भारत-पाकिस्तान स्वातंत्र्याची कहाणी : पाकिस्तानला खरंच भारताच्या एक दिवस आधी स्वातंत्र्य मिळालंय?

पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अकील अब्बास जाफरी
    • Role, इतिहासकार, संशोधक

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळून 73 वर्षं पूर्ण झाली. पण, इंग्रजांबरोबरचा स्वातंत्र्य करार एकाचवेळी होऊन सुद्धा पाकिस्तान आपला स्वातंत्र्य दिन भारतापेक्षा एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्टला का साजरा करतो? इतिहासातील अशा काही घटना पाहूया ज्यांच्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत.

याविषयी पाकिस्तानमधले जुने जाणकार असं सांगतात की, "पाकिस्तानला पवित्र रमजान महिन्याच्या 27व्या मध्यरात्री स्वातंत्र्य मिळालं. आणि ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं तो दिवस अलविदा जुम्मा म्हणजे रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार होता. आणि त्या दिवशी 14 ऑगस्ट 1947 हा दिवस होता. म्हणून पाकिस्तान स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताच्या एक दिवस पुढे किंवा 'मोठा' आहे."

पण, आपण जर दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर बघितलं तर लक्षात येतं की, त्या दिवशी गुरुवार होता. आणि रमजानचा 27वा नाही तर 26वा दिवस होता.

पाकिस्तानचं एक टपाल तिकीट बघितलं जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 11 महिन्यांनी म्हणजे 9 जुलै 1948ला काढण्यात आलं, त्यात पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट 1947 असा स्पष्टपणे लिहिलाय.

यातून हाच निष्कर्ष निघतो की, पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस 14 नाही तर 15 ऑगस्ट 1947 आहे. मग, स्वातंत्र्याचा पहिला वाढदिवस 14 ऑगस्ट 1948ला का साजरा झाला?

मग पुन्हा मनात गोंधळ निर्माण होतो की, पाकिस्तान खरंच कधी स्वतंत्र झाला? 14 ऑगस्ट 1947 की 15 ऑगस्ट 1947?

पाकिस्तान 14 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला असेल तर स्वातंत्र्याच्या 11 महिन्यांनंतर निघालेल्या टपाल तिकिटावर 15 ऑगस्ट 1947 अशी तारीख का लिहिलीय. आणि जर 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं असेल तर 1948 मध्ये स्वातंत्र्याची पहिली वर्षपूर्ती 14 ऑगस्टला का साजरी झाली. आणि तिथून पुढे पाकिस्तानात स्वातंत्र्यदिन 14 ऑगस्टला का साजरा होतो?

पाकिस्तान खरा कधी स्वतंत्र झाला?

हे पडताळण्याचा सगळ्यांत पक्का दस्तऐवज म्हणजे इंडियन इन्डिपेन्डन्ट अॅक्ट 1947 (Indian Independent Act 1947). हा कायदा ब्रिटिश संसदेत मंजूर झाला. आणि ग्रेट ब्रिटनच्या सहाव्या राजाने 18 जुलै 1947 रोजी त्यावर स्वाक्षरी केली.

या कायद्याची एक प्रत पाकिस्तानचे सेक्रेटरी जनरल चौधरी महम्मद अली (हे पुढे जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधानही झाले) यांनी 24 जुलै 1947 लाच मोहम्मद अली जिन्ना यांना पाकिस्तानला पाठवून दिली होती.

पाकिस्तानी झेंडा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 15 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान सरकारच्या प्रतिनिधीमंडळाने लंडनच्या लँकेस्टर हाऊसमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांना झेंडा भेट दिला होता.

हा कायद्याचा मजकूर ब्रिटिश सरकारने 1983मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'द ट्रान्सफर ऑफ पॉवर' या ग्रंथाच्या 12व्या खंडात 234व्या पानावर आहे.

त्याचा अनुवाद कायद-ए-आझम पेपर्स प्रोजेक्ट, कॅबिनेट डिव्हिजन, पाकिस्तान सरकार, इस्लामाबाद यांनी केलेल्या जिन्ना पेपर्स (अनुवाद उर्दूत आहे) या ग्रंथाच्या तिसऱ्या खंडाच्या 45व्या पानावर आहे.

या ग्रंथात सरळ सरळ असं म्हटलंय की, 15 ऑगस्ट 1947ला ब्रिटिश सरकार भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती करेल.

पत्रक

फोटो स्रोत, legislation.gov.uk

नवीन दोन देश भारत आणि पाकिस्तान हे असतील आणि त्यासाठी ठरलेली तारीख 15 ऑगस्ट आहे, असं त्यात नमूद करण्यात आलंय.

7 ऑगस्ट 1947 : संयुक्त राष्ट्रसंघाच्या ब्रिटिश स्थायी सदस्याला पाठवलेली तार

तारेतला मजकूर असा आहे,

"व्हॉईसरॉय यांनी तार पाठवली आहे की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यतेसाठी मुस्लीम नेत्याने अर्ज करावा. हा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे. सध्या ब्रिटिश व्हॉईसरॉय पाकिस्तानच्या वतीने तसा अर्ज करतील. आणि 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यावर खुद्द पाकिस्तान ही प्रक्रिया पार पाडू शकेल."

माऊंटबॅटन यांची समस्या

ब्रिटिश सरकारने जाहीर तर केलं की, पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांना 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य बहाल करण्यात येईल. पण, यात अडचण अशी होती की, माऊंटबॅटन यांना 14 आणि 15 ऑगस्ट या दिवशी भारतात नवी दिल्ली इथं भारतीय स्वातंत्र्याची घोषणा करायची होती.

मोहम्मद अली जिन्ना, लुईस माऊंटबॅटन, एडविना माऊंटबॅटन आणि फातिमा जिन्ना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोहम्मद अली जिन्ना, लुईस माऊंटबॅटन, एडविना माऊंटबॅटन आणि फातिमा जिन्ना

पुढे नवनिर्वाचित भारतीय सरकारकडे सत्तेची सूत्र सोपवायची होती. आणि त्यांना स्वत:ला स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून पदभारही स्वीकारायचा होता.

त्यांनी असा मार्ग काढला की, ते 13 ऑगस्ट 1947 ला कराचीत गेले. 14 ऑगस्टला सकाळी त्यांनी पाकिस्तानमध्ये संविधान सभेला संबोधित केलं. आणि सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यांनी अशी घोषणा केली की, आज रात्री म्हणजे 14 आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्री पाकिस्तान स्वतंत्र देश असेल.

13 ऑगस्टच्या मध्यरात्री लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या सन्मानार्थ कराचीतील गव्हर्नर जनरल हाऊसमध्ये रात्रीची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. तिथे जमलेल्या लोकांना संबोधित करताना मोहम्मद अली जिन्ना म्हणाले,

"मी ब्रिटिश सम्राटांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतो. आणि त्याचबरोबर हा आनंद व्यक्त करतो की, आज भारतीय लोकांनाही पूर्णपणे सत्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट 1947 पासून दोन नवे देश पाकिस्तान आणि भारत अस्तित्वात येतील. ब्रिटिश सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रकूल देशांना स्वातंत्र्य देण्याच्या त्यांच्या निर्णयाच्या अंमलबजावणीत आपण आणखी थोडं पुढे गेलो आहोत."

व्हॉईसरॉय यांचा संदेश आणि स्वातंत्र्याची घोषणा

दुसऱ्या दिवशी गुरुवारी 14 ऑगस्ट 1947 ला रमझान महिन्याच्या 26 तारखेला सकाळी नऊ वाजता कराचीच्या सिंध असेंब्लीच्या इमारतीत पाकिस्तानची विशेष संविधान सभा सुरू झाली.

अगदी सकाळपासूनच इमारतीत सामान्य जनताही उत्साहाने जमली होती. पाकिस्तानचे नवे गव्हर्नर जनरल महम्मद अली जिना आणि लॉर्ड माऊंटबॅटन एका खास बग्गीत बसून असेंबली हॉलमध्ये निघाले तेव्हा दुतर्फा लोक जमले होते. आणि जोरदार घोषणा आणि टाळ्यांच्या गजरात जनतेनं या दोघांचं स्वागत केलं. असेंबली हॉलमध्ये सगळ्या खुर्च्या गच्च भरलेल्या होत्या.

कराचीत आपल्या 14 ऑगस्टच्या भाषणानंतर लॉर्ड माऊंटबॅटन यांची रॅली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कराचीत आपल्या 14 ऑगस्टच्या भाषणानंतर लॉर्ड माऊंटबॅटन यांची रॅली

गॅलरीत पाकिस्तानमधल्या प्रसिद्ध व्यक्ती, नेते वर्तमानपत्रांचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सभेचं अध्यक्षपद अर्थातच संविधान सभेचे अध्यक्ष मोहम्मद अली जिना यांच्याकडे होतं. त्यांच्या शेजारी माऊंटबॅटन बसले होते.

सर्वप्रथम लॉर्ड माऊंटबॅटन यांनी ब्रिटिश सम्राटांचा संदेश उपस्थितांना वाचून दाखवला. यात जिनांना उद्देशून म्हटलं होतं की,

"ब्रिटिश राष्ट्रकूलात सहभागी असलेल्या पाकिस्तान नावाच्या एका नव्या राष्ट्राची स्थापना आज होते आहे. त्याबद्दल मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. तुम्ही ज्या पद्धतीने स्वातंत्र्य मिळवलं ते अख्ख्या जगात स्वातंत्र्यप्रेमी लोकांसाठी मार्गदर्शक ठरले. मला अशी आशा आहे की, ब्रिटिश राष्ट्रकूलातील सर्व देश लोकशाहीच्या सिद्धांतांचं पालन करतील."

हा संदेश वाचून दाखवल्यानंतर लॉर्ड माऊंटबॅटन यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात पाकिस्तान आणि पाकिस्तानी जनतेच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली.

या आपल्या भाषणात त्यांनी म्हटलंय की,

"आज मी व्हॉईसरॉय म्हणून तुमच्या समोर उभा आहे. उद्या नव्या पाकिस्तानी सरकारची स्थापना होईल. आणि त्याची व्यवस्था तुमच्या हातात असेल. मी तुमचा शेजारी देश भारताचा नवा संवैधानिक प्रमुख म्हणून काम पाहिन. दोन्ही देशांच्या सरकारांनी मला संयुक्त सुरक्षा परिषदेचा तटस्थ अध्यक्ष बनण्याची विनंती केली आहे. माझ्यासाठी ही खूप सन्मानाची गोष्ट आहे. आणि ही जबाबदारी कसोशीने पेलण्याचा मी प्रयत्न करेन.

उद्या दोन नवीन सार्वभौम राष्ट्र ब्रिटिश राष्ट्रकूलात समाविष्ट होतील. खरंतर ही दोन नवीन राष्ट्र नाहीएत. तर गौरवपूर्ण प्राचीन इतिहास असलेली दोन राष्ट्र आहेत. या दोन्ही स्वतंत्र देशांतील नेते जगभरात लोकप्रिय आहेत. अख्खं जग त्यांचा आदर करतं. या दोन्ही देशातील कवी, शास्त्रज्ञ आणि सैन्यानेही मानवतेच्या दृष्टिकोणातून जगाची सेवा केली आहे. या देशांच्या सरकारांना अनुभव कमी असेल पण, ते कमजोर नाहीत. उलटपक्षी जगभरात शांती आणि विकास घडवून आणण्यात आपला वाटा दोन्ही राष्ट्र उचललीत एवढी क्षमता त्यांच्यात आहे."

लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या मागोमाग बॅरिस्टर जिन्ना यांनी आपलं भाषण सुरू केलं. त्यांने ब्रिटिश राजा आणि व्हॉईसरॉय यांचे आभार मानले आणि त्यांना आश्वासन दिलं की,

माऊंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट रोजी दिल्लीत भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माऊंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट रोजी दिल्लीत भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

"शेजारी देशांबरोबर आमची कायम स्नेह आणि मैत्रीची भावना राहील. आणि आम्ही सगळ्या जगाचे मित्र असू."

विधानसभेचं कामकाज संपवून आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केल्यानंतर मोहम्मद अली जिन्ना, लॉर्ड माऊंटबॅटन आणि इतर मान्यवर गव्हर्नर जनरल हाऊसमध्ये परत आले. दुपारी दोन वाजता माऊंटबॅटन नवी दिल्लीला जाण्यासाठी निघाले, तिथे मध्यरात्री बारा वाजता भारतीय स्वातंत्र्याची घोषणा त्यांना करायची होती. त्याचबरोबर भारताचे नवे गव्हर्नर जनरल म्हणूनही ते पदभार स्वीकारणार होते.

लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या स्वातंत्र्याच्या घोषणेनुसार, 14 आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्री बारा वाजता जगाच्या नकाशावर एका स्वतंत्र, सार्वभौम आणि इस्लामी जगतातील सगळ्यांत मोठ्या देशाची नोंद झाली. या देशाचं नाव होतं पाकिस्तान.

त्याचवेळी लाहोर आणि ढाकामधून पाकिस्तान प्रसारण सेवेवरून पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली. त्यापूर्वी 14 आणि 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री लाहोर, पेशावर आणि ढाका रेडिओ केंद्रांवरून रात्री अकरा वाजता ऑल इंडिया रेडिओ सेवेनं आपलं शेवटचं प्रसारण पूर्ण केलं.

पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

मध्यरात्री बारा वाजण्याच्या काही क्षण आधी रेडिओ पाकिस्तानची सिग्नेचर धून वाजवण्यात आली. आणि जहूर आजर यांच्या आवाजात इंग्रजीत एक घोषणा झाली की, मध्यरात्री ठिक बारा वाजता स्वतंत्र आणि सार्वभौम पाकिस्तान अस्तित्वात येईल. त्याप्रमाणे ठिक बारा वाजता हजारो श्रोत्यांच्या कानात शब्द ऐकू गेले, "यह पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस है."

इंग्रजीत झालेल्या घोषणेनंतर मुस्तफा अली हमदानी यांनी उर्दू भाषेत घोषणा केली. त्यानंतर मौलाना जहीर अल कासमी यांनी कुराणातून सूरह अल फतह यांच्या आयातांचा पाठ वाचला. मागून त्यांचा अनुवादही वाचून दाखवण्यात आला.

त्यानंतर ख्वाजा खुर्शीद अन्वर यांची रचलेली एक विशेष रचना प्रसारित झाली. मग संतो खाँ आणि त्यांच्या साथीदारांनी कव्वाली सादर करताना अल्लामा इक्बाल यांची नज्म 'साकी नामा' प्रस्तुत केली. हे प्रसारण हफिज होशियारपुरी यांच्या भाषणाने संपलं.

मध्यरात्री बारा वाजता रेडियो पाकिस्तानच्या पेशावर केंद्रावरून आफताब अहमद बिस्मिल यांनी उर्दूमध्ये आणि अब्दुल्ला जान मगमूम यांनी पश्तू भाषेत पाकिस्तानच्या स्थापनेची घोषणा केली. कुराण पठणाचा मान कारी फिदा महम्मद यांना मिळाला. प्रसारणाच्या शेवटी अहमद नदीम कासमी यांनी लिहिलेलं एक गीत पेश करण्यात आलं, ज्याचे बोल होते, 'पाकिस्तान बनाने वाले, पाकिस्तान मुबारक हो'

त्याचवेळी अशाच प्रकारची घोषणा रेडियो पाकिस्तानच्या ढाका केंद्रावरून इंग्रजीत कलीमुल्लाह यांनी केली तर त्याचा बांगला भाषेतील अनुवादही सादर करण्यात आला.

डॉन वृत्तपत्र

फोटो स्रोत, dawn media group

15 ऑगस्ट 1947च्या सकाळी रेडियो पाकिस्तानच्या लाहोर प्रसारणाची सुरुवात सकाळी आठ वाजता कुराणमधील सुरा - आले इमरान यांच्या आयातींनी झाली. त्यानंतर इंग्रजी बातम्या वाचून दाखवल्या वृत्त निवेदक नोबी यांनी. त्यानंतर ठीक आठ वाजता जिन्ना यांचा एक संदेश वाचून दाखवला जो ध्वनीमुद्रित होता. या भाषणाची क्लिप यू ट्यूबवर उपलब्ध आहे.

जिन्ना यांच्या भाषणाची सुरुवात

"आज तुमच्यासमोर येताना खूप आनंद होत आहे. तुम्हा सगळ्यांचे मी अभिनंदन करतो. 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र आणि सार्वभौम पाकिस्तानचा जन्म झाला आहे. मुस्लीम समाजाने जो त्याग केला आणि आपलं स्वतंत्र राष्ट्र निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न केले त्यांना मिळालेलं हे यश आहे."

आपल्या या भाषणात जिनांनी पाकिस्तानच्या सर्व नागरिकांना स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितासाठी शुभेच्छा दिल्या. आणि नवीन देशाच्या स्थापनेबरोबरच पाकिस्तानच्या लोकांची जबाबदारी वाढणार आहे असं भाष्य केलं. आणि लोकांना आवाहन केलं की, एक राष्ट्र म्हणून सगळ्यांशी मिळून मिसळून आणि शांती-सद्भावनेनं राहणं हे आपलं उद्दिष्ट आहे.

डॉन वृत्तपत्राचा अंक

15 ऑगस्ट 1947च्या सकाळी पाकिस्तानमधल्या वर्तमानपत्रांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विशेषांक प्रसिद्ध केले. डॉन या प्रसिद्ध इंग्रजी वर्तमानपत्राने याच दिवसापासून कराचीतून प्रकाशनाची सुरुवात केली. त्यांच्या विशेषांकाचं शीर्षक होतं, 'पाकिस्तानची कायम भरभराट होऊ दे - लॉर्ड माऊंटबॅटन'

डॉन वर्तमानपत्रात मथळ्याच्या खाली पहिली बातमी आहे ती लॉर्ड माऊंटबॅटन यांनी 14 तारखेला केलेल्या भाषणाची. त्या भाषणातील काही अंश या लेखात वर दिलेलाच आहे. डॉनने या विशेषंकाबरोबरच 32 पानांचं असं परिशिष्टही प्रसिद्ध केलं होतं. हे परिशिष्ट आमच्याकडे आहे. आणि यूट्यूबवरही ते उपलब्ध आहे.

डॉनच्या परिशिष्टामध्ये मोहम्मद अली जिन्ना यांचा संदेशही देण्यात आला आहे. हा संदेश जिन्ना यांच्या 10, औरंगजेब रोड, नवी दिल्ली या निवासस्थानातून प्रसारित केला होता. 7 ऑगस्ट 1947 रोजी लिहिलेल्या या संदेशात जिन्ना म्हणतात,

"मला असं सांगण्यात आलंय की, डॉन वर्तमानपत्राचा पहिला अंक 15 ऑगस्ट पासून पाकिस्तानची राजधानी कराचीतून प्रकाशित करण्यात येणार आहे."

सरकारी आदेश आणि दस्ताऐवजांमध्ये स्वातंत्र्य दिनाचा उल्लेख

पाकिस्तान सरकारचं पहिलं राजपत्रही 15 ऑगस्ट 1947ला प्रकाशित करण्यात आलं. त्यात पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल म्हणून मोहम्मद अली जिन्ना यांची नियुक्ती आणि पदभार स्वीकारल्याची घोषणा होती. त्याच दिवशी लाहोर हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती अब्दुल रशीद यांनी जिन्ना यांना गव्हर्नर जनरल पदाची शपथ दिली. लियाकत अली खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या पहिल्या मंत्रिमंडळानेही त्याच दिवशी शपथ घेतली.

हे सगळे दस्ताऐवज आणि घटना पाहिल्या की हे सिद्ध होतं, पाकिस्तान 14 ऑगस्ट 1947 नाही तर 15 ऑगस्ट 1947ला अस्तित्वात आला.

पाकिस्तानच्या स्थापने नंतर पहिल्या वर्षी या तारखेचा कुठलाही घोळ नव्हता.

इतकंच कशाला, 19 डिसेंबर 1947च्या दिवशी पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने 17/47 सदरात जे पत्र जारी केलंय, त्यात 1948 मध्ये येणाऱ्या सरकारी सुट्ट्यांची यादी आहे. आणि यात 1948 सालासाठी पाकिस्तान दिवसाची सुटी 15 ऑगस्ट 1948 या तारखे पुढे लिहिण्यात आली आहे.

हे पत्र इस्लामाबादच्या नॅशनल डॉक्युमेंटेशन सेंटरमध्ये बघायला मिळतं.

1948च्या पहिल्या तिमाहीत पाकिस्तानच्या टपाल विभागाने पाकिस्तानच्या सुरुवातीच्या काळातल्या टपाल तिकिटांचं डिझायनिंग सुरू केलं. चार टपाल तिकिटांचा हा संच होता. यातील तीन तिकिटं के. रशीदुद्दिन आणि महम्मद लतिफ यांनी संयुक्तपणे तयार केली होती. चौथं तिकीट देशातील कलाकार रहमत चुगताई यांनी बनवलं होतं.

ही टपाल तिकिटं ब्रिटिश प्रिंटिंग प्रेस मेसर्स टॉमस डी लारो यांनी छापली. आणि 9 जुलै 1948 ला त्यांची विक्री सुरू झाली.

या तिकिटांवर पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 असल्याचं लिहिलं आहे. याचाच अर्थ असा की, या तिकिटांचं डिझायनिंग झालं, छपाईसाठी ती लंडनला गेली तोपर्यंत पाकिस्तानला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं यावर सरकारी एकमत होतं.

सत्य शोधनासाठी दस्ताऐवजांची पडताळणी

मग पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट वरून 14 ऑगस्ट कसा झाला? हे शोधून काढण्यासाठी आम्ही इस्लामाबादच्या नॅशनल डॉक्युमेंटेशन सेंटरमधील कॅबिनेट कक्ष गाठला.

तिथे आमची भेट झाली केंद्रचे संचालक कमर अल जमान यांच्याशी. त्यांच्या मदतीने आम्ही केंद्रात असलेल्या काही जुन्या फाईली पाहिल्या. या फाईली आतापर्यंत गुप्त ठेवण्यात आल्या होत्या. पण हळूहळू त्या लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या.

ही कागदपत्रं पाहिली तेव्हा लक्षात आलं, मंगळवार 29 जून 1948ला कराचीत पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची एक बैठक झाली होती.

या बैठकीला परराष्ट्र व्यवहारमंत्री, कायदेमंत्री, गृहमंत्री, कृषिमंत्री असे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. आणि याच बैठकीत हा निर्णय झाला की, पाकिस्तानचा पहिला स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट नाही तर 14 ऑगस्टला साजरा करायचा.

पंतप्रधान लियाकत अली यांनी मंत्रिमंडळाला स्पष्ट केलं की, हा निर्णय अंतिम नाही. आणि गव्हर्नर जनरलांच्या संमतीनेच निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकेल.

ज्या फाईलीत या माहितीची नोंद आहे त्या फाईलीचा क्रमांक आहे CF/48/196 आणि केस क्रमांक आहे 393/54/48. मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अहवाल हा इंग्रजीत नोंदवलेला आहे.

त्या नोंदीचा अनुवाद असा आहे, "माननीय पंतप्रधानांनी कायद-ए-आझम यांच्यासमोर प्रस्ताव ठेवण्याचं मान्य केलं आहे. प्रस्ताव असा आहे की, पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट ऐवजी 14 ऑगस्टला साजरा केला जावा."

मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव कुणी ठेवला आणि त्याला कुणी अनुमोदन दिलं हे मात्र या फाईलमध्ये नोंदवलेलं नाही.

शिवाय स्वातंत्र्य दिन नेमका 14 तारखेला का व्हावा यासाठी कोणता युक्तीवाद करण्यात आला त्याचे तपशीलही या फायलीत नाहीत. पण, फाईलीत शेवटी चौकटीत अशीही नोंद आहे की, कायद-ए-आझम यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

फाईलीत आणखी पुढे पाहिलं तर पुढच्या पानावर केस क्रमांक CM/48/54 तारीख 12 जुलै 1948 रोजी मंत्रिमंडळाचे उपसचिव एस. उम्मान यांना निर्देश देण्यात आले आहेत की, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 29 जून 1948 ला होणाऱ्या सभेतले निर्णय त्यांनी सर्व सरकारी यंत्रणांना कळवावे, म्हणजे ते लागू होतील.

फाईलीत पुढचा आदेश नंबर आहे 15/2/48. 13 जुलै 1948 ला जारी झालेल्या या पत्रकात पाकिस्तान सरकारचे उपसचिव अहमद अली यांची स्वाक्षरी आहे.

या आदेशात असं म्हटलं होतं की, देशात पहिला स्वातंत्र्य दिवस समारंभ 14 ऑगस्ट 1948 रोजी साजरा करण्यात येईल. आणि या दिवशी अख्ख्या देशात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात यावी. सर्व सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक इमारतींवर राष्ट्रध्वज फडकावण्यात यावा.

याचविषयी आणखी एक आदेश फाईलीत पाहायला मिळतो. पाकिस्तान सरकारचे सहाय्यक सचिव महम्मद मुख्तार यांची स्वाक्षरी त्यावर आहे. या आदेशाचा क्रमांक आहे 15/2/48. आधीचाच निर्णय यात नव्याने कळवण्यात आलाय.

त्याचबरोबर ही सूचनाही आहे की, पाकिस्तान सरकारचा हा निर्णय मंत्रालय, सगळे सरकारी विभाग, मंत्रिमंडळ सचिव, संविधान सभा, कायद-ए-आझम यांचे स्वीय आणि सैन्य सचिव, अकाऊंटन्ट जनरल, पाकिस्तानचे महसूल आणि ऑडिटर जनरल, तसंच पाकिस्तानातील भारतीय दूतावासालाही कळवला जावा.

या फाईलीत पुढचा आदेश 14 जुलै 1948 या दिवशीचा आहे. याचा डीओ क्रमांक आहे CB/48/398. या आदेशात शुजात उस्मान अली यांनी गृह मंत्रालयाचे उप सचिव खान बहादूर सय्यद अहमद अली यांना संबोधित करून उपरोक्त आदेशाची कल्पना दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाली. आणि संपूर्ण पाकिस्तानात पहिला स्वातंत्र्य दिन समारंभ 14 ऑगस्ट 1948 ला साजरा करण्यात आला.

तरीही आघाडीचं वर्तमानपत्र डॉनने स्वातंत्र्य दिनाची वर्षपूर्ती 14 ऑगस्ट नाही तर 15 ऑगस्टलाच साजरी केली. त्यांनी त्या निमित्ताने 15 ऑगस्टला 100 पानांचा एक विशेषांक प्रकाशित केला. याचं एक कारण असंही असू शकतं की, 15 ऑगस्ट 1948ला रविवार होता. आणि हा दिवस विशेषांकासाठी योग्य आहे.

15 ऑगस्ट ऐवजी 14 ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा आजही अव्याहत सुरू आहे. आणि हळूहळू लोकांची अशी समजूत झाली की पाकिस्तानला स्वातंत्र्यच 15 ऑगस्टला नाही तर 14 ऑगस्टला मिळालं.

आपण आतापर्यंत जी कागदपत्रं बघितली त्यातून एक सिद्ध होतं की, पाकिस्तानच्या पहिल्या मंत्रिमंडळाने पाकिस्तानच्या स्वातंत्र्याचा इतिहास किंवा तारीख नाही बदलली.

त्यांनी एवढाच निर्णय घेतला की, स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट नाही तर 14 ऑगस्टला साजरा करायचा. आणि या शिफारशीला बॅरिस्टर जिन्ना यांचंही समर्थन होतं.

आम्हाला खात्री आहे की, आम्ही केलेलं हे संशोधन आणि प्रकाशित केलेला लेख बघूनही पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या इतिहासात सरकार दफ्तरी काही बदल होणार नाही.

पण, ही गोष्ट नाकारताही येणार नाही की, पाकिस्तान स्वातंत्र्य दिवस 14 ऑगस्ट नाही तर 15 ऑगस्ट आहे. त्या दिवशी मुस्लीम दिनदर्शिकेनुसार, रमझान महिन्याचा 27वा दिवस होता. आणि तो अलविदा जुम्मा म्हणजे रमझानचा शेवटचा शुक्रवार होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)