You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमरीश पुरी: 'हिरो'पेक्षाही जास्त लक्षात राहणारा 'व्हिलन'- ब्लॉग
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अमरीश पुरींची ओळख प्रामुख्याने व्हिलन म्हणूनच राहिली. बॉलीवुडमध्ये विविधांगी भूमिका साकारणारे दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांच्या काही गाजलेल्या भूमिकांवर टाकलेली एक नजर.
अमरीश पुरींची भीती वाटायची. ते स्क्रीनवर आले की पोटात खड्डा पडायचा. भेदक डोळे, खर्जातला आवाज, उत्तम संवादफेक आणि वातावरणात पसरलेला दरारा. अमरीश पुरींची ही टिपिकल ओळख आमच्या पिढीला होती. आम्ही त्यांना पाहिलं ते एक व्हिलन म्हणून आणि ते शेवटपर्यंत तसेच राहिले. ठकराल, डागा, ठाकूर, अशी आडनावं परिधान करून अमरीश पुरी स्क्रीनवर आले की पोटात खड्डा पडायचा. हिरोने त्यांना शेवटी बुकलून काढेपर्यंत ती भीती तशीच कायम राहायची. 70 आणि 80 च्या दशकातले सिनेमे हे व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या हिरोवर केंद्रित असायचे. तिथे व्यवस्थेला लागलेली कीड म्हणून हमखास अमरीश पुरी समोर असायचे. शहरातला एखादी धनाढ्य व्यक्ती, कपटी वकील किंवा उद्योगपती म्हणून ते सगळ्या व्यवस्थेला खिशात घालायचे आणि मग त्याविरुद्ध बंड करायला उभे असायचे ते अनिल कपूर, सनी देओल यांच्यासारखे चाळीत राहणारे हिरो. शेवटी अर्थातच त्यांचा विजय व्हायचा. पण कायम लक्षात रहायचा तो अमरीश पुरी.
80च्या दशकात 'विधाता', 'गांधी', 'अंधा कानून', 'अर्धसत्य', 'मेरी जंग', 'मि. इंडिया', 'राम लखन', 'बेनाम बादशाह', यासारखे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले. पाकिस्तानातील लाहोरमध्ये जन्मलेल्या अमरीश पुरींना रुढार्थाने हिरो व्हायचं होतं.
मात्र ते स्क्रीन टेस्टमध्ये नापास झाले आणि त्यांनी कर्मचारी विमा महामंडळात विभागात नोकरी धरली. नंतर त्यांनी सत्यदेव दुबेंच्या नाटकात काम करायला सुरुवात केली. साधारण 1970 पासून त्यांनी व्हिलनच्या भूमिका वठवायला सुरुवात केली आणि ते रुढार्थाने व्हिलन म्हणूनच त्यांनी ओळख निर्माण केली.
म्हणूनच की काय 80च्या दशकात ज्यांचा जन्म झाला आहे त्यांनी स्क्रीनवर व्हिलन म्हणून फक्त अमरीश पुरींनाच पाहिलं आहे. बरं त्या व्हिलनच्या भूमिकेत तरी किती वैविध्य असावं? 'मिस्टर इंडिया' चित्रपटातला मोगँबो रंगवावा तो अमरीश पुरी यांनीच. सिंहासनावर बसून विशिष्ट प्रकारे अंगठी वाजवून 'मोगँबो खूश हुआ' म्हणणं त्यांच्याशिवाय कुणाला जमेल असं मला तरी वाटत नाही. 'मेरी जंग' चित्रपटातल्या ठकराल या वकीलासमोर कुणाची हिंमत होणार नाही अशी प्रतिमा पूरी उभी करण्यात कसूर सोडली नाही. 'दामिनी' चित्रपटातला धूर्त आणि चलाख चड्डा वकील अमरीश पुरींनी अफलातून रंगवला आहे. केसाला एक विशिष्ट प्रकारचा झटका देण्याची लकब आणि मग सनी देओलने केलेली त्या वकिलाची चिरफाड हा सनी देओल आणि अमरीश पुरी यांच्या अभिनयाचा परिपाक आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
मात्र असं असलं तरी अमरीश पुरी यांना एक कनवाळू किनारही होती. शहरातील उच्चभ्रू वकील ज्या ताकदीने अमरीश पुरीने रंगवला त्याच ताकदीने त्यांनी 'गर्दीश'मधला हवालदार बापही रंगवला.
स्वत: एका प्रामाणिक हवालदार असून आपल्या मुलाला इन्सपेक्टर करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या बापाला शेवटी आपल्या मुलाचं नाव गुन्हेगाराच्या यादीत टाकण्याची वेळ येते. आपली भारतीय संस्कृती परदेशात नेण्याची आस लागलेला बाप अमरीश पुरींनी परदेसमध्ये रंगवला. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये आपल्या मित्राच्या मुलाशी लग्न लावून देण्याचं वचन निभावताना आपल्या मुलीच्या खऱ्या प्रेमाची जाणीव दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये होते. स्वाभिमान, आपल्या मुलीवरचं प्रेम, इगो असं सगळं डोळ्याने बोलून शेवटी जा सिमरन 'जिले अपनी जिंदगी' म्हणणारा बलदेव सिंह अजूनही लक्षात राहतो हे फक्त त्यांच्या अभिनयाचं यश आहे.
अमरीश पुरींनी केवळ व्यावसायिक चित्रपटात काम केलं असं नाही. रिचर्ड अॅटनबरोच्या गांधीमध्ये, गोविंद निहलानींच्या अर्धसत्यमध्ये तसेच श्याम बेनेगल यांच्या निशांत या चित्रपटातल्या भूमिकांना समीक्षकांची दादही मिळाली आहे. स्टीव्हन स्पिलबर्गच्या इंडियाना जोन्समध्ये केलेली तांत्रिकाची भूमिका तर जगभरात गाजली.
चाची 420 मध्ये कमल हसनने साकारलेल्या चाचीच्या प्रेमात असलेल्या दुर्गाप्रसाद भारद्वाज या उद्योगपतीला कोणी विसरेल? नायकमधला मुरलेला राजकारणी असो वा हातिमताई मधला जादूगार ज्या भूमिकांचंही सोनं केलं.
सत्तर ऐंशीच्या दशकातील सामाजिक परिस्थिती तितकीशी पुढारली नव्हती. त्यावेळेच्या गरजा, त्यावेळची दु:खं मर्यादित होती. आपलं हक्काचं घर, जमीन, मनापासून केलेलं प्रेम, एखादा भूतकाळातील लढा, सूड याभोवती या काळातील चित्रपट फिरायचे आणि तिथेच मोक्याच्या ठिकाणी अमरीश पुरीही असायचा.
खरंतर या प्रवाहात वाहत जात अमरीश पुरी फक्त खलनायकाच्या भूमिकेत अडकले की काय असाही एक प्रश्न निर्माण होतो. पण एखादा कडक व्यक्ती आयुष्याच्या उत्तरार्धात जरा मवाळ भूमिका घेतो त्याप्रमाणे अमरीश पुरींनी मवाळ भूमिका निभावल्या. पण अंगभूत अभिनयाच्या कौशल्यात तसुभरही तडजोड केली नाही.
40 व्या वर्षी पहिल्यांदा चित्रपटात भूमिका मिळालेले अमरीश पुरी 2005 ला एके दिवशी घरात पडले आणि त्यातून त्यांच्या डोक्यात गाठी झाल्या. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अमरीश पुरी यांची आजही आठवण होते आणि त्यांची तितकीच भीती वाटते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)