'भाई - व्यक्ती की वल्ली' सिनेमाला का मिळत नाही आहेत थिएटर्स?

    • Author, श्रीकांत बंगाळे आणि सुप्रिया सोगळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्राला भरभरून आनंद दिलाय. त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील चित्रपट महाराष्ट्रानं साजरा करायला पाहिजे, असं अभिनेते सुबोध भावे यांनी म्हटलं आहे.

पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित 'भाई - व्यक्ती की वल्ली' हा चित्रपट आज प्रदर्शित होणार आहे.

पण, या चित्रपटाला काही सिंगल स्क्रीन थिएटर मालकांनी शो देण्यास नकार दिला आहे, असं या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितलं आहे.

"काही सिंगल स्क्रिन थिएटर्स आहेत जिथं मराठी लोक मोठ्या प्रमाणात जातात, तिथं 'सिम्बा' चांगला चालतो आहे. त्यामुळं ते एकही शो देणार नाही असं म्हणतायत. हे योग्य नाही ना. महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला थिएटरसाठी भीक मागावी लागते आहे, तर काय करणार?

मराठीच नाही, कोणताही दुसरा चित्रपट हिंदी चित्रपट असो, त्याला एकतरी शो मिळायला हवा. तुमचा चित्रपट चालतो आहे, तर त्याचा अर्थ असा नाही ना की बाकीचे दाबून टाका? दुसऱ्या चित्रपटासाठी त्याग नाही करू शकत का?" असं मांजरेकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

"आम्ही फक्त दोन शोज मागत आहोत. दोन तुमचे ठेवा. ही काय पद्धत झाली का की आमचा चित्रपट चालतोय तर आम्हाला जास्त पैसा कमवायचाय. दुसऱ्या चित्रपटाला काही नाही मिळालं तरी चालेल! अरे, इंडस्ट्री चालणार कशी मग? मी सरकारकडे तक्रार केली आहे, आणखी काय करणार?" मांजरेकर सवाल उपस्थित करतात.

हा वाद घालायचा विषयच नाही - सुबोध भावे

भाई या चित्रपटाला काही सिंगल स्क्रिन थिएटर्समध्ये शो मिळत नाहीये, यावर अभिनेते सुबोध भावे सांगतात की, "महाराष्ट्र राज्याला निर्मिती होऊन 50 वर्षं झाली, तरीसुद्धा मराठी चित्रपटांसाठी भीक मागावी लागत आहे. आता मराठी लोकांनीच काय ते ठरवायला हवं."

दर आठवड्याला 3 ते 4 मराठी चित्रपट प्रदर्शित होतात आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे, असं चित्रपट वितरकांचं म्हणणं आहे, यावर सुबोध सांगतात की, "दर आठवड्याला चार-चार हिंदी चित्रपट येत नाहीत का? 'भाई' हा या वर्षातला पहिला मराठी सिनेमा आहे. तसंच महिन्याला अथवा आठवड्याला आम्ही किती चित्रपट आणायचे हे ठरणारे ते कोण आहेत?"

"गेल्या 2 ते 3 महिन्यांतील चित्रपटांचं आपण विश्लेषण करायला हवं. यात कोणता हिंदी चित्रपट चाललाय आणि कोणत्या चित्रपटाला सर्वांत जास्त गर्दी होती, हे पाहायला हवं. गेल्या 2 महिन्यांत सर्व मराठी चित्रपटांना गर्दी आहे. मुळात महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला थिएटर मिळायला पाहिजे की नाही हा वाद घालायचा विषयच नाहीये. थिएटर मिळायलाच पाहिजे," ते पुढे सांगतात.

"पु. ल. देशपांडे यांती 100वी जयंती आहे. त्यांच्यावरील चित्रपट आहे. त्यांनी आपल्या सगळ्यांना इतका भरभरून आनंद दिलाय, त्यामुळे त्यांचा चित्रपट आपण साजरा करायलाच पाहिजे यात दुमतच नाही," ते पुढे सांगतात.

'भाईला शो मिळेलच'

"भाई या चित्रपटाला सिंगल स्क्रीन मिळत नाहीये, पण मनसे चित्रपट सेना उद्या दुपारपर्यंत त्यांना जे-जे शो हवे आहेत ते मिळवून देईल," असं या प्रकरणी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितलं.

पण शो द्यायला काही सिंगल स्क्रीन मालकांचा विरोध आहे, यावर खोपकर सांगतात की, "असू द्या विरोध. उद्या कळेल त्यांना काय ते. यासाठी आम्ही चित्रपट वितरकांना जो काही मेसेज पाठवायचा आहे तो पाठवला आहे. मराठी चित्रपटांना कुणी विरोध केला तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि कुठल्याही परिस्थितीत उद्या भाईला प्राईम टाईम मिळेल."

प्राईम टाईम शो मिळवण्यासाठी मराठी चित्रपटांना झगडावं का लागतं, यावर ते सांगतात, "खरंतर आम्हालाच यासाठी का आंदोलन करावं लागतात, यावर सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे. सरकारनं जर का कायदा बनवला असेल आणि थिएटर्स कायद्याचं पालन करत नसतील तर त्यांच्यावर काय कारवाई करतात?"

'चार-चार मराठी चित्रपट रीलिज होणं हाच प्रॉब्लेम'

'भाई'ला उद्या शो मिळण्यात अडचण येईल, असं मला वाटत नाही. कारण 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला सिम्बा या चित्रपटाचे शो हाऊसफुल होते. यात बुधपारपासून ड्रॉप झालाय. पण तीन-तीन मराठी चित्रपट आहेत. पाटील, सोहळा आणि थापाड्या.

ही सगळी माणसं भाडं देत आहेत. त्यामुळे थिएटरवाल्यांना शो लावावे लागत आहेत. शिवाय सिम्बा चालतोय आणि चालणारे शो काढणं सोपं नसतं. पण आता सिम्बाचे शो पडल्यामुळे तो चित्रपट काढणं थिएटर वाल्यांना सोपं झालं आहे," मराठी चित्रपट वितरक समीर दीक्षित सांगतात.

"मला असं वाटतं की, प्रॉब्लेम आपल्यामध्येच आहे. चार-चार मराठी चित्रपट रीलिज होत असल्यामुळे, थिएटरवाले म्हणतात की मी 'थापाड्या' काढून 'भाई' लावतो किंवा 'सोहळा' काढून 'थापाड्या' लावतो. सिम्बाचा तर एवढा फरक नाही पण आपल्यामध्ये चार-चार चित्रपट येत असल्यामुळे मराठीला थिएटर मिळणं कठीण होतं.

सिम्बा रिलायंसचा चित्रपट आहे आणि वायकॉमही रिलायंसचीच कंपनी आहे. पण चालणारा सिनेमा मोठा असला तर छोट्या सिनेमाला दाबलं जातं. हे मार्केट फोर्स असतात. शेवटी जे चालणारं असतं ते विकलं जातं," चित्रपटाला शो न मिळण्याचं कारण ते सांगतात.

भाई चित्रपटाच्या निर्मितीत 'वायकॉम 18' या निर्मिती संस्थेचा सहभाग आहे.

पण मराठी चित्रपटांना एकंही शो मिळणं मुश्कील आहे का, यावर ते सांगतात, "आतापर्यंत मला जो फीडबॅक आला आहे, त्यानुसार भाईला उद्या बऱ्यापैकी शो मिळालेले असतील. मराठवाड्यात 50 थिएटर्स आहेत, त्यापैकी 45 थिएटरमध्ये भाईला एक-एक शो मिळाला आहे."

हे प्राईम टाईमचे शो आहेत का, यावर ते सांगतात, "हे शो मिक्स आहेत. काही ठिकाणी प्राईम टाईम आहेत. प्राईम टाईम म्हटलं की मल्टीप्लेक्समध्ये संध्याकाळी प्राईम टाईम आहे, तर सिंगल स्क्रीनमध्ये दुपारी 12 ते 3 प्राईम टाईम आहे. त्यामुळे प्राईम टाईम बदलता येतो. भाईला शुक्रवारी चांगली ओपनिंग मिळाली, तर शनिवारी आणि रविवारी चित्रपट हाउसफुल चालेल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)