अॅडलिन कॅस्टलिनो : 'बिकिनी राउंडमुळे सौंदर्यस्पर्धेत भाग घेतल्याचं वडिलांपासून लपवलं होतं'

    • Author, मधु पाल
    • Role, मुंबईहून बीबीसी हिंदीसाठी

मिस युनिव्हर्सच्या 69 व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा निकाल लागला आणि मॅक्सिकोच्या अँड्रिया मेजाने यांनी 'मिस युनिव्हर्स 2020' चा किताब जिंकला तर 'मिस इंडिया' अॅडलिन कॅस्टलिनो टॉप-4 ठरली.

या स्पर्धेत भारताच्या अॅडलिन कॅस्टलिनो तिसऱ्या रनर-अप होत्या.

मिस युनिव्हर्सचा किताब पटकवण्याचं स्वप्न अपुरं राहिल्याचं अॅडलिन सांगतात. त्या म्हणाल्या, "मला याचा अतिशय आनंद आणि समाधान आहे की इतक्या अडचणींचा सामना करूनही आपण तब्बल 20 वर्षांनंतर टॉप-5 मध्ये स्थान मिळवलं."

भावनिक प्रवास

बीबीसी हिंदीशी बोलताना अॅडलिन कॅस्टलिनो म्हणाल्या, "लोकांनी मला खूप प्रेम आणि आदर दिला, याचा मला अतिशय आनंद आहे. सौंदर्य स्पर्धेच्या या प्रवासात लोकांनी मला खूप सहकार्य केलं."

त्या पुढे म्हणाल्या, "अनेकांनी मला सांगितलं की आम्ही तुझ्यासोबत आहोत. माझ्या संपर्कात असणारे अनेकजण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत होते.

कुणाला कोव्हिडची लागण झाली होती तर कुणाचे प्रियजन त्यांना सोडून गेले होते. हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक प्रवास होता आणि मी माझ्या मित्रांच्या आयुष्यात थोडा आनंद आणि आशेचा किरण आणू शकले, याचा मला आनंद आहे."

स्पर्धेआधी कोरोनाची लागण

मिस युनिव्हर्सची 69 वी स्पर्धा अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये पार पडली. जगभरातील 74 सौंदर्यवतींनी यात सहभाग घेतला.

अॅडलिन सांगतात, "इथपर्यंत येण्यासाठी मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. इतक्या दूर आल्यावर ऐन स्पर्धेच्या तोंडावर मला कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे मानसिकदृष्ट्या मी खूप तणावात होते."

"या कारणामुळे मी निराश होते आणि लवकरात लवकर बरं व्हावं, यासाठी प्रार्थना करत होते. बरी होताच मी अमेरिकेला रवाना झाले. त्यामुळे मला पुरेशी विश्रांतीही घेता आली नाही. अजूनही मला पूर्णपणे बरं होण्यासाठी वेळ लागणार आहे."

बिकिनी राउंडमुळे वडिलांपासून लपवलं

अॅडलिन कॅस्टेलिनो यांनी 'मिस दिवा युनिव्हर्स 2020' चा किताब जिंकला होता. मात्र, सौंदर्य स्पर्धात भाग घेतल्याचं त्यांनी वडिलांपासून लपवून ठेवलं होतं.

याचं कारण सांगताना अॅडलिन सांगतात, "कपड्यांबाबत माझे वडील फार कडक शिस्तीचे होते. स्पर्धेतला बिकनी सेगमेंट त्यांना अजिबात आवडला नसता. त्यामुळे मला वडिलांपासून हे लपवून ठेवावं लागलं. त्यांना न सांगताच मी या स्पर्धेत भाग घेतला. पण, मी जिंकले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला होता."

"आज मी आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचं नाव मोठ करत असल्याने ते मला कधीच मागे वळून बघायला सांगत नाहीत. आता तर मी जेव्हा-जेव्हा निराश, हताश होते ते मला धीर देतात."

'कुवैतमध्ये बरंच काही सोसलं'

मूळ कर्नाटकच्या असलेल्या अॅडलिन यांचं बालपण कुवैतमध्ये गेलं. 15 वर्षांच्या असताना त्या भारतात परतल्या.

त्यांचं कुटुंब कुवैतवरून भारतात का आलं, याबद्दल सांगताना अॅडलिन म्हणतात, "मला संधी हवी होती आणि ती मला मुंबईत दिसायची. मला आत्मनिर्भर व्हायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं रहायचं होतं. मला माझी ओळख निर्माण करायची होती."

"मी कुवैतमध्ये बरंच काही बघितलं. तिथे आम्ही खूप सोसलं. तिथे असताना तिथल्या स्त्रियांना कशी वागणूक मिळते, हे मी बघितलं. त्यांना एकप्रकारच्या हिंसेचा सामना करावा लागतो. स्त्रियांच्या आयुष्यालातही ध्येय असायला हवं, हे मी तिथल्या अनुभवावरूनच शिकले."

तोतरेपणाची अडचण

अॅडलिन म्हणतात, "फॅशनच्या दुनियेत जाईल, असा विचारही मी केला नव्हता. मी मुंबईत डान्स शिकायला आले होते आणि मी डॉक्टर व्हावं, अशी माझ्या आईची इच्छा होती. माझ्या रुममेटकडून मला सौंदर्यस्पर्धांविषयी माहिती मिळाली आणि तिथूनच मला माझी खरी पॅशन कळली."

"मला तोतरेपणाची समस्या होती. त्यामुळे बोलताना त्रास व्हायचा. तोतरेपणा कमी करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आणि इतरांशी बोलताना स्वतःच्या भावना व्यक्त करायला शिकले. आज मला तो विश्वास वाटतो."

शेतकऱ्यांचा संघर्ष

अॅडलिन कॅस्टलिनो शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी काम करणाऱ्या 'विकास सहयोग प्रतिष्ठान' या संघटनेसाठी काम करतात. तसंच पीसीओएस फ्री इंडिया अभियाच्याही त्या अॅम्बेसेडर आहेत.

अॅडलिन म्हणतात, "मी एका शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे. मी शेतकऱ्यांचा संघर्ष बघितला आहे. मी माझ्या माणसांना संघर्ष करताना पाहिलं आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला मी शेतकऱ्यांविषयी बोलले होते. त्यावेळी हा मुद्दा पुढे इतका मोठा होईल, याची कल्पनाही नव्हती."

"आता लोकांमध्ये शेतकऱ्यांविषयी बरीच जागरुकता आली आहे. आज त्यांच्याकडे आवाज आहे आणि स्वतःच्या हक्कासाठी ते स्वतः आवाज बुलंद करत आहेत, याचा मला आनंद आहे. आवाज उठवणे, हेच सर्वात महत्त्वाचं असतं."

"बरंच काही करायचं आहे"

20 वर्षांपूर्वी मिस युनिव्हर्स स्पर्धेत सेलिना जेटली थर्ड रनर-अप होत्या.

सेलिनाप्रमाणेच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या इतर सर्वच मॉडेल्सने बॉलीवुडमध्ये नशीब आजमावलं होतं. अॅडलिन यांचाही असा काही विचार आहे का?

यावर अॅडलिन म्हणतात, "मला बरंच काही करायचं आहे. मनोरंजनापासून ते उद्योग क्षेत्रापर्यंत बरंच काही करायची इच्छा आहे. मला माधुरी दीक्षित आवडतात आणि मलाही पुढे या क्षेत्रात चांगलं काम करायला आवडेल."

यावर्षीच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ब्राझिलच्या जुलिया गामा फर्स्ट रनर-अप तर पेरुच्या जानिक माकेता सेकंड रनर-अप ठरल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)