नालासोपाऱ्यातले 'गली बॉय' म्हणतात, 'अपना टाइम आएगा'

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

समाज से निराशा तो सहारा मिला हिप-हॉप से, लाईफलाईन जैसे लोकल ट्रेन, मिला भी सकती है मौत से,

मुश्किले हजार पर झुके ना हमारे हौंसले...

'बाँबे लोकल'चे रॅपर्स हे गाणं गातात, तेव्हा गाता गाताच अगदी सहज आपल्या आसपासच्या परिस्थितीवरही बोलून जातात. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही डगमगणार नाही, असं ठासून सांगतात.

आमिर शेख 'शेख्सपियर', अक्षय पुजारी 'ग्रॅव्हिटी', रोशन गमरे 'बीट रॉ', गौरव गंभीर 'डिसायफर' आणि त्यांच्या साथीदारांचा हा ग्रुप नालासोपाऱ्यात हिप-हॉपची पाळंमुळं भक्कम करतो आहे.

मुंबईच्या वेशीवरचं हे शहर आता डान्सपाठोपाठ 'हिप-हॉप हब' म्हणूनही उदयाला येतं आहे. आणि 'गली बॉय' या चित्रपटाच्या निमित्तानं नालासोपाऱ्यातल्या या कलाकारांनीही लक्ष वेधून घेतलं आहे.

हिप-हॉप म्हणजे नेमकं काय?

हिप-हॉप म्हटल्यावर अनेकांच्या डोळ्यांसमोर हिप-हॉप शैलीचा ब्रेकडान्स उभा राहतो. पण ब्रेकडान्स हा हिप-हॉपचा केवळ एक घटक आहे. "रॅप, बीट बॉक्सिंग, DJ, ग्राफिटी अशा अनेक घटकांशिवाय हिप-हॉप पूर्ण होऊ शकत नाही. तसंच हिप-हॉप हा केवळ एक संगीताचा प्रकार नाही, तर ती एक अख्खी संस्कृतीच आहे," असं 'शेख्सपियर' आवर्जून नमूद करतो.

विशिष्ट शैलीत वेगानं तालात गायलेलं रॅप साँग हा तर हिप-हॉपचा आत्मा आहे. बीटबॉक्सिंग म्हणजे तोंडानं आवाज काढून निर्माण केलेलं संगीत. वेगवेगळ्या गाण्यांचं किंवा संगीताचं मिक्सिंग करण्याचं काम DJ करतात. ग्राफिटी म्हणजे रंगीबेरंगी भित्तीचित्र. त्यालाच साजेशी फॅशन- पेहराव हाही हिप-हॉपचा भाग आहे.

1970च्या दशकात अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये संगीताची वेगळी शैली आणि कलाकारांची चळवळ म्हणून हिप-हॉपचा उदय झाला, असं मानलं जातं. पण हिप-हॉपची पाळंमुळं आफ्रिकन-अमेरिकन, कॅरेबियन संस्कृतींमध्ये खूप आधी पासूनच रोवली गेली होती.

साठच्या दशकात अमेरिकेत समान नागरी हक्कांसाठीच्या लढ्याला यश आल्यावरही कृष्णवर्णियांना मिळणाऱ्या वागणुकीत फारसा फरक पडला नव्हता. आपल्याला मनातला राग आणि भावनांना वाट करून देण्यासाठी मग अनेकांनी संगीताचं माध्यम निवडलं. बहुतेकांकडे वाद्यंही नसायची. त्यातूनच बीट बॉक्सिंगचा जन्म झाला.

न्यूयॉर्कच्या ब्राँक्स प्रामुख्यानं कृष्णवर्णीय आणि आर्थिकदृष्ट्या गरीब समाजाचा वस्तीमध्ये सुरू झालेलं हिप-हॉपचं लोण आधी अमेरिकेच्या अन्य शहरांत आणि मग परदेशांतही पोहोचलं. प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक संस्कृतीचाही तिथल्या हिप-हॉप संगीतावर प्रभाव पडत गेला.

नालासोपाऱ्यात कसं रुजलं हिप-हॉप?

मुंबईच्या उत्तरेला वसई आणि विरारदरम्यान नालासोपारा वसलं आहे. मग महानगराच्याच नाही तर संगीताच्याही मुख्य प्रवाहापासून दूर भासणाऱ्या नालासोपाऱ्यात हिप-हॉपची क्रेझ कुठून आली?

'ग्रॅव्हिटी'नं अगदी नेमक्या शब्दांत या प्रश्नाचं उत्तर दिलंय. "जिथे संघर्ष असतो, तिथे त्याची कहाणी सांगणारेही तयार होतात. नालासोपाऱ्यात हिप-हॉपची चळवळच उभी राहिली आहे, ती इतकी मोठी होईल असं कुणाला इथे वाटलं नव्हतं."

मूळचा बिहारचा पण नंतर नालासोपाऱ्यात स्थायिक झालेल्या 'शेख्सपियर'लाही तसंच वाटतं. "देशभरातून पोटापाण्यासाठी आलेले मुंबईकडे आलेले लोक नालासोपाऱ्यात स्थायिक झाले आहेत. इथले बहुतेकजण मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातले आहेत. त्यांना आर्थिक, सामाजिक पातळीवर मोठा संघर्ष करावा लागतो. सकाळी उठून ट्रेन पकडा, नोकरीसाठी जा, गर्दीतून थकून घरी या असं त्यांचं आयुष्य. ते अशा गोष्टींच्या शोधात असतात ज्यातून त्यांना आनंद मिळेल. म्हणूनच इथले लोक नृत्य, संगीत याकडे वळताना दिसतात. तरुणांना हिप-हॉप अतिशय आवडीचं आहे."

नालासोपारा-वसई-विरार या परिसरात पाश्चिमात्य डान्सफॉर्म्स आधीपासूनच लोकप्रिय आहेत. किंग्स युनायटेड, फिक्टिशियस, व्ही कंपनी असे डान्स ग्रुप्स असोत किंवा सुरेश मुकुंद, सॅड्रिक डिसूझा, रोहन रोकडे, असे डान्सर्स. गेल्या दोन दशकांत इथल्या अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या टिव्ही शोजमध्ये बाजी मारली आहे. त्यातूनच प्रेरणा घेऊन एबीसीडी-2 चित्रपटाची निर्मती झाली होती.

पण केवळ हिप-हॉपही आता इथं जोर धरू लागलं आहे. त्यातूनच साधारण दोन वर्षांपूर्वी 'बाँबे लोकल' या हिप-हॉप कलेक्टिव्हची म्हणजे टीमची निर्मिती झाली. आजही या कलेक्टिव्हचे सदस्य नालासोपाऱ्यातच सराव करतात आणि या शहरातल्या समस्यांवरही भाष्य करतात.

हिप-हॉपमधून सामाजिक संदेश

एरवी हिप-हॉप म्हणजे रॅपर्समधली लढाई, शिवीगाळ करणारी गाणी, बिनधास्त लाईफस्टाईल अशी काहीशी नकारात्मक प्रतिमा अनेकांच्या मनात असेल. पण ती चुकीची असल्याचं 'शेख्सपियर' स्पष्टपणे सांगतो.

"अमेरिकेत हिप-हॉप चळवळीनं कृष्णवर्णीयांना नवं बळ दिलं. तसं आपल्याकडेही होत आहे. भारतात दलित समाज आहे आणि इथेही रॅपर्स आपल्या गाण्यांतून वेगवेगळे मुद्दे मांडतात."

स्वतः 'शेख्सपियर'नंही विविध सामाजिक मुद्द्यांविषयी गाणी लिहिली आहेत. मूळचा बिहारचा पण नंतर नालासोपाऱ्यात स्थायिक झालेला आमिर त्यामागची आपली प्रेरणा सांगतो.

"मी आधी काहीसा एकलकोंडा होतो. लहानपणी शिक्षणासाठी गावी आजोळच्या घरी राहात होतो, तेव्हा तिथे मला घरगुती हिंसाचार होताना दिसला. त्यानं मला प्रभावित केलं. पण पुढे हिप-हॉपनं मला आत्मविश्वास दिला. मला माझ्या आसपासच्या वास्तवाची जाणीवही करून दिली."

मुंबईतल्या सामान्य माणसांच्या दैनंदिनन जीवनाबरोबरच दिल्लीच्या JNU मधला विद्यार्थ्यांचा संघर्ष, अल्पसंख्यांकांच्या समस्या, अशा मुद्द्यांवरची गाणी सादर करायलाही 'शेख्सपियर' घाबरत नाही.

"मी स्वतः मुस्लिम आहे आणि राजकीय परिस्थितीनं अल्पसंख्यांकांना कसं प्रभावित केलं आहे, या सगळ्याविषयी मी बोललो आहे. पण एक कलाकार म्हणून केवळ राजकीय आणि सामाजिक गोष्टींवरच नाही, तर इतर विषयांवरही काही सादर करायला मला आवडतं." असं तो सांगतो.

'गली बॉय'मुळे हिप-हॉपला फायदा होईल?

नालासोपाऱ्यातल्या एका बैठ्या चाळीत, चिंचोळ्या गल्लीत 'शेख्सपियर' आणि बाँबे लोकलचे बाकी कलाकार आपलं गाणं सादर करत होते, तेव्हा आसपासचे लोक उत्सुकतेनं तिथे जमले. कुणी त्यांच्या तालावर ठेकाही धरला. त्यात महिलांचाही समावेश होता.

"आम्ही रॅप सादर करत असतो, तेव्हा लहान मुलं आम्हाला पाहतात. नालासोपाऱ्यातले कॉलेजचे विद्यार्थी आमचा परफॉर्मन्स पाहिल्याचं सांगतात. तेही रॅपिंग करायला उत्सुक असतात." असं 'शेख्सपियर'नं सांगितलं.

'गली बॉय' या चित्रपटाविषयीही इथं अनेकांना उत्सुकता वाटते. 'शेख्सपियर' त्यातल्या रॅप बॅटल दृष्यांत सहभागी झाला आहे तर फिल्मच्या म्युझिक ट्रॅकमध्ये 'डिसायफर' आणि 'बीट रॉ' यांच्या बीट्सचा समावेश आहे. "या चित्रपटामुळं भारतीय हिप-हॉप जगाच्या नकाशावर पोहोचेल. इथे काही चांगलं घडत असल्याचं बाहेरच्यांना कळेल. मी त्याविषयी आशावादी आहे." असं शेख्सपियर सांगतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)