रत्येक बातमीवर बोलतात. स्वत:ला ते ओव्हरेक्स्पोज करताहेत. सोमय्यांच्या नेरेटिव्हला पाटील यांच्या वक्तव्यानं खीळ बसते," आशिष जाधव म्हणतात.
"एकीकडे देवेंद्र फडणवीस कायम म्हणतात मी 'सामना' वाचत नाही. हीच भूमिका भाजपानं कायम यापूर्वीही घेतली आहे. त्याच 'सामना'ला स्वत: प्रदेशाध्यक्ष पत्र लिहितात. हे काय आहे? हेही खरं आहे की दुसरीकडे सव्वा रुपयांचा दावा म्हणून संजय राऊत स्वत:चीच किंमत कमी करतात."
"त्याचा अर्थ असा होतो की त्यांची जी कथित बदनामी होते आहे त्याची किंमत सव्वा रुपया आहे. पण राऊत प्रसरमाध्यमांमध्ये सेनेला जिवंत ठेवतात. ते त्यांचं काम आहे. पाटील यांचं ते काम नव्हे. मला वाटतं यामागे त्यांचा काही विचार नसावा. त्यांच्या बोलण्यानं उलट आघाडीचं फावतं आहे. ते पक्षाला प्रसिद्धीत ठेवतात पण त्यानं पक्ष वाढत नाही," जाधव पुढे म्हणतात.
अशा प्रकारची शाब्दिक युद्ध दोन्ही नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांना नवीन नाहीत. पण आता न्यायालयाची पायरी चढण्याच्या तयारीनं हे युद्ध वेगळ्या वळणार आहे हे नक्की. त्यामुळे हे भांडण कोणाच्या फायद्याचं ठरणार हे पाहण्यासाठी जे बोललं गेलं आहे, त्यातलं प्रत्यक्षात किती होतं ते पाहावं लागणार आहे. 'राऊत विरुद्ध पाटील' हा सामना इतक्यात संपण्याच्या तयारीत नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)