You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'ठाकरे मला माझ्या कामामुळे मिळाला, जातीधर्मामुळे नाही': नवाझुद्दीन सिद्दीकी
- Author, मधू पाल
- Role, बीबीसी मराठीसाठी
"बाळासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी माझी निवड का केली गेली, असा प्रश्न विचारला जातो. टीका करणाऱ्यांनी बाळासाहेबांची भूमिका करण्यासाठी कुणाची निवड केली, हे पाहायला हवं. निर्माते संजय राऊत यांनी एका कलाकाराची निवड केली आहे. हा कलाकार कोणत्या जातीधर्माचा आहे, हे लक्षात घेऊन निवड केली नाही. या कलाकाराची क्षमता आहे, तो भूमिकेला न्याय देऊ शकतो म्हणून निवड केली," असं बाळासाहेब ठाकरेंची भूमिका करणाऱ्या नवाझुद्दीन सिद्दीकी यांनी सांगितलं.
माणसाची ओळख कर्तृत्वावर ठरते, हे सांगताना नवाझु्दीन सांगतात, "मी जिथे जन्माला आलो, जिथे वाढलो, जो धर्म मला मिळाला त्यात माझं काहीच योगदान नाही. माणूस वयाने प्रगल्भ झाल्यावरच त्याची ओळख बनते. त्याचं शिक्षण होतं, विचार विकसित होतात कामाचा अनुभव पदरी असतो. तो कुठे जन्माला आला आहे, त्याची जातधर्म काय यावर ओळख अवलंबून नसते. कामाची राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाते त्यावेळी ओळख निर्माण होते."
बाळासाहेब ठाकरेंसारख्या लोकानुनय व्यक्तिमत्त्वाची भूमिका पेलण्याचं आव्हान कसं साकारलं, यावर ते म्हणतात, "प्रत्येक चित्रपटामुळे काहीतरी नवं व्यक्तिमत्त्व साकारण्याची संधी मिळते. बायोपिक करताना जबाबदारी वाढते. ठाकरेंसारखं व्यक्तिमत्त्व पेलताना जबाबदारी वाढते, कारण अगदी आतापर्यंत लोकांनी त्यांना पाहिलं आहे. त्यांची अनेक भाषणं, मुलाखती युट्यूबवर उपलब्ध आहेत. लोक सहजपणे माझ्या कामगिरीचं मूल्यांकन करू शकतात. शेकडो प्रकारच्या अपेक्षा असतात.
"दुसऱ्या पद्धतीने केलं तर बाळासाहेबांची कॉपी करतो, असाही आरोप होतो. मी यापासून स्वत:ला दूर ठेवलं आहे. बाळासाहेबांना भाषणात, मुलाखतीत तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. इंटरनेटवर ज्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात मजकूर उपलब्ध आहे, त्यांची भूमिका निभावताना जबाबदारी वाढते."
"माझा चित्रपट परदेशात दाखवण्यात आला आणि तिथल्या लोकांनी प्रशंसा केली तर हा भारताचा सिनेमा म्हणून सांगितलं जातं. ते माझं छोटंसं योगदान असतं. त्यावेळी अभिमान वाटतो. देशवासियांना गर्व वाटेल अशा गोष्टीचा अभिमान वाटायला हवा. आपण एक देश आहोत. आपल्या विचारात एकजूट असायला हवी. माणसाची ओळख प्रांतात-धर्मनिहाय असू नये. छोट्या संकुचित गोष्टीत अडकलो तर आपण मोठे होऊ शकणार नाही," असं नवाज सांगतो.
चित्रपट म्हणून काम केलं आहे. प्रपोगंडा म्हणून, निवडणुका म्हणून चित्रपट केला आहे, असं बोलण्यापेक्षा 23 तारखेला बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने चित्रपट येतो आहे. क्रीडाविषयक चित्रपट त्या औचित्यानुसार प्रदर्शित होतात. सलमानभाईंचा चित्रपट ईदेच्या वेळी येतो. या कलाकृतीकडे चित्रपट म्हणून पाहायला हवं. ट्रेलर बघून लोक उलटसुलट बोलू लागतात. शंभर-दोनशे माणसं एखाद्या चित्रपटासाठी काम करतात. त्यांची मेहनत असते. लोकांबद्दल मतं व्यक्त करणं योग्य नाही. प्रत्येक माणूस स्वत:साठी जज असतो'', असं नवाझुद्दीन यांनी सांगितलं.
तुमच्या कारकिर्दीवर बायोपिक व्हावा का, यावर माझ्यावर बायोपिक यावा एवढी माझी पात्रता नाही असं नवाझुद्दीन सिद्दीकी यांनी सांगितलं.
तुमच्यासाठी भारतीयत्वाची व्याख्या काय, यावर नवाझुद्दीन म्हणाले, "भारतीय असणं ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. विविधतेने नटलेला आपला देश आहे. विविधांगी माणसं एकोप्याने नांदतात. सगळ्या जातीधर्मपंथाच्या व्यक्तींनी देशाला बळकट करण्याची गोष्ट अभिमानास्पद वाटते."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)