मीना कुमारींचं वैयक्तिक आयुष्यही पतीने घातलेल्या 'त्या' तीन अटींमुळे ट्रॅजेडी बनलं?

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

निर्माता दिग्दर्शक केदार शर्मा यांचं एक खास वैशिषट्य होतं. एखाद्या कलाकारानं उत्तम काम केल्यास पुरस्कार म्हणून ते कलाकाराला दोन आणे द्यायचे. नंतर त्यांनी पुरस्कराची रक्कम वाढवून चार आणे केली होती.

''माझ्याकडे आता दोन आणे चार आणे खूप जमा झाले आहेत, तुम्ही आता पुरस्काराची रक्कम वाढवा,'' असं मीना कुमारी यांनी 'चित्रलेखा' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान केदार शर्मा यांना म्हटलं होतं. त्यानंतर खरंच एका सीननंतर त्यांनी मीना कुमारी यांच्या अभिनयावर खुश होत, 100 रुपयांची एक नोट बक्षीस म्हणून दिली.

ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी

मीना कुमारी यांनी संपूर्ण आयुष्यभर भारतीय महिलांच्या जीवनातील ट्रॅजेडी म्हणजेच दुःख सिनेमाच्या पडद्यावर सादर केलं. त्यात त्या एवढ्या गुंतल्या होत्या की, त्यांना त्यांच्या आयुष्यातील ट्रॅजेडीबाबत विचार करायला वेळच मिळाला नाही. पण मीना कुमारी यांच्या अभिनयात 'ट्रॅजेडी' शिवाय दुसरं काहीही नव्हतं, असं म्हणणं त्यांच्यावर अन्याय ठरेल.

'परिणिता' चित्रपटातील शांत अशी अल्लड बंगाली तरुणी, 'बैजू बावरा' मधली चंचल सुंदर प्रेयसी, 'साहब बीबी और गुलाम' मधली अत्याचार सहन करणारी सून असो किंवा 'पाकिजा'ची साहबजान असो तिच्या सर्वच भूमिकांनी भारतीय सिनेचाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे.

1 ऑगस्ट 1932 ला जन्मलेल्या मीना कुमारी यांनी अभिनेत्री म्हणून 32 वर्ष भारतीय सिनेचाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अत्यंत भावनिक आणि नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असलेल्या मीना कुमारी यांचं संपूर्ण जीवन इतरांना सुख वाटण्यात आणि त्यांची दुःखं वाटून घेण्यात गेलं.

''मधुबालाच्या सौंदर्याचं कौतुक करत तिला 'व्हिनस ऑफ द इंडियन स्क्रीन' म्हटलं गेलं, तर नर्गिसला लोकांनी 'फर्स्ट लेडी ऑफ इंडियन स्क्रीन' म्हटलं. मात्र मीना कुमारीच्या सौंदर्याकडं कुणाचंही लक्ष गेलं नाही," असं कमाल अमरोही यांचा मुलगा ताजदार अमरोही यांनी म्हटलं.

''मीना कुमारी यांना 'ट्रॅजेडी क्वीन'चा किताब मिळाला आणि त्यांनीही 'ट्रॅजेडी'लाच स्वतःची ओळख बनवलं. चित्रपटात ज्या प्रकारच्या भूमिका त्या करत होत्या, खऱ्या आयुष्यातही तसंच काहीसं आहे, असं लोकांना वाटू लागलं होतं. विशेष म्हणजे लोकांबरोबरच मीना कुमारी यांना स्वतःदेखील तसंच वाटायला लागलं होतं.''

मोसंबीचा ज्यूस आणि कमाल अमरोहींशी प्रेमाची सुरुवात

मीना कुमारी 1949 मध्ये पहिल्यांदा कमाल अमरोहींना भेटल्या तेव्हा ते विवाहित होते. त्यांचा 'महल' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. कमाल यांना मीना कुमारींना 'अनारकली' चित्रपटात भूमिका द्यायची होती. त्यासाठी ते त्यांच्या घरी येऊ लागले आणि त्यांच्या भेटीगाठी वाढल्या.

दरम्यान, एकदा पुण्याहून येताना मीना कुमारी यांच्या कारचा अपघात झाला. 'आउटलूक' चे माजी संपादक विनोद मेहता यांनी मीना कुमारी यांचं आत्मचरित्र 'मीनाकुमारी- अ क्लासिक बायोग्राफी' मध्ये याबाबत लिहिलं आहे.

'त्यांच्या प्रेमाला मोसंबीच्या ज्युसमुळं सुरुवात झाली. कमाल अमरोही मीना कुमारी यांना भेटण्यासाठी पुण्याच्या रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी मीना कुमारी ज्यूस पित नसल्याची तक्रार त्यांच्या लहान बहिणीनं त्यांच्याकडं केली. कमाल यांनी ज्युसचा ग्लास हाती घेतला, मीना यांचं डोकं पलंगावरून उचललं आणि ज्यूस पाजण्यासाठी त्यांच्याकडं नेला,' असं विनोद मेहतांनी लिहिलं आहे.

'मीना कुमारी पूर्ण ज्यूस प्यायल्या. त्यानंतर कमाल दर आठवड्याला सायनहून पुण्यापर्यंत गाडीतून मीना कुमारींना भेटायला यायचे. त्यानंतर आठवड्यातून एक दिवस भेट पुरेशी नाही असं त्यांना वाटलं. ज्या दिवशी त्यांना भेटायचं नसेल त्यादिवशी ते एकमेकांना पत्र लिहायचे. रोज एक पत्र. पण ते पत्र कधीही पोस्टात टाकलं गेलं नाही. कारण ती पत्रं ते दोघंही एकमेकांना स्वतःच्या हातानं द्यायचे.'

मंजू आणि चंदन

त्यानंतर रुग्णालयातच त्यांच्या अनेक भेटी झाल्या. कमाल अमरोही यांनी त्यांना 'मंजू' असं नाव दिलं तर त्या कमाल अमरोही यांना 'चंदन' म्हणायच्या.

'त्यानंतर या दोघांमध्ये टेलिफोनवरून बोलणं सुरू झालं. अमरोही रात्री बरोबर साडे अकरा वाजता मीना कुमारींना फोन करायचे. त्यानंतर सकाळी साडे 5 वाजेपर्यंत दोघं बोलायचे. कदाचित रात्री एवढ्या उशिरापर्यंत बोलण्यामुळंच मीना कुमारी आणि कमाल अमरोही दोघांनाही रात्री झोप न लागण्याचा आजार जडला,' असं विनोद मेहता यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

छोटी अम्मी

24 मे 1952 रोजी मीना कुमारी यांनी कमाल अमरोही यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी कमाल अमरोही यांच्या पहिल्या पत्नी अमरोहा इथं राहायच्या. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या तेव्हा त्यांनी मुलगा ताजदारला सावत्र आई म्हणजे मीना कुमारी यांना भेटण्यासाठी मुंबईला पाठवलं.

ते पोहोचले तेव्हा कमाल अमरोही यांची तब्येत खराब होती. त्यांना ताप आलेला होता. ''पांढरी साडी परिधान केलेल्या छोटी अम्मी बाबाच्या डोक्याजवळ बसलेल्या होत्या. त्या त्यांच्या डोक्यावर ईडो कोलोनच्या पट्ट्या ठेवत होत्या. एक मोलकरीण बाबाच्या पायांची मालीश करत होती,'' असं ताजदार अमरोही यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितलं.

''मी एकदम घाबरून गेलो होतो. कुठं जाऊ ते मला कळत नव्हतं. छोटी अम्मींना माझी अडचण समजली. बाबादेखील हसले, पण काहीच बोलले नाही. मीना कुमारींनी मला जवळ बोलवलं आणि मला मिठी मारली. त्या मला म्हणाल्या, आजपासून मी तुझी छोटी अम्मी आहे.''

कमाल अमरोहींच्या तीन अटी

मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांच्या वैवाहिक जीवनात मात्र काही दिवसांनी तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. कमाल अमरोही यांनी मीना कुमारी यांना चित्रपटांत काम करण्याची परवानगी दिली. पण त्यांच्यावर तीन अटीही लादल्या होत्या.

'मीना कुमारींनी सायंकाळी 6 वाजेच्या आधी घरी यायचं ही पहिली अट होती. मीना कुमारी यांच्या मेकअप रूममध्ये त्यांच्या मेकअप मॅनशिवाय दुसरा कोणीही पुरुष बसणार नाही, ही दुसरी अट होती. तर तिसरी अट मीना कुमारी केवळ त्यांच्याच कारमध्ये बसतील. ती कारच त्यांना घरून स्टुडिओत घेऊन जाईल आणि तिच कार त्यांना पुन्हा घरी घेऊन येईल अशी होती,' असा उल्लेख विनोद मेहतांनी केला आहे.

राज कपूरची पार्टी

ज्यादिवशी मीना कुमारी यांनी या अटींवर सह्या केल्या. त्याचदिवशी त्यांनी हे नियम मोडणंही सुरू केलं. सर्वात पहिली घटना 'शारदा' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान राज कपूर यांनी मीना कुमारींना एका पार्टीसाठी आमंत्रित केलं.

'रशियातील चित्रपट क्षेत्रातले काही प्रतिनिधी मुंबईत आलेले होते. राज कपूर यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक सोहळा आयोजित केला होता. मीना कुमारींनी त्यांचं आमंत्रण स्वीकारलं आणि पतीला फोन करून उशीर होणार असल्याचं सांगितलं. त्याचं कारण मात्र राज कपूर यांच्या पार्टीचं न सांगता शूटिंगला उशीर होणार असल्याचं सांगितलं होतं,'' असं विनोद मेहतांनी लिहिलंय.

योगायोग म्हणजे दुसऱ्याच दिवशी कमाल अमरोही हे राज कपूर यांच्या पार्टीत असलेल्या काही पाहुण्यांना भेटले. त्यांना कळलं की मीना कुमारी शुटिंगमध्ये व्यस्त नव्हत्या, तर पार्टीत होत्या. नंतर कमाल यांनी याबाबत उल्लेख केला तर मीना कुमारींनी तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, असं म्हटलं.

मीना कुमारींना समजावण्यात अपयश

हा मुद्दा इथंच थांबला नाही. एके दिवशी कमाल अमरोहींचे सचिव बाकर यांनी मीना कुमारी यांना अभिनेते प्रदीप कुमार यांच्या कारमधून उतरताना पाहिलं. नंतर आणखी काही घटना घडल्या आणि नंतर मीना कुमारींनी कमाल अमरोहींच्या घरी परत न जाण्याचा निर्णय घेतला.

''मीना कुमारी कमाल यांच्या घरातून बाहेर पडण्याचं कारणच शोधत होत्या. कारण त्यांना स्वातंत्र्य हवं होतं. छोटी अम्मी घरातून गेल्या तेव्हा बाबा एक पती म्हणून त्यांचं कर्तव्य पार पाडत होते,'' असं ताजदार अमरोही सांगतात.

''त्या मेहमूद यांच्याकडे गेल्या होत्या. कमाल तिथं गेले. छोटी अम्मींनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं होतं. बाबा दार वाजवत होते, 'मंजू बाहेर ये, माझ्याशी बोल. तुझी तक्रार काय, मला सांग,' असं ते म्हणत होते. पण मीना कुमारी बाहेर आल्या नाही.

मेहमूद म्हणाले, त्या आता चिडलेल्या आहेत त्यामुळं ऐकणार नाही. थोड्या वेळात त्या शांत होतील. तुम्ही नंतर त्यांना भेटायला या. बाबानी तीन-चार वेळा दार वाजवत म्हटलं, 'मंजू तू आत आहेस आणि मला ऐकत आहेस. मी आता जात आहे. पण परत येणार नाही. मी तुला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू ऐकलं नाही. पण याचा अर्थ तुझा माझ्यावर अधिकार नाही, असा होत नाही. आपल्या घराची दारं तुझ्यासाठी कायम उघडी आहेत आणि राहतील. तुला हवं तेव्हा तू परत येऊ शकते.''

कमाल अमरोहींचं वॉक आऊट

दरम्यानच्या काळात अशा काही घटना घडल्या ज्यामुळं या दोघांमधलं अंतर कमी होण्याऐवजी वाढत गेलं.

'सोहराब मोदी यांनी मीना कुमारी आणि कमाल अमरोही दोघांना 'इरोज' सिनेमागृहात एका प्रिमियरसाठी आमंत्रित केलं. सोहराब यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांना मीना कुमारींचा परिचय करून दिला. या प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी आहेत आणि कमाल अमरोही त्यांचे पती आहेत, असं ते म्हणाले.

दोघं एकमेकांना नमस्कार करण्यापूर्वीच अमरोही म्हणाले, "नाही मी कमाल अमरोही आहे आणि ही माझी पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी. एवढं बोलून ते सिनेमागृहाच्या बाहेर निघून गेले आणि मीना कुमारी यांना एकट्यांना बसून चित्रपट पाहावा लागला," असा उल्लेख विनोद मेहतांनी केला आहे.

'साहब, बिबी और गुलाम' मधील उत्कृष्ट अभिनय

खासगी जीवनातील या चढ-उतारांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीवर मात्र फारसा परिणाम दिसला नाही. त्यांनी एकापेक्षा एक उत्तम चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. समीक्षक त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होते.

''मीना कुमारी यांचे अनेक चित्रपट आहेत. प्रत्येकात त्यांच्या विविध प्रकारच्या भूमिका आहेत. 'दिल एक मंदिर'सारखं उदाहरण तुम्ही पाहू शकता किंवा त्यांचा अखेरचा चित्रपट 'पाकीजा' अथवा 'परिणिता' प्रत्येक भूमिका त्यांनी वेगळ्या पद्धतीनं साकारली आहे,'' असं मीना कुमारीला जवळून ओळखणारे आणि त्यांचा अखेरचा चित्रपट 'गोमती के किनारे'चे दिग्दर्शक सावन कुमार टाक म्हणाले.

''एवढे दिवस लोकांच्या मनावर राज्य करणं हे सोपं नाही. 'साहब, बिबी और गुलाम' त्यांचा सर्वोत्तम चित्रपट होता. त्या चित्रपटाचा एक सीन मला प्रचंड आवडतो. त्यात रेहमान साहेब त्यांच्या प्रेयसीकडं जात असतात आणि मीना कुमारी त्यांना 'न जाओ सय्या, छुडा कर बय्या' हे गाणं गाऊन थांबवतात. ज्या पद्धतीनं त्या अभिनय करत होत्या, तसा अभिनय कोणीही करू शकत नाही.''

पाकिजानं केलं अमर

कमाल अमरोही आणि मीना कुमारी पती पत्नी म्हणून एकमेकांपासून वेगळे राहत होतो. पण अभिनेत्री म्हणून त्या कमाल अमरोहींच्या चित्रपटात काम करायला कायम तयार असायच्या. त्यामुळंच अमरोहींपासून 5 वर्षे वेगळं राहूनही मीना कुमारींनी त्यांच्या 'पाकिजा'चं शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता.

''जसं शहाजहाननं ताजमहल तयार करून मुमताज महल यांना कायमचं अमर केलं, तसंच कमाल अमरोहींनी 'पाकिजा' चित्रपटाच्या माध्यमातून मीना कुमारींसाठी ताजमहल उभा करून त्यांना अमर केलं,'' असं ताजदार अमरोही सांगतात.

''जेव्हाही भारतीय चित्रपटांचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा 'पाकिजा' चा उल्लेख नक्की होईल. या चित्रपटात राज कुमार साहेब, अशोक कुमार आणि नादिराचंही योगदान आहे. पण तीन नावं ही कायम अमर राहतील, मीना कुमारी, कमाल अमरोही आणि पाकीजा.''

डाकू अमृतलाल यांची भेट

या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानच कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्याबरोबर एक रंजक घटना घडली. 'आऊटडोअर शुटिंगसाठी कमाल अमरोही नेहमी दोन कार घेऊन जायचे. एकदा दिल्लीला जाताना मध्यप्रदेशच्या शिवपुरीमध्ये त्यांच्या कारमधलं पेट्रोल संपलं. तेव्हा रस्त्यावर कारमध्येच रात्र घालवण्याचा निर्णय त्यांनी घेतला,' असं विनोद मेहतांनी लिहिलंय.

'तो भाग डाकूंचा आहे, हे त्यांना माहिती नव्हतं. मध्यरात्रीनंतर जवळपास डझनभर डाकूंनी त्यांना घेरलं. कारमध्ये बसलेल्या लोकांना त्यांनी खाली उतरायला सांगितलं. कमाल अमरोहींनी कारमधून उतरण्यास नकार दिला आणि ज्याला मला भेटायचं असेल त्यानं कारजवळ यावं असं म्हटलं.'

'थोड्या वेळानं एक रेशमी पायजमा आणि शर्ट परिधान केलेला एक व्यक्ती त्यांच्या जवळ आला. त्यानं विचारलं, 'तुम्ही कोण आहात?' अमरोहींनी उत्तर दिलं, 'मी कमाल आहे आणि या परिसरात शूटिंग करत आहे. आमच्या कारचं पेट्रोल संपलं आहे.' डाकूंना वाटलं की ते रायफल शूटिंगबाबत बोलत आहेत.'

'पण हे चित्रपटांचं शूटिंग असून दुसऱ्या कारमध्ये मीना कुमारी बसलेल्या आहेत, हे समजल्यानंतर त्यांचे हावभावच बदलले. त्यांनी लगेचच संगीत, नृत्य, जेवण याची व्यवस्था केली. त्यांना झोपायला जागा दिली आणि सकाळी त्यांच्या कारसाठी पेट्रोलही मागवलं. शेवटी जाताना त्यानं मीना कुमारी यांना धारदार चाकूनं त्याच्या हातावर ऑटोग्राफ देण्याची मागणी केली. बरेच प्रयत्न करून अखेर मीना कुमारींनी ऑटोग्राफ दिले. पुढच्या शहरात गेल्यानंतर त्यांना समजलं की, रात्री त्यांच्याबरोबर असलेला व्यक्ती हा डाकू अमृतलाल होता.'

आजारपणातही केला अभिनय

दारू आणि तंबाखूच्या व्यसनामुळं मीना कुमारींची तब्येत प्रचंड खराब झाली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालीच नाही.

'' 6 दिवस माझ्या चित्रपटाचं शुटिंग चागलं झालं. त्यानंतर त्या आजारी पडल्या. पण चित्रपटाचं शुटिंग कोणत्याही परिस्थितीत थांबवायचं नाही, असं त्यांचं कायम म्हणणं असायचं,'' असं अखेरच्या दिवसांत त्यांच्याबरोबर असलेले आणि त्यांच्या 'गोमती के किनारे' या अखेरच्या चित्रपटाचे दिग्दर्शक सावन कुमार टाक म्हणाले.

''आमचं असं भावनिक नातं तयार झालं होतं की, आम्ही एकमेकांना त्रास देण्याचा विचारही करू शकत नव्हतो. त्या एवढ्या अशक्त झाल्या होत्या की, शॉट देताना त्या कोसळतील याची भीती असायची. त्या अभिनय करायच्या त्यावेळी त्यांना मागून पकडलेलं असायचं, हे लोकांना माहिती नव्हतं.

शॉट संपताच त्यांना खुर्चीवर बसवलं जायतं. मला दिग्दर्शक बनवून त्यांनी माझ्यावर उपकार केले. त्यांची अट होती की, जर तुम्ही दिग्दर्शन केलं तरच मी हा चित्रपट करेल,'' असं त्यानी सांगितलं.

मला मरायचं नाही

अखेरच्या काळात मीना कुमारी यांना 'सेंट एलिजाबेथ नर्सिंग होम' मध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाच्या रूम नंबर 26 मध्ये असताना, 'आपा, आपा, मला मरायचं नाही' हे त्यांचे अखरेचे शब्द होते.

मोठी बहीण खुर्शीद यांनी त्यांना सहारा देताच त्या कोमामध्ये गेल्या. त्यानंतर त्या यातून कधीही बाहेर आल्या नाहीत. ''ज्यादिवशी त्यांचं निधन झालं तेव्हा मी तिथं उपस्थित होतो. त्यांना भायखळाच्या कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलं. सगळे लोक माती टाकून गेले होते. मी एकटाच राहिलो होतो,'' असं टाक म्हणाले.

''तोपर्यंत माझ्या डोळ्यात एकही अश्रू आला नव्हता. मी दगड बनलो होतो. पण मी त्यांच्यावर मूठभर माती टाकली. त्यातला पहिला कण त्यांच्यावर पडला, तेव्हा मला एवढं रडू आलं की, मी स्वतःला रोखूच शकलो नाही. परतताना माझ्या मनात एक शेर आला,''

चांदनी मर गई, रोशनी मर गई

सारी शम्मे बुझा कर चले आए लोग

चादरे गुल से छिलता था जिसका बदन

उसको मिट्टी उढ़ा कर चले आए लोग'

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)