You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजपविरोध म्हणजे हिंदूविरोध नाही, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाषेचा अर्थ काय?
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली
भाजपचा विरोध म्हणजे हिंदूंचा विरोध नव्हे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भैयाजी जोशी नुकतंच म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे गोव्यात एका व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात रविवारी भैयाजी जोशी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी ते म्हणाले, "हिंदू समाज म्हणजे भाजप नाही. भाजपचा विरोध करणारा हिंदुविरोधी आहे, असा त्याचा अर्थ काढू नये. राजकीय विरोध चालतच असतो. त्याला याच्याशी जोडून बघता कामा नये."
ते पुढे म्हणाले, "हिंदूच हिंदूंचा शत्रू बनल्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. ही उदाहरणं काही आजची नाही. एका जातीतले लोकही एकमेकांचा विरोध करतात."
"हिंदुत्वाचा विरोध करणंदेखील कधीकधी पॉलिटिकल असतं. हिंदुत्वाचं समर्थन करणंही कधीकधी पॉलिटिकल असतं. मला वाटतं हिंदुत्व आणि हिंदू समाजाने याच्या वर यायला हवं."
इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या कार्यक्रमात संघाचे सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांना प्रश्न विचारण्यात आला होता, "देशातील आजची परिस्थिती बघता हिंदूच हिंदूचा शत्रू आहे, असं वाटतं का?"
वक्तव्याचा अर्थ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आणि अभ्यासक अमिताभ सिन्हा यांच्या मते भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याला संघ विचारसरणीशीच जोडूनच बघितलं पाहिजे.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "राष्ट्र सर्वोपरी है - ही संघाची मूळ संकल्पना आहे. व्यक्ती आणि पक्ष दोन्ही त्यानंतर येतात. याच परंपरेचं संघही आजही पालन करतो. राष्ट्र सर्वांत वर असेल तर कुठलाही राजकीय पक्ष दुसऱ्या क्रमांकावरच येईल."
अमिताभ सिन्हा पुढे म्हणतात, "राजकीय पक्ष मार्ग आहे. लक्ष्य नाही. त्यामुळे राष्ट्राला सर्वतोपरी मानणारे सर्वत्र असावे, असं संघाला वाटतं. मग तो कुठल्याही पक्षात असो. जेणेकरून अशा व्यक्तींनी आपल्याच पक्षात एक दबावगट बनवून ठेवावा."
नागरिकत्व कायदा आणि NPR विरोध
भैयाजी जोशी यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे, विशेषतः वक्तव्याच्या टायमिंगवरून.
असं असेल तर भाजप शाहीनबागमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना आणि केजरीवाल यांना देशविरोधी का म्हटलं जातंय? या प्रश्नाचं उत्तर देताना अमिताभ सिन्हा म्हणतात, "भैयाजी जोशी यांचं वक्तव्य दिल्ली निवडणूक किंवा नागरिकत्व कायद्याविरोधी निदर्शनांशी जोडून बघू नये."
त्यांच्या मते ज्या दिवशी केजरीवाल देशहिताविषयी बोलतील ते संघी म्हणजेच संघाचे होतील. मात्र ते मनापासून असलं पाहिजे, राहुल गांधींप्रमाणे नाही.
तर भैयाजी जोशी यांच्या या वक्तव्यातून फार काही अर्थ काढू नये, असं ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अक्षय मुकूल यांना वाटतं. त्यांच्या मते संघ कायमच असं करत आलेला आहे.
ते म्हणाले, "लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी संघाचे लोक पूर्वीही भाजप नेत्यांपेक्षा वेगळी वक्तव्यं करायचे. मात्र, कुणाला असं वाटत असेल की संघ आणि भाजप यांच्यात वितुष्ट आलं आहे, तर हे चुकीचं मत आहे. मला असं वाटत नाही.
"नागरिकत्व कायदा आणि त्याविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय विचार करतो, हे अजून समोर आलेलं नाही. आपण हेदेखील विसरता कामा नये की नागरिकत्व कायदा एक प्रकारे संघाच्या अजेंड्याचा भागही आहे."
हिंदू राष्ट्राची संकल्पना
भैयाजी जोशी यांचं वक्तव्य हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेशी जोडून बघितलं पाहिजे का? अमिताभ सिन्हा म्हणतात, "सर्वांत आधी हे समजून घ्या की हिंदू कोण आहेत? सुदर्शनजी यांच्या मते भारताच्या भौगोलिक स्थितीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हिंदू मानलं पाहिजे. तसं मानलंही आहे.
सिंधूच्या अलीकडे राहाणारा प्रत्येकजण हिंदू आहे. प्रार्थनेचे नियम वेगवेगळे असू शकतात. मग ते सनातन व्यवस्थेत असो, कुराण पठण करणारा असो, बायबल मानणारा असो किंवा गुरुग्रंथ साहेब मानणारा असो. सर्वांसाठी एक शब्द वापरायचा झाला तर तो आहे हिंदू."
2025 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षं पूर्ण होत आहेत. संघाने कायमच नरेंद्र मोदींचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आणि हिंदू राष्ट्राचं स्वप्न सोबत पाहिलंय. हे संघाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उद्देशांपैकी एक आहे.
2014 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा अंदाज बांधला होता की नरेंद्र मोदी 10 वर्षं पंतप्रधानपदी राहिले तर 2025 साली हिंदू राष्ट्राचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
अशाप्रकारचं वक्तव्यं पहिल्यांदाच केलं आहे का?
यापूर्वीदेखील अशी वेगवेगळी किंवा वाद निर्माण करणारी वक्तव्यं संघ नेत्यांनी केली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आरक्षणासंबंधी म्हणाले होते, "आरक्षणाचा विरोध करणारे आणि समर्थन करणारे यांनी एकमेकांचं म्हणणं समजून घेतलं तर ही समस्येवर चुटकीसरसी तोडगा काढता येईल."
ते म्हणाले होते, "एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. ही सद्भावना समाजात निर्माण होत नाही तोवर या समस्येवर तोडगा निघणार नाही."
त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाने (बसप) जोरदार टीका केली होती.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) सहभागी असलेल्या रामदास आठवले, रामविलास पासवान या नेत्यांनीही भागवत यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
त्यानंतर या वक्तव्यावर स्पष्टीकरणही देण्यात आलं होतं. संघाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, "मोहन भागवत यांनी आपल्या वक्तव्यात या मुद्द्यावर चर्चेचं आवाहन केलं आहे."
संघ आणि पक्षात अंतर
भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांचं नातं पक्ष अस्तित्वापेक्षाही जुनं आहे. भाजपचा जन्म ज्या जनसंघातून झाला तो संघाला मानणारा होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक माधव सदाशिव गोळवळकर यांनी आपल्या काळात जनसंघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पक्ष असल्याचं म्हटलं होतं.
जनसंघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नियुक्ती केंद्र असल्याचं गोळवळकर म्हणाले होते. म्हणजेच जनसंघात काम करणारा प्रत्येकजण शेवटी संघासाठी आणि संघ उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी काम करतो.
त्याकाळी संघाची उद्दिष्टं राजकीय नव्हती. ती सामाजिक आणि सांस्कृतिक होती. त्यात हिंदू राष्ट्राची संकल्पनाही होती.
संघ आणि भाजप यांच्यातलं नातं अमिताभ सिन्हा गणिताचं उदाहरण देऊन स्पष्ट करतात. त्यांच्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेट आहे आणि भाजप त्याचा सबसेट आहे.
असं असलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपवर किती प्रभाव आहे, यावर प्रसार माध्यमांमध्ये चर्चा कायमच सुरू असते. हे समजून घेण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या कार्यकाळाचा आढावा घ्यायला हवा.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार सहा वर्ष टिकलं. त्यावेळी वाजपेयी आणि अडवाणी यांनी विचारपूर्वक एका रणनीतीअंतर्गत संघाला सरकारच्या कारभारापासून दूर ठेवलं होतं. या सरकारमध्येही हे अंतर कायम ठेवण्याचा प्रयत्न दिसत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)