You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Mumbai rain: मुंबईची तुंबई नालेसफाई न केल्यामुळे होते का?
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पंधरा जणांचा जीव घेतला आहे.
दरम्यान, मुंबईत नालेसफाईवरून दरवर्षी वादंग होत असतो. 9 जूनला मुंबईत मान्सून सक्रिय झाला. पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई तुंबली. याही पावसात तेच चित्र दिसत आहे.
पावसाळ्यातलं मुंबईचं हे चित्र नेहमीचंच. दरवर्षी मुंबईत पाऊस सुरू झाला की, मुंबई तुंबणार हे निश्चित असतं.
पावसाळ्याआधी मुंबई महापालिकेकडून पूर्ण नालेसफाईचा केल्याचा दावा केला जातो. पण अनेकदा पहिल्याच पावसात हा दावा फोल ठरतो. मग राजकीय पक्षांकडून मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप- प्रत्यारोप सुरू होतात.
या आरोप प्रत्यारोपाच्या केंद्रस्थानी असलेला नालेसफाईचा मुद्दा फक्त राजकारणापुरताच चर्चेत राहतो. यंदाही नालेसफाईच्या घोळावरून राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यात आले.
नालेसफाई मुंबईसाठी का महत्वाची आहे? यंदा महापालिकेने काय दावा केला आहे? विरोधी पक्षांनी हा दावा फोल ठरल्याचं का म्हटलंय? याबाबतचा हा आढावा.
नालेसफाई का आणि कधी केली जाते?
मुंबई ही सात बेटांना जोडून तयार झालेलं शहर आहे. हे शहर वाढवण्यासाठी समुद्र आणि खाडी यावर भराव टाकण्यात आले. त्यामुळे मुंबईची भौगोलिक परिस्थिती पूर येण्यासाठी अनुकूल आहे. मुंबईत एकूण 117 नाले आहेत. मुंबईत पाणी साचलं की त्याचा या नाल्यांमधून निचरा होण्यास मदत होते. त्यावेळी नालेसफाई केली जाते.
मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात व पावसानंतर अशा तीन टप्प्यात नालेसफाईची कामे करते. त्यासाठी दरवर्षी अंदाजे 100 कोटी रुपये खर्च करण्यात येतात. कंत्राटदारांना नालेसफाईची कंत्राटं दिली जातात.
कंत्राटदारांनी छोट्या आणि मोठ्या नाल्यांमधला गाळ काढून त्याची विल्हेवाट लावणं अपेक्षित असतं. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करताना किती गाळ उपसणे आवश्यक आहे याचं उद्दिष्ट ठरवलं जातं. त्यानुसार ही नालेसफाई केली जाते.
नाल्यांमधून गाळ काढल्यानंतर पावसाच्या पाण्याचा निचरा सहजतेने व्हावा हाच नालेसफाईचा मूळ उद्देश आहे.
यंदा मुंबई महापालिकेचा काय दावा आहे?
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अधिक 35% गाळ काढण्याचं उद्दिष्ट मुंबई महापालिकेकडून पावसाळ्याआधी ठरवण्यात आलं होतं.
या उद्दिष्टाच्या अधिक म्हणजे 104% गाळ यंदा उपसण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
महापालिकेकडून दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण वर्षभरात प्रमुख नाल्यांमधून सुमारे 4 लाख 13 हजार 987 मेट्रिक टन गाळ काढण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यापैकी पावसाळापूर्व 3 लाख 11 हजार 381 मेट्रिक टन गाळ काढण्याचे निश्चित करण्यात आलं होतं.
31 मे 2021 च्या अखेरीसपर्यंत एकूण 3 लाख 24 हजार 284 मेट्रिक टन इतका गाळ पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून काढण्यात आला आहे. तर 19 हजार 093 इतक्या वाहनफेऱ्यांद्वारे हा गाळ वाहून नेण्यात आला. म्हणजेच पावसाळापूर्व उद्दिष्टाच्या 104% इतका गाळ काढण्याची कामगिरी महानगरपालिकेने पार पाडली आहे.
यामध्ये मुंबई शहरात 40 हजार 264 मेट्रिक टनाच्या तुलनेत 43 हजार 766 मेट्रिक टन गाळ काढण्यात आला. यानुसार एकूण 109% गाळ हा मुंबई शहरातून काढण्यात आला.
पूर्व उपनगरांमध्ये 96 हजार 908 मेट्रिक टन उद्दिष्टाच्या तुलनेत 1 लाख 6 हजार 260 मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. यानुसार 102% गाळ काढण्याचं उद्दिष्ट गाठण्यात आलं आहे.
पश्चिम उपनगरांमध्ये 1 लाख 74 हजार 209 मेट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी, 1 लाख 82 हजार 285 मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. म्हणजेच एकूण 105% टक्के गाळ काढण्यात आला आहे.
याचबरोबर मुंबईतील पाणी साचण्याची 435 ठिकाणं शोधून त्या ठिकाणचं काम करण्यात आलं आहे. काही बांधकामांमुळे, मेट्रोच्या कामांमुळे नव्याने पाणी साचण्याची ठिकाणं तयार होतात. त्यानुसार लहान- मोठ्या 235 ठिकाणांचं काम महापालिकेकडून सुरू आहे.
1000 कोटींचा भ्रष्टाचार?
मुंबई महापालिकेने 104 टक्के नालेसफाईचा दावा केला असला तरी पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. त्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सत्ताधारी शिवेसेनेवर हल्लाबोल केला.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी गेल्या पाच वर्षांत या नालेसफाईत 1000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
ते म्हणाले, "नालेसफाई कधी 104 % कधी 107% टक्के झाली असल्याच्या दाव्याची मोठमोठी आकडेवारी फेकण्यात आली आहे. पण जेव्हा मुंबईत पहिलाच पाऊस पडला तेव्हा या आकडेवारीमधले कट-कमिशनचे व्यवहार उघडे पडले. गेल्या पाच वर्षांत 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे."
ते पुढे म्हणतात, "सत्ताधाऱ्यांच्या वसुलीचा नाद खुळा, नेमेची येतो पावसाळा... "
भाजप पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुंबई महापालिका भ्रष्टाचारात अनेक ठिकाणी कोट्यवधींचे टार्गेट असणारे सचिन वाझे असल्याचं म्हटलंय.
ते म्हणतात, "नाल्यातील गाळा ऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेत भरलेल्या करातून माल काढला गेला. 100 कोटींचं टार्गेट असणारा एक सचिन वाझे सापडला. पण असे सचिन वाझे ठिकठिकाणी आपल्या सर्वसामान्यांच्या नशिबी आहेत."
राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीच्या रूपाने एकत्र असलेल्या कॉंग्रेसनेही नालेसफाईचा दावा खोटा असल्याचा आरोप केला आहे.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा हे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "मुंबई महापालिकेने नालेसफाईची दिलेली आकडेवारी ही साफ खोटी आहे. आम्ही मुंबई कॉंग्रेसतर्फे 90 फुट रोडजवळच्या नाल्यांची पाहणी केली. तिथे नालेसफाई झालेली दिसली नाही. इतर नाल्यांची परिस्थितीही अशीच आहे. नालेसफाई करणारे कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी मुंबईकरांची फसवणूक करत आहेत."
विरोधी पक्षाचे नेते मुंबई महापालिका प्रशासनावर आणि सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेवर सडकून टीका करतायेत. याबाबत सत्ताधारी पक्ष असलेली शिवसेना मात्र नालेसफाईच्या दाव्यावर ठाम आहे.
महापौर किशोरी पेडणेकर सांगतात," नालेसफाई ही 104 % झालेली आहे. हे सत्य आहे. पाणी वाहून नेण्याची क्षमता आम्ही वाढवली आहे. विरोधक बेभान आरोप करतात. त्यांना किती उत्तरं द्यायची? अनेक तांत्रिक बाबी आहेत त्या कशा आणि किती समजावून सांगणार?"
मग मुंबई का तुंबते?
महापौर किशोरी पेडणेकर पुढे सांगतात, "मुंबईत पाणी साचण्याला फक्त नालेसफाई जबाबदार नाही. नाले साफ केल्यामुळे, त्यातील गाळ काढल्यामुळे पावसाचं पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढते. ती यावर्षी आपण निश्चितपणे वाढवली आहे. काही नाल्यांमध्ये मशीनचा उपयोग मर्यादित होतो आणि प्रत्यक्ष आतमध्ये माणसांना उतरवूनच गाळ काढावा लागतो. ते ही आम्ही केलं आहे.
"पण फक्त नालेसफाई झाली नाही म्हणून मुंबईत पाणी साचतं हे बोलण्याला काही अर्थ नाही, हे विरोधी पक्षालासुध्दा माहिती आहे."
त्या पुढे सांगतात, "उगाच राजकारण करायचं म्हणून हे आरोप केले जातात. मुंबईत ठिकठिकाणी जे भुयारी मार्ग आहेत ते नाल्यांपेक्षाही खाली आहेत. मॅनहोलची झाकणं वाहत्या पाण्याच्या प्रवाहामुळे निघून येतात. त्यासाठी आम्ही फायबरची झाकणं लावली.
"तीही काहीवेळा निघतात. समुद्राच्या पातळीपासून खाली असलेल्या शहरात पाणी हे काही प्रमाणात तुंबणार. पण त्याचं प्रमाण कमी असेल याची मुंबई महापालिकेने काळजी घेतली आहे. आता पूर्वीपेक्षा पाणी हे कमी साचतं. पण राजकीय उत्तर द्यायचं असेल तर पुणे, नागपूर ही शहरंही तुंबतात. मग तिथेही भ्रष्टाचार झालाय का? विरोधकांनी राजकारण करू नये".
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)