लग्नानंतर पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या महिलांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

इरफान आणि झोया

फोटो स्रोत, devina gupta

फोटो कॅप्शन, इरफान आणि झोया
    • Author, देविना गुप्ता,
    • Role, बीबीसी न्यूज

पाकिस्तानातील सिंध प्रांतामध्ये गतकालीन राजपूत राज्याचा भाग राहिलेल्या उमरकोट इथे सरिताचं घर होतं.

घरच्यांचा निरोप घेऊन वीस वर्षीय सरिता निघाली आणि वाटेत एका पुलापाशी सिंधू नदीमध्ये तिने एक नाणं टाकलं.

भारतात जाण्यासाठी नदीची परवानगी घेऊन ती पुढे गेली. आता ती वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्यासाठी दुसऱ्या देशात प्रवेश करत होती- हा प्रवास सुखाचा होऊ दे, अशी तिने प्रार्थना केली.

सरिता कुमारी यांनी 1984 साली सीमा पार करून राजस्थानातील घणेराव इथे ठाकूर हिंमत सिंह यांच्याशी लग्न केलं.

"माझ्या वडिलांनी मला ही प्रथा शिकवली. राजपूत मुलींना त्यांच्याच कुळामध्ये लग्न करायची परवानगी नसते.

पाकिस्तानात सोधा राजपूत कुळातलं फक्त आमचंच कुटुंब आहे. त्यामुळे मला भारतातील वर शोधावा लागेल, हे आम्हाला आधीपासूनच माहीत होतं. एका लग्नसमारंभासाठी मी भारतात आले तेव्हा केवळ 19 वर्षांची होते.

माझ्या भावी सासूने त्याच समारंभात मला पाहिलं आणि माझी पत्रिकाही जुळली. लग्न करताना मी माझ्या पतीला केवळ एकदाच पाहिलं होतं," सरिता कुमारी सांगतात.

सरिता यांना हिंदी शिकण्यापासून नव्याने आयुष्याची सुरुवात करावी लागली.

"तशी ती निव्वळ वाळंवटात आखलेली रेषाच आहे आणि राजस्थान व सिंध यांच्यात सामायिक सीमाही आहे, तरीसुद्धा सुरुवातीला इथे जुळवून घेणं अवघड गेलं. 'बिन्दनी ने कुछ ना आवे'- तिला काही येत नाही, असं ते राजस्थानीमध्ये म्हणायचे.

मला वर्तमानपत्रंही वाचता यायची नाहीत, बोर्ड वाचता यायचे नाहीत, त्यामुळे काहीतरी गमावल्यासारखं वाटायचं सारखं.

इथे जुळवून घ्यायला मला काही वर्षं लागली. माझ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या सोबत मी हिंदी शिकले. मी राजस्थानी शिकले आणि मग धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी संस्कृतही शिकले."

भारतातील आरंभीच्या वर्षांमध्ये सरिता यांना स्वतःच्या समुदायाकडून पूर्वग्रहाला सामोरं जावं लागलं, तो काळ त्यांना अजूनही आठवतो.

केवळ भाषेचा मुद्दा नाही, तर पाकिस्ताना माहेरच्या घरी शिजवलं जाणारं अन्नही भारतातील सासरच्या घरापेक्षा निराळं होतं.

सरिता

फोटो स्रोत, devina gupta

फोटो कॅप्शन, सरिता

सरिता यांना पाच वर्षांमध्ये भारतीय नागरिकत्व मिळालं आणि आता त्या पाकिस्तानातील हिंदू नववधूंसाठी एक पुस्तक लिहित आहेत.

या मुलींचं कौटुंबिक जीवन सुकर होण्यासाठी त्यांना ज्या प्रथा माहिती असायला हव्यात, त्याबद्दलचं हे पुस्तक आहे.

2017 सालापासून सरिता यांचे पती घणेरावचे अठरावे ठाकूरसाहेब झाले. त्यांचं कुटुंब या भागात एक हॉटेल आणि एक लॉज चालवतं.

सरिता कुमारी यांना त्यांचे वडील वारले तेव्हा माहेरच्यांना भेटायला जाता आलं नाही, या एका गोष्टीची मात्र खंत वाटते.

"नव्वदच्या दशकात दोन्ही देशांमध्ये तणाव होता, त्यामुळे तीन-चार वर्षं मला पाकिस्तानला जाता आलं नाही. माझे वडील वारले तेव्हाही मी तिथे नव्हते.

माझ्या मुलांचा जन्म झाला तेव्हा त्यांना पाहण्यासाठी माहेरून कोणी येऊ शकलं नाही. माहेरी काही अडचण आली किंवा काही आजारपण आलं, तरी मी पाकिस्तानात जाऊ शकत नाही," त्या म्हणतात.

सरिता कुमारी सोधा यांची आई व भाऊ अजूनही उमरकोट इथे राहतात. त्यांच्या पूर्वजांनी मुघल सम्राट हुमायूँला आश्रय दिला होता. तिथेच त्याचा मुलगा अकबर याचा जन्म झाला. आज हे शहर गतकालीन वैभवाच्या अवशेषांनी भरलेलं आहे.

प्रेम, हुरहूर आणि फैज़ यांची शायरी

नहीं निगाह में मंझिल, तो जुस्तुजू ही सही

नही विसाल मुयस्सर, तो आरज़ू ही सही

फैज़ अहमद फैज़ यांच्या वरील ओळींमध्ये प्रिज व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या हुरहुरीचं वर्णन केलं आहे- प्रिय व्यक्तीला भेटता येत नसेल तर किमान भेटीची आशा तरी राहू दे.

शझनम आणि मन्सूर यांचा विवाह

फोटो स्रोत, devina gupta

फोटो कॅप्शन, शझनम आणि मन्सूर यांचा विवाह

बेचाळीस वर्षीय शझमां मन्सूर 2008 साली भारताकडे येण्यासाठी कराची विमानतळावर आल्या, पण ऐनवेळी विमान रद्द करण्यात आलं, तेव्हा त्यांच्या मनात वरील ओळींमधील भावनाच आल्या होत्या.

विशेष व्हिसा काढून त्या माहेरी आल्या होत्या, आणि व्हिसाच्या अटींनुसार त्यांनी ठराविक दिवसांनी भारतात परतणं आवश्यक होतं. त्यांचे भारतीय असणारे पती मन्सूर मुंबईत त्यांची वाट पाहत होते.

मन्सूर अली सांगतात, "तेव्हा खूपच त्रास झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. त्याचा फटका ऐन वेळी दोन्ही देशांमधील थेट विमानप्रवासाला बसला. शझमांला परत येता आलं नसतं तर तिचा व्हिसा रद्द झाला असता, त्यामुळे आम्ही चिंतेत होतो.

चार दिवस आम्ही अशा तणावाखाली काढले आणि शेवटी मी तिच्यासाठी श्रीलंकेमार्गे येणाऱ्या विमानाचं तिकीट काढलं."

भारतात स्थायिक होण्यासाठी पाकिस्तानातून स्थलांतर करणाऱ्या शेकडो वधूंपैकी शझमां एक आहेत. त्यांचं 2005 साली मन्सूर यांच्याशी लग्न झालं आणि त्या भारतात आल्या.

"बंगळुरू हे माझ्या बाबांचं शहर आहे. फाळणीच्या वेळी त्यांचं कुटुंब पाकिस्तानला गेलं तेव्हा बाबा लहान होते. पण बंगळुरूमध्ये घालवलेल्या वेळाच्या मधूर आठवणी त्यांच्या सोबत राहिल्या. मन्सूरशी लग्न करून मी त्यांच्या आठवणींशी जोडून घ्यावं, अशी त्यांची इच्छा होती. मलाही ते पटलं," शझमां सांगतात.

पण दोन्ही देशांमधील बदलत्या राजकीय समीकरणांचा फटका वेळोवेळी सीमापार प्रवासाला बसत असतो, या वास्तवाशी जुळवून घेऊनच नझमां यांना इथे राहावं लागणार होतं.

भारतीय नागरिकांशी लग्न करणाऱ्या पाकिस्तानी वधू सर्वसाधारणतः अल्पकालीन व्हिसा घेऊन इथे येतात आणि इथल्या वास्तव्याबद्दल त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नोंद करावी लागते.

ठराविक आठवड्यांनी पोलीस काटेकोरपणे तपासणी करतात. मग या नववधूंना दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज करावा लागतो, आणि त्यानंतर नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो.

सरिता यांचा विवाह

फोटो स्रोत, devina gupta

फोटो कॅप्शन, सरिता यांचा विवाह

डेक्कन हेराल्ड या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीतील आकडेवारीनुसार, सन 2011 ते मार्च 2020 या कालावधीमध्ये केवळ 4085 पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं. तर, याच कालावधीत 15 हजारांहून अधिक बांग्लादेशी लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं. यातील धर्म व लिंगभाव यांनुसारची आकडेवारी गृह मंत्रालयाने पुरवलेली नाही, हे लक्षात घ्यायला हवं.

शझमां यांना 2018 साली भारतीय नागरिकत्व मिळालं- त्याच वर्षी त्या माहेरी जाऊन आल्या. त्यानंतर त्यांना तिकडे जाता आलेलं नाही.

आता त्या भारतीय आहेत आणि सध्याच्या राजकीय वातावरणात त्या फारशा लोकांना स्वतःच्या पाकिस्तानी नात्याविषयी सांगत नाहीत.

"मी एक नियम केलेला आहे. कोणा व्यक्तीला मी पहिल्यांदाच भेटत असेन, तर मी पाकिस्तानाची आहे हे त्यांना सांगत नाही.

लोक काहीतरी बोलून जाण्याची शक्यता असते, आणि ते आपल्याला लागतं. एकदा मी माझ्या मुलीसोबत बागेत गेले होते आणि दुपट्टा वेगळ्या पद्धतीने घेतला होता. तर, एक बाई माझ्यापाशी आली आणि मी कुठून आलेय असं विचारायला लागली. मी पाकिस्तानची आहे, असं तिला सांगितलं. तर, 'पाकिस्तानी दहशतवादी असतात', असा तिने शेरा मारला.

मला धक्काच बसला. हे पहा, कोणीच पाकिस्तानात गेलेलं नाही, पण पाकिस्तानातले लोक दहशतवादी आहेत, अशी एक सार्वत्रिक प्रतिमा झालेली आहे. माझ्या कुटुंबाला असं दुखावून घ्यायला लागावं, असं मला वाटत नाही."

अशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं, तर त्यांचे पती रागावर नियंत्रण ठेवण्याचं तंत्र वापरतात किंवा विनोदाने परिस्थिती सावरतात.

"मी शांत राहून वीसपर्यंत आकडे मोजायचा प्रयत्न करतो. मी पाकिस्तानी मुलीशी लग्न करायला नको होतं, वगैरे बाता मारणारे लोक भेटल्यावर लगेच माझा पारा चढतो. काही वेळा ते थेटच मला याबद्दल विचारतात, तेव्हा मी त्यांना सांगतो की, भारतीय संविधानानुसार सर्व भारतीय भाऊ-बहीण आहेत, त्यामुळे पाकिस्तानी मुलीशी लग्न केलं. यावर काही जण हसायला लागतात. अशा मार्गाने मग मी तणाव कमी करतो," मन्सूर सांगतात.

'कॅनडात राहावंसं वाटतं'

आमच्या भारतीय आणि पाकिस्तानी वारशाशी जोडून घेण्यासाठी आम्हाला कॅनडात राहावं वाटतं.

मीर इर्फान नजाफी दुबईमध्ये त्यांच्या मैत्रिणीसाठी 'हश्मी काजळ' शोधत होते. केवळ एका पाकिस्तानी दुकानातच हे काजळ मिळतं. याच दुकानात त्यांना त्यांची भावी पत्नी भेटणार आहे, याची कल्पना मीर यांना नव्हती.

शझनम

फोटो स्रोत, devina gupta

फोटो कॅप्शन, शझनम

मूळच्या पाकिस्तानी असलेल्या झोया फातिमा रिझवी तत्काळ भारतीय नागरिक असलेल्या मीर यांच्या प्रेमात पडल्या. मीर यांचे भुरकट केस आणि देखणं रूप यांची त्यांना भुरळ पडली. पण त्यांनी 2012 साली लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा झोया यांच्यासाठी ती खूप मोठी घटना होती.

"लग्न करून भारतात स्थायिक झालेल्या पाकिस्तानी मुलींना कागदपत्रांबाबत आणि प्रवासाबाबत कसं अडचणींना सामोरं जावं लागतं, याबद्दल मी बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. देशातून बाहेर जाण्यासाठी त्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागते, असंही ऐकलं होतं. त्यामुळे खरंतर मला भीतीच वाटत होती. त्यामुळे दुबई किंवा कॅनडा यासारख्या तटस्थ देशात राहायची माझी इच्छा आहे, असं मी त्याला सांगितलंही."

पण तरीही भारत व पाकिस्तान यांच्यातील शत्रुत्वामुळे कडवट झालेल्या लोकांकडून त्यांना पूर्वग्रहाला सामोरं जावं लागलं.

"माझ्या एका मित्राने लग्नाला यायला नकार दिला. मी शत्रूसमोर भारताचा विश्वासघात करतो आहे, असा आरोप त्याने केला. माझ्या काही नातेवाईकांनीही मुलीकडच्या लोकांसोबत फोटो काढू दिले नाहीत. त्यांच्या मनात इतिहासाबद्दल दाटलेला कडवटपणा होता," असं मीर इर्फान सांगतात.

संघर्ष व राजकारण यांचा गुंतागुंतीचा इतिहास दोघांच्या नात्यावर कमी-अधिक प्रभाव टाकत असला, तरी भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या मुद्द्यावर सीमारेषा अधिक स्पष्टपणे आखल्या जातात आणि लढाऊ पवित्रे घेतले जातात.

"मी कायम भारताच्या बाजूने असतो, तर झोया पाकिस्तानच्या बाजूने असते," मीर इर्फान सांगतात.

आता ते कॅनडाला स्थायिक झाले आहेत. त्यांच्या दोन मुलींना भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमधील वारशाशी जोडून घेण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचं मीर इर्फान यांना वाटतं.

"व्हिसासंबंधीच्या निर्बंधांमुळे आम्हाला एकत्र भारतामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये जाता आलेलं नाही. मला आमच्या मुलींना घेऊन कुटुंब म्हणून भारतात आणि पाकिस्तानात जायचं आहे. लवकरच तसा प्रवास करता येईल, अशा मला आशा आहे," ते सांगतात.

त्यांचं कुटुंब भारत व पाकिस्तान यांचा स्वातंत्र्य दिवस कॅनडात साजरा करतं आहे, या पार्श्वभूमीवर त्यांना ही आशा शोकात्म उपरोधाकडे निर्देश करणारी वाटते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)