You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BiggBoss15 : मुनमुन दत्ता करणार 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेतील 'बबिता जी' अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता हिची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री होणार आहे. कलर्स टीव्हीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.
कलर्स टीव्हीवर बिग बॉसचा 15 वा सीझन सध्या सुरू आहे. आधीच स्पर्धा वाढली असताना आता मुनमुन दत्ताचा प्रवेश होणार असल्यानं प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येतेय.
मुनमुन दत्तानं कलर्सनं केलेल्या ट्वीटला रिट्विट करत, या बिग बॉसमध्ये एन्ट्री करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
मात्र, मुनमुन दत्ता केवळ एका स्पेशल टास्कसाठी सेलिब्रेटी गेस्ट म्हणून बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची चर्चा आहे.
याआधी मुनमुन दत्ता तिच्याबाबत झालेल्या ट्रोलिंगमुळे बातम्यांमध्ये चर्चेत आली होती. त्यानंतर मुनमुनने माध्यमं आणि प्रेक्षकांना मुनमुन दत्तांनी खडे बोल सुनावले होते.
'बबिता जी'ने 'टप्पू'सोबत नात्याच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं
अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, 'प्रेक्षकांकडून बऱ्याच अपेक्षा होत्या' आणि 'भारताची मुलगी असल्याचं म्हणताना लाज वाटते'.
'बबिता जी' हे लोकप्रिय पात्र साकारणाऱ्या मुनमुन दत्ता आणि 'टप्पू' हे पात्र साकारणारा त्यांचा सहकारी अभिनेता राज अनाडकट यांच्यात अफेअर सुरू असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सोशल मीडियावर सुरू होते.
काही प्रसारमाध्यमांमध्येही या चर्चांना स्थान दिल्याचं दिसून आलं.
सोशल मीडियावरील बरेच लोक मुनमुन आणि राज यांच्याबाबत आक्षेपार्ह मीम, फोटो, मजकूर पसरवत आहेत. या माध्यमातून ट्रोलिंग सुरू होतं.
या सगळ्या गोष्टींना कंटाळून अखेर रविवारी (12 सप्टेंबर) अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "सर्वसामान्य लोकांना सांगू इच्छिते की, तुमच्याकडून मला बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र, ज्या प्रकारच्या गोष्टी कमेंट सेक्शनमध्ये लिहिल्या गेल्यात, त्यावरून शिकले-सवरलेले लोकांनीही दाखवून दिलंय की आपण किती मागासलेल्या समाजातील आहोत."
'तुमची मस्करी एखाद्याला मानसिकरित्या संपवू शकते'
अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलंय की, "महिलांना त्यांचं वय, शरीर, आई बनण्याच्या गोष्टीवर बोलणं, हे केवळ तुमच्यासाठी मस्करी असू शकेल, पण तुमची मस्करी एखाद्याला मानसिकरित्या तोडू शकते, याची तुम्हाला जाणीव नाही. 13 वर्षांपासून मी लोकांचं मनोरंजन करतेय आणि माझी प्रतिष्ठा संपवायला तुम्हाला 13 मिनिटंही लागले नाहीत."
"जर पुढल्या वेळी कुणी नैराश्यात जाऊन स्वत:चा जीव घेतला, तर जरा थांबून विचार करा की, तुमच्या बोलण्यामुळे तर ती व्यक्ती त्या निर्णयापर्यंत पोहोचली नाहीय ना. मला लाज वाटते की, मी भारताचा मुलगी आहे," असं मुनमुन दत्ता म्हणाल्या.
आणखी एका पोस्टमध्ये मुनमुन दत्ता यांनी म्हटलंय की, "मीडियाला कुणी अधिकार दिल्ला की, काल्पनिक आणि स्वत: रचलेल्या गोष्टींना बातमीच्या नावाखाली कुणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकवण्याचा?"
'टप्पू'ची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकटनेही इन्स्टाग्रामवरून आपली भूमिका मांडलीय.
राजने लिहिलंय की, "जे लोक सातत्यानं माझ्याबद्दल लिहितायेत, त्यांनी याचा विचार करावा की, तुमच्या 'बनवलेल्या गोष्टीं' माझ्या परवानगीशिवाय लिहिल्याचे काय दुष्परिणाम होतील."
"मी सर्व क्रिएटिव्ह लोकांना सांगू इच्छितो की, तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी इतर ठिकाणी वापरा, ज्यातून तुम्हाला काही मिळू शकेल. देव तुमचं रक्षण करो आणि सद्बुद्धी देवो," असंही राज म्हणाला.
मुनमुन दत्ता यांच्या पोस्टला आता बऱ्याच जणांनी समर्थन दिलंय आणि सोबत असल्याचं सांगितलं जातंय.
टॉक शो होस्ट नयनदीप रक्षित यांनी म्हटलंय की, "अगदी बरोबर बोललात. मीडिया आणि लोकांना लाज वाटायला हवी. मीही याचा भाग आहे आणि मी सुद्धा ही जबाबदारी घेतो. मला पत्रकार म्हणवताना लाज वाटते."
मात्र, काही लोकांनी इतक्या कठोर शब्दांबाबत मुनमुन दत्ता यांच्यावर टीकाही केलीय.
काही दिवसांपूर्वी मुनमुन दत्ता या एका समाजाशी संबंधित केलेल्या अवमानकारक वक्तव्यांमुळे अडचणीत आल्या होत्या. मात्र, भाषेची समज कमी असल्याचं सांगत त्यांनी तो व्हीडिओ हटवला आणि चुकी झाल्याचं मान्य केलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)