You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
2020 या वर्षात 'या' कलाकारांनी सिनेसृष्टीला केलं अलविदा
- Author, सुप्रिया सोगळे
- Role, बीबीसी हिंदीसाठी
2020 हे वर्ष संपत आलंय. जगाने या वर्षात अनेक ऐतिहासिक घटनांचा अनुभव घेतला. एका विषाणूनं सुरुवात झालेल्या कोरोनाच्या संकटानं जगभरात लाखो लोकांचा जीव घेतला.
दुसरीकडे भारतातील सिनेसृष्टीनं अनेक कलाकारांनाही गमावलं.
1. निम्मी
हिंदी सिनेमाच्या 50 आणि 60 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री नवाब बानो उर्फ निम्मी यांचं 25 मार्च 2020 रोजी निधन झालं.
शोमॅन राज कापूर यांनी नवाब बानो यांना मोठ्या पडद्यावर आणलं होतं. त्यांना रुपेरी पडद्यावर आणताना राज कपूर यांनीच त्यांचं नाव बदलून 'निम्मी' असं ठेवलं.
अभिनेत्री निम्मी यांनी बरसात, दिदार, दाग, आन, उडनखटोला, कुंदन, भाई-भाई, बसंत बिहार यांसारख्या लोकप्रिय ठरलेल्या सिनेमांमधून काम केलं.
2. इरफान खान
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित इरफान खान हे सिनेसृष्टीतील सक्षम कलाकारांपैकी एक मानले जात. 1988 साली 'सलाम बॉम्बे' सिनेमातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली.
केवळ भारतीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्येही त्यांनी आपला ठसा उमटवला. अनेक कलाकारांसाठी इरफान खान प्रेरणादायी बनले.
2018 साली इरफान यांनी ट्विटरवरून सांगितले की, त्यांना न्युरोएंडोक्रिन ट्युमरचा त्रास आहे. त्यावर उपचारासाठी ते लंडनलाही गेले. उपचारानंतर भारतात परतल्यानंतर त्यांनी 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमातही काम केलं होतं.
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागलं असतानाच 28 एप्रिल 2020 रोजी कोलन इन्फेक्शनमुळे इरफान पुन्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले. उपचारादरम्यानच 29 एप्रिल 2020 रोजी वयाच्या 53 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या चार महिन्यांपूर्वी त्यांची आई सईद बेगम यांचं जयपूरमध्ये निधन झालं होतं.
लाईफ ऑफ पाय, नेमसेक, पान सिंह तोमर, मकबूल, द लंचबॉक्स, स्लमडॉग मिलिनेअर, इन्फर्नो, हासिल, पिकू, हिंदी मीडियम, तलवार यांसारखे सिनेमे इरफान यांच्या नावावर आहेत.
3. ऋषी कपूर
इरफान खान यांच्या निधनातून सिनेरसिक सावरत होते, तोच दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाचे वृत्त समोर आले.
30 एप्रिल 2020 रोजी ऋषी कपूर यांचं कर्करोगानं निधन झालं. 2018 मध्ये त्यांना ल्युकेमियाचं निदान झालं आणि त्यानंतर न्यूयॉर्क सिटीमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं होतं.
हिंदी सिनेसृष्टीचे 'शोमॅन' म्हटल्या जाणाऱ्या राज कपूर यांचे पुत्र असलेल्या ऋषी कपूर यांनी बालकलाकार म्हणूनच आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. पुढे 1973 साली 'बॉबी' सिनेमातून त्यांनी प्रमुख भूमिकेतील पहिला सिनेमा केला. रोमँटिक सिनेमे त्यांच्या वाट्याला आले आणि रोमँटिक हिरोची प्रतिमा पुढे तीन दशकं कायम राहिली.
2012 साली प्रदर्शित झालेल्या 'अग्निपथ' सिनेमात त्यांनी पहिल्यांदा नकारात्मक भूमिका साकारली होती. ही भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.
जवळपास 50 वर्षांच्या आपल्या सिनेकारकीर्दीत ऋषी कपूर यांनी अनेक भूमिका साकारल्या. अमर अकबर अँथनी, प्रेम रोग, कर्ज, सागर, चांदनी, हिना, दिवाना, बोल राधा बोल, दामिनी, नमस्ते लंडन, लव्ह आज कल, मुल्क, कपूर अँड सन्स यांसारखे शेकडो सिनेमे त्यांच्या नावावर आहेत.
4. वाजिद खान
एक जून रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं तबलावादक शराफत अली खान यांचे धाकटे पुत्र आणि प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचं निधन झालं.
47 वर्षीय वाजिद खान यांनी थोरले बंधू साजिद खान यांच्यासह हिंदी सिनेसृष्टीत संगीतकार म्हणून 1998 पासून काम करण्यास सुरुवात केली होती. सलमान खानच्या 'प्यार किया तो डरना क्या' सिनेमाला या संगीतकार जोडीने संगीत दिलं होतं.
संगीतकार साजिद-वाजिद यांनी संगीतबद्ध केलेल्या 'दिवानों' अल्बममधील गाणी प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी गायली होती.
मुझसे शादी करोगी, तेरे नाम, दबंग, राऊडी राठोड, एक था टायगर, हिरोपंती अशा सिनेमांसाठीही या संगीतकार जोडीने संगीत दिलं होतं.
5. बासू चॅटर्जी
प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचं 4 जून 2020 रोजी वयाच्या 99 व्या वर्षी निधन झालं.
चॅटर्जींना दोनवेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. 70-80 च्या दशकात मध्यमवर्गीय कुटुंबांच्या कथांवर आधारित ते सिनेमे करत असत.
रजनीगंधा, पिया का घर, चितचोर, छोटी सी बात, स्वामी, खट्टा-मिठा, बातों-बातों में, चमेली की शादी, मनपसंद, अपने-पराये यांसारखे सिनेमे बासू चॅटर्जी यांनी दिग्दर्शित केली.
6. सुशांत सिंह राजपूत
बिहारमधील छोट्याशा गावातून बॉलीवुडचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या सुशांत सिंह राजपूतनं 2010 साली 'पवित्र रिश्ता' मालिकेतून कलाकार म्हणून कारकीर्द सुरू केली. 2013 साली 'काय पो छे' सिनेमातून त्याने आपली सिनेकारकीर्द सुरू केली.
मात्र, नीरज पांडे यांच्या 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' सिनेमानं सुशांतला स्टार बनवलं. आपल्या सहा-सात वर्षांच्या सिनेकारकीर्दीत सुशांतनं अभिनयाचे अनेक पैलू दाखवले. छिछोरे, सोनचिरैया, केदारनाथ, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी, पीके यांसारखे सिनेमे त्याने केले.
14 जून 2020 रोजी सुशांतने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. वय वर्षे 34 असलेल्या सुशांतच्या अकाली मृत्यूमुळे अनेकांना चटका लागला.
सुशांतच्या आत्महत्येवरून देशभर चर्चा झाली. सध्या हे प्रकरण सीबीआयकडे आहे आणि चौकशीचा अंतिम अहवाल सुद्धा अद्याप आला नाहीय.
मात्र, AIIMS ने सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या म्हणून घोषित केलंय. त्याच्या मृत्यूनंतर 'दिल बेचारा' हा त्याचा शेवटचा सिनेमा प्रदर्शित झाला.
7. सरोज खान
हिंदी सिनेसृष्टीतील पहिल्या महिला नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं 3 जुलै 2020 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या 71 वर्षांच्या होत्या.
तीन वर्षांच्या असताना सरोज खान यांनी सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. 68 वर्षांच्या कारकीर्दीत सरोज खान यांनी अनेक मोठमोठ्या अभिनेते, अभिनेत्रींना आपल्या तालावर थिरकायला लावलं.
माधुरी दीक्षित, श्रीदेवी, ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर, सलमान खान आणि शाहरूख खान यांच्या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांनी केलं आहे. माधुरी दीक्षित सरोज खान यांना गुरू मानत असे.
सिनेसृष्टीत 'मास्टरजी' म्हणून ओळख मिळवलेल्या सरोज खान यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं.
8. जगदीप
'शोले' सिनेमात 'सुरमा भोपाली'ची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचं 8 जुलै रोजी निधन झालं. ते 81 वर्षांचे होते.
त्यांनी जवळपास 70 वर्षे सिनेमांमध्ये काम केलं. शोले सिनेमातील 'सुरमा भोपाली'मुळे बनलेलीची त्यांची ओळख अनेक वर्षे कायम राहिली. विनोदी कलाकार म्हणून ते लोकप्रिय ठरले.
जवळपास 400 सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. मुन्ना, आर-पार, दो बिघा जमीन, ब्रम्हचारी, भाभी, दो भाई, अंदाज, फूल और कांटे यांसारख्या सिनेमांचा त्यात समावेश आहे.
9. कुमकुम
50-60 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री कुमकुम यांचं 28 जुलै 2020 रोजी निधन झालं. अभिनेते आणि दिग्दर्शख गुरु दत्त यांनी कुमकुम यांना सिनेमात आणलं.
कुमकुम यांनी प्यासा, बारीश, आर-पार, मिर्झा गालिब, उजाला, कोहिनूर, मिस्ट एक्स इन बॉम्बे, मदर इंडिया, नया दौर, सीआयडी यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं होतं.
10. इब्राहिम अल्काजी
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित इब्राहिम अल्काजी भारतीय रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार होते. रंगभूमीबाबत त्यांची निष्ठा आणि त्यांनी दिलेलं योगदान मोठं मानलं जातं.
15 वर्षे ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक होते. त्यादरम्यान त्यांनी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना प्रशिक्षण दिलं. नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, विजया मेहता, रोहिणी हट्टंगडी, सुहास जोशी, ज्योती सुभाष, ओम शिवपुरी आणि बी जयश्री असे बरेचजण त्यांचे शिष्य होते.
4 ऑगस्ट 2020 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं इब्राहिम अल्काजी यांचं निधन झालं.
11. राहत इंदौरी
कोरोनाच्या संसर्गामुळे प्रसिद्ध उर्दू कवी, शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांचं 11 ऑगस्ट 2020 रोजी निधन झालं. ते 70 वर्षांचे होते.
मध्य प्रदेशातील इंदौर इथं एक जानेवारी 1950 रोजी राहत इंदौरी यांचा जन्म झाला. इंदौरमधीलत नूतन स्कूलमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.
इंदौरच्या इस्लामिया करीमिया कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर बरकतुल्लाह विद्यापीठातून MA चं शिक्षण पूर्ण केलं. गेल्या 40-50 वर्षांपासून राहत इंदौरी मुशायरा, कवी संमेलनांमध्ये सहभागी होत होते.
गंभीर आणि अर्थपूर्ण शायरींसोबतच तरुण पिढीची नसही त्यांनी ओळखली होती. 'बुलाती है मगर जाने का नहीं' ही त्यांची कविता आजही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर गाजत असते.
खुद्दार, मर्डर, याराना, हमेशा, मुन्ना भाई एमबीबीए, मीनाक्षी, करीब, मिशन कश्मीर यांसारख्या सिनेमांसाठी त्यांनी गाणीही लिहिली.
12. पंडित जसराज
संगीतातील मेवाती घरण्याचे गायक पंडित जसराज यांचं अमेरिकेत 17 ऑगस्ट 2020 रोजी निधन झालं. पद्मविभूषण पुर्सकाराने जसराज यांना गौरवण्यात आलं होतं.
जसराज यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्यानं झालं. ते 90 वर्षांचे होते. वर्षातील सहा महिने ते अमेरिकेत, तर सहा महिने भारतात घालवत असत.
त्यांचं निधन झालं, तेव्हा भारतात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. त्याचं पार्थिव मुंबईत आणण्यात आलं आणि सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
लहानपणापासून पंडित जसराज यांना संगीताची आवड होती. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शास्त्रीय संगीताला अर्पण केलं. संजीव अभ्यंकर, संदीप रानडे, शशांक सुब्रमण्यम, अनुराधा पौडवाल, साधना सरगम यांसारखे त्यांचे शिष्य आहेत.
13. निशिकांत कामत
'डोंबिवली फास्ट' या मराठी सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता-दिग्दर्शक निशिकांत कामत याचं 17 ऑस्टला हैदराबाद इथं निधन झालं. निशिकांत 50 वर्षांचा होता.
14 वर्षांच्या आपल्या सिनेकारकीर्दीत निशिकांतने अजय देवगन, जॉन अब्राहम, रितेश देशमुख, इरफान खान यांसारख्या कलाकारांचे सिनेमे दिग्दर्शित केले.
मुंबई मेरी जान, फोर्स, लई भारी, दृश्यम इत्यादी सिनेमे निशिकांतच्या नावावर आहेत.
14. आशालता वाबगावकर
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं 22 सप्टेंबर रोजी निधन झालं. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सातारा जिल्ह्यात टीव्ही मालिकेचं चित्रिकरण करत असतानाच त्या कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या.
मराठीह हिंदी सिनेमांमध्येही वाबगावकर यांनी काम केलं होतं. अपने-पराये, उंबरठा, नमक हलाल, वो सात दिन, घायल, अग्निसाक्षी, सदमा, दो आँखे बाराह हाथ यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केलं होतं.
15. एसपी बालासुब्रमण्यम
पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेले प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं.
कोरोनातून ते बरे झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला आणि त्यातच उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
बालासुब्रमण्यम यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये 40 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.
एकेकाळी सलमान खानवर चित्रित केलेली सर्व गाणी बाला सुब्रमण्यामच गात असत. सलमानचा आवाज म्हणूनही त्यांची ओळख बनली होती.
बालासुब्रमण्याम यांना सहावेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, साजन अशा सिनेमांचाही त्यांनी गायलेल्या गाण्याच्या सिनेमांमध्ये समावेश आहे. 'देखा है पहली बार', 'बहुत प्यार करते हैं तुमको सनम' अशी बरीच गाणी त्यांची गाजली. 'ये हसीन वादियां' आणि 'साथियां तुने क्या' ही गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली.
16. फराज खान
90 च्या दशकातील अभिनेते फराज खान हे 'मैंने प्यार किया' सिनेमातून पदार्पण करणार होते. मात्र, शूटिंगआधी ते आजारी पडले आणि त्यांच्या जागी सलमान खानला घेण्यात आलं. मग पुढे फरेब सिनेमातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.
'अमर.. अकबर.. अँथनी' सिनेमातील अभिनेते युसूफ खान हे फराज खान यांचे वडील होत. फराज खान यांनी राणी मुखर्जीच्या 'मेहंदी' सिनेमातही काम केलं आहे. सलग सात सिनेमे फ्लॉप झाल्यानं त्यांनी आपला मोर्चा मालिकांकडे वळवला. 'नीली आंखे' ही त्यांची शेवटची मालिका.
ऑक्टोबर 2020 ते आपल्या आजारावरील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. त्यांच्या उपचारावरील खर्चासाठी त्यांचे भाऊ फहमान खान यांनी आर्थिक मदतीचं आवाहनही केलं होतं.
सलमान खान आणि पूजा भट्टसह अनेक कलाकारांनी त्यांना मदत केली.
4 नोव्हेंबर 2020 रोजी वयाच्या 50 व्या वर्षी फराज खान यांचं निधन झालं. पूजा भट्ट यांनीच ही माहिती सोशल मीडियावरून दिली.
17. आसिफ बसरा
जवळपास दोन दशकं हिंदी सिनेमांमध्ये काम कलेल्या आसिफ बसरा हे 12 नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशातील राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं.
ब्लॅक फ्रायडे, परजानिया, आऊटसोर्स्ड, जब वी मेट, पाताल लोक, होस्टेज यांसारख्या वेब सीरीज, सिनेमे यांमध्ये त्यांनी काम केलंय.
18. सौमित्र चॅटर्जी
बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि सत्यजित रे यांचे आवडते कलाकार सौमित्र चॅटर्जी यांचं 15 नोव्हेंबर रोजी कोरोनामुळे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.
पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या सौमित्र चॅटर्जी यांनी सत्यजित रे यांच्या 14 सिनेमांमध्ये काम केलं होतं.
60 च्या दशकापासून सुरू झालेला त्यांचा फिल्मी प्रवास 2020 मध्ये थांबला.
हिंदी भाषेत त्यांनी दोन सिनेमे केले. त्यात निरुपमा आणि हिंदुस्तानी सिपाही यांचा समावेश आहे.
अपूर संसार, जॉय बाबा फेलूनाथ, घरे बाइरे, चारुलता, अभिज्ञान, सोनार केल्ला यांसारखे त्यांचे बंगाली सिनेमे लोकप्रिय ठरले,.
19. रवी पटवर्धन
तेजाब, यशवंत, उंबरठा, अंकुश, राजू बन गया जेंटलमन, तक्षक, हफ्ता बंद, बंधन, तेजस्विनी यांसारख्या सिनेमांमध्ये दिसलेले, मराठीतील प्रसिद्ध अभिनेते रवी पटवर्धन यांचं 5 डिसेंबर रोजी निधन झालं.
रवी पटवर्धन हे 84 वर्षांचे होते. अनेक मराठी सिनेमे, मलिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)