You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
GOT Season 8: 'गेम ऑफ थ्रोन्स'मधल्या या 9 गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील
'गेम ऑफ थ्रोन्स' नावाच्या टीव्ही महामालिकेचा अखेरचा सीझन येतोय. जगभरात त्याची चर्चा जोरदार सुरू आहे.
मुंबईमध्ये या मालिकेचे मोठमोठाले होर्डिंग लागले आहेत तसंच सोशल मीडियावरही त्याचे तुफान ट्रेंड्स दिसत आहेत. ज्यांनी ही मालिका पाहिली आहे, ते इतरांना ती बघण्यास विनवण्या करताना दिसतात.
त्यामुळे एका इंग्रजी मालिकेचं भारतात एवढं काय कौतुक, असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. तशी तर अनेक कारणं आहेत, पण या मालिकेतल्या या 9 धक्कादायक गोष्टींमुळे तर ही मालिका नक्कीच जगभरात गाजतेय.
पण त्यापूर्वी, ही मालिका नेमकी काय आहे, त्यात काय गोष्ट आहे, या व्हीडिओत नक्की पाहा
तर या आहेत या मालिकेविषयीच्या 9 धक्कादायक गोष्टी
1. खर्च
या मालिकेने टीव्ही कार्यक्रमांचं स्वरूपच बदललं. टीव्हीवरचे कार्यक्रम कमी बजेटमध्ये करायचे, असा पूर्वी समज होता. पण 2011 साली अमेरिकेत सुरू झालेल्या गेम ऑफ थ्रोन्सवर प्रचंड खर्च करण्यात येत आहे.
आता सुरू होत असलेल्या आठव्या सीझनच्या प्रत्येक भागावर 1.5 कोटी डॉलर (सुमारे 1 अब्ज रुपये) खर्च करण्यात आला आहे, असा अंदाज वर्तमानपत्रांनी दिला आहे. आणि काही स्रोतांनुसार यंदाच्या सीझनमध्ये सहा एपिसोड असतील. म्हणजे साधारण 9-10 कोटी डॉलर या सीझनचं बजेट असेल.
'बाहुबली' या बॉलिवुडमधल्या प्रचंड महाग सिनेमाचं बजेट होतं 2.8 कोटी डॉलर (सुमारे 1 अब्ज 80 कोटी रुपये). म्हणजे 'बाहुबली' या बिगबजेट सिनेमावर जेवढा खर्च झाला, त्यापेक्षा चारपट खर्च 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या एका सीझनवर झालेला असावा, असा अंदाज आहे.
2. त्रिखंडात शूटिंग
'गेम ऑफ थ्रोन्स'ची कथा अशी आहे की कधी एक मुख्य पात्र अतिशय थंड प्रदेशात असतं तर दुसरं पात्र जगाच्या दुसऱ्याच एका खूप उष्ण प्रदेशात लढाई करताना दिसतं.
त्यामुळे या मालिकेचं शूटिंग कॅनडा, उत्तर आयर्लंड, क्रोएशिया, आईसलंड, माल्टा, मोरोक्को, स्कॉटलंड, स्पेन आणि अमेरिका या 9 देशांमध्ये एकाच वेळी सुरू होतं. म्हणजे युरोप, अमेरिका आणि अफ्रिकेत मोठमोठे सेट उभे करून आणि कलाकारांना तिथे नेऊन याचं गेल्या आठ वर्षांत शूटिंग करण्यात आलं आहे.
त्यामुळे मालिका पाहायला भारी वाटते, पण खर्च वाढत जातो. पण त्याने एक बरं झालं की अतिदुर्गम भागांमध्येही पर्यटन वाढलं आहे. ज्या ठिकाणांची नावंसुद्धा लोकांनी कधी ऐकली नव्हती, तिथे जाऊन लोक आता सेल्फी काढू लागले आहेत. खरं नसेल वाटत तर ही बातमी वाचा .
3. कथानकात अनपेक्षित वळण
ही मालिका जॉर्ज आर. आर. मार्टिन यांच्या 'A Song of Ice and Fire' या कादंबऱ्यांवर आधारित आहे. 70 वर्षांचे मार्टिन सावकाश लिखाण करत आहेत, पण मालिकेचे सीझन्स कादंबरीच्या पुढच्या खंडासाठी थांबू शकत नाहीत. त्यामुळे आता मालिकेतील कथा आता पुढे सरकली आहे आणि कादंबऱ्या मागून येताहेत.
अनेक सिनेमे पाहून आणि कथा वाचून हल्ली प्रेक्षक चतुर झाले आहेत. त्यामुळे कथेत पुढे काय होईल, याचा ते अंदाज बांधू शकतात याची कल्पना असल्यामुळे मार्टिन यांनी धक्कातंत्र अवलंबलं आहे. कथेतल्या नायकाला मारण्यासाठी ते प्रसिद्ध झाले आहेत. म्हणजे 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये एखादं पात्र रंगात येऊ लागतं आणि लोकांना आवडू लागतं. हाच खरा हीरो आहे, असं सर्वांना वाटू लागताच ते मारलं जातं.
कथेतला नायक मध्येच मेल्याने आता काय होईल, याची उत्कंठा वाढते. अशी अनेक धक्कादायक वळणं या कथेत आहेत.
4. लोकप्रियता
जेव्हा एखाद्या मालिकेचा नवा सीझन येतो, तेव्हा पहिल्या सीझनची लोकप्रियता पुढच्या सीझन्सना क्वचितच मिळते. पण गेम ऑफ थ्रोन्सने टीव्ही रेटिंग्सचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले.
आतापर्यंत आलेल्या 7 सीझन्समधले रेटिंग्स वाढतच गेल्याचं दिसत आहे. एकट्या अमेरिकेतच सातव्या सीझनचा प्रत्येक भाग तीन कोटी लोकांनी पाहिल्याची आकडेवारी 2017 मध्ये प्रसिद्ध झाली होती.
ही मालिका जगात अनेक देशांमध्ये वितरित केली जाते आणि पाहिली जाते, पण त्याचा एकत्रित आकडा उपलब्ध नाही.
5. थिएटरमध्ये टीव्ही मालिका
सिनेमाघरांमध्ये रिलीज झालेला सिनेमा आपण टीव्हीवर पाहतो. पण 'गेम ऑफ थ्रोन्स' ही पहिली अशी मालिका आहे जी आधी टीव्हीवर आली, पण लोकप्रियतेमुळे नंतर थिएटर्समध्ये रिलीज करण्यात आली. आता आठव्या सीझनचे भागही अमेरिका, ब्रिटनसह काही देशांमध्ये थिएटर्समध्ये पाहता येतील.
6. भारत कनेक्शन
गेम ऑफ थ्रोन्समधली कथा काल्पनिक युगात बेतलेली आहे. हे युग साधारणतः मध्ययुगाशी मिळतं-जुळतं आहे. त्या काळातल्या वस्तू, सेट उभं करणं हे मोठं आव्हान!
त्यासाठी लागणारे कपडे, काठ्या, तलवारी, दागिने वगैरे गोष्टी भारतातून पाठवले जात होते.
डेहराडूनमधल्या एका कारखान्यात तलवारी तर दिल्लीतल्या एका बाजारातून पात्रांचे कपडे पाठवण्यात यायचे. विश्वास नाही बसत? मग बीबीसीचा हा रिपोर्ट तुम्ही पाहू शकता.
7. सेक्स
'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेवर आरोप करण्यात येतो की यात सेक्स खूप जास्त दाखवण्यात आलं आहे. यातली अनेक पात्र एकमेकांशी, वेश्यांसोबत सेक्स करताना गप्पा मारत असतात. तसंच भाऊ-बहीण, मामा-भाचा असे कुणीही कुणासोबतही सेक्स करताना दाखवले आहेत.
निर्मात्यांचं म्हणणं आहे की हा कथेचा महत्त्वाचा भाग आहे.
8. ड्रॅगन आणि व्हाईट वॉकर्स
या काल्पनिक कथेत जादू नसती तरच नवल. यात ड्रॅगन आहेत, जे आग ओकत फिरत असतात. पण ते पाळीव असल्यामुळे राजकन्येच्या शब्दाबाहेर नाहीत.
यात व्हाईट वॉकर्स नावाची मेलेली माणसं आहेत, जी जिवंत माणसांवर हल्ला करताना दाखवली आहे.
या रहस्यमय गोष्टी पाहताना तर्क वगैरे गोष्टींचा विचार न केलेलाच बरा!
9. नाव
ही मालिका एवढी लोकप्रिय झाली की यातल्या पात्रांची नावं लोकांनी आपल्या मुलांना द्यायला सुरुवात केली आहे.
गेम ऑफ थ्रोन्समध्ये आर्या नावाचं एक प्रमुख पात्र आहे. ते आवडल्यामुळे ब्रिटनमध्ये आर्या नावाची नोंदणी विलक्षण वाढली, असं या बातमीत म्हटलं आहे.
गेम ऑफ थ्रोन्सला अनेक पुरस्कार मिळाले आणि त्यावर तेवढीच टीकाही झाली. पण या मालिकेने हे दाखवून दिलं की टीव्ही, डिजिटल अॅप्स आणि थिएटर या सर्व माध्यमांवर एकाच वेळी राज्य करता येऊ शकतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)