मुंबईतला 'काळा घोडा' फोर्टमधून राणीच्या बागेत कसा गेला?

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

काळा घोडा फेस्टिव्हलमुळे दरवर्षी मुंबईतल्या फोर्टमध्ये एका विशिष्ट जागेवर विविध कलाप्रकार, प्रदर्शनं सादर केली जातात. या परिसराचं नावच 'काळा घोडा' असं आहे.

पण या परिसराला वर्षातून ठराविक काळीच जाग येते असं नाही तर इथं मुंबईच्या कलाक्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी सतत घडत असतात.

19 व्या शतकाच्या मध्यानंतर मुंबईत नव्या इमारती आकारास येऊ लागल्या. मुंबई महानगरपालिका, विद्यापीठ, महाविद्यालयं आकार घेऊ लागली.

मुंबई किल्ल्याच्या म्हणजे फोर्टच्या भिंती 1862च्या सुमारास पाडून त्याबाहेर असणारा खंदकही बुजवण्यात आला.

अल्बर्ट ससून यांनी उभारला पुतळा

भिंती पाडल्यावर फोर्टच्या एका सीमेवर 'प्रिन्स ऑफ वेल्स' म्हणजे 'किंग एडवर्ड सातवे' यांचा घोड्यावर बसलेल्या स्थितीतला पुतळा उभारण्यात आला.

1875-76 या काळामध्ये युवराज मुंबईला आले होते. त्यांच्या स्मरणार्थ 1879 साली अल्बर्ट ससून यांनी हा पुतळा उभारला होता.

बगदादमधून ससून कुटुंब भारतामध्ये आश्रयाला आलं होतं. मुंबईमध्ये ससून डॉक, डेव्हिड ससून लायब्ररी, नेसेट इलियाहू सिनेगॉग, बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय अशा निरनिराळ्या इमारती बांधण्याचं श्रेय या कुटुंबाकडं जातं.

"ब्रिटिशांनी भारतात दिलेल्या आश्रयासाठी आणि एकूणच मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अल्बर्ट ससून यांनी हा पुतळा उभारण्याचं ठरवलं", असं मुंबईच्या नागरी वारसास्थळांचे अभ्यासक भरत गोठोसकर यांनी बीबीसीला सांगितलं.

गोठोसकर म्हणाले, "हा पुतळा काळ्या रंगाच्या घोड्यावर असल्यामुळं त्या परिसरालाच काळा घोडा असं नाव मिळालं. त्यानंतर पुतळा हटवला गेला तरी त्या परिसराचं 'काळा घोडा' हे नाव कायम राहिलं. दोन वर्षांपूर्वी इथं एक वेगळा फक्त घोड्याचा पुतळा बसवण्यात आला आहे."

जॉर्ज फर्नांडिसांमुळं हटवला गेला पुतळा

स्वातंत्र्यानंतर मुंबईतील वसाहतावादाची प्रतिकं, नावं, चिन्ह बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार प्रिन्स ऑफ वेल्ससह मुंबईतील अनेक ब्रिटिशकालीन पुतळे काढण्यात आले.

यातील बहुतेक पुतळे 'भाऊ दाजी लाड' संग्रहालयाच्या आवारात ठेवण्यात आले. तर प्रिन्स ऑफ वेल्सचा पुतळा या संग्रहालयाच्या बाहेर म्हणजेच राणीच्या बागेत ठेवण्यात आला.

'हा पुतळा हटवण्यासाठी जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबईत असताना आंदोलन केलं होतं', असं ज्येष्ठ समाजवादी चिंतक अमरेंद्र धनेश्वर सांगतात.

वसाहतवादाची प्रतिकं नष्ट व्हावीत अशी भूमिका डॉ. राममनोहर लोहिया यांनी घेतली होती. त्यानुसार जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबईत मागण्या लावून धरल्या होत्या.

"ब्रिच कँडी जवळील एका पोहोण्याच्या तलावात भारतीय लोकांना प्रवेश निषिद्ध होता. त्याविरोधातही फर्नांडिस यांनी आंदोलन केल्याचं मला स्मरतं", अशी आठवण धनेश्वर यांनी बीबीसीला सांगितली.

पुतळ्याचे विशेष आकर्षण म्हणून उल्लेख

मुंबईला आल्यावर हा पुतळा पाहिलाच पाहिजे असं सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या मुंबईचं वर्णन करणाऱ्या पुस्तकांमध्ये आवर्जून लिहून ठेवलेलं दिसतं. 1889 साली बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे यांनी 'मुंबईचा वृत्तांत' नावाचं पुस्तक लिहिलं होतं.

या पुतळ्याचं मोठं वर्णन या दोघांनी पुस्तकात करून ठेवलं आहे. ते लिहितात, "इ. स. 1879 च्या जून महिन्याच्या 26 व्या तारखेस माजी गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल यांनी पुतळा उद्घाटनाचा समारंभ केला.

पायापासून मस्तकापर्यंत पुतळ्याची उंची 12 फूट 9 इंच आहे. त्यांच्या आसनाची उंची जमिनीपासून साडेचौदा फूट आहे. अंगात फील्ड मार्शलचा पोशाख घातला आहे, गळ्यात ऑर्डर आफ द बाथ आहे. उजव्या हातांत टोपी आहे."

चबुतऱ्यावरील सुंदर देखावे

हा पुतळा एका उंच चबुतऱ्यावर होता. मात्र आता राणीच्या बागेत स्थलांतर झाल्यावर हा सुंदर चबुतरा नाहीसा झाल्याचे दिसते.

या चबुतऱ्यावर दोन्ही बाजूस विविध प्रसंग कोरण्यात आले होते. या चबुतऱ्याचंही आचार्य आणि शिंगणे यांनी वर्णन केलं आहे.

ते लिहितात, "आसनाच्या दोन्ही बाजूला ओतीव कामात दोन देखावे फार उत्तम दाखविले आहेत. गोदीतून युवराज बाहेर आले तो व मैदानात लहान मुलांस मेजवानी झाली त्या वेळी पारशी स्त्रियांनी त्यांजवर जी पुष्पवृष्टी केली तो ह्या दोन्ही प्रसंगाचा देखावा दाखविला आहे. यात माजी गव्हर्नर जनरल लॉर्ड नार्थ ब्रुक ह्यांनी एतदेशीय संस्थानिकांबरोबर मुलाखत करून दिली हा देखावा आहे."

या देखाव्यात "युवराजांसह, नॉर्थ ब्रुक, सर फिलिप वुडहौस, सर बार्टल फ्रिअर, ऑनरेबल डोसाभाय फ्रामजी, सर मंगळदास नथुभाई, मिस्तर म्याक्लीन, मिस्तर एडवर्ड ससून, मिस्तर गबे, बडोद्याचे तरुण गायकवाड, म्हैसूरचे महाराज, कोल्हापूरचे राजे, कच्छचे राव व निझाम सरकारचे प्रसिद्ध दिवाण सालरजंग" होते

तसंच दुसऱ्या देखाव्यात पारशी स्त्रिया युवराजांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालण्यासाठी येत आहेत असं चित्र असल्याचं वर्णन या लेखकांनी केलं आहे. या पुतळ्यास सव्वा लाख रूपये खर्च आल्याचंही ते लिहितात.

1925 साली 'मुंबईचा मार्गदर्शक अर्थात् मुंबईचा मित्र' हे पुस्तक लिहिणाऱ्या जयराम रामचंद्र चौधरी यांनीही या पुतळ्याचा उल्लेख करून त्याचं वर्णन लिहिलं आहे.

आजचा काळाघोडा परिसर

आजच्या काळा घोडा परिसरामध्ये वॅटसन हॉटेल, एल्फिन्स्टन कॉलेज, डेव्हिड ससून लायब्ररी, छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, जहांगिर आर्ट गॅलरी, आर्मी नेव्ही बिल्डिंग, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, नेसेट इलियाहू सिनेगॉगसारख्या जुन्या इमारती आहेत.

आज येथे प्रिन्स ऑफ वेल्सचा पुतळा नसला तरी घोड्याचा एक पुतळा उभारण्यात आला आहे. तसंच काळा घोडा ही या परिसराची ओळख कायम राहिली आहे.

मुंबईच्या या 'कल्चरल आर्ट डिस्ट्रिक्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसराबद्दल कला इतिहास अभ्यासक शर्मिला फडके सांगतात, "हा परिसर दक्षिण मुंबईत महत्त्वाच्या व मध्यवर्ती जागेवर असल्यामुळं मुंबईकरांच्या मनात या जागेला विशेष स्थान आहे.

या जागेला व्यावसायिक मूल्य आहेच त्याहून ट्रामने जोडलं गेलं असल्यामुळं जुन्या मुंबईकरांना फिरण्याचं ते महत्त्वाचं ठिकाण आहे.

आज बदललेल्या मुंबईत इथं पार्किंगला जागा मिळत असल्यानं या काळातही लोक इथं येऊ शकतात.

जहांगीर आर्ट गॅलरीमुळं इथं चित्रकार, कला आस्वादकांची वर्दळ वाढली. इथल्या फुटपाथवर होणारी प्रदर्शनं, लायब्ररी, कॉलेज आणि जवळच असणाऱ्या विद्यापिठांमुळं तरूणांचीही इथं मोठी गर्दी असते."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)