You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोहन भागवत: हिंदुत्व कुणाची मक्तेदारी नाही, यात सर्वांचा सहभाग आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस आणि विजयादशमी निमित्त रविवारी ( 25 ऑक्टोबर) सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केले.
मोहन भागवत यांनी आजच्या भाषणात 370 कलम, राम मंदिर, नागरिकत्व कायदा, चीनसंदर्भातील आव्हानं आणि कोरोनासारख्या अनेक मुद्यांवर भाष्य केले.
राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी विरोधक 'देशविरोधी वर्तणूक' करत असल्याचा आरोपही मोहन भागवत यांनी केला.
संघाचा शस्ञपूजा आणि विजयादशमीचा हा कार्यक्रम यंदा नागपूरच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात करण्यात आला. यापूर्वी याचे आयोजन खुल्या मैदानात केले जात होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात मर्यादित संख्येत स्वयंसेवक उपस्थित होते.
'जातीय तेढ मनातच राहिली'
कोरोना आरोग्य संकट येण्यापूर्वी जे मुद्दे चर्चेत होते त्या मुद्यांनी मोहन भागवत यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली.
त्यांनी म्हटलं, '' मार्चमध्ये लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी देश-विदेशातील अनेक विषय चर्चेत होते. पण असे सर्व विषय मागे पडले आणि त्यांचे स्थान आरोग्य संकटाने घेतले. विजयादशमीपूर्वीच कलम 370 रद्द झाले आणि त्या संदर्भातील संसदीय प्रक्रिया पूर्ण झाली.''
विजयादशमीनंतर नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने रामजन्म भूमीसंदर्भात ऐतिहासिक निकाल दिला. एकमताने हा निर्णय घेण्यात आला आणि सर्वांनी संयमाने तो स्वीकारला.''
मोहन भागवतांनी पुढे म्हटलं, की यानंतर नागरिकत्व संशोधन विधेयक आले ज्यावरून प्रचंड गदारोळ करण्यात आला. नागरिकत्व संशोधन कायदा संसदेत पारित झाला होता. भेदभाव आणि अत्याचाराचा सामना कराव्या लागलेल्या आपल्या शेजारील देशांमधील बंधू-भगिनींना नागरिकत्व देण्याची प्रक्रिया आहे.
''हे संशोधन कोणत्याही धार्मिक समुदायाचा विरोध करत नाही. पण हा कायदा देशात मुसलमानांची संख्या वाढू नये म्हणून बनवण्यात आल्याचे वातावरण विरोध करणाऱ्यांनी बनवले.''
'त्यांनी विरोध सुरू केला, आंदोलन होऊ लागले आणि देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.. यावर कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत विचार करण्यापूर्वीच कोरोनामुळे सर्वकाही दाबले गेले. कोरोनामुळे मनातली जीतय तेढ मनातच राहिली. त्यावर उपाय शोधण्यापूर्वीच कोरोनाची परिस्थिती ओढावली. ''
कोरोना आरोग्य संकटाचा सामना इतर देशांच्या तुलनेत भारताने चांगला केला, असंही मोहन भागवतांनी म्हटलं. यासाठी त्यांनी सरकारच्या सजगतेचे कौतुक केले. जगातील काही देशांच्या तुलनेत भारतात कोरोना आरोग्य संकटाचा प्रभाव कमी दिसून येत आहे याची काही कारणं आहेत. कोरनाचा संसर्ग कसा होऊ शकतो आणि संसर्ग थांबवण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार करून प्रशासनाने लोकांना माहिती दिली.
कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. माध्यमांनी गरजेपेक्षा अधिक कोरोनाबाबत चर्चा केल्याने लोकांमध्ये भीती वाढली पण त्यामुळे लोक अधिक सावध झाले.
चीनने मित्रत्वाला कमजोरी समजू नये
मोहन भागवत यांच्या भाषणात भारत-चीन सीमावादाचा उल्लेखसुद्धा होता. चीनबाबत भारताने घेतलेल्या भूमिकेचं भागवत यांनी कौतुक केलं. चीनने भारताला कमकुवत समजण्याची चूक करू नये, असा इशाराही भागवत यांनी दिला.
ते म्हणाले, "चीनने आपल्या लष्करी ताकदीच्या गर्वात आपल्या सीमांवर आक्रमण केलं. सगळ्या जगासोबत चीन असंच करत आहे. भारताने यावेळी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चीन भांबावला आहे. भारत ठामपणे उभा राहिला. लष्करी आणि आर्थिक दृष्टीकोनातून तणावात आल्यानंतर चीन ताळ्यावर आला आहे.
आता चीन याचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल. यामुळे आपल्याला इतर देशांसोबतचे लष्करी आणि राजकीय किंवा कुटनितीक संबंध मजबूत बनवावे लागतील. आपले शेजारी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका हे फक्त शेजारचे देश नसून गेली कित्येक वर्षे ते आपल्याशी जोडलेले आहेत आहेत. त्यांच्यात आणि आपल्यात समानता आहेत. आपल्याला त्यांना पुन्हा आपल्याकडे वळवायला हवं."
चीनला इशारा देताना भागवत पुढे म्हणाले, "आमच्या मित्रत्वाला आमची कमजोरी समजू नका. भारताला झुकवू शकतो, असं म्हणणाऱ्यांचा गैरसमज दूर झाला आहे."
यासोबतच भागवत यांनी विरोधकांवरही भारतविरोधी कृत्यांचे आरोप करत निशाणा साधला. बाह्य सुरक्षेसोबतच अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असल्याचं भागवत म्हणाले.
"सत्तेच्या बाहेर असताना सत्ता मिळण्याबाबत विचार करणं हे लोकशाहीत असतं. त्यासाठीचे डावपेच करणं स्वाभाविक आहे. पण त्यामध्ये विवेक असावा. पण आपल्या वागणुकीमुळे आपल्यात कटुता निर्माण झाली असेल, तर ते राजकारण नाही. भारताला कमकुवत, विखुरलेला समाज बनवण्यासाठी कार करत असलेल्या शक्ती परदेशात आणि देशात अशा दोन्ही ठिकाणी आहेत," असं ते म्हणाले.
अनेक जण संविधानाविरुद्ध कायदा बासनात गुंडाळून विरोध करतात. भारताचे तुकडे होतील, असं म्हणतात. बाबासाहेबांनी अराजक म्हणून संबोधलेल्या गोष्टी ते करत असतात. समाजाने त्यांच्यापासून दूर राहणं शिकायला हवं. हे लोक संभ्रम निर्माण करतात."
'हिंदुत्व कुणाची जहागीर नाही'
मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात हिंदुत्व शब्दावर बरंच बौद्धिक दिलं. विरोधकांनी या शब्दाबाबत दिशाभूल करू नये, असं त्यांनी म्हटलं.
ते म्हणाले, "हिंदुत्व या शब्दाच्या अर्थाला पूजा-अर्चेशी जोडून संकुचित करण्यात आलं आहे. हा शब्द आपल्या देशाची ओळख आहे. हा शब्द आपल्या परंपरेचा भाग आहे. हिंदू कोणत्याही एका संप्रदायाचं नाव नाही. कोणत्याही एका प्रांतात जन्म झालेला हा शब्द नाही. ही कुणाची जहागीर नाही. किंवा कोणत्याही एका भाषेचा पुरस्कार करणारा हा शब्द नाही."
"आपण भारत एक हिंदू-राष्ट्र आहे, असं म्हणतो, त्यावेळी त्याची संकल्पना राजकीय नाही. हिंदूंशिवाय इतर कुणीच राहणार नाहीत, असा याचा अर्थ नाही. किंबहुना हिंदू या शब्दात हे सर्वजण समाविष्ट आहेत."
"हिंदू शब्दाच्या भावनेच्या परिघात येण्यासाठी कुणालाही आपली पूजा-पद्धत, प्रांत किंवा भाषा यांसारखी विशेषता सोडावी लागत नाही. पण फक्त आपलंच वर्चस्व असावं, ही इच्छा सोडावी लागते. स्वतःच्या मनातून फुटीरतावादाची भावना नष्ट करावी लागते."
सरसंघचालक भागवत पुढे म्हणाले, "आपली छोटीशी ओळखसुद्धा आहे. ही आपली विविधता असते. काहीजण इथे आधीपासून होते. काही जण यामध्ये बाहेरून येऊन सामील झाले. हिंदू विचारात अशाच विविधतेचा स्वीकार आणि सन्मान आहे. पण या विविधतेला लोक फरक समजतात."
मोहन भागवत यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे कृषी बिलाचं समर्थनही केलं. "शेतकऱ्याला आपल्या मालाचा साठा, वितरण स्वतःला करता आलं पाहिजे. सगळे मध्यस्थ आणि दलालांच्या तावडीतून सुटून त्याला आपल्या मर्जीने उत्पादन विकता आलं पाहिजे. हेच स्वदेशी कृषी धोरण म्हणून ओळखलं जातं," असं भागवत म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)