शरद पवार : पार्थ पवार यांच्या मताला कवडीची किंमत नाही, ते अपरिपक्व आहेत

शरद पवार-पार्थ पवार

फोटो स्रोत, FACEBOOK/PARTHPAWAR

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

शदर पवार यांनी मात्र पार्थ पवार यांच्या मताला कवडीची किंमत नाही, ते अपरिपक्व आहेत, असं विधान करत पार्थ यांच्या वक्तव्यांपासून स्वतःला दूर ठेवलं आहे. पार्थ यांनी सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर पत्रकारांनी शरद पवार यांना विचारलं असता शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

"माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही ते इनमॅच्युअर आहेत," असं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार यांच्या या वक्तव्याचं विश्लेषण तुम्ही इथं वाचू शकता -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "तो त्यांच्या घरचा प्रश्न आहे, आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे किंवा नातवांनी आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवांनी ठरवायचं आहे. त्या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही. त्यांनी एक म्हटलंय की सीबीआय चौकशीसाठी त्यांची हरकत नाही, मला वाटतं की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे."

शरद पवार यांचं हे वक्तव्य पार्थ पवार यांचं मनोधैर्य खच्ची करणारं आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

तर पार्थ हे लंबी रेस का घोडा आहेत, असं ट्वीट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.

लाईन

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे सध्या चर्चेत आले आहेत. याचं कारण म्हणजे 'जय श्रीराम' म्हणत त्यांनी राम मंदिर निर्माणाला दिलेल्या शुभेच्छा.

राम मंदिराच्या भूमिपूजनाने कोरोना जाणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केला होता. मात्र शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी जय श्रीराम म्हणत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्यात.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर पार्थ पवार यांनी राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहून 'जय श्रीराम'चा जयघोष करणारं ट्वीट केलं.

शरद पवार यांच्या एवढ्या स्पष्ट भूमिकेनंतरही पार्थ पवार यांनी केलेल्या ट्वीटमुळे पार्थ पवार हे पक्ष आणि शरद पवार यांच्या विरोधी भूमिका का घेत आहेत, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थची ही वैयक्तिक भूमिका आहे, असं म्हटलं.

"लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. सगळ्यांना दडपशाहीची इतकी सवय झाली आहे का की व्यक्तिस्वातंत्र्याचा विसर पडला आहे?" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

पण त्यामुळे पार्थ यांच्यासंदर्भातली चर्चा थांबली नाही. याच कारण म्हणजे पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळा विचार मांडण्याची पार्थ पवार यांची ही पहिलीच वेळ नव्हती.

कोरोना
लाईन

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरून राजकारण सुरू असतानाच पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आणि सुशांत सिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणारं निवेदन त्यांना दिलं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

"मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करत असून ते सत्य शोधण्यास सक्षम आहेत आणि अतिशय बारकाईने तपास करत आहेत. तरीदेखील राजकीय फायद्यासाठी या गुन्ह्याचा तपास CBI ला द्यावा अशी मागणी होतेय. त्याचा मी तीव्र निषेध करतो," असं अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं.

शिवसेना नेते संजय राऊत यांनीही मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम आहेत, असंही म्हटलं. याच प्रकरणात शरद पवार यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर आक्षेपही घेतले होते.

एकीकडे भाजप सुशांत सिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत असताना पार्थ पवार यांनीही तशीच भूमिका घेतल्यामुळे चर्चेला तोंड फुटलं.

'सुशांत सिंह राजपूत प्रकरणी पार्थ याने सीबीआय चौकशीची मागणी केली असली तरी या प्रकरणाचा चांगला तपास व्हावा असं त्यांनी सुचवलं आहे. पण, याचा अर्थ त्यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला आणि लगेच सीबीआयकडे तपास द्यावा असं काही नाही,' अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली होती.

पार्थ पवारांच्या या ट्वीटबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, "तरुण असताना, अनुभव कमी असताना कधीकधी अशा गोष्टी घडतात. धर्मावरून राजकारण न करण्याची पक्षाची भूमिका आहे. तो वैयक्तिक आस्थेचा प्रश्न आहे. पार्थ यांचं राम मंदिरावरील ट्वीट ही त्यांची वैयक्तिक आस्था आहे. शिवाय सुशांत सिंह प्रकरणी सीबीआय चौकशी होणार नसल्याचं याआधीच स्पष्ट करण्यात आलं आहे."

पण एकूणच पार्थ पवार यांचं नेमकं काय सुरू आहे? भाजपला सोयीची वाटणारी भूमिका घेऊन पार्थ त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत का? की पार्थ यांच्या निमित्ताने अजित पवार यांची शरद पवारांबद्दलची नाराजी बाहेर पडत आहे? हे प्रश्न कायम आहेत.

या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी वर्षभरापूर्वी लोकसभा निवडणुकीच्यावेळी झालेल्या घटनांचा आढावा घ्यावा लागेल.

पार्थ यांच्या लोकसभा उमेदवारीवरून संघर्ष

लोकसभा निवडणुकीवेळी पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली. मात्र पार्थ यांची उमेदवारी घोषित करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली होती.

त्याआधी शरद पवार माढ्यामधून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. 'पण एकाच कुटुंबातून तिघांनी निवडणूक लढवू नये, म्हणून मीच न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पिढीला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला,' असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

पार्थ पवार

फोटो स्रोत, FACEBOOK/PARTHPAWAR

पण त्यावरून पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे पवारांच्या घरात राजकीय सत्तासंघर्ष सुरू होणार का, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला. त्याबद्दलची सविस्तर बातमी इथे वाचू शकता.

पार्थ पवार यांच्या रुपानं पवार घराण्यातली तिसरी पीढी राजकारणात आली. वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्यांनी लंडनमधून बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी दीड वर्षांपासून ते अजित पवार यांच्या सोशल मीडियाचं काम पाहत होते.

पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर सध्या तरी पक्षात त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आली नाहीये.

रोहित आणि पार्थ यांच्यात स्पर्धा?

पार्थ यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, तर त्यांचे चुलत भाऊ रोहित पवार हे विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातून विजयी झाले. रोहित यांच्याकडे कोणतंही मंत्रिपद नाहीये.

शरद पवारांचे भाऊ आप्पासाहेब पवार हे पवारांच्या कुटुंबात पितृस्थानी होते. त्यांचे चिरंजीव राजेंद्र पवार यांना राजकारणात रस होता. पण अजित पवार आधीच सक्रीय असल्याने त्यांना ती संधी मिळाली नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे राजेंद्र पवारांनी बारामती ऍग्रो आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात ठसा उमटवला.

रोहित पवार-शरद पवार

फोटो स्रोत, ROHIT RAJENDRA PAWAR/ FACEBOOK

पण राजेंद्र यांचे चिरंजीव रोहित यांना राजकारणात रस होता. त्यांनी अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून राजकारणाला सुरूवात केली.

पार्थप्रमाणेच रोहित हे पवारांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचं नेतृत्व आहे. त्यामुळे राजकारणात रोहित पवार यांच्याबरोबरीनं आपलंही स्थान निर्माण करण्यासाठी आता पार्थ यांची धडपड सुरू आहे का? सुशांत प्रकरणाचा तपास आणि राम मंदिर मुद्द्यावरून ते स्वतःची स्वतंत्र राजकीय भूमिका मांडत आहेत का?

"पार्थ पवार यांच्या ट्वीटमधून काही विचार मांडत आहेत, असं दिसत नाहीये. ते केवळ स्वतःचं उपद्रवमूल्य दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. हा नकारात्मक प्रसिद्धीचाच भाग आहे," असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं.

रोहित आणि पार्थबद्दल बोलायचं झालं तर दोघांमध्ये स्पर्धा नाहीये. मात्र त्यांच्यात तुलना होणं स्वाभाविक आहे, असं चोरमारे यांनी म्हटलं.

पार्थ पवार

फोटो स्रोत, FACEBOOK/PARTHPAWAR

"पण रोहित यांनी जिल्हा परिषदेपासून राजकारणाला सुरूवात केली. विधानसभेसाठी त्यांच्या कुटुंबाच्या प्रभावक्षेत्राबाहेरचा मतदारसंघ निवडला, तिथं काम केलं आणि निवडूनही आले. पार्थ यांनी थेट लोकसभेची निवडणूक लढवली. अजूनपर्यंत त्यांना स्वतःसाठी 'ग्राउंड' तयार करता आलं नाहीये."

पार्थ यांच्या निमित्ताने अजित पवारांची नाराजी समोर?

पार्थ यांचं ट्वीट हे तत्कालीन परिस्थितीशी संबंधित असलं तरी दोन्ही मुद्द्यांवर शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध मत मांडण्यामागे त्यांची नाराजी आहे, की हे अजित पवारांच्या नाराजीचं शाब्दिक रुप आहे?

मुळात शिवसेनेसोबत सत्तास्थापनेबद्दलच अजित पवार नाराज होते. त्यामुळेच त्यांनी भाजपसोबत जात देवेंद्र फडणवीसांबरोबर सरकार स्थापन केलं होतं. याबद्दलच्या घडामोडी देवेंद्र फडणवीस आणि स्वतः शरद पवार यांनीही सांगितल्या होत्या.

फडणवीसांसोबत सरकार स्थापन केल्यानंतर अजित पवार माघारी आले, शिवसेनेसोबतच्या सरकारमध्ये सहभागीही झाले.

मात्र आपली नाराजी लपविण्याची संधी त्यांनी तेव्हाही नाही सोडली आणि त्यापूर्वीही सोडली नव्हती.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांची शिखर बँक घोटाळाप्रकरणी ईडीनं चौकशी केली होती. याच प्रकरणात अजित पवारांवरही आरोप होते. त्यावेळी अजित पवारांनी कोणालाही न सांगता तडकाफडकी राजीनामा दिला होता आणि ते 'नॉट रिचेबल' झाले होते.

त्यानंतरही 2004 साली काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त जागा निवडून आल्यावरही शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद देऊ केलं, तेव्हाही अजित पवार नाराज होऊन 'नॉट रिचेबल' झाले होते.

पार्थ पवार हे अजित पवारांचेच पुत्र आहेत. उपमुख्यमंत्री असल्यामुळे जी भूमिका, जी नाराजी अजित पवारांना व्यक्त करता येत नाहीये, ती पार्थ पवारांच्या निमित्ताने व्यक्त होत आहे का? भाजपच्या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका घेणारे ट्वीट पार्थ यांनी करून अजित पवारांना सोयीचं मत मांडलं आहे का?

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

"पार्थच्या निमित्ताने अजित पवार हे भाजपला समांतर भूमिका घेऊन काय प्रतिक्रिया येऊ शकतात हे निश्चितच जोखून पाहू शकतात," असं मत 'चेकमेट' या पुस्तकाचे लेखक सुधीर सूर्यवंशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

पार्थ पवार यांचे ट्वीट दबावतंत्राचा भाग असल्याची शक्यता सुधीर सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

"अजित पवार हे आपल्या मुलाचं राजकीय करिअर घडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीत पार्थ यांच्या पराभवानंतर आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. 'पार्थ यांचे ट्वीट ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. मात्र, त्यांना पक्षासोबत घेऊन जायचं असेल तर त्यांना काहीतरी जबाबदारी द्यायला हवी, विधान परिषदेची उमेदवारी द्यायला हवी," अशी भूमिका अजित पवार पक्ष आणि शरद पवार यांच्यासमोर मांडू शकतात."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)