You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुमचा गारेगार करणारा ACच आणखी उष्णता वाढवतोय
उन्हाळा संपून पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी गेल्या 2-3 महिन्यात उन्हानं जो घाम फोडला होता ते विसरणं अशक्य आहे. मार्च महिना संपता संपताच महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत पाऱ्यानं चाळीशी पार केली होती.
या सततच्या वाढत्या तापमानाला कारणीभूत असणारा महत्त्वाचा घटक म्हणजे जागतिक तापमानवाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. अशा वातावरणात एअर कंडिशनरची (एसी) मागणी वाढली नाही तरच नवल.
पण तात्पुरता गारवा देणारे एसीच आपल्या पृथ्वीचं तापमान वाढवत आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
खरंतर एसी चालवायला जास्त वीज लागते. ही अतिरिक्त वीजेच्या गरजेमुळेच पर्यावरणात उष्णतेचं प्रमाण वाढतंय. पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे की, 2001 नंतरच्या 17 वर्षांतली 16 वर्षं सर्वाधिक तापमानाची ठरली आहेत.
अशा पद्धतीने तापमान वाढत असताना एसीची मागणी वाढणारच. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अहवालानुसार 2050 पर्यंत एसीसाठी लागणाऱ्या वीजेची मागणी तिप्पट होईल.
म्हणजे जेवढी वीज आज अमेरिका, युरोपियन महासंघ आणि जपान एकत्रितरित्या वापरतात, तितकी वीज 2050 पर्यंत फक्त एसीसाठी लागेल.
म्हणूनच शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान कंपन्या एसीमधल्या कुलिंग सिस्टीमला अधिकाधिक परिणामकारक बनवायच्या प्रयत्नात आहेत, जेणेकरून एसीसाठी कमी वीजेची गरज भासेल.
उदाहरणार्थ, स्टॅनफोर्ड विद्यापीठातल्या संशोधकांनी एक खास प्रकारची यंत्रणा विकसित केली आहे. ही यंत्रणा अत्याधुनिक सामग्री आणि नॅनो-फोटोनिक्स तंत्रज्ञान वापरून विकसित करण्यात आली आहे.
यामध्ये एक अतिशय पातळ आणि परावर्तित करणाऱ्या (रिफ्लेक्टिंग) साधनांचा वापर करण्यात आला आहे जी स्वच्छ सूर्यप्रकाशातही उष्णता बाहेर फेकतात.
वीजेशिवाय एसी चालले तर?
वर उल्लेखलेली यंत्रणा विकसित करणाऱ्या संशोधकांच्या असं लक्षात आलं की, या पॅनलच्या खाली असणाऱ्या पाईपमध्ये भरलेलं पाणी थंड केलं जाऊ शकतं. या थंड पाण्याच्या यंत्रणेमुळे कोणत्याही इमारतीचं कुलिंग आरामात करता येऊ शकतं.
हे सगळं करायला वीजेची गरज भासत नाही. संशोधकांना आता ही 'स्काय कूल सिस्टीम' बाजारात आणायची आहे.
फ्लोरिडा विद्यापीठाच्या सौर उर्जा केंद्राचे डॅनी पार्कर त्यांच्या सहकाऱ्यांसोबत अनेक वर्षांपासून एअर कंडिशनर आणि हीटिंग सिस्टीम अधिक परिणामकारक बनवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढत आहेत.
2016 मध्ये त्यांनी एक असं यंत्र शोधून काढलं जे पाण्याच्या बाष्पीभवनाव्दारे थंड होत होतं. या यंत्राला नेहमीच्या एसी युनिटला जोडणं शक्य आहे यामुळे कमी वीजेत जास्त थंड हवा मिळणं शक्य होईल.
या तंत्राचा वापर करून युरोपिय देशांत कुलिंगचा परिणाम 30 ते 50 टक्के अधिक चांगला होऊ शकतो असं संशोधकांना वाटतं.
तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या सॅमसंगनं 'विंड फ्री' नावाचं एक नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे. या तंत्रज्ञानाव्दारे खोलीचं तापमान कमी केलं जातं त्यामुळे खोली थंड होते.
विशेष म्हणजे यात वीजेचे पंखे चालवण्याची गरज नाही. हे तंत्रज्ञान नेहमीच्या एसीपेक्षा 32 टक्के जास्त फायदेशीर आहे असं कंपनीचं म्हणणं आहे.
स्वस्त आणि कमी वीज लागणारे एसी बाजारात आधीपासूनच उपलब्ध आहेत. यात इन्वर्टर लागलेले असतात.
उर्जातज्ज्ञ लॅन स्टाफेल यांच्या मते, "लोकांना एसीसाठी जास्त पैसे खर्च करायचे नसतात. चीनमध्ये तर वीज फारच स्वस्त आहे त्यामुळे तिथल्या लोकांना वीजबिलाची काहीही चिंता नाही."
अर्थात तरीही चीनच्या काही उर्जा समुहांनी या वर्षाच्या सुरूवातीला एसीला अजून परिणामकारक बनवण्यासाठी काही कार्यक्रम चालवले. वीजेची बचत व्हावी असा या कार्यक्रमाचा हेतू होता.
आपले एसी फक्त सुस्थितीत ठेवले आणि योग्य वापरले तरी बऱ्यापैकी वीजेची बचत होऊ शकते.
उदाहरणच द्यायचं झालं तर टाडोचं 'स्मार्ट एसी कंट्रोल' अॅप. हे अॅप एका रिमोट कंट्रोलला जोडलेलं असतं आणि जेव्हा घरात कोणी नसतं तेव्हा रिमोट कंट्रोलव्दारे एसी आपोआप बंद केला जातो.
याशिवाय हा रिमोट बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेऊन आतलं कुलिंग सेट करतो. टाडोचा दावा आहे की या तंत्रज्ञानामुळे 40 टक्क्यांपर्यंत वीज वाचू शकते.
अपारंपारिक उर्जेचा वापर
सगळे एसी जर वीजेऐवजी अपारंपारिक ( उदा. सौर उर्जा) उर्जा स्रोतांवर चालू लागले तर आपण एसीमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. पण असं घडण्याची शक्यता धुसर आहे.
एसीसाठी वीजेची मागणी सतत वाढतच चालली आहे. याचं कारण फक्त तापमान वाढ नसून लोकांचं उत्पन्न वाढणं हे देखील आहे.
पुढच्या 30 वर्षांत जगातले 50 टक्के एसी फक्त चीन, भारत आणि इंडोनेशियात खपतील अशी शक्यता आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)