चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल या 11 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिलाय, त्यांच्याविषयी व्यक्त केली जाणारी मतं आणि प्रत्यक्षात त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्यांचं राजकीय वजन किती आहे, याविषयीची सविस्तर जाणून घ्यायचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला आहे.

चंद्रकांत पाटील यांचा जन्म प्रभूदास चाळ, रे रोड, मुंबई इथं झाला.

त्यांचं शालेय शिक्षण राजा शिवाजी विद्यालय दादर आणि महाविद्यालयीन शिक्षण सिद्धार्थ कॉलेज इथं झालं.

दादा किंवा चंद्रकांतदादा नावाने ओळखले जाणारे पाटील मुळचे कोल्हापूरचे असले तरी त्यांचे आई-वडील गिरणी कामगार असल्यामुळे ते मुंबईत वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचं सर्व शिक्षण मुंबईतच पूर्ण झालं.

1. अभाविप ते प्रचारक

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) यशवंतरावजी केळकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालयीन जीवनापासून अभाविपच्या कामास सुरुवात केली.

ऑगस्ट 1980 रोजी जालन्याच्या प्रचार अभ्यासवर्गात चंद्रकांत पाटील यांच्या नावाची पूर्णवेळ प्रचारक म्हणून घोषणा करण्यात आली. यानंतर जळगाव जिल्ह्यात अभाविपचं काम वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.

2. चलो काश्मीर मोहीम

1990 मध्ये अभाविपच्यावतीने काश्मीर प्रश्नावर देशपातळीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी 'चलो काश्मीर' नावाने मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गतच सुमारे 20 हजार तरुण श्रीनगरमधील लाल चौकात भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी जाणार होते. या मोहिमेचे नेतृत्व चंद्रकांत पाटील करत होते.

3. रा. स्व. संघात काम

त्यानंतर चंद्रकांत पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय झाले. 1995-99 अशी 4 वर्षं त्यांच्याकडे रा. स्व. संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह म्हणून जबाबदारी होती. यानंतर सन 1999-2004 पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात रा. स्व. संघाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा कार्यात त्यांची मोलाची भूमिका होती.

4. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी

सतत 13 वर्षं पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्य करणारे दादा पाटील हे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या संस्थेत जानेवारी 1994 ते एप्रिल 2000 पर्यंत विश्वस्त मंडळात सदस्य होते.

एप्रिल 2000 ते मार्च 2013 पर्यंत दादांकडे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सचिवपदाची जबाबदारी होती.

5. भाजपमध्ये संधी

2005 मध्ये चंद्रकांत पाटील राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. सन 2004-2005 या कालावधीत त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख अशी जबाबदारी सोपविण्यात आली.

2007-2010 भाजप प्रदेश सरचिटणीस, तर सन 2010-2015 पर्यंत त्यांच्याकडे भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. जुलै 2019 पासून त्यांच्याकडे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे.

6. पदवीधर मतदारसंघातून राजकारणात प्रवेश

2008 मध्ये भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील पदवीधरांचे विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्यांना दिली.

2014मध्ये पक्षाने त्यांना पुणे पदवीधर मतदार संघातून दुसऱ्यांदा संधी दिली. या निवडणुकीत त्यांचा विजय होऊन, विधान परिषदेत पुन्हा प्रवेश केला.

2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन होत असताना, या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्री होण्याची संधी मिळाली.

मंत्रिमंडळात समावेशानंतर सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या महत्त्वाच्या खात्यांचा पदभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला.

2016 मध्ये त्यांची विधान परिषदेचा सभागृह नेता म्हणून निवड झाली. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर जून 2018 त्यांच्याकडे कृषी आणि फलोत्पादन विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. महत्त्वाच्या महसुल खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

7. कोथरुडमधून विधानसभेत

जुलै 2019 मध्ये त्यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा विजय झाला. भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना आपला मतदारसंघ चंद्रकात पाटील यांना द्यावा लागल्यामुळे झालेलं दुःख लपवता आलं नव्हतं.

चंद्रकांत पाटील यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर 'बाहेरचा उमेदवार' अशी टीका झाली होती.

पण, बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा मुद्दा खोडून काढत म्हटलं होतं, "मी 1982 पासून दर महिन्याला पुण्यात येत आहे, विद्यार्थी परिषद, भाजपमध्ये काम करत असताना सतत पुण्यात येत आहे. तसंच पुणे पदवीधर मतदारसंघाचा मी गेली 12 वर्षं आमदार आहे."

चंद्रकांत पाटील यांच्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीविषयी कोल्हापूरमधील ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई सांगतात, "चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूर यांचा काही अर्थाअर्थी संबंध नाही. भाजप नेते प्रमोद महाजन किंवा इतर मंडळी जेव्हा कोल्हापूरला यायचे तेव्हा चंद्रकांत पाटील त्यांच्यासोबत इथं यायचे.

पुढे प्रमोद महाजन यांनी दूरसंचार मंत्री असताना त्यांना कोल्हापूरात टेलिमॅटिक्स नावाची कंपनी टाकून दिली आणि मग त्यांचं कोल्हापूरात बस्तान बसलं. याव्यतिरिक्त ते म्हणजे मुंबईत भाजपच्या गोटातील एक कार्यकर्ता इतकीच त्यांची ओळख होती."

8. कोल्हापूर आणि चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांचं कोल्हापूरवरील प्रेम पुतनामावशीचं आहे, असं देसाई पुढे सांगतात.

"त्यांच्या मते, कोल्हापूरमधून निवडणूक जिंकणं शक्य नाही म्हणून चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचा रस्ता धरला. त्यांचा कोल्हापूरकरांवर विश्वास असता तर ते इथूनच लढले असते. त्यांचं कोल्हापूरवरील प्रेम हे पुतनामावशीचं प्रेम आहे."

पण, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे याविषयी वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते, "कोल्हापूरमधील मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे आमदार होते आणि भाजप-सेना एकत्र निवडणूक लढवत होते त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना मतदारसंघ मिळणं अपेक्षित नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी पुण्यातून निवडणूक लढवण्याचं ठरलं. याचा अर्थ ते कोल्हापूरमधून पळून गेले असा होत नाही."

"कोल्हापूर परिसरातल्या कितीतरी व्यक्ती आणि संस्थांना त्यांनी अडचणीच्या काळात मदत केली आहे. कोल्हापूरचा टोल रद्द करायचं जे काम राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जमलं नाही, ते चंद्रकांत पाटील यांनी सत्तेत आल्यानंतर करून दाखवलं. पंधरा वर्षांच्या सत्तेच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केली नसेल त्याहून अधिक मदत पाच वर्षांत चंद्रकांत पाटील यांनी लोकांना केली आहे," असंही चोरमारे सांगतात.

9. चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे की मुंबईचे?

चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे आहेत की मुंबईचे हा वाद सातत्याने समोर येत असतो.

सुभाष देसाई यांच्या मते, "चंद्रकांत पाटील मुंबईचे आहेत. त्यांचा जन्मही मुंबईत झाला आणि जडणघडणही तिकडच झाली. त्यांचे वडील मात्र कोल्हापूरच्या खानापूरचे. चंद्रकांत पाटील यांचं टेलिमॅटिक्स व्यवसायापुरतं कोल्हापूरशी नातं आहे. कोल्हापूरच्या दक्षिण भागात त्यांचा बंगला आहे. विधानसभा निवडणुकीला कोल्हापूरमधून उभं राहायचं याची चर्चा सुरू होती, तेव्हा मी कोल्हापूरचाच आहे, असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता."

पण चंद्रकांत पाटील यांचे वडील कोल्हापूरचे असल्यामुळे त्यांचं मूळ कोल्हापूर असल्याचं विजय चोरमारे यांचं मत आहे.

ते म्हणाले, "चंद्रकांत पाटील यांच्या वडिलांचं गाव कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर आहे. तिथं त्यांचं घरही आहे. पाटील यांचे वडील गिरणी कामगार असल्यामुळे मुंबईला गेले. मग मुंबईतच त्यांचं शिक्षण झालं. त्यांच्या घडणीशी कोल्हापूरचा काही संबंध नाही. 1995च्या दरम्यान ते कोल्हापूरला परत आले. असं असलं तरी पाटील यांचे वडील कोल्हापूरचे असल्यामुळे त्यांचं मूळ कोल्हापूर हे आहे."

10. संघाचे निष्ठावान आणि उत्तम संघटक

चंद्रकांत पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठावान असल्याचं देसाई यांचं मत आहे.

ते म्हणतात, चंद्रकांत पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी खूप निष्ठावान आहेत. RSSचे सरसंघचालक जे सांगतील, तेच चंद्रकांत पाटील ऐकतात, तर चोरमारे यांच्या मते, "चंद्रकांत पाटील चार दशकांहून अधिक काळ संघटनात्मक कामात आहेत आणि आयुष्यातली अनेक वर्षं त्यांनी पूर्णवेळ संघटनात्मक कामासाठी दिली आहेत. म्हणूनच तर चंद्रकांत पाटील हे भाजपपेक्षाही संघाचे म्हणूनच अधिक ओळखले जातात."

ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांच्या मते, संघटन ही चंद्रकांत पाटील यांची जमेची बाजू आहे.

ते सांगतात, "कोणताही पक्ष चालवण्यासाठी दोन प्रकारचे नेते हवे असतात. एक म्हणजे समोर जाऊन भाषण करणारे आणि दुसरे म्हणजे पक्षासाठी अनेकांचं संघटन करणारे. चंद्रकांत पाटील दुसऱ्या गटात मोडतात. चंद्रकांत पाटील यांची कारकीर्द प्रामुख्यानं संघटक म्हणून राहिली आहे. राजकारणात ते अलीकडच्या काळात आले. ते पडद्यामागच्या राजकारणात तज्ज्ञ आहेत. पण, मैदानी राजकारणाचा त्यांना अनुभव नाही."

"दुसरं म्हणजे भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांना मूळचा संघाचा पण मराठा समाजाचा नेता हवा होता. त्यामुळे मग चंद्रकांत पाटील यांना एक एक जबाबदारी मिळत गेली आणि ते ती व्यवस्थितपणे पार पाडत गेले."

11. मुख्यमंत्रिपदाची इच्छा

चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली होती.

पुणे पत्रकार संघाच्या एका कार्यक्रमात तुम्हाला संघटनेनं सांगितलं तर मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, असं विचारल्यावर ते म्हणाले होते, "सोडतो की काय?"

चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय वजनाविषयी चोरमारे यांनी सांगितलं, "चंद्रकांत पाटील जेव्हा अभाविप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होते, तेव्हाच त्यांचा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत संपर्क आला. त्यांनी सोबत कामंही केलं. त्यातही पाटील यांनी अमित शहा यांच्यासोबत अधिक काळ काम केलं आहे.

"महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या, तेव्हा अमित शहा यांनी त्यांना भेटीसाठी बोलावलं. त्या भेटीत अमित शहा यांनी चंद्रकांत पाटील यांना थेट विचारलं होतं की, तुम्हाला प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडेल की उपमुख्यमंत्री?, यातून मग चंद्रकांत पाटील यांचं पक्षातील स्थान समजून येतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)