रामसे ब्रदर्स: हॉरर चित्रपटांचा ब्रँड बनलेले हे सात भाऊ कोण होते?

    • Author, इकबाल परवेझ
    • Role, फिल्म पत्रकार, मुंबईहून बीबीसीसाठी.

रामसे ब्रदर्स...इंग्रजांना फतेहचंद रामसिंघानी यांचं नाव उच्चारताना अडचण येत होती. त्यामुळे त्यांनी रामसिंघानी यांचं नाव बदलून रामसे असं केलं.

पुढे फतेहचंद यांनी त्यांच्या सात मुलांसोबत मिळून रामसे ब्रदर्स नावाने हॉरर चित्रपटांचा ब्रॅँड बनवला.

रामसे ब्रदर्सनी रुपेरी पडद्यावर अशी 'दहशत' पसरवली की ते या जॉनरचे मास्टरच बनले.

70 आणि 80 च्या दशकात रामसे ब्रदर्सनी सुमारे 45 चित्रपट बनवले. मनोरंजन क्षेत्रात हॉरर चित्रपटांचा अर्थ म्हणजे रामसे ब्रदर्स यांचे चित्रपट, अशीच व्याख्या त्यांनी बनवली होती.

सध्याच्या जगात लक्ष्मी, स्त्री, भुलभुलैय्या यांच्यासारखे चित्रपट 'हॉरर कॉमेडी' जॉनर या नावाने ओळखले जातात.

सध्याचे काही प्रेक्षक रामसे ब्रदर्सच्या हॉरर चित्रपटांना दर्जाहीन असल्याचं मानतात. पण प्रत्येक काळात प्रेक्षकांची आवड-निवड बदलते.

त्या काळात रामसे बंधूंनी हॉरर जॉनरला वेगळ्या उंचीवर नेलं. त्यांनी आपल्या नावाचा एक अजरामर ब्रँड बनवला.

श्याम रामसे यांची कन्या साशा श्याम रामसे यांनी सध्याच्या आणि मागच्या काळातील हॉरर चित्रपटांची तुलना करताना चर्चा केली.

त्या सांगतात, "आजकाल जागरुकता वाढली आहे. अनेक माध्यमं तयार झाली आहेत. लोक वेगवेगळे चित्रपट पाहतात. सध्याच्या काळात 10 वर्षांचा मुलगासुद्धा काही चुकीचं वाटत असेल तर सांगतो. पण तो काळ वेगळा होता. त्या काळात आमच्या चित्रपटांना मोठं यश मिळालं. आजही अनेक प्रेक्षक ते चित्रपट पाहतात. अनेक हाऊस पार्ट्यांमध्ये मी गेले. तिथं लोक रामसे ब्रदर्सचे जुने भीतीदायक चित्रपट पाहतात. आम्ही नुकतेच एका पार्टीत 'वीराना' चित्रपट पाहिला."

हॉरर चित्रपटात यश

रामसे बंधूंसोबत 'पुराना मंदीर'सह तीन चित्रपट करणाऱ्या अभिनेत्री आरती गुप्ता सुरेंद्रनाथ सांगतात, "पुराना मंदीर चित्रपटासाठी आजही लोक वेडे आहेत. मधुर भांडारकर, अनुराग कश्यप यांच्यासारखे लोक त्या चित्रपटाचे चाहते आहेत. अनुराग कश्यप तर 'पुराना मंदीर' चित्रपटाचा टी-शर्ट घालून फिरतात."

रामसे बंधूंसोबत तीन हॉरर चित्रपट करणाऱ्या कुनिका लाल यांच्या मते, "त्या मते तंत्रज्ञानात कमतरता होती. त्यावेळी सोशल मीडियाचं इतकं प्रस्थ नव्हतं. हॉलिवूडसह जगभरातले चित्रपट लोक पाहतात. त्यांच्याशी तुलना करू लागतात. आजचं तंत्रज्ञान आणि आवड-निवड बदलली आहे. त्यामुळेच आधीच्या चित्रपटांचे दृश्य बालिश वाटू लागतात. पण त्या काळातील तंत्रज्ञानाच्या हिशोबाने ते चित्रपट उत्तम होते. त्यावेळी रामसे बंधूंचे चित्रपट पाहताना लोक घाबरायचे, हे नक्की.

रामसे ब्रदर्सने हॉरर जॉनर चित्रपटांच्या निर्मितीत प्रचंड मोठं यश मिळवलं. आता त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यासाठी अजय देवगण यांनी कॉपीराईट अधिकार मिळवले आहेत, हे विशेष.

रामसे बंधूंवर बनवण्यात येणाऱ्या चित्रपटामुळे त्यांच्याबद्दल माहीत नसणाऱ्या तरुणांनाही त्यांचं कर्तृत्व कळेल.

तुलसी रामसे यांचे पुत्र दीपक रामसे यांनी सांगितलं, "रामसे ब्रदर्सवर अजय देवगण चित्रपट किंवा वेब सिरीज बनवत आहेत. यामध्ये काय दाखवावं, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागेल. 2021 मध्ये हा चित्रपट रिलीज होऊ शकतो. यानंतर लोक रामसे ब्रदर्सला ओळखू लागतील.

या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी रामसे ब्रदर्सच्या वडिलांनी म्हणजेच फतेहचंद रामसे यांनी पाया रचला. पाकिस्तानच्या लाहोर आणि कराची येथे रामसे यांचा रेडिओचा व्यवसाय होता. फाळणीनंतर ते आपलं कुटुंब घेऊन मुंबईला आले.

मुंबईत त्यांनी रेडिओचं दुकान टाकलं. फतेहचंद रामसे यांची सात मुलं होती. त्यापैकी काहींना रेडिओ तयार करणं चांगल्या पद्धतीने जमायचं. त्यांच्यापैकी एकाचं टेलरिंग आणि गारमेंटचं दुकानही होतं.

घरात उदरनिर्वाह चालवण्यासाठी आवश्यक ते सगळं त्यांच्याकडे होतं. पण फतेहचंद यांचं मन यामध्ये रमायचं नाही. मुलांनी ही दुकानं चालवावीत, असं त्यांना वाटायचं नाही.

फतेहचंद यांना चित्रपटांची आवड होती. त्यामुळे त्यांना फिल्म इंडस्ट्रीत जायचं होतं.

1954 मध्ये रिलीज झालेल्या 'शहीद-ए-आझम भगतसिंह' यासह इतर काही चित्रपटांमध्ये त्यांनी पैसा गुंतवला.

त्यानंतर 1964 मध्ये 'रुस्तम सोहराब' चित्रपटाची निर्मिती केली.

दीपक रामसे सांगतात, "हा ऐतिहासिक चित्रपट बनवण्यास वेळ लागला. पैसाही जास्त लागला. यामधून फारसा काही फायदा मिळाला नाही. त्यावेळी दादांना खूप अडचण येत होती. दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ आपल्या पद्धतीने काम करून त्रास द्यायचे. त्यामुळेच आपलं कुणीतरी या क्षेत्रात असलं तर बरं होईल, असं त्यांना वाटू लागलं. त्यामुळेच त्यांनी आपल्या मु्लांना प्रशिक्षण देणं सुरू केलं.

हॉरर चित्रपटांची सुरुवात

'दो गज जमीन के नीचे' च्या अफाट यशानंतर रामसे बंधूंनी हॉरर चित्रपटांची रांगच लावली. दरवाजा, गेस्ट हाऊस, पुराना मंदीर, पुरानी हवेली, बंद दरवाजा आणि वीराना यांसारखे यशस्वी हॉरर चित्रपट बनवले. 70 आणि 80 च्या दशकात रामसे बंधूंची भीतीदायक मनोरंजन चांगलंच यशस्वी ठरलं.

साशा रामसे यांच्या मते, भारतीय प्रेक्षकांची मागणी वडिलांनी ओळखली होती. त्यांनी हॉररसोबतच संगीत, बॅकग्राऊंड, ह्यूमर आणि रोमान्स यांचं उत्तम मिश्रण चित्रपटांमध्ये दिलं. यामुळेच रामसे बंधूंच्या हॉरर चित्रपटांचा वेगळा ब्रँड होता.

दीपक रामसे म्हणतात, "रामसे ब्रदर्स त्यावेळी तरुण होते. सगळे भाऊ हॉलिवूडच्या चित्रपटांनी प्रभावित होते. हॅमर हाऊस ऑफ हॉरर तसंच काही इटालियन चित्रपट निर्मात्यांची प्रेरणा आम्ही घेतली होती. त्या चित्रपटांनी प्रेरित होऊन भारतीय प्रेक्षकांची आवड-निवड लक्षात घेऊन चित्रपट बनवले जात.

तंत्रज्ञानाचा अभाव

90 च्या दशकापासून तंत्रज्ञानाचा वापर चित्रपटांमध्ये वाढला. आज कोणतीही दृश्य तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक प्रभावी केली जातात. पण त्यावेळी तशा प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं.

रामसे बंधूंनी फिजिकल मेकअप आणि बॅकग्राऊंड स्कोअर हेच भीती घालण्यासाठीचं शस्त्र बनवलं. मनोरंजनासाठी कॉमेडी, म्यूझिक आणि बोल्ड सीनचा तडका दिला.

या चित्रपटांमध्ये अनिरुद्ध अग्रवाल प्रामुख्याने भूत बनायचे. मेकअपनंतर ते अत्यंत भीतीदायक वाटत असत.

दीपक रामसे सांगतात, "तंत्रज्ञानाची प्रगती झालेली नसल्याने फक्त बॅकग्राऊंड स्कोअरवर अवलंबून राहावं लागायचं. पुराना मंदिरचे कंपोझर उत्तम सिंह होते. त्यांचं संगीतच भूताच्या आधी लोकांना घाबरवायचं. शिवाय मेकअपही त्यावेळी महत्त्वाचं ठरायचं. हिंसेमुळे आमच्या चित्रपटांना 'ए' सर्टिफिकेट मिळायचं.

पण संपूर्ण तीन तास चित्रपटात भूतं-खेतंच दाखवून चालत नाही. चांगले बोल्ड सीन, कॉमेडी, संगीत वगैरे गोष्टी घातल्या तर ते उपयोगी ठरतं. या सर्व गोष्टींचा विचार केला जायचा."

मोठे स्टार नाहीत

रामसे बंधूंच्या चित्रपटांचं बजेट कमी असायचं. कोणताच मोठा चेहरा या चित्रपटांमध्ये नसायचा. 'ए' सर्टिफिकेटमुळे लहान मुलं आणि कुटुंबीय सिनेमागृहात येत नसत.

पण तरीही भूतांच्या बळावर रामसे बंधूंनी चित्रपट हिट बनवले. या चित्रपटांनी यश तर मिळवलंच पण मोठमोठ्या अभिनेत्यांच्या चित्रपटांनाही टक्कर दिली.

दीपक रामसे सांगतात, डिस्ट्रीब्यूटनी स्टार कास्ट विचारल्यानंतर नवी नावं सांगितली जायची. हे चित्रपट कसे चालतील, नव्या कलाकारांसाठी इतके पैसे कसे द्यावेत, अशा शंका उपस्थित केली जायची. पण आपल्या चित्रपटाचा स्टार भूत आहे, असं उत्तर रामसे बंधूंकडून दिलं जायचं.

रामसे बंधूंचे चित्रपट मोठ्या अभिनेत्यांच्या चित्रपटासोबतच्या तारखांनाही प्रदर्शित व्हायचे.

रामसे ब्रदर्सचं टीमवर्क

सात भाऊ आपापल्या टीम बनवून करायचे. आपल्या जबाबदाऱ्या सर्वांनी वाटून घेतल्या होत्या.

रामसे बंधूंच्या बहुतांश चित्रपटांचं शुटींग महाबळेश्वरला व्हायचं. एक बस करून रामसे बंधू महाबळेश्वरला जायचे. तिथल्या अनारकली हॉटेलमध्ये बुकिंग केली जायची. त्या काळात महिनाभर इतरांना हॉटेलमध्ये प्रवेश नसायचा.

साशा याबाबत सांगतात, "त्या काळातील कलाकार आजही भेटल्यानंतर म्हणतात रामसे बॅनर हेच एक कुटुंब होतं. अत्यंत प्रेमाने काम केलं जायचं. माझी आई, आमच्या सर्व काकू शुटिंगदरम्यान उपस्थित असायच्या.

छोट्या पडद्यावर एंट्री

70 आणि 80 च्या दशकात धुमाकूळ गाजवल्यानंतर रामसे बंधूंनी रुपेरी पडद्यावरून छोट्या पडद्याकडे येण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी दूरदर्शन वाहिनीनंतर पहिला खासगी चॅनल झी टीव्ही सुरू झाला होता. रामसे बंधूंचे चित्रपट ए सर्टिफिकेट असल्यामुळे दूरदर्शनवर दाखवता येत नसत. त्यामुळे आपल्या चित्रपटांचे हक्क विकण्यासाठी रामसे बंदू झी टीव्हीचे मालक सुभाष चंद्रा यांच्याकडे पोहोचले.

सुभाष चंद्रा यांनी त्यांना झी हॉरर शो बनवण्याचा प्रस्ताव रामसे बंधूंसमोर ठेवला. हा प्रस्तावही रामसे बंधूंनी स्वीकारला.

झी हॉरर शोचे 365 एपिसोड बनवण्यात आले. तुलसी रामसे यांचे पुत्र दीपक रामसे यांनी 200 एपिसोडचं दिग्दर्शन केलं. त्यानंतर हळूहळू रामसे ब्रदर्सचे चित्रपट मोठ्या पडद्यावरून गायब झाले.

साशा यांच्या मते, "झी हॉरर शो म्हणजे चित्रपटाचाच फॉरमॅट होता. अर्ध्या तासाचे पाच म्हणजे एकूण अडीच तासांचे एपिसोड. आपला ब्रँड घरोघरी पोहोचवण्यासाठी टीव्हीचा उपयोग चांगला ठरला. यामागी माझ्या वडिलांची दूरगामी दृष्टी होती."

याबाबत दीपक सांगतात, "आम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेतला. टीव्हीमुळे आमचा ब्रँड घरोघरी पोहोचला. शुक्रवारी रात्री नऊ वाजता झी हॉरर शो लागायचा. त्यावेळी मुलं घाबरून पांघरूण घेऊन बसायचे. पण शो पूर्ण पाहायचे. आम्ही टीव्हीच्या हिशोबाने काही बदल केले. बोल्ड सीन काढून टाकले. पण एकंदरीत हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला."

प्रमोशनची आगळीवेगळी पद्धत

चित्रपट निर्मितीसोबतच रामसे बंधूंनी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनवर लक्ष केंद्रीत केलं होतं.

सध्या प्रमोशनचे वेगवेगळे फंडे आजमावले जातात. पण रामसे बंधूंची पद्धत निराळी होती.

रामसे बंधू यांचं चित्रपट पाहायला गेल्यानंतर भूताचा वेश घेतलेला व्यक्ती तिकिट पाहायला यायचा. यामुळे चित्रपटाला प्रसिद्धी मिळायची. शिवाय रेडिओचाही वापर त्यांनी यासाठी केला.

खोलवर प्रेम आणि ताळमेळ

रामसे ब्रदर्स यांच्या कामात चांगला ताळमेळ होता. तसंच त्यांच्यातील नातंही खूप बळकट होतं.

कामादरम्यान ते एकमेकांचा बलस्थानांना ओळखून त्यांचा उपयोग करून घ्यायचे. पैशांचा प्रश्न असूनही भावंडांमध्ये तक्रार झाली नाही. त्यांचं नातं त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. फतेहचंद जिवंत होते तोपर्यंत सगळ्या व्यवसायाचे मालक तेच होते. ते सगळ्या मुलांना पैसे देत असत. त्यांच्यानंतर मोठ्या भावाने ही भूमिका मोठ्या जबाबदारीने बजावली.

दीपक आणि साशा तसंच कुनिका लाल यांच्या बोलण्यात या गोष्टी वारंवार येत होत्या.

तिसरी पिढीही हॉरर चित्रपटांत

70-80 च्या दशकात चित्रपट विश्व गाजवणाऱ्या सात भावंडांपैकी पाचजण आता या जगात नाहीत. कुमार आणि गंगू रामसे वृद्धत्वाकडे झुकले आहेत.

आता रामसे बंधू यांची तिसरी पीढीसुद्धा हॉरर चित्रपटांच्या क्षेत्रात आहे. कुमार रामसे यांचे पुत्र गोपाल रामसे आणि श्याम रामसे यांची मुलगी नम्रता रामसे लेखक आहेत. तुलसी रामसे यांचे पुत्र दीपक रामसे दिग्दर्शनाचं काम करत आहेत. साशा रामसे क्रिएटिव्ह रायटिंग आणि दिग्दर्शनाचं काम करते. दीपक रामसे यांनी 'वो कौन थी' नावाचा एक चित्रपट बनवला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)