You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ठाकरे सिनेमावरून शिवसेना-मनसेत सोशल मीडियावर कलगीतुरा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ठाकरे या सिनेमावरून नवा वाद सुरू झाला आहे.
सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांचा वरळीच्या एट्रिया मॉलमध्ये आयोजित खास शोच्या वेळेस अपमान झाला असं सांगण्यात येत आहे. त्यावरूनच आता शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये वाद सुरू झाला आहे.
या शो दरम्यान पानसे आणि राऊत यांच्यात मीडियाच्या प्रतिनिधींसमोर वाद झाल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.
लोकसत्ताने दिलेल्या बातमीमध्ये सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटचा उल्लेख करण्यात आला आहे. "ठाकरे The Biopic…लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणी कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे," असं ट्वीट राऊत यांनी केलं होतं.
सध्या मात्र राऊत यांच्या ट्वीटरवर अशा प्रकारचं कुठलंही ट्विट दिसत नाही.
पण या सिनेमाच्या निमित्ताने केवळ संजय राऊत यांचीच चर्चा होत असून दिग्दर्शक पानसे यांना डावलण्यात आल्याचा आरोप मनसेतर्फे करण्यात आला आहे.
मनसेनं त्यांच्या पाठिंब्यासाठी पोस्टरबाजी सुद्धा केली आहे.
राज ठाकरे यांचे समर्थक किर्तीकुमार शिंदे यांनी "अभिजित मित्रा तू चुकलास" अशा नावाने एक पत्रच फेसबूकवर प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तसंच इतरत्र अभिजित कोठेही दिसत नाहीत असे शिंदे म्हणतात.
'एट्रिया मॉलमध्ये पानसे यांना बसण्यास जागा देण्यात आली नाही, ते उशिरा आले असं कारण दिल्याचं आपल्याला समजलं' असे शिंदे यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तसंच शिंदे यांनी मनसैनिक तुझ्या बाजूने आहेत असं या पत्रात म्हटलं आहे.
ते लिहितात, "हे सगळं तुझ्यावरच्या प्रेमापोटीच. म्हणून तर #isupportabhijeetpanase या हॅशटॅगसह हजारो महाराष्ट्र सैनिक काल रात्रीपासून स्वत:च्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आता तूसुद्धा तुझ्या भावना व्यक्त कर. आम्ही सर्वजण तुझ्यासोबत खंबीरपणे उभे आहोत."
मनसेने #isupportabhijeetpanase ही मोहीम ट्वीटरवर सुरू केल्यावर त्यावर मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
संदीप देशपांडे यांनी "मा. बाळासाहेब हे सामान्य शिवसैनिकाला सुद्धा प्रेमाने वागवायचे त्याचा अपमान नाही करायचे हाच ठाकरे चित्रपटाचा संदेश आहे जो या चित्रपटाची निर्मिती करण्याऱ्यांना सुद्धा कळला नाही," अशा शब्दांमध्ये राऊत यांचे नाव न घेता ट्वीट केलं आहे.
तर अमेय खोपकर यांनी "एक 'संजय' होता, ज्याने धृतराष्ट्राला दूर 'दर्शन' घडवलं! आणि आता एक 'संजय'... महाराष्ट्रात दिग् 'दर्शन' नाकारतोय! पण लक्षात घ्या... जो बात 'पानसे' गयी... वो हौदसे नहीं आती! " असे ट्वीट केलं आहे.
दुसऱ्या एका ट्वीटमध्ये खोपकर यांनी, "अभिजित हे असं वागणं हीच त्यांची संस्कृती आहे पण महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षक हे तुझ्या पाठीशी आहेत अशा शब्दांमध्ये पानसे यांना पाठिंबा व्यक्त केला आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)