You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कादर खान यांची बॉलिवूडकरांनी साधी विचारपूसही केली नाही-सर्फराज
सरफराज सांगतात "बॉलिवूड माझ्या वडिलांना विसरुन गेलं. हे सत्य आहे. पण माझ्या वडिलांनीही कधी अशी अपेक्षा केली नव्हती की त्यांना कुणी लक्षात ठेवावं. कदाचित त्यांना हे आधीच माहिती होतं."
"ते फक्त माझे गुरु नव्हते, तर ते मला वडिलांप्रमाणे होते. त्यांचं जादुई व्यक्तिमत्व आणि प्रतिभेनं प्रत्येक अभिनेत्याला आपण एका सुपरस्टारसोबत काम करत असल्याचा फील दिला. अख्खी फिल्म इंडस्ट्री आणि माझं कुटुंबही शोकात आहे. आपलं दु:ख शब्दात व्यक्त करणं शक्य होणार नाही" - गोविंदा
"कादर खान यांचं निध... प्रचंड दु:खद आणि वेदनादायी बातमी आहे. एक प्रतिभावान स्टेज आर्टिस्ट, शानदार फिल्म कलाकार... माझ्या बहुतेक हिट फिल्मचे लेखक.. एक अतुलनीय व्यक्तिमत्व आणि एक गणितज्ज्ञ " - अमिताभ बच्चन
"कादर ख़ान, तुम्ही कायम आठवणीत राहाल. आतिश, घरवाली बाहरवाली, दुल्हे राजा, वाह तेरा क्या कहना, बडे मियां छोटे मियां.. तुमच्यासारखी अदाकारी कुणालाही शक्य नाही. कादरभाई तुम्ही आठवणींचा खजिना मागे सोडून गेला आहात." - रविना टंडन
बॉलिवूडकरांचे असे ट्वीट बघून तुम्हाला वाटलं असेल की कादर खान यांच्या निधनाने बॉलिवूड किती शोकात आहे. त्यांच्याविषयी बॉलिवूड किती गंभीर आणि संवेदनशील होतं.
पण बीबीसीनं जेव्हा कादर खान यांचा पुत्र सरफराज खान याच्याशी बातचीत केली, तेव्हा त्यांचं उत्तर हैराण करणारं होतं.
सरफराज सांगतात "बॉलिवूड माझ्या वडिलांना विसरुन गेलं. हे सत्य आहे. पण माझ्या वडिलांनीही कधी अशी अपेक्षा केली नव्हती की त्यांना कुणी लक्षात ठेवावं. कदाचित त्यांना हे आधीच माहिती होतं."
80 आणि 90 च्या दशकात शानदार अभिनय आणि लेखनानं प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान कमावणाऱ्या कादर खान यांचं 31 डिसेंबरला कॅनडाच्या रुग्णालयात निधन झालं. ते 81 वर्षाचे होते.
कादर खान गेली काही वर्ष आजाराशी झुंजत होते. 31 डिसेंबरच्या दुपारी ते कोमात गेले. गेले 4-5 महिने ते रुग्णालयात उपचार घेत होते. कादर खान यांना श्वास घेण्यात अडचण येत होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना नियमित व्हेंटिलरवरुन बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं.
गोविंदा यांच्या ट्वीटवर सरफराजनं म्हटलं की प्रेमानं जरी काही लोक त्यांना वडील मानत असले, तरी खरं दु:ख, वेदना मलाच आहे. मला बरीच धावपळ करावी लागली. अख्खं आयुष्य मीच त्यांची काळजी घेतली. त्यावेळी कुणालाही त्यांची आठवण झाली नाही.
सरफराज सांगतात "माझ्या वडिलांनी आपलं अख्खं आयुष्य बॉलिवूडसाठी खर्ची घातलं. पण त्यांनी अशा कुठल्याही गोष्टींची अपेक्षा बाळगली नव्हती. कदाचित काम करत असताना त्यांच्या सीनियर्ससोबत बॉलिवूडची वागणूक कशी होती, हे त्यांनी पाहिलं होतं."
बॉलीवूड कादर खान यांना विसरुन गेलं होतं, ही गोष्ट सरफराज मान्य करतात. ते म्हणतात की बॉलिवूडकरांपेक्षा कादर खान यांचे चाहते त्यांना अधिक मान-सन्मान द्यायचे. त्यामुळेच त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक कॅनडात आले होते. मात्र बॉलिवूडमधून केवळ डेव्हिड धवन यांनीच फोन करुन विचारपूस केली.
सरफराज सांगतात "माझ्या वडिलांनी कधीही फिल्म इंडस्ट्रीकडून अवास्तव अपेक्षा ठेवलीच नव्हती. पण आपल्या जवळच्या लोकांकडून त्यांना नक्कीच काही आशा-अपेक्षा होती. आणि कालही तेच पाहायला मिळालं. डेव्हिडजींशिवाय कुणीही साधा फोनही केला नाही. पण इंडस्ट्रीत हा ट्रेंड आहे. पुढं जाऊन प्रत्येकाला याचा सामना करावा लागेल. दुनियेसमोर लोक जवळीक दाखवण्याचा देखावा करतात. तिकडं कुणाच्या लग्नात जाऊन नाचतात, अगदी वाढप्याचं कामही करतात. पण वास्तव हेच आहे"
तब्बल 300 चित्रपटांमध्ये काम
सरफराज सांगतात की जेव्हा गोविंदा सुपरस्टार होते, तेव्हा लोक त्यांची भेट घेण्यासाठी तरसायचे. पण आता गोविंदा शोधून शोधून लोकांना भेटत असतात.
तब्बल 300 चित्रपटात काम करणाऱ्या कादर खान यांनी गोविंदासोबत अनेक चित्रपट केले. 90 च्या दशकात गोविंदा आणि कादर खान यांची जोडी पडद्यावर हिट होती. पण गेल्या दशकभऱापासून कादर खान फिल्म इंडस्ट्रीपासून दूर होते. प्रकृती ठीक नसल्याने त्यांचा बहुतेक वेळ कॅनडामध्ये मुलांसोबतच गेला.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत कादर खान यांची मैत्री कायम चर्चेत राहिली. कादर खान आणि अमिताभ यांनी याराना चित्रपटात एकत्र काम केलं. शिवाय कादर खान यांनी लिहिलेल्या अनेक चित्रपटात अमिताभ मुख्य भूमिकेत होते.
सरफराज सांगतात की कादर खान अमिताभ यांचे चाहते होते. ते अमिताभ यांचं कौतुक करताना अजिबात थकायचे नाहीत. अमिताभ बच्चनही कादर खान यांच्या कामाचा आदर करायचे. त्यामुळेच दोघांचं नातं आणि मैत्री शानदार होती.
पण गेली काही वर्ष कादर खान आजारी असतानाही अमिताभ बच्चन किंवा अन्य बॉलिवूडकराने साधा फोन करुन त्यांची चौकशीही केली नाही.
कादर खान यांनी बऱ्याच दक्षिण भारतीय चित्रपटातही काम केलं. त्यांचं पूर्ण करिअर आणि त्यांना पाहून-ऐकून सरफऱाज असं सांगतात की "फिल्म अवॉर्ड आणि बॉलिवूडच्या कौतुकापेक्षाही प्रेक्षकांचं प्रेम त्यांना जास्त महत्वाचं वाटायचं."
ते म्हणायचे की मी जर साऊथमध्ये जन्माला आलो असतो, तर तिथं माझी मंदिरं उभी राहिली असती. त्यांना जेव्हा आपली लढाई एकट्यानेच लढायची आहे, याची जाणीव झाली, तेव्हाच त्यांनी आम्हाला सांगितलं की फिल्म इंडस्ट्रीकडून कुठलीही अपेक्षा ठेऊ नका. त्याचा काहीही उपयोग नाही. कदाचित त्यांना कुठलीतरी एक गोष्ट मनाला लागली असावी."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)