You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'सैराट' बनवणारे नागराज मंजुळे आता हॉटसीटवर: तुमच्याबरोबर खेळणार 'कोण होणार करोडपती?'
सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. 'कोण होणार करोडपती' या सोनी मराठी वाहिनीवरील प्रश्नमंजुषा कार्यक्रमात नागराज सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असणार आहे.
हिंदीतील कौन 'बनेगा करोडपती'चं वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांचं सूत्रसंचालन. अमिताभ यांचा भारदस्त आवाज, सहभागी स्पर्धकांशी त्यांचा होणारा संवाद, प्रत्येक प्रश्नाबरोबर वाढत जाणारी काठिण्य पातळी आणि उत्कंठा आणि विजेत्यांना मिळणारी लाखोंची बक्षीसं यामुळे या कार्यक्रमाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता.
याआधी स्वप्नील जोशी आणि सचिन खेडेकर या अभिनेत्यांनी 'कोण होणार करोडपती'चं सूत्रसंचालन केलं आहे.
सचिन खेडेकर यांचं भारदस्त व्यक्तिमत्व आणि दमदार आवाज ही खुबी होती. चॉकलेट हिरो स्वप्नील जोशीच्या रूपात युवा वर्गाला आकर्षित करण्याची योजना होती. या दोघांनंतर आता अभिनेता, दिग्दर्शक नागराज यांच्या हातात कार्यक्रमाची सूत्रं असणार आहेत.
सोनी मराठी चॅनेलवर 'कोण होणार करोडपती' प्रक्षेपित होईल. मात्र हा हंगाम नेमका कधी सुरू होणार याची घोषणा चॅनेलने केलेली नाही.
सोनी चॅनेलने तसंच नागराज यांनी ट्वीटरवर व्हीडिओ शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली.
इंग्लंडमधल्या 'हू व्हाँट्स टू बी मिलेनिअर' या प्रश्नमंजुषा कार्यक्रमावर आधारित 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम भारतात 2000 साली सुरू झाला. त्यावेळी सर्वाधिक बक्षीस रक्कम 1 कोटी रुपये होतं.
केबीसी 2 वेळी ही रक्कम वाढवून 2 कोटी करण्यात आली. या कालावधीत अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली. प्रकृतीची साथ नसल्याने त्यांना 24 भागांचं चित्रीकरण करता आलं नाही.
2007 हंगामासाठी अमिताभ यांच्याऐवजी शाहरुख खानने सूत्रसंचालन केलं.
2010 मध्ये चौथ्या हंगामात अमिताभ पुन्हा सूत्रसंचालकपदी परतले. बक्षीस रक्कम 5 कोटींपर्यंत वाढवण्यात आली.
आतापर्यंत केबीसीचे 9 हंगाम झाले आहेत. दहाव्या हंगामासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. फोन अ फ्रेंड ऐवजी आस्क द एक्सपर्ट लाइफलाइनचा पर्याय देण्यात आला. विजेत्याला आता 7 कोटी रुपये बक्षीस रक्कम देण्यात येते.
हर्षवर्धन नवाथे यांनी पहिल्यांदा 1 कोटी बक्षीस रक्कम जिंकण्याचा मान पटकावला होता. त्यानंतर विजय राहुल, अरुंधती, रवी सैनी, सुशील कुमार, सन्मीत कौर साहनी, अचिन आणि सार्थक नरुला यांनी आतापर्यंत सर्वोत्तम बक्षीस रक्कम पटकावण्याचा बहुमान पटकावला आहे.
नागराज यांनी सूत्रसंचालक असणार हे स्पष्ट केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
''केबीसीमध्ये अमिताभ बच्चन या आपल्या आवडत्या नायकाबरोबर कमीत कमी एक पडाव जिंकेपर्यत खेळायला मिळावं असं स्वप्न पाहणारे नागराज आज स्वत: त्याच मराठी अवताराची सूत्रं हाती घेत आहेत. खरंच ग्रेट आहात तुम्ही सर. अनेकांसाठी प्रेरणादायी'', अशा शब्दांत अमित दांडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"सैराटसारख्या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिने इंडस्ट्रीला कोटीच्या कोटी उड्डाणं घेऊन देणारे नागराज आता लोकांना मालामाल करणार. प्रतिभाशाली, साधा आणि उत्तम माणूस," अशा शब्दांत अविनाश गोवारीकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"कोळशाचा हिरा कसा होतो याचा प्रत्यय या व्यक्तीच्या आयुष्याकडे बघितल्यावर होतो. अभिनंदन अण्णा," असं राजेश एम. देवकर यांनी लिहिलं आहे.
पण आसिफ खान यांना नागराजचा निर्णय आवडलेला नाही. "तुम्ही आम्हाला कॅमेऱ्या मागे हवे आहात," असं ते म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)