You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इरफान पठाणचं सणसणीत उत्तर, 'मी पत्नीचा मालक नाही तर जोडीदार'
इंडियन क्रिकेट टीमचे माजी ऑल राउंडर आणि टी-20 वर्ल्ड कप विजेत्या टीमचे खेळाडू इरफान पठाण आणि त्यांच्या पत्नी सफा बेग एका फोटोवरून चर्चेत आलेत.
सफा बेग यांनी ट्वीटरवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे इरफान पठाण यांच्यावर अनेकांनी टीका केली. या फोटोत सफा बेग यांचा चेहरा ब्लर करण्यात आला आहे.
मात्र, चेहरा ब्लर करण्याचा निर्णय पूर्णपणे सफा यांचा असल्याचं सांगत इरफान यांनी ट्रोलर्सना उत्तर दिलं. इतकंच नाही तर मी तिचा जोडीदार आहे तिचा मालक नाही, असं म्हणत सफा स्वतःचे निर्णय स्वतःच घेत असल्याचंही स्पष्ट केलं.
सफा यांनी त्यांचा मुलगा इमरान खान पठाण याच्या ट्वीटर अकाउंटवरून एक फोटो शेअर होता. या फोटोमध्ये सफा, पती इरफान आणि मुलगा इमरान तिघेही दिसत आहेत. पण, यात सफा यांचा चेहरा ब्लर केलेला होता.
फोटोवरून अनेकांनी इरफान पठाण यांच्यावरच प्रश्नांची सरबत्ती केली. पत्नीचा चेहरा का दाखवला नाही, असा प्रश्न काहींनी विचारला. तर यांची समानता इथे येऊन संपते, असंही काहींनी म्हटलं. इरफान पठाण हेच पत्नीला चेहरा झाकण्यास सांगत असल्याचे आरोप करण्यात आले.
अखेर इरफान पठाण यांनीच तो फोटो स्वतःच्या ट्वीटर अकाउंटवरून पोस्ट करत टीकेला उत्तर दिलं.
आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "तो फोटो माझ्या राणीने (पत्नीने) आमच्या मुलाच्या अकाउंटवरून ट्वीट केलेला आहे. त्यावरून आम्हाला बऱ्याच द्वेषपूर्ण प्रतिक्रिया मिळाल्या. मी तो फोटो इथेही शेअर करतोय. तिने स्वतःच्या मर्जीने फोटो ब्लर केला आहे आणि हो मी तिचा जोडीदार आहे तिचा मालक नव्हे." या ट्वीटमध्ये त्यांनी #herlifeherchoice असा हॅशटॅगही दिला आहे.
कोण आहेत सफा बेग?
28 फेब्रुवारी 1994 रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये सफा बेग यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मूळ हैदराबादचे. मात्र, व्यवसायानिमित्त ते जेद्दाहला गेले. सफा यांचे वडील मिर्जा फारूख बेग सौदी अरेबियातले नावाजलेले उद्योजक आहेत.
सफा यांनी जेद्दाहमधल्या इंटरनॅशनल इंडियन स्कूलमधून शिक्षण घेतलंय. लग्नाआधी सफा यांनी मॉडलिंग क्षेत्रात करियर केलं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार इरफान पठाण आणि सफा बेग यांची पहिली भेट दुबईत झाली. इरफान पठाण आणि सफा यांचं लग्न अरेंज्ड आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये दोघांनी सौदी अरेबियातील पवित्र शहर असलेल्या मक्कामध्ये लग्न केलं.
अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला होता. लग्नानंतर सफाने मॉडलिंग सोडलं. दोघांना एक मुलगाही आहे. त्याचं नाव इमरान खान पठाण. त्याच्याच नावाने एक ट्वीटर अकाउंटही उघडण्यात आलं आहे. इमरानची आई सफा याच हे अकाउंट हँडल करतात.
लग्नानंतर सफाने आपलं आयुष्य अत्यंत खाजगी ठेवलं. सार्वजनिक ठिकाणी त्या फार दिसत नाहीत.
इतकंच नाही तर सार्वजनिक व्यासपीठावर त्यांचे जे फोटो आहेत त्यातही कुठेच त्यांचा चेहरा दिसत नाही. आम्ही इरफान पठाण यांचं ट्वीटर अकाउंट ढुंढाळलं त्यावेळी इरफान सोबतच्या प्रत्येक फोटोमध्ये त्यांनी स्वतःचा चेहरा झाकलेला आहे. कधी बुरखा, कधी मास्क तर कधी हातांनी चेहरा लपवलेला असतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)