You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मान्सून : यंदा चांगला पाऊस होणार, या अंदाजावर विश्वास ठेवायचा का?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात देशभरात सामान्य मान्सून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सलग तिसऱ्या वर्षी देशभरात समाधानकारक पाऊस असेल, असा अंदाज 'स्कायमेट वेदर' या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेनं वर्तवला आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरी 880.6 मिलिमीटर पाऊस पडतो. स्कायमेटच्या अंदाजानुसार, यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या 103 टक्के म्हणजे 907 मिलिमीटर पाऊस पडू शकेल.
पण, हे हवामान अंदाज विश्वासार्ह असतात का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
हवामान अंदाजाच्या विश्वासार्हतेविषयी पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर सांगतात, "आपल्याकडचा हवामान अंदाज दीर्घ मुदतीचा आणि दीर्घ भूभागाचा असतो. त्यातून काढलेली सरासरी काही उपयोगाची नसते. आपल्याकडील संस्थांना छोटा भूभाग आणि छोट्या मुदतीचा हवामानाचा अंदाज सांगता येत नाही.
उलट सध्याच्या हवामान बदलाच्या काळात स्थानिक पातळीवर हवामानाचा अंदाज देण्याची गरज आहे. अमेरिका, सिंगापूर या देशांमध्ये 12 वाजता सांगितलं जातं की, आज दोन वाजता पाऊस पडेल आणि तसा तो पडतो देखील. कारण या देशांमध्ये हवामानाचा अंदाज सांगण्याचं शास्त्र प्रगत आहे. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज सांगितला जाईल अशा मॉडेलची आपल्याकडे गरज आहे."
शेती प्रश्नांचे अभ्यासक दीपक चव्हाण यांच्या मते, "हवामान विभागाचा अंदाज अत्यंत ढोबळ असतो. भारतात सरासरीच्या 103 टक्के पाऊस पडेल, पण बुलडाणा किंवा महाराष्ट्रातल्या एखाद्या जिल्ह्यात नेमका किती पाऊस पडेल, हे या अंदाजात सांगितलं जात नाही. त्यामुळे मग सामान्य शेतकऱ्यानं या अंदाजाचं विश्लेषण कसं करायचं हा प्रश्न पडतो.
यंदा देशात चांगला पाऊस पडेल, इतकीच माहिती या अंदाजातून मिळते. पण, मी जर सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, तर माझ्या पट्ट्यात पाऊस नेमका किती आणि कधी पडेल हे या अंदाजात सांगितलं जात नाही. दीर्घ स्तरावर (देश पातळीवर) हा अनुमान व्यक्त केला जातो. यामुळे मग शेतकऱ्यांमध्ये हवामान अंदाजांविषयी संभ्रम असतो."
असं असेल तर हवामानाच्या अंदाज वर्तवणाऱ्या संस्था स्थानिक पातळीवरील अनुमान का देत नाही असा प्रश्न पडतो.
स्थानिक पातळीवरचा अंदाज नाही, कारण...
महाराष्ट्रातील हवामान अंदाजाविषयी विचारल्यावर स्कायमेट वेदर संस्थेच्या मेटरोलॉजी अँड क्लायमेट चेंज विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट महेश पालावत सांगतात, "सध्या आम्ही भारत स्तरावरील अनुमान दिलं आहे. प्रादेशिक स्तरावरचं अनुमान दिलेलं नाही. त्यामुळे कोणत्या भागात किती पाऊस होईल, याची माहिती देणं आता थोडं अवघड आहे. असं असलं तरी, महाराष्ट्रात पाऊस सामान्य राहिल."
पण, मग तुम्ही महाराष्ट्र स्तरावरचा अंदाज का सांगू शकत नाही, असं विचारल्यावर ते म्हणाले, "आता हा वसंत ऋतुचा काळ आहे. या काळातील मॉडेल जास्त अचूक नसतात. मे महिन्यात जे मॉडेल येतील, त्याआधारे मग अचूकता थोडी जास्त वाढते."
स्थानिक पातळीवरचं पूर्वानुमान देण्यात काय अडचण आहे, याविषयी भारतीय हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर सविस्तर माहिती देतात.
ते सांगतात, "हवामान विभाग ज्यावेळी देशासाठी पूर्वानुमान जारी करतं तेव्हा त्यात मध्य भारत, ईशान्य भारत, वायव्य भारत आणि दक्षिण भारत असे भाग गृहित धरले जातात. देशपातळीवरील हवामानाचा अंदाज सांगताना त्यात ± अशी टक्केवारी सांगितली जाते. जसं आताच्या आकडेवारीत, देशात सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडेल आणि यात मॉडेल एरर ± 5 % सांगितला आहे.
"पण जर फक्त एका प्रांतासाठी पूर्वानुमान द्यायचं म्हटलं की हा परसेंटेज एरर 15 ते 18 टक्क्यांपर्यंत वाढतो. एरिया कमी केला की एरर वाढतो. समजा महाराष्ट्राच्या बाबतीत हा एरर 25 ते 30 टक्के आला तर मग एवढ्या मोठ्या एररसहितच्या अंदाजाचा काय फायदा? जिल्हास्तरावरील अंदाज सांगा असंही लोक म्हणतात. पण सद्यस्थितीत ते अशक्य आहे. कारण यात मॉडेल एरर खूप मोठ्या प्रमाणात डोकावतील. त्यामुळे जास्तीत जास्त एरर देऊन हवामान विभाग लोकांना संभ्रमात टाकू इच्छित नाही."
हवामानाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानामुळे देशातील शेतकरी आणि उद्योगांना त्यांचं मान्सूनमधील नियोजन करण्यास मदत होते, असंही होसाळीकर सांगतात.
"भारतीय हवामान विभागाकडून दीर्घकालीन पूर्वानुमान 4 महिन्यांसाठी दिले जातात. जून ते सप्टेंबर असे हे चार महिने असतात. हवामान विभाग दीड महिना आधी पूर्वानुमान द्यायला सुरुवात करतं. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही 80 ते 90 टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यामुळे शेती आणि शेतीवर आधारित उद्योग अशा सगळ्यांना त्यांचं नियोजन करण्यासाठी या पूर्वानुमानामुळे फायदा होतो."
अचूक अंदाज शक्य?
हवामान विभागाच्या अचूक अंदाजाविषयीही अनेकदा चर्चा होते. पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला, पण पाऊस पडलाच नाही, अशी तक्रार अनेकदा शेतकरी करताना दिसून येतात.
हवामान विभागाच्या अचूक अंदाजाविषयी विचारल्यावर होसाळीकर सांगतात, "एखाद्या गोष्टीपासून आपण जितकं दूर तितकी अचूकता कमी येते. म्हणून हवामान विभाग दोन टप्प्यांत पूर्वानुमान देतं. एक पूर्वानुमान 16 एप्रिलला जारी करण्यात आलं असून पुढचं मे महिन्यात जारी केलं जाईल. त्यावेळी मान्सून जवळ आलेला असेल आणि चांगली गणितं माडंता येतील."
तर स्कायमेटच्या महेश पालावत यांच्या मते, "भारतच नाही जगात कुणाकडेही हवामानाचा अचूक अंदाज सांगू शकतील, अशी साधनं नाहीत. कारण हवामान डायनॅमिक असतं. ते सारखंसारखं बदलत असतं. त्यामुळे आताची जी वायूमंडळाची स्थिती आहे त्याच्या आधारे आम्ही पुढच्या चार-पाच महिन्यांचा फॉरकास्ट करत आहोत. वायूमंडळातील बदलानुसार मॉड्यूल चालत राहतात."
पर्याय काय?
स्थानिक पातळीवर हवामानाचा अंदाज देण्यासाठी जिल्हास्तरावर हवामान विभागाचे केंद्र स्थापन करायला हवे, असं दीपक चव्हाण यांचं मत आहे.
ते सांगतात, "देशभरात जिल्हा स्तरावर भारतीय हवामान विभागाची केंद्रं स्थापन करायला हवेत. या केंद्रांमधून वर्षभर त्या भागातील पाऊस, तापमान आणि आद्रर्ता यांविषयीची माहिती द्यायला हवी. यामुळे स्थानिक शेतकरी वर्गाला लाभ मिळेल. जितकं स्थानिक पातळीवर हवामानाचा अंदाज सांगितला जाईल, तितकं ते परिसरातील लोकांच्या फायद्याचं राहिल."
मान्सूनचा पाऊस
भारतीय उपखंडात जो पाऊस पडतो त्याला मान्सून म्हणतात. एखाद्या विशिष्ट मोसमात भारताच्या नैऋत्य दिशेकडून येऊन भारताला धकडणाऱ्या आणि सोबत भरपूर पाणी पाऊस घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात.
या वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसाला मान्सूनचा पाऊस असं म्हटलं जातं. भारतात हा पाऊस साधारणपणे जून ते सप्टेंबर या महिन्यात पडतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)