You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मनोरंजन क्षेत्राच्या बदलत्या जगात टीव्ही टिकणार का?
- Author, झुबेर अहमद
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
छोट्या कपड्यांमधली एक तरुण मुलगी किचनमध्ये फोनवर कुणाशी तरी बोलत असते. ज्याक्षणी ती ऐकते, 'लाईट, कॅमेरा, अॅक्शन' त्या क्षणी ती लगेच कॅमेऱ्याला सामोरं जाऊन तिच्या ठरलेल्या भूमिकेचं काम चोख बजावते.
द व्हायरल फिवर (TVF), या डिजिटल कंटेट निर्मात्यांकडून येणाऱ्या पुढील वेब सिरीजमधला हा एक सीन होता. त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ही वेब सीरिज लवकरच पाहता येणार आहे. या यूट्यूब चॅनलवर 38 लाख फॉलोअर्स आहेत.
TVF आणि त्यांची टीम हे सातत्यानं 15 ते 35 वयोगटासाठी वेब सिरीज आणि इतर कार्यक्रम तयार करत असतात.
सध्याचा भारत तरुण आहे. डिजिटल विश्वाशी ही सारी तरुणाई जोडलेली आहे. लाखो जण या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आहेत. यातल्या बहुतांश डिजिटल प्लॅटफॉर्म्सचं वय हे फारतर 3 वर्षांचं असेल. या सगळ्यांसाठी TV हे माध्यम बाद झालं असून डिजीटल प्लॅटफॉर्म्सनी त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला आहे.
यासाठी, मुंबईतलं तरुण ग्राफिक डिझाईनर जोडपं विजय आणि वैशाली पिसाळ यांचं उदाहरण बोलकं आहे. TV घरात नसला तरी ते आनंदी आहेत. त्यांना बातम्या किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम पाहायचे असतील तेव्हा ते आपल्या आवडत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाऊन पाहतात. यासाठी मोबाईल हे उत्तम साधन त्यांच्याकडे आहे.
मोबाईलवर मनोरंजन
विजय म्हणतात, "आम्ही जास्त करुन यूट्यूबवर कार्यक्रम पाहतो. यूट्यूबवर खूप माहिती आहे. लहान मुलांच्या मनोरंजनाचेही असंख्य कार्यक्रम युट्यूबवर आहेत. आम्ही काही निवडक कार्यक्रम आमच्या मुलांना मोबाईलवर दाखवतो."
हे पिसाळ कुटुंब देशातल्या अशाच एका अनोख्या बदलत्या ट्रेंडचा भाग आहे. त्यामुळे केबल, सॅटेलाईट (DTH) TV, सिनेमा या पारंपरिक माध्यमांना यामुळे धोका उत्पन्न झाला आहे. भारतीय माध्यमांमध्ये होणाऱ्या डिजिटल क्रांतीचा हा बदलता ट्रेंड एक भाग आहे. केवळ गेल्या एक वर्षभरात हजारो लोकांनी TV सोडून डिजिटल प्लॅटफॉर्म्सकडे धाव घेतली आहे. नवी लहान मुलं भारतीय मीडिया उद्योगाच्या या प्रयोगांकडे वेगानं वळत आहेत.
डिजिटल जग सध्या आघाडीवर आहे आणि यातले उद्योग चालवणाऱ्यांनुसार, हे जग केवळ तरुणाईसाठी आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा आनंद लुटण्यासाठी त्यावर तरुणांसाठी बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांच्याकडे हिंदीमधल्या स्टॅण्डअप कॉमेडीचे अनेक कार्यक्रम आहेत, त्यांच्याकडे स्वस्तात तयार झालेल्या मात्र उत्तम चालणाऱ्या वेब सीरीज आहेत, त्यांच्याकडे क्रीडा प्रकारांचे, चित्रपटांचे आणि सिनेतारकांच्या मुलाखतीचे थेट प्रक्षेपणही होतं.
तरुणाईवर लक्ष
'ऑल इंडिया बकचोद' (AIB), 'द व्हायरल फिवर' TVF हे दोन डिजिटल प्लॅटफॉर्म्स सध्या तरुणाईला केंद्रीत करून कार्यक्रम निर्मिती करत आहेत.
TVFचे समीर सक्सेना सांगतात, "पाच वर्षांपूर्वी आम्ही काही मित्रांनी मिळून युट्यूबवर TVFची सुरुवात केली. तरुण मुलं तासनतास त्यांच्या मोबाईलमध्ये आपला वेळ घालवतात. मग, त्यांच्या छोट्या स्क्रीनवर त्यांना आवडेल अशा गोष्टी देण्यास काही हरकत नाही, असा आम्ही विचार केला."
समीर सक्सेना आपल्या ऑफिसमधले प्रमुख आहेत. पण, त्यांच्या वागण्या-बोलण्यावरून असं अजिबात वाटत नाही. ते अनौपचारिकरित्याच बोलतात. त्यांच्या TVFचा परमनंट रुममेट हा अनेक कार्यक्रम तरुणांमध्ये लोकप्रिय झाला.
याच तऱ्हेनं हॉटस्टारने AIB वर 'ऑन एयर AIB' हा विनोदी कार्यक्रम दाखवला. ज्याला लोकांनी खूप दाद दिली. समीर सांगतात, "आम्ही प्रेमकथा जेव्हा बनवतो, तेव्हा टीव्ही मालिकांप्रमाणे वाढवून सांगत नाही. तरुण आमच्या कथेसोबत स्वतःला जोडू शकतात."
हे जग खूप वेगळं आहे
समीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या दोन मजली कार्यालयात 200 लोक काम करतात. ज्यात 45 पटकथा लेखक आहेत. इथलं वातावरण खेळीमेळीचं आणि अनौपचारिक आहे. आपण, एका डिजिटल क्रांतीचा एक भाग आहोत, याचा त्यांना अंदाज आहे.
ऑफिसमध्ये तेव्हा आयडिया मीटिंग सुरू होती. दुसऱ्या खोलीत पुढच्या एका वेब सीरिजचं शूटिंग सुरू होतं. एका टेबलावर कोणी मीटिंगमध्ये पाय वर करून बसला आहे, तर कोणी शॉर्ट्स आणि टीशर्टमध्ये स्ट्रॅटेजी मीटिंग करत आहे.
इथे कोणी टाय आणि सूटातलं नाही. समीरसुद्धा अशाच कॅज्युअल पोशाखात ऑफिसमध्ये आले होते. हे ऑफीस कॉर्पोरेटच्या दुनियेपेक्षा एकदम निराळं आहे. पण, पैसे कमावण्यातही मागे नाही.
ही मीडिया कंपनी पैसे कसे कमावते हे जाणून घेण्यासाठी समीर यांना विचारलं असता, त्यावर समीर सांगतात, "आम्ही भारतातल्या सगळ्यांत मोठ्या संख्येनं प्रेक्षक असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मपैकी एक आहोत. आता कंपन्या टीव्ही सोडून मार्केटिंगसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्सकडे वळत आहेत. कारण, या माध्यमातून जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं, हे या कंपन्यांना कळून चुकलं आहे. या कंपन्या आमच्याकडे येऊन त्यांच्यासाठी काहीतरी करा असं सांगतात."
समीर यांची कंपनी केवळ कंटेट बनवते. पण, गेल्या काही वर्षांत बघता-बघता देशात डिजिटल व्हीडिओंच्या नव्या संकल्पना घेऊन अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म्स आले आहेत. ज्यात स्टार ग्रुपचा 'हॉटस्टार' आपल्या सगळ्या प्रतिस्पर्ध्यांपासून कैक पटीने पुढे आहे.
काही यशस्वी प्लॅटफॉर्म्समध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हीडिओ, सोनी लीव्ह आणि वूट यांचा समावेश आहे. काही सबस्क्रिप्शन म्हणजेच पैसे घेऊन, काही सबस्क्रिप्शन आणि जाहिरातींच्या साथीनं तर काही मोफत सुरू आहेत. मोफत देणाऱ्यांना भविष्यांत कमाईची अपेक्षा आहे.
देशातल्या प्रत्येक कोपऱ्यांत आपल्याला लोक मोबाईल आणि व्हीडिओ कंटेट पाहताना दिसतात. हे अधिककरुन रिलायन्सच्या जिओ टीव्ही अॅपच्या माध्यमातून मोफत आपला आवडता कार्यक्रम पाहतात. सामान्य लोकांसाठी हा सगळ्यांत लोकप्रिय डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
कसा बदलतोय बाजार?
अखेर ही क्रांती झाली कशी? या प्रश्नाचं उत्तर देताना तज्ज्ञ म्हणतात, की याची मुख्य कारणं अनेक आहेत. मोबाईल डेटा स्वस्त होणं, स्मार्टफोनच्या संख्येत वाढ (देशातल्या एक तृतीयांश जनतेकडे स्मार्टफोन आहे.)
ऑनलाईनमध्ये सरकारी सेन्सॉर बोर्ड नसणं, टीव्हीच्या मनोरंजन आणि बातम्यांच्या कार्यक्रमामधून लोकांना आलेला कंटाळा, जगभरातल्या उत्तम फिल्म आणि डॉक्युमेंट्रीजची उपलब्धता असणं. देशातल्या 60 टक्के युवांचा सर्वाधिक वेळ मोबाईलवर जाणं ही प्रमुख कारणं आहेत.
डिजिटल प्लॅटफॉर्म्स पुढे जाण्याचं अजून एक कारण आहे. अशोक मनसुखानी केबल टीव्ही क्षेत्रातले प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. सध्या ते हिंदुजा ग्रुपच्या 'इन केबल'चे प्रमुख आहेत. ते म्हणतात की, "टीव्हीवाल्यांनी युवा पिढीकडे दुर्लक्ष केलं. अनेकांना काहीतरी नवीन हवं आहे. आम्ही ग्राहकांना 800 चॅनल देतो आणि विविधताही देतो. पण, वाहिन्यांनी एका वर्गाकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे. हा वर्ग 25 ते 35 वर्षाच्या युवा पिढीचा आहे."
डिजिटल प्लॅटफॉर्म या वर्गाला त्यांच्या आवडीचे कार्यक्रम देत आहेत. या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या 'हॉटस्टार'ने IPL आणि फुटबॉलचं थेट प्रक्षेपण दाखवून युवा वर्गाला आपल्या ताब्यात घेतलं आहे. दर महिन्याला ते 15 कोटी प्रेक्षक आपल्या प्लॅटफॉर्मवर आकर्षित करतात. जर, क्रिकेटचा काळ असेल आणि IPL मॅचचं थेट प्रक्षेपण होणार असेल तर या संख्येत दुपटीनं वाढ होते.
कोट्यवधींची गुंतवणूक
'हॉटस्टार'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित मोहन सांगतात की, "आम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळे आहोत. फिल्म, क्रीडाप्रकार, टीव्ही वाहिन्या आणि बातम्या या सगळ्यांना आम्ही एकाच ठिकाणी आणलं आहे. यामुळे प्रेक्षकांना वाटतं की हे सगळं आपल्यासाठीच बनवलं गेलं आहे."
'हॉटस्टार'चं आधुनिक कार्यालय अमेरिकेतल्या कार्यालयांपेक्षा कमी नाही. व्हायरल फिवरच्या कार्यालयापेक्षा यांचं ऑफिस एकदम वेगळं आहे. हा कॉर्पोरेटचा एक वेगळाच चेहरा आहे. जिथे डिजिटल मीडिया मार्केटच्या विकासासाठी मोठ-मोठे निर्णय घेतले जातात. जिथे केवळ एका कार्यक्रमासाठी कोट्यवधींची गुंतवणूक केली जाते.
डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या जोरदार प्रगतीला पाहून बॉलीवूडचे चार मोठे दिग्दर्शक आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसारखे अभिनेते जोडले गेले आहेत. करण जोहर, जोया अख्तर, अनुराग कश्यप आणि दिवाकर बॅनर्जी यांनी काही वर्षांपूर्वी चार कहाण्यांची 'बॉम्बे टॉकीज' नावाची फिल्म बनवली होती.
मोठे स्टारही सहभागी
या दिग्दर्शकांनी एकत्र येत 'लस्ट स्टोरीज' नावाचा एक सिनेमा बनवला. पण हा सिनेमा बॉलिवुडसाठी नाही तर नेटफ्लिक्स या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी त्यांनी बनवला. करण जोहर यांनी डिजिटलच महत्त्व ओळखलं आहे. ते म्हणतात, "मी मोठ्या पडद्याचा भक्त आहे. पण आजचं सत्य हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही."
या क्षेत्रातील जाणकार सांगतात या प्लॅटफॉर्मचं महत्त्व लक्षात घेतल तर तो दिवस दूर नाही जेव्हा शाहरूख, आमिर, सलमान आणि हृतिक रोशनसारखे कलाकार याच्याशी जोडले जातील.
पण DTH आणि टीव्ही ब्रॉडकास्टरसाठी मात्र हा चिंतेचा विषय ठरू शकतो कारण जाहिरात देणाऱ्या कंपन्याचा कल डिजिटलकडे वेगाने झुकू लागला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींच्या आकड्यांकडे पाहिल तर हे स्पष्ट दिसून येतं.
गेल्या वर्षी जाहिरातींतून या प्लॅटफॉर्मना 115 अब्ज रुपये मिळाले होते तर सब्सस्किप्शनमधून 4 अब्ज रुपये मिळाले होते. 2020मध्ये हे दुप्पट होण्याचा अंदाज आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्म टीव्हीशी आज तरी स्पर्धा करू शकत नाही. पण त्याचे प्रेक्षक वेगाने वाढत आहेत. पण भविष्यात या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्यांची संख्या फार वाढणार आहे. याच कारण म्हणजे देशात स्मार्टफोनचा वापर आणि इंटरनेट विस्तार वेगाने वाढत आहे. शिवाय इंटरनेटचा दरही कमी होत आहे.
मीडिया इंडस्ट्रीच्या रिपोर्टनुसार 2018मध्ये भारतीय मीडिया उद्योग 24 अब्ज डॉलरचा पेक्षा मोठा असेल. यात 734 अब्ज रुपयांनी टीव्हीच आघाडीवर असेल. पण फक्त 5 वर्ष जुन्या असणाऱ्या 151 अब्ज रुपयांचा होईल. यात जर गेमिंग आणि अॅनिमेशन यांचा समावेश केला तर यात आणखी 120 अब्ज रुपयांची भर पडेल. 2020पर्यंत डिजिटलमधील वाढ 25 टक्के असेल तर टीव्हीचा वेग हा 10 टक्के असेल.
डिजिटल क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या मते ही तर सुरुवात आहे. समीर सक्सेना म्हणतात, "आता तर खेळ सुरू झाला आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. अजूनही बरचं काही होणार आहे."
टीव्हीचं काय होणार?
डिजिटल प्लॅटफॉर्मना रातोरात मिळालेल्या यशामुळं केबल आणि डीटीएच कंपन्या त्यांच्याशी कशी स्पर्धा करायची याचा विचार करत आहेत. एक तर त्यांच्याशी स्पर्धा करा किंवा त्यांच्याशी हातमिळवणी करा, असे दोन पर्याय त्यांच्याकडे आहेत.
सर्वांत मोठ्या डीटीएच कंपन्यांपैकी एक टाटा स्कायचे सीइओ हिरत नागपाल म्हणतात दोन्ही क्षेत्र एकत्र आले तर भारतासारख्या देशांत दोन्ही क्षेत्रांचा विकास होण शक्य आहे.
ते म्हणतात, "लवकरच तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर टीव्ही चॅनलसोबतच नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारसारखे प्लॅटफॉर्मही पाहू शकाल. तुम्ही हे टीव्हीच्या स्क्रीनवरही पाहू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला नवीन सेटटॉप बॉक्स देऊ. यावर तुम्ही टीव्हीही पाहू शकाल आणि डिजिटलही."
भारतातील 80 कोटी लोक टीव्ही पाहतात. म्हणजेच 50 कोटी लोकसंख्येकडे अजूनही टीव्ही नाही. याचाच अर्थ असा की टीव्हीच्या प्रसाराची अजूनही क्षमता आहे.
दर दुसरीकडे 50 कोटी लोकांकडे इंटरनेट आहे आणि 34 कोटी लोकांकडे स्मार्टफोन आहे. म्हणजेच डिजिटल प्लॅटफॉर्ममध्येही मोठ्या विकासाची संधी आहे.
तर दुसरीकडे टीव्ही बनवणाऱ्या कंपन्यांनी स्मार्ट टीव्ही बनवणे सुरू केले आहेत. त्यात तुम्ही सहज इंटरनेट जोडू शकता जेणे करून तुम्ही कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मचे कार्यक्रम तुम्ही पाहू शकता.
येत्या पाच वर्षांत कुणाचा विकास अधिक होणार? हॉटस्टारचे अजित मोहन म्हणतात, "येत्या 5 वर्षांत बरेच विजेते तयार होणार आहेत." याचाच अर्थ असा की टीव्ही आणि डिजिटल अशी दोन्ही माध्यमं पुढं जातील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)