छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल (वय 86 वर्षे) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मण समाजाविरोधात कथितरित्या आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे.

रविवारी (5 सप्टेंबर) नंदकुमार बघेल यांच्याविरोधात रायपूरमधील पोलीस ठाण्यात ब्राह्मण समाजाने तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी रायपूरच्या स्थानिक कोर्टात आज (7 सप्टेंबर) नंदकुमार बघेल यांना हजर करण्यात आलं होतं. तर कोर्टानं त्यांना जामीन देण्यास नकार दिला आणि 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं.

याआधी पत्रकारांशी बोलताना नंदकुमार बघेल म्हणाले होते की, "आमची लढाई आमने-सामने आहे. मला जामीन नकोय आणि तुरुंगाला मी घाबरत नाही."

नंदकुमार बघेल यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 505 आणि कलम 153 अन्वये कारवाई करण्यात आली.

वडिलांच्या कारवाईवर मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले होते की, आमचे राजकीय विचार वेगवेगळे आहेत.

2. 'भारतातील हिंदू आणि मुस्लीम यांचे पूर्वज एक आहेत' - मोहन भागवत

'आम्ही प्रत्येक भारतीयाला हिंदू मानतो, इथे दुसऱ्याच्या मतांचा अनादर होणार नाही.' असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लीम यांचे पूर्वज एकच आहेत असंही ते म्हणाले.

मोहन भागवत सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी' या विषयावर त्यांनी भाष्य केलं. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

या कार्यक्रमात मुस्लीम समाजातील उच्चविभूषित सुद्धा उपस्थित होते. यावेळी भागवत म्हणाले, "देश पुढे नेण्यासाठी सर्वांना सोबत जावं लागेल. आमच्यासाठी हिंदू हा शब्द आहे. मातृभूमी, गौरवशाली परंपरा आहे.

इस्लाम हा परकीय आक्रमणामुळे भारतात आला हा इतिहास आहे. त्यामुळे तो तसाच सांगितला गेला पाहिजे. कट्टरपंथीयांचा विरोध करण्यासाठी जागरुक व्हावं लागेल. जागृतीसाठी जेवढा वेळ लागणार तेवढं समाजाचं नुकसान होणार."

3. 'बेळगाव झांकी आहे की नाही ते माहीत नाही, पण मुंबई बाकी आहे'

बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर सोशल मीडियावर 'बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है' असा ट्रेंड पक्षाकडून होताना दिसत आहे.

एकीकरण समितीचा पराभव झाला असताना महाराष्ट्रात पेढे वाटणं लज्जास्पद असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

ते म्हणाले, "बेळगाव झांकी आहे की नाही ते माहित नाही, पण मुंबई बाकी आहे हे नक्की आणि मुंबई महानगरपालिका आम्ही सोडणार नाही," असं म्हणत त्यांनी थेट शिवसेनेला आव्हान दिलं आहे.

यावेळी त्यांनी हैद्राबादच्या निवडणुकीचं उदाहरण दिलं. हैद्राबादमध्ये भाजप 2 नगरसेवकांवरुन 51 नगरसेवकांपर्यंत पोहोचलं. त्याच पद्धतीने आम्ही मुंबईतही लढू असंही ते म्हणाले.

'सकाळी एक बोलायचं आणि दुपारी दुसरं बोलयाचं अशी यांची तऱ्हा आहे,' असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला.

4. मी वाघ आहे, कोल्ह्या-कुत्र्यांना घाबरणारी नाही- चित्रा वाघ

'मी वाघ आहे लक्षात ठेवा. कोल्ह्या-कुत्र्यांना घाबरणारी नाही,' अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करुन झाले आणि आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू असल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

त्या म्हणाल्या, "वाघावर कोल्हे-कुत्रे भुंकत आहेत. मी पीडितांच्या पाठशी आहे म्हणून. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल झाले आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू आहे. मी काय आहे आणि काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा. कोल्ह्या, कुत्र्यांना घाबरणारी नाही."

काही दिवसांपूर्वी मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला होता. "चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो", असं ते म्हणाले होते.

5. रश्मी ठाकरे यांचे 19 बेनामी बंगले, किरीट सोमय्यांचा आरोप

उद्धव ठाकरे यांच्यासह 12 जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे 19 बेनामी बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड तुम्हीही बॅग भरा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांची बेनामी संपत्ती बजरंग खरमाटे यांच्या नावावर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. टीव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.

याप्रकरणी त्यांनी सोमवारी (6 सप्टेंबर) बजरंग खारमाटे यांच्या सांगली आणि तासगाव येथील मालमत्तेची पाहणी केली. आरटीओ अधिकारी खारमाटे अनिल परब यांच्या जवळचे होते असं मानलं जातं.

पत्रकार परिषदेत बजरंग खरमाटे यांच्याकडे 750 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचाही दावा सोमय्या यांनी केला आहे. त्यांचा पगार 70 हजार असताना एवढी मालमत्ता कुठून आली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

खरमाटे यांची सोन्याची आणि चांदीची दुकानं असून प्रथमेश पाईप फॅक्ट्री त्यांची आहे असंही ते म्हणाले. अनिल परब यांच्या सचिवाची एवढी संपत्ती कशी? मग मंत्र्यांची किती असेल? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)