You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अवकाळी पाऊस : 'रात्री मका झाकला, पण 2 एकरवरील गव्हाला मात्र गारपिटीनं झोडपलं'
विदर्भ आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या काही भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. यामुळे रबी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान व्हायची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील लाडसावंगी गावात काल रात्री (17 फेब्रुवारी) अचानक गारपीट झाली. यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, डाळींब, मका या पिकांचं नुकसान झालं आहे.
काल रात्री अचानक गारपीट झाली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याचं लाडसावंगी येथील शेतकरी रमेश पडूळ (60) यांनी सांगितलं.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "रात्री गारपीट झाली आणि त्यानंतर खूप पाऊस पडला. यामुळे आमचं मोसंबी, गहू या पिकांचं नुकसान व्हायची शक्यता आहे. आमच्या शेतातल्या मोसंबीला आता चांगला बार लागला आहे. पण, त्याला गारीचा दणका बसला की फळ काळं पडतं. दुसरं म्हणजे गहू सोंगायला आले आहेत. आता गारपिटीमुळे ते पांढरे पडतील."
गेल्या वर्षी अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊनसुद्धा अजूनपर्यंत पीक विम्याची मदत मिळाली नसल्याची खंत ते पुढे बोलून दाखवतात.
लाडसावंगी येथील एका तरुण शेतकऱ्यानं सांगितलं, "काल रात्री गारपिटीला सुरुवात झाली. तेव्हा मी लगेच शेतात गेलो आणि सोंगलेली मका झाकून आलो. पण, 2 एकरावर गहू शेतात उभा होता, त्याला गारपिटीनं झोडपलंय. डाळिंबाच्या बागेचंही नुकसान झालं आहे."
बुलडाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस झाला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातल्या मंगळूर नवघरे येथील शेतकरी श्रीकांत वाकडे सांगतात, "आमच्या भागात थोडा पाऊस झाला आहे. त्यामुळे नुकसान व्हायची शक्यता कमी आहे. गारपीट झाली असती तर खूप जास्त नुकसान झालं असतं. कारण अजून 75 टक्के पीक काढणी बाकी आहे."
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावचे शेतकरी कैलास भोसले यांच्या मनात सध्या भीतीचं वातावरण आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "काल रात्री जोरात पाऊस झाला. त्यामुळे द्राक्षांचं नुकसान व्हायची शक्यता आहे. नुकतंच द्राक्षांच्या मण्यामध्ये पाणी भरायला सुरुवात केली होती. आता गारपीट झाली किंवा जास्त पाऊस आला तर द्राक्षाच्या घडामध्ये पाणी जाईल आणि मनी क्रॅकिंग होईल. यामुळे मग पूर्ण घड खराब व्हायची शक्यता असते."
कैलास भोसले यांचा 3 एकर क्षेत्रावर द्राक्षाचा प्लॉट आहे.
आज सकाळी पावसाची भूरभूर सुरू असून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे मनात भीती असल्याचं भोसले सांगतात.
पावसाचा इशारा
पुणे आणि नाशिक शहरात 18 आणि 19 फेब्रुवारीला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेट या संस्थेनं वर्तवली आहे.
या संस्थेनुसार, औरंगाबाद आणि अहमदनगरमधील जिल्ह्यांना 19 तारखेला सकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेनंही पुढील दोन-तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गारपीट का होते?
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडंच कधीनाकधी गारपीट होत असते. कधी ती जास्त प्रमाणात होते, तर कधी चुकून-माकून. यामुळे शेतीचं नुकसान होतं, हाताशी आलेली पिकं आडवी होतात. पण आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये हे घडत असेल तर यामागचं कारण समजून घेणं गरजेचं आहे.
हवामानशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक- हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी- या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते.
बाष्पाचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधीकधी अरबी समुद्रावरून येणारे वारे. ते येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात - वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे 9 ते 12 किलोमीटर उंचीवर.
ते फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते.
या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे. ही स्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिल्यास गारपीट तितक्या काळासाठी सुरू राहते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)