You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेव्हा अमिताभ बच्चन यांनी 7 दिवस तोंड धुतलं नव्हतं...
- Author, मधु पाल
- Role, बीबीसी हिंदीसाठी मुंबईहून
चित्रपटसृष्टीत गेली तीन दशकं मेकअप आर्टिस्टचं काम करणारे पंढरी दादा यांनी अनेक कलाकारांचा मेकअप केला होता.
सुरूवातीच्या काळात प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता व्ही. शांताराम यांचा मेक अप करताना त्यांच्या ज्या भावना होत्या त्याच शेवटपर्यंत होत्या.
1948 मध्ये कोणतंही उद्दिष्ट न ठेवता या जगात आलेल्या पंढरी दादांच्या कामाची शिफारस प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस यांनी केली होती.
त्या काळात मेकअप च्या क्षेत्रात दादा व्यक्तिमत्त्व समजले जाणारे उस्ताद बाबा वर्धन यांच्यापासून मेकअपचे धडे घेऊन त्यांनी मॉस्कोहून मेकअप आर्टिस्ट या विषयात डिप्लोमा प्राप्त केला.
'झनक झनक पायल बाजे', 'चित्रलेखा' 'ताजमहाल', 'नुर जहां', 'नील कमल', 'काला पत्थर', 'शोले', 'नागिन', 'मिस्टर इंडिया', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' अशा 500 पेक्षाही अधिक चित्रपटांमधील अभिनेत्यांना नवीन रंग दिला. त्यामुळे चित्रपटसृष्टीत नवीन आयाम प्रस्थापित झाले.
या कलाकारांमध्ये मीना कुमारी, मधुबाला, नूतन, दिलीप कुमार, राज कपूर, अशोक कुमार, देव आनंद, राजेश खन्ना, सुनील दत्त, अमिताभ बच्चन, राज कुमार, शाहरुख खान, आमीर खान, करीना कपूर, विद्या बालन आणि माधुरी दिक्षीत यांचा समावेश आहे.
घरच्या परिस्थितीमुळे झालो मेकअप आर्टिस्ट
अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या पंढरी जुकर यांनी आपला प्रवास सांगायला सुरुवात केली. ते म्हणतात "मला खरंतर मेकअप आर्टिस्ट वगैरे व्हायचं नव्हतं. कारण मला हे क्षेत्र आवडत नव्हतं. माझ्या वडिलांनासुद्धा सगळ्यांनी हेच सांगितलं की हे क्षेत्र चांगलं नाही. माझ्या गरिबीकडे पाहता माझे शेजारी मेकअप आर्टिस्ट बाबा वर्धन यांनी मला त्यांच्याबरोबर काम करण्याचा सल्ला दिला.
राजकमल फोटो स्टुडिओमध्ये चित्रपट तयार होतात तिथे मी सगळ्या कलाकारांचा मेक अप करायला सुरुवात केली. या कामासाठी मला महिन्याचे 70 रुपये मिळायचे. माझं काम बघून मला प्रदेश या चित्रपटासाठी रशियाला जाण्याची संधी मिळाली. तिथे मी मेकअप विषयातला डिप्लोमा पूर्ण केला.
हे सगळं नर्गिस यांच्या मदतीमुळे शक्य झालं. जर त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला नसता तर मला कधीच मोठी संधी मिळाली नसती. त्याचप्रमाणे मला मीना कुमारींनीही खूप मदत केली. त्यांनी अगदी सुरुवातीच्या चित्रपटांपासून त्यांच्या पाकिजा या शेवटच्या चित्रपटापर्यंत मेक अप माझ्याकडूनच करवून घेतला."
ब्लॅक अँड व्हाईट काळात मेक अप कठीण
ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या काळात मेक अप करणं फार कठीण होतं, असं पंढरी जुकर सांगतात. पुढं ते म्हणतात की "छोटीशी चूकही तेव्हा लक्षात येत असे. मेकअप म्हणून आम्ही फक्त काजळ, पेन्सिल, मरून लिपस्टिक आणि पावडरचा वापर करायचो.
मात्र जेव्हा रंगीत सिनेमाचं युग आलं तेव्हा मेकअप आर्टिस्टचं काम आणखी सोपं झालं. दिलीप कुमार नेहमी सांगतात की हे लोक आमचे कर्तेधर्ते आहेत. तरुण लोकांना म्हातारं बनवणं, म्हाताऱ्याला तरुण बनवणं, साधारण दिसणाऱ्या व्यक्तीला सुंदर बनवणं ही पंढरीची कमाल आहे."
तुम्हाला सांगू इच्छितो की, "दिलीप कुमार, धर्मेंद्र आणि सुनील दत्त असे कलाकार आहेत ज्यांचा मेकअप चटकन होतो. त्यांचं व्यक्तिमत्त्व फार छान होतं. ते विना मेक अपचेच छान दिसायचे.
अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तर नूतन आणि दिव्या भारती मुळातच सुंदर होत्या. त्यांचा रंगच असा होता की मेकअपची गरजच पडायची नाही."
तुम्ही खूप पुढे जाल
एक चांगला मेक अप आर्टिस्ट होण्यासाठी चित्रकलेचीही चांगली समज हवी. आम्हाला जेव्हाही एखाद्या भूमिकेत टाकायचं असेल तेव्हा आम्ही त्याचं स्केच तयार करायचो. उदा. मिस्टर इंडियामध्ये मोगँबो आणि शोलेमध्ये गब्बर. काही चित्रपटात हिरो आणि व्हिलन दोघांचाही मेकअप मी केला होता, असं पंढरी जुकर सांगतात.
ते पुढे म्हणतात की, " मला आजही आठवतं, मी 365 दिवस कलाकारांचा मेकअप करायचो. प्रत्येक कलाकाराला असं वाटायचं की मी त्यांचा मेक अप करावा. त्यासाठी ते तासनंतास वाट पहायचे. मला आठवतं की अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या चित्रपटाचं शुटिंग गोव्यात सुरू होतं. मी सगळ्या कलाकारांचं मेक अप करत होतो. अमिताभला मी दाढी लावली होती. मला काही तातडीच्या कामासाठी सात दिवस घरी परत यावं लागलं होतं.
तेव्हा मी अमिताभला विचारलं की तू आता काय करणार. कारण मी तर गोव्यात नाही. तेव्हा अमिताभ म्हणाले की मी हा मेकअप सात दिवस मेक अप ठेवेन. पुढचे सहा दिवस त्याने डोक्यावरून अंघोळ केली नाही. त्याने तो लूक ठेवूनच पुढचे सहा दिवस तोंड न धुता शूटिंग केलं."
मी जेव्हा सहा दिवसानंतर त्याला भेटलो तेव्हा ती दाढी त्याच्या चेहऱ्यावर होती. ते कसे झोपत असतील? कसे खात असतील, हा सगळा विचार करून मी अगदी बेचैन झालो. तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुम्ही खूप पुढे जाल. कामाप्रति असलेली तुमची निष्ठा तुम्हाला एके दिवशी सुपरस्टार बनवेल."
माधुरीला हिरोईन म्हणून का घेत नाही?
बॉलिवूडमध्ये असे काही कलावंत आहेत जे दिसायला साधारण आहेत, मात्र मेकअप झाल्यानंतर त्यांचा कायापालट होतो. माधुरी दीक्षित अशीच एक अभिनेत्री आहे. सुरुवातीला त्या विना मेकअप छान दिसायच्या नाहीत.
"सुभाष घई यांनी कर्मा चित्रपटातील एका गाण्यात माधुरी दीक्षितला घेतलं होतं. जेव्हा मी माधुरी दीक्षितला बघितलं तेव्हा मी सुभाष घईला म्हटलं की ही मुलगी नाकी डोळी सुंदर आहे. तुम्ही हिला हिरोईन म्हणून का घेत नाही? मात्र सुभाष घईंनी नकार दिला,. म्हणाले की ही मुलगी फारच साधारण आहे. मला तिच्यात हिरोईनचं तेज दिसत नाही. सुभाष घईंचं म्हणणं होतं की तुम्ही तिची शिफारस करताय कारण ती महाराष्ट्रातली आहे.
तेव्हा मी सुभाष घईंना सांगितलं की असं काही नाही. मला अर्धा तास द्या मी तिचं सौंदर्य तुम्हाला दाखवतो. तेव्हा मी माधुरीचा मेकअप केला सुभाष घईंच्या समोर सादर केलं. माधुरीला पाहताच त्यांनी तिचं कर्मा चित्रपटातलं गाणं हटवलं आणि पुढच्या चित्रपटात त्यांनी माधुरीला मुख्य अभिनेत्री म्हणून काम दिलं."
श्रीदेवीच्या मेकअपला लागायचा वेळ
"मी आणि यश चोप्रा यांनी 40 वर्षं एकत्र काम केलं. यश चोप्रांच्या सुरुवातीच्या चित्रपटापासून शेवटच्या चित्रपटांपर्यंत काम केलं.
चांदनी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, सिलसिला अशा यश चोप्रांच्या चित्रपटांत सगळ्या कलावंतांना मी सुंदर बनवलं. श्रीदेवी यांना तयार करण्यासाठी बराच वेळ लागायचा कारण त्यांच्या डोळ्यांपासून प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष दिलं जायचं. श्रीदेवीही कधी घाई करायच्या नाहीत."
पुढे पंढरी जुकर सांगतात की, "काजोलबदद्ल मला आठवतं की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे च्या वेळी तिने स्वत:चा मेकअप आर्टिस्ट आणला होता. मात्र यश चोप्रांनी तिला सांगितलं की तुझा मेक अप पंढरीच करेल. तेव्हा मी काजोलचा मेक अप केला आणि तिला तो फार आवडला."
आता तर सीतेलाही आयशॅडो लावतात
अलिकडच्या काळाबद्दल बोलताना पंढरी जुकर म्हणतात की, "आता काळ बदलला आहे. आता वेगळं तंत्रज्ञानही आलं आहे. सुनील दत्त यांच्या रेशमा आणि शेरा यांच्या चित्रपटासाठी तीन महिने राजस्थानमध्ये राहिलो. तो काळच वेगळा होता. तेव्हा अभिनेते उन्हात वॅनिटी व्हॅनशिवाय शुटिंग करत असत. आम्ही त्यांच्याबरोबर रहायचो. मात्र आता सगळं एकदम आधुनिक झालं आहे."
"आज अनेक मेकअप आर्टिस्ट असे आहेत की जे टीव्हीवरील रामायण मालिकेतील सीतेलाही आयशॅडो लावतात. आपण कोणता काळ पडद्यावर दाखवतोय हाही विचार करत नाहीत. आता वेळ बदलली आहे. आधी दिलीप कुमार, संजीव कुमार यांच्यासारखे कलाकार म्हणायचे की आपण सोबतच जेवूयात. आधी लोकं काम आणि नाव दोन्हीसाठी आसुसलेले असायचे. मेक अप आर्टिस्टला मान असायचा. आता सगळं बदललं आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)