You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#BollywoodSexism बॉलीवूडमधल्या स्त्रिया आजही शोभेची बाहुलीच का?
- Author, शुभ्रा गुप्ता
- Role, चित्रपट समीक्षक
कृपया सेक्ससीन नाही. आम्ही बॉलीवूड आहोत... पण हो! तुम्हाला चित्रविचित्र हावभावासह अंगविक्षेप असलेली गाणी, कंबर लचकवत केलेली नृत्य आणि नायिकेच्या देहाचं निरर्थक प्रदर्शन करणारी दृश्य मात्र आमच्याकडे आम्ही तुम्हाला दाखवू.
बॉलीवूडमध्ये महिलांचं चित्रण कसं होतं याविषयी चर्चा सुरू होते किंवा डोळ्यापुढे ही अशीच दृश्य डोळ्यासमोर तरळतात.
पण हे केवळ बॉलीवूडला लागू नाही. भारतातील बहुतेक सगळ्या चित्रपट उद्योगांमध्ये नायिकांचं अस्तित्व शोभेची बाहुली म्हणूनच प्रामुख्याने असतं. नायक अर्थात हिरो असेल तर झळकण्यात तो आघाडीवर असतोच. नायिकेचं प्रमुख काम म्हणजे हिरोला आवडतं तसं जगणं आणि त्याची स्तुती करणं हेच असतं. हिरोची चमकोगिरीची वेळ आली की बाजूला व्हायचं. हे असंच चालत आलं आहे असं मात्र नाही.
हॉलीवूड इंडस्ट्रीमधील जुन्या काळातल्या झुंजार संघर्षवादी नायिकांप्रमाणे बॉलीवूडमध्येही ठाम आणि स्वतंत्र भूमिका घेणाऱ्या नायिका होत्या. सिनेमा इंडस्ट्रीची ती सुरुवातीची वर्षं होती. सामाजिकदृष्ट्या प्रतिबंध असणाऱ्या जात आणि वर्ग अशा विषयांवर बेतलेले चित्रपट त्या काळाचं वैशिष्ट्य होतं.
1950च्या दशकात सामाजिकदृष्ट्या संवेदनशील काळात गोष्टी हळूहळू बदलल्या. 1960च्या दशकात प्रबोधन या ऐवजी मनोरंजन हा सिनेमा निर्मित्तीचं प्रमुख उद्दिष्ट झालं. पुरुष कलाकार चित्रपटाच्या केंद्रस्थानी असत. सगळी संरचना पुरुष केंद्रित झाली. यामुळे महिला कलाकार जवळपास दुय्यम ठरू लागल्या.
बॉलीवूड चित्रपटातल्या कुटुंबाचं प्रातिनिधिक दृश्य म्हणजे आई मुलाला गाजर हलवा भरवते आहे. बहीण भावाला राखी बांधते आहे. अडीअडचणीच्या काळात काळात भाऊ रक्षण करेल अशी खात्री बहिणीला असते. नवऱ्याला प्रदीर्घ आर्युमान लाभावं म्हणून बायका उपास करत असत.
नव्वदीच्या दशकाच्या मध्यात करण जोहर दिग्दर्शित कुछ कुछ होता है चित्रपट प्रदर्शित झाला. नव्या बॉलीवूड संरचनेच्या शिल्पकारांमध्ये करणचा समावेश होतो. चित्रपटाचा नायक शाहरुख खानला त्याचं प्रेम गवसतं.
प्रसिद्ध अभिनेत्री काजोल या चित्रपटाची नायिका होती. काजोल टॉमबॉय अर्थात पुरुषी अवतारात दाखवण्यात आली होती. ती बास्केटबॉल खेळत असे. केसांचा बॉबकट ठेवत असे. मात्र तिची ही प्रतिमा आकर्षक भासत नाही असं ठरवण्यात आलं. काजोल मादक शिफॉनची साडी लेवून पडद्यावर अवतरते. साडीतच बास्केटबॉल खेळते आणि जिंकते. काजोलचं हे रूपच आकर्षक आहे असं कोणी ठरवलं?
चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला. आधुनिक बॉलीवूडच्या रोमान्सचं प्रतीक म्हणून हा चित्रपट ओळखला जाऊ लागला.
टॉमबॉय प्रतिमेतल्या काजोलला मागे ढकलून साडीतल्या काजोलला पुढे रेटण्याची चूक केल्याचं दिग्दर्शक करण जोहर आता मान्य करतात. लाजाळूसारखी राहणाऱ्या आणि साडी नेसलेल्या स्त्रीला मनाजोगता जोडीदार मिळतो असा पायंडा या सिनेमाने पाडला होता.
द्वयर्थक सूचक संवाद अगदीच सहज उच्चारले जातात. आजूबाजूला आक्षेपार्ह असं काही बोललं जातंय हे अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. स्त्रियांची तुलना चकाचक गाड्यांशी केली जाते.
महिला कलाकारांनी पांढरे पारदर्शक कपडे परिधान करून धबधब्याखाली ओलंचिंब होणं आता ट्रेंडिंग नसतं. मात्र आजही त्यांचे तसे कपडे खपू शकतात. नायिकांच्या शरीराचा वेध घेणारा कॅमेरा, द्वयर्थक संवाद हे आजही बॉलीवूडमधल्या मुख्य प्रवाहातील सिनेमांची ओळख आहे.
भारतीय समाजात खोलवर रुजलेली पुरुषसत्ताक पद्धत, लिंगभेदातून आलेलं पुरुषी वर्चस्व चित्रपटातून दिसतं असा दावा केला जाऊ शकतो आणि तो खरा आहे.
हॉलीवूडमधलं बडं प्रस्थ असलेल्या हार्वी वाईनस्टीन यांचा खरा चेहरा उघड झाला. हॉलीवूडमध्ये चित्रपटांची निर्मिती कशी होते आणि कलाकारांना कसं काम मिळतं हे ठरवण्यावर याप्रकरणाचा परिणाम दूरगामी आहे. यासंदर्भात बॉलीवूडमध्ये अगदी सूक्ष्म स्तरावर का होईना पण जागरुकता निर्माण होते आहे.
कास्टिंग काऊचसारखे अन्यायकारी प्रकारांबद्दल महिला कलाकार उघडपणे बोलू लागल्या आहेत. बॉलीवूड यंत्रणा हाकणाऱ्या पुरुषांकडून होणाऱ्या अनेक विकृत गोष्टींबद्दल आवाज उठवण्यात येऊ लागला आहे.
समाजाने ठरवलेली चौकट भेदत कथा, पटकथा, संवाद यांची संरचना बदलत काम करणाऱ्या मंडळींना नेहमीच मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं जातं.
बदलत जाणाऱ्या भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्रपटांची संख्या कूर्मगतीने वाढते आहे. आणि हे चित्रपटच आता समांतर ही ओळख ओलांडून मुख्य प्रवाहातले म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
2017 वर्षात बॉलीवूडमध्ये सशक्त महिला कॅरेक्टर्स पाहायला आणि अनुभवायला मिळाल्या.
लिपस्टिक अंडर माय बुरखा, अनारकली ऑफ अराह, अ डेथ इन द गुंज, तुम्हारी सुलू या चित्रपटांमध्ये दमदार अदाकारी पाहायला मिळाली. चित्रपटांमधली महिलांची साचेबद्ध प्रतिमा मोडून काढण्याचं श्रेय या चित्रपटांना जातं.
त्यांनी त्यांच्या गरजा व्यक्त केल्या, भावनिक आणि लैंगिक. नुसते हुंदके देण्यापेक्षा किंवा पापण्यांची अकारण फडफड करण्यापेक्षा त्यांनी आपल्या भवतालची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले.
मात्र अजूनही हे चित्रपट शंभर कोटींचा गल्ला करणाऱ्या बिग बजेट लीगमध्ये यांचा समावेश नाही.
2017 वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी 'टायगर जिंदा है' हा एक चित्रपट. या चित्रपटात महिला कलाकारांना नेहमीच्या चौकटीत अडकवण्यात आलं नव्हतं.
कतरिना कैफ स्क्रीनवर असताना चित्रपटाचा नायक सलमान खान त्या संवादाचा भागही नव्हता. ही खूप चांगली गोष्ट आहे.
(शुभ्रा गुप्ता इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राच्या चित्रपट समीक्षक आहेत.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)