You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
FRIENDSHIP DAY:फ्रेंड्स ही सीरिज माझ्यासाठी एखादया कम्फर्ट फूड सारखी आहे-- ब्लॉग
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
टेलिव्हिजनचा शोध लागल्यापासून ते आतापर्यंत हजारो सिरियल तिथे प्रसारित झाल्या असतील. त्यात लाखो लोकांनी काम केलं असेल मग कधी काळी एक सिरिअल प्रसारित झाली त्यातले सहा जण पुन्हा एकत्र येऊन गप्पा मारणार तर मी काय करू.
इतकी तटस्थता किंवा स्थितप्रज्ञता माझ्याकडे हवी होती आणि दुर्दैवाने ती नाहीये. त्यामुळे फ्रेंड्स रियुनियनचा एपिसोड टेलिकास्ट होऊन भारतात येईपर्यंत मला असंच तीळ तीळ तुटत राहावं लागेल.
मला तसं काही होत नाही हे दाखवण्यासाठी मी स्वतःलाच सांगितलं आहे की ठीक आहे फार भारी गोष्ट नाही. होतच असतं असं, कमर्शिअल गोष्ट आहे ती त्याला उगीच सेंटिमेंटल व्हॅल्यू देण्याची गरज नाही. पण जितकं मी स्वतःला तसं समजावत जातो तितकाच मी त्यात रुतत जातो.
मायच्यानं सांगतो (हा मायची आण म्हणजे आईची शपथचा शॉर्टफार्म आहे) इतक्या सिरिअल पाहिल्या असतील पण फ्रेंड्ससारखं कोणत्याच सिरिअलला कधी झालं नाही. माझी सर्वांत आवडती सिरिअल नाहीये ती. अशा बराच सिरिअल्स आहेत ज्या मला फ्रेंड्सहून जास्त आवडतात.
त्यांची लिस्ट इथे देण्याचं काही कारण नाही. पण ती टेलिव्हिजनवर आलेली सर्वांत ग्रेट सिरिअल नक्कीच नाही. पण फ्रेंड्स ही फ्रेंड्सच आहे आणि तिची रिप्लेसमेंट दुसरी काहीच नाही. इव्हन त्यांचं रियुनियन देखील. हेच मला वाटतं.
फ्रेंड्सचा चाहता कसा झालो?
मी फ्रेंड्सचा फॅन आहे हे पण मला बरेच दिवस माहिती नव्हतं. फक्त ती सिरिअल पाहायचो इतकंच. म्हणजे सहा-सात वेळा पाहिली असेल फार तर. त्याला फॅन म्हणण्याइतकं काय आहे काय माहीत. आमच्या काकांनी शोले 35 वेळा पाहिला होता असं ते सांगतात. बाकी दीवार बीवार असल्या पिक्चरचं नाव काढू नका त्यांच्यासमोर तीन दिवस जातील तुमचे. ते स्टोरी सांगतात की तिकिटासाठी केवढीमोठी रांग होती वगैरे वगैरे त्याची. त्या मानाने मी फ्रेंड्ससाठी काही त्याग केला नाही.
पण माझ्या बोलण्यात फ्रेंड्सचे रेफरन्स येत तेव्हा इतर फ्रेंड्स पाहणारे मित्र मैत्रीण आपोआपच जवळ येत गेले. त्यांचं म्हणणं आहे की ते शहरातले आहेत आणि त्यांना फ्रेंड्सबद्दल कळणं किंवा त्याचा फॅन होणं हे विशेष नाही पण तू गावाकडचा असून देखील फ्रेंड्सचा चाहता कसा झाला. त्याचं उत्तर सोपं नक्कीच नाही. कारण त्याचं एक कारणही नाही.
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर सिरिअल पाहत गेलो आणि अजूनही पाहावी वाटते. आणखी किती दिवस पाहील माहीत नाही पण तरीदेखील त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देणं मला इंटरेस्टिंग वाटतं. सो त्याचं उत्तर काहीसं असं आहे. कदाचित आणखी एक दोन वर्षांनी विचाराल तर वेगळं असेल पण आताचं उत्तर असं आहे.
नव्वदीत वाढलेल्यांचे दोन वीक पॉइंट्स, तिसरा असा अॅड झाला..
नव्वदीमध्ये वाढलेल्या लोकांचे दोन 'वीक पॉइंट्स' आहेत एक म्हणजे शक्तिमान आणि दुसरं अंदाज अपना अपना. तसे या पिढीचे भलते वीक पॉइंट्स आहेत आणि आमच्या तीर्थरुपांना वाटतं ही पिढीच वीक आहे. मी काही त्यांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण पिताजी 'आप मुझे खट्टू कह लिजिए या निखट्टू मै आपको कुछ बनके दिखाऊंगा.'
बरेच जण अंदाज अपना अपनाशी असलेलं नातं उघडपणे सांगतील पण ते शक्तिमानचं नाव घेणार नाही. ते हेच लोक होते ज्यांनी शनिवारची शाळा शक्तिमानसाठी बुडवली म्हणून शनिवारी मायबापाचा आणि सोमवारी मास्तरांचा मार खाल्ला आहे.
मी कधी नाही खाल्ला या कारणासाठी मायबापाचा मार. हॉस्टेलला होतो ना. (पण शाळा बुडवून किराणा दुकानात जाऊन शक्तिमान पाहिलं त्यासाठी मास्तरांचा मार खाल्ला आहे. असं माझ्यासोबत हॉस्टेलला असलेले लोक सांगतील. त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. लोक काही पण सांगतात. )
हेच मार खाणारे पोरं पुढे कॉलेजमध्ये गेले. तोपर्यंत 2000 साल उजाडून गेलं होतं. आणि शक्तिमानच्या जागी मॅट्रिक्स, टर्मिनेटर, टायटॅनिक असे इंग्लिशमधले हिंदी डब पिक्चर गावागावात दिसू लागले. या पिढीची मनोरंजन करून घेण्याची भूक भलतीच भारी त्यामुळे आधी असलेले सोनी, झी, हिंदी पिक्चर इतकं सगळं कमी पडू लागलं.
सेट मॅक्स, चॅनल व्ही, एमटीव्हीपण कमी पडू लागले. मग ते केबलवाल्याला सांगू लागले आम्हाला इंग्रजी सुधारायचं आहे त्यामुळे दोन चार इंग्रजीचे चॅनेल देत जा. (आई जर तु हा लेख वाचत असशील तर सांगतो हे मी माझं सांगत नाहीये. बाकीच्याचं सांगतोय. मी फक्त डिस्कवरी पाहत होतो. ) तिथून आलं स्टार वर्ल्ड. मग नंतर आलं वॉर्नर ब्रदर्सचं चॅनेल.
जसं इंजिनिअरिंग कर स्कोप आहे किंवा मायक्रोबायलोजी घे स्कोप आहे हे वाक्य मिथ आहे तसंच 'इंग्रजी टीव्ही आणि सिनेमा पाहा इंग्रजी सुधारेल' हे वाक्य फक्त मिथच नाही महामिथ आहे.
माझ्या इंग्रजीबद्दल काहीच सांगत नाही. ते चांगलं असतं तर हाच लेख इंग्रजीत लिहिला असता ना. पण सांगणाऱ्याने आम्हाला सांगितलं की इंग्रजी पाहात चला. मग काय काय इंग्रजी सिनेमे पाहू लागलो. आणि त्यात फ्रेंड्स हाताशी लागलं.
बरं आता तुम्हाला हे तर कळलं की मी फ्रेंड्सपर्यंत कसा पोहोचलो पण मला फ्रेंड्स का आवडू लागलं आणि माझ्या आयुष्याचा भाग कसं बनलं ते मी सांगतो.
फ्रेंड्स आणि मी...मिलना बिछडना वगैरे टाइपचा सीन
फ्रेंड्सचं आणि माझं रिलेशन एकदम हॅरी मीट सॅलीमधल्या जोडीसारखं आहे. हा पिक्चर पाहिला नसेल तर समजा सैफ अली खान राणी मुखर्जीच्या हम-तुम सारखं आहे. भेट झाली मग सेपरेट झालो, पुन्हा भेट झाली मग सेपरेट झालो आणि शेवटी भेट झाली आणि सोबत आहोत. आता आम्ही रिलेशनशिपच्या या स्टेजवर आहोत जिथं एकमेकांना सोडणं अशक्य आहे.
इंग्रजी शिकण्यासाठी म्हणून फ्रेंड्स पाहायला सुरुवात केली तर त्यांचं बोलणचं मला कळत नव्हतं. इतकं फास्ट बोलत होते की म्हटलं तिकडे वेगळीच इंग्लिश बोलतात. मग चार पाच एपिसोड पाहून नाद सोडून दिला.
माझ्यासोबत शिकणारे मित्र इंजिनिअरिंगला गेले होते. ते इंजिनिअरिंगला जाऊन फुल नर्ड बिर्ड बनले होते. त्या लोकांचा फुलटाइम बिजनेस असायचा वेगवेगळे पिक्चर शोधणे आणि सीरिज शोधणे, अर्थात टोरंटवर. मग ते डाऊनलोड करून ठेवायचे. त्यांनी मला पेनड्राइव्हमध्ये काही सिजन दिले. तेही सबटायटलसोबत.
मित्राच्याच लॅपटॉपवर ते पाहायचो. पाहिजे तेव्हा पॉज करून नीट वाचायचं. मग ते कळलं तर हसायचो. बरेच एपिसोड पाहिल्यावर थोडं थोडं कळू लागलं आणि थोडं थोडं हसू लागलो. आता ते जोक्स कळले म्हणून हसत होतो की इंग्रजी कळलं म्हणून हसत होतो याचा पत्ता अजून लागलेला नाही. टाइम ट्रॅव्हलने मागे जाऊन समजून घ्यावं लागेल ते नेमके काय होतं. पण तुम्हाला अंदाज आला असेल मी फ्रेंड्स कसं पाहत होतो. ही गोष्ट असेल आता 2008-09 या सालची.
फास्ट फॉरवर्ड टू 2014
तो पर्यंत बक्कळ इंग्रजी पिक्चर पाहिले होते. सबटायटल फास्ट वाचता येऊ लागले होते. मग फ्रेंड्स पाहायला घेतलं. आणि मग काय कळू लागलं. माझ्या हसण्याचं टायमिंग पण सुधारलं म्हणजे जेव्हा तो पब्लिकचा पाठीमागून हसण्याचा साउंड येतो तेव्हाच मी हसू लागलो. म्हणलं हा हसायचा जॉब द्या मला. मी करून घेइल मस्तपैकी.
तेव्हा पासून आतापर्यंत फ्रेंड्स हे माझं गो टू सिरिअल झालं आहे. कधीकधी ठरवतो फ्रेंड्स पाहायचं नाही त्यामुळे इतर पाहणं कमी झालं मग तासभर नेटफ्लिक्स, प्राईम, हॉटस्टार, होईचोई, सोनी लाइव्ह, मुबी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहतो काय पाहण्यासारखं आहे. त्यावर बऱ्याचदा काहीच सापडत नाही मग पुन्हा फ्रेंड्सच पाहतो.
'काही गोष्टी कधी सुटल्याच नाहीत'
बऱ्याचदा विचार करतो सिरिअल सारखी सिरिअल त्यासोबत का अॅटच झालोत आपण. फक्त कॉमेडी आहे म्हणून, लिखाण चांगलं आहे की हलकं फुलकं आहे. काय कारण असेल असं बऱ्याचदा मनात येतं. पण मला काही नेमकं उत्तर सापडत नाही. कदाचित त्याचं उत्तर नव्वदीमध्ये वाढलो त्यातच असेल असं वाटतं. शक्तिमान, अंदाज अपना अपना असो की त्यावेळच्या कोणत्याही गोष्टी अजून सोडाव्याशा वाटत नाही. माझ्याकडून सोनू निगमचं दिवाना आणि आलताफ राजा नाही सुटले अजून.
फ्रेंड्स सोबत असलेला जवळीक ही फक्त स्टोरी मुळे नाही किंवा कोणत्या एका कारणामुळे नाहीतर त्यातला रिलेटिबिलिटीमध्ये आहे असं मला वाटतं. फ्रेंड्स हे माझ्यासाठी एकाच वेळी फॅंटसी आणि रिअॅलिजम दोन्ही पण आहे. फॅंटसी यासाठी की कुणाला सुंदर मुला-मुलींच्या ग्रुपचा पार्ट असलेलं आवडणार नाही. त्यांचं वागणं, बोलणं, कुल राहणं हे सगळं फॅंटसीच आहे माझ्यासाठी.
एकेदिवशी ते बार्कालाँज घ्यायचंय आणि माझ्या आवडत्या लोकांसोबत 54 इंची टीव्हीवर ही सीरिज सलग पाहायची आहे. जोई आणि चॅंडलर जसा टीव्ही पाहतात अगदी तशीच. आणि त्याच वेळी माझ्यासाठी रिअॅलिजम पण आहे कारण घराबाहेर पडल्यावर आई वडील सोबत नसताना अनेक लोक तुमचे बनतात. तुमच्या सुख दुखात आणि पीजेमध्ये सामील होतात. याचं रिफ्लेक्शन फ्रेंडमध्ये मला कुठतरी दिसतं.
फ्रेंड्स कॉमेडी सिरिअल आहे पण सगळंच गुडी गुडी होत नाही त्यात. प्रत्येक पात्र एक्सिस्टेंशिएल क्रायसिसमधून जातं. मी कोण आहे आणि मला काय हवं आहे याचा शोध ते सतत घेताना दिसतात. अनेक प्रॉब्लेम्स येतात त्यांना ते टॅकल करतात.
आपण शाळा कॉलेजमध्ये जातो तिथं सांगितलं जातं की तुम्ही परिश्रम करा यश तुमचं आहे. तुम्ही सगळ्यांशी चांगले वागा दगडालाही पाझर फुटेल. कठीण परिस्थितीमध्ये डगमगू नका वगैरे वगैरे….पण जेव्हा प्रत्यक्षात बाहेर पडतो तेव्हा येणाऱ्या प्रॉब्लेम्सच काय करायचं हे कुठे ठाऊक असतं?
इंटरव्यूला जायचं आहे आणि नळाला पाणी नाही, कसं बसं तुम्ही बाथरूममधून बाहेर येतात आणि शर्ट घ्यायला जातात तेव्हा नेमकं त्याच वेळी तुम्ही काल इस्त्री करुन आणलेला शर्ट तुमचा रुम पार्टनर घालून गेलेला असतो. चुरगळलेला शर्ट घेऊन तुम्ही इस्त्रीवाल्याकडे जाता आणि लाईट जाते. काय कराल? हे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्याचं ट्रेनिंग कुठेच नसतं पण ते पण एखाद्या अॅकेडमिक प्रॉब्लेम इतकेच महत्त्वाचे आहेत.
फ्रेंड्समध्ये अशा छोट्या छोट्या प्रॉब्लेम्समधून ते लोक नेहमी जाताना दिसतात. कधी सोडवतात तर कधी आणि गुंता वाढवून ठेवतात. पुन्हा नवा प्रॉब्लेम येतो. कधी नोकरी जाणं, कधी नोकरी बदलावी वाटणं, नवे मित्र मैत्रीण येणं ते सोडून जाणं, रिलेशनशिप, ब्रेकअप, लग्न, डिव्होर्स, गरोदरपण, बाळंतपण, मृत्यू अशा अनेक वेगवेगळ्या फेजेसमधून हे लोक जाताना आपण पाहतो.
जर मी या जागी असतो तर काय केलं असतं किंवा माझ्या जागी फ्रेंड्समधलं अमूक कॅरेक्टर असतं तर तिने किंवा त्याने काय केलं असतं याचा पण विचार कधीकधी त्या परिस्थितीतला बोजडपणा कमी करतो. कुणी म्हणेल हा तर एस्केपिजम आहे.
असूही शकतं. दर्जेदार कलाकृतीमध्ये पलायनवादाची तत्त्वं असतातच, नाहीतर ती कलाकृती किती बोरिंग होईल.
'कंफर्ट फूड'
फ्रेंड्स हे माझ्यासाठी एखाद्या कंफर्ट फूड सारखं झालं आहे. कितीही दिवस खराब गेलेला असू द्या. आजूबाजूला न आवडणाऱ्या न पटणाऱ्या गोष्टी घडू द्या. चांगलं तंदुरी चिकन आणि फ्रेंड्सचा एक एपिसोड माझ्या आयुष्यात जे प्रॉब्लेम्स सुरू आहेत त्यांचा विसर पाडण्यासाठी पुरेसे आहेत आणि समजा प्रॉब्लेम्स नसले, बेस्ट दिवस असला तरी तो दिवस फ्रेंड्स पाहून सेलिब्रेट करायचा असतो. अॅनिवे ते मी पाहणारच असतो.
पुन्हा येऊ रियुनियनकडे. पण माझ्यासाठी फ्रेंड्स कधी संपलेलंच नाही. जेव्हा पण माझा शेवटच्या सिजनचा शेवटचा एपिसोड संपतो त्यानंतर मी लगेच पहिल्या सिजनचा पहिला एपिसोड पाहतो. यावेळी मी फिजिकली कुठे जरी असलो तरी मेंटली मॅनहटमधल्या सेंट्रल पर्कमध्ये कुठेतरी कोपऱ्यात बसून या सहा लोकांकडे आणि गंथरकडे पाहत असतो.
अनेक गावं, शहरं बदलली, अनेक लोक आले आणि गेले, काही राहिले. आयुष्यात बरीच स्थित्यंतरं झालीत पण एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे फ्रेंड्स. हे सीरियलच्याही बाबतही खरं आहे आणि आयुष्यात भेटलेल्या मित्र-मैत्रिणींच्याच बाबतीतही. कदाचित हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)