You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पु. ल. देशपांडेः जेव्हा बाळासाहेब ठाकरे पु.ल. देशपांडे यांच्यापुढे नतमस्तक झाले होते...
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पु.ल. देशपांडे आणि बाळासाहेब ठाकरे. एक लोकप्रिय साहित्यिक आणि दुसरा वादग्रस्त राजकारणी. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातली ही दोन दिग्गज व्यक्तिमत्त्व नुकतीच सिनेमाच्या पडद्यावरून लोकांना पुन्हा भेटीस आली. 'ठाकरे' आणि 'भाई - व्यक्ती की वल्ली?' हे दोन्ही चित्रपट लागोपाठ प्रदर्शित झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्येच उडालेल्या एक जाहीर खडाजंगीची आठवण येते.
'भाई - व्यक्ती की वल्ली?' या मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जीवनपटाचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला. त्यानिमित्तानं साहित्य आणि कलेच्या पलीकडचे पुल पुन्हा लोकांसमोर आले आहेत. या चित्रपटानं पुलंनी सत्तेविरोधात केलेल्या एका भाषणाची पुन्हा नव्याने आठवणही करून दिली आहे.
डिसेंबर 1996 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारनं 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराची सुरुवात केली आणि पहिले मानकरी पु. ल. देशपांडे ठरले. मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते पुलंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यावेळी पुलंचं भाषण यांची पत्नी सुनीताबाई देशपांडे यांनी वाचून दाखवलं होतं. पुलंनी त्या भाषणात सरकारवर 'लोकशाहीपेक्षा ठोकशाही' आणि 'मुद्द्यांऐवजी गुद्द्यांची दडपशाही' सुरू असल्याची टीका केली होती.
एरवी हसवणाऱ्या आणि कोपरखळ्या मारणाऱ्या पुलंची ही टीका बाळासाहेब ठाकरेंना चांगलीच जिव्हारी लागली होती.
पुलं नेमकं काय म्हणाले होते?
महाराष्ट्र टाइम्सनं त्यावेळी दिलेल्या वृत्तांतात पुलंच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते.
"वयाच्या अखेरच्या टप्प्यात मला सर्वांत अधिक अस्वस्थ करणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे योग्य मुद्द्यांनी सिद्ध करण्याची घटना गुद्द्यांनी दडपून टाकण्याच्या प्रवृत्तीचा वाढता जोर ही आहे. विचारस्वातंत्र्याचा मी आजवर पाठपुरावा करीत आलो आहे. अशा वेळी लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा 'लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो' वगैरे बोलायला लागतात, तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दांत सांगू? 'निराशेचा गाव आंदण आम्हासी' ही संत तुकोबाची ओळ पुन्हा पुन्हा आठवायला लागते," त्या भाषणात ते म्हणाले होते.
"अलीकडे राज्य, राजकारण, राज्य शासन, राजकीय पक्ष वगैरे शब्द भ्रष्टाचार, गुंडगिरी, खुनाखुनी, जाळपोळ यांना पर्यायी शब्द झाल्यासारखी अवस्था झाली आहे. उच्चार आणि आचार यांच्यात तफावत पडताना दिसली, की जीवनातल्या चांगलेपणावरचा विश्वासच उडत जातो. कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचा तर आनंदाचा अनुभव देणारी निर्मिती करण्यातला उत्साहच नाहीसा होतो. आपल्या मताला अनुसरून लिहिण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य हे मला फार महत्त्वाचे वाटते. लोकांच्या हितासाठी मांडलेला विचार सत्ताधीशांना मानवला नाही, तरी सत्य लोकांपुढे आणलेच पाहिजे, असा आग्रह धरणारे विचारवंत निर्भय राहिले पाहिजेत. आपल्याला न पटलेला विचार सत्ताबळाने दडपून टाकणारे राज्यकर्ते साऱ्या सामाजिक प्रगतीला अगतिक करतात."
बाळासाहेब ठाकरेंची प्रतिक्रिया काय होती?
लेखक, कवी, संगीतकार, नाटककार, अभिनेता, निर्माता आणि पुलंच्याच शब्दांत सांगायचं तर 'बहुरूपी' आणि 'विदूषक' असा हा हरहुन्नरी अवलिया त्याच्या लिखाणातून आपल्या खास शैलीत कधीकधी समाजावर भाष्य करायचा. पण ते अशी टीका करतील असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अजिबात वाटलं नव्हतं.
खरं तर पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंचे संबंध तसे सलोख्याचे होते. ठाकरेंचं शिक्षण जिथे झालं त्या ओरियंट हायस्कूलमध्ये पु.ल. शिक्षक होते.
पण त्याच पुलंनी जाहीर कार्यक्रमात परखडपणे अशा चार गोष्टी सुनावणं, ही गोष्ट बाळासाहेबांना रुचली नाही. मग दोन दिवसांनंतर एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मंचावरून बाळासाहेबांनी पुलंवर आगपाखड केली.
"झक मारली अन् पुलंना पुरस्कार दिला. आम्ही ठोकशाहीवाले तर आमचा पुरस्कार कशाला स्वीकारता?" असं ठाकरे म्हणाले आणि त्यांनी पुलंची 'मोडका पूल' अशी संभावनाही केली होती.
विचारस्वातंत्र्य आणि पुलं
एकीकडे पुलंनी हा पुरस्कार स्वीकारायला नको होता, अशी प्रतिक्रिया उमटत असतानाच, अनेकांनी पुलंच्या भूमिकेचं समर्थनही केलं होतं.
कुठलाही सरकारी पुरस्कार सरकारचे प्रतिनिधी जाहीर करत असले तरी तो कुणाच्या वैयक्तिक स्वखिशातून दिला जात नाही तर जनतेच्या तिजोरीतून दिला जातो, असं पुलंच्या चाहत्यांचं आणि समर्थकांचं म्हणणं होतं.
पुलंच्या त्या भाषणावर बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं प्रत्युत्तरही साहित्यिकांना आवडलं नव्हतं. लेखक जयंत पवार सांगतात, "बाळासाहेबांनी असं बोलणं साफ चुकीचं होतं. तुम्ही तुमच्या मर्जीतल्या लोकांना पुरस्कार दिलात, तर ते गप्प बसतील. पण लोकांनी गप्प बसू नये, सत्ता आणि व्यवस्थेवर सतत टीका नाही केली तरीसुद्धा जे योग्य असेल किंवा अयोग्य असेल ते सांगावं. अर्थात त्या टीकेवर त्यावर पुलं आणखी काही बोलले नाहीत. पण जेव्हा त्यांना संधी मिळाली, तेव्हा ते गप्प राहिले नाहीत."
"ज्यांच्याकडे बोलण्याची क्षमता आहे, त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवणं, पुरस्कार सन्मान देणं, हे सत्ताधारी करत असतात आणि तुम्हाला त्यांच्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण या प्रयत्नांना दाद न देता पुरस्कार घेऊनसुद्धा तुम्ही हे बोलू शकता, हे कळायला पाहिजे," असं जयंत पवार नमूद करतात.
पुलंवरच्या त्या टिप्पणीवर जनमानसातून बाळासाहेबांवर बरीच टीका झाली. तेव्हा त्यांना कळलं की पुलंवर आपण तसा हल्ला करायला नको होता.
मग एके दिवशी त्यांनी गाडीतून थेट पुणे गाठलं. भांडारकर रोडवर 'मालती माधव' या त्यांच्या निवासस्थानी बाळासाहेबांनी पुलंची भेट घेतली आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांची माफी मागितली, अशी आठवण पुणे मिररचे मनोज बिडकर सांगतात. तेव्हा 'सामना'बरोबर असलेले बिडकर यांनी ही घटना टिपली होती.
सत्तेविरोधात बोलणारे पुलं काही पहिलेच नव्हते आणि त्यांनी केवळ युती सरकारवरच टीका केली असंही नाही.
1975-77 दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली तेव्हा दुर्गाबाई भागवतांसारख्या दिग्गज लेखिकेनं त्या दडपशाहीविरोधात आवाज उठवला होता. मग बाकीच्या साहित्यिकांनीही तशीच भूमिका घेतली, तेव्हा पुलंही त्या विरोधात सहभागी झाले.
विजय तेंडुलकरही नेहमीच बोलायचे. नामदेव ढसाळांची तर एक पूर्ण कविताच विद्रोहानं भरली आहे. पण अशी उदाहरणं मोजकीच असल्यानं आपल्याला हे साहित्यिक काही वेगळं करत असल्यासारखं वाटतं.
"सत्तेसमोर दबून राहण्याची आपल्याकडे प्रवृत्ती आहे. गप्प बसणं हा नियम झाला आहे. साहित्यिक कधीच बोलत नाहीत असंही नाही. नयनतारा सहगल यांचा जो अपमान झाला त्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ मुंबईत जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी अनेक साहित्यिक कलाकार आले होते आणि ते जाहीरपणे बोलले," अशी आठवण जयंत पवार करून देतात.
सरकारविषयी बोलण्याचा अधिकार हा कुठल्याही माणसाला आहे. पण साहित्यिकांनी बोलणं महत्त्वाचं का ठरतं?
जयंत पवार सांगतात, "साहित्यिक, कलाकार, प्राध्यापक वकील किंवा मोठमोठी यशस्वी माणसं यांना एक विशिष्ठ आवाज असतो. साहित्यिकांना समाजानं एक स्थान दिलं आहे. त्यांच्यावर हा विश्वास टाकला आहे की, तुमचे शब्द आम्ही प्रमाण मानो. अशी विश्वासार्हता सर्वांना मिळत नाही, ती कमवावी लागते. ती पुलंनी कमावली होती."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)