‘मला पाण्याची स्वप्नं पडतात, आता तर माझ्या दारात पाणी आणणाऱ्यालाच माझं मत’

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी प्रतिनिधी पालघरहून

"पाण्याचे हंडे वाहून वाहून इथल्या बायकांना आता टक्कल पडायला लागलं आहे," 18 वर्षांची यशोदा झोले मला सांगत होती. तिच्या गावाच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीजवळ आम्ही बसलो होतो.

पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्याचा हा भाग. वातावरणात उकाडा जाणवायला लागला होता आणि उर्वरित महाराष्ट्रासारखे या भागातही दुष्काळाचे चटके बसायला सुरुवात झाली होती. इथं नजर जाईल तिथपर्यंत कोरडं माळरानच दिसत होतं.

इथल्याच आदिवासी पट्ट्यात पवारपाडा या थोड्या उंचावरच्या गावात यशोदा राहते. आणि याच विहिरीवर ती पाणी भरायला येते... दिवसातून तीनदा! म्हणजे रोज पाणी भरायला ती तीन वेळा खाली उतरून येते आणि पाण्याने भरलेले दोन हंडे डोक्यावर घेऊन पुन्हा वर चढत जाते.

"माझं आयुष्य पाण्याभोवतीच फिरतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या डोक्यात पाण्याचाच विचार असतो," ती सांगते. "माझा दिवसातला जास्तीत जास्त वेळ पाणी आणण्यात जातो. फक्त माझाच नाही, माझ्या गावातल्या इतर बायकांचाही."

यशोदाचा दिवस भल्या पहाटे सुरू होतो. उठल्या उठल्या पहिलं काम काय तर पाणी भरायला जाणं. त्यासाठी तिला डोंगर उतरून खाली यावं लागतं, मग पाण्याचे दोन हंडे भरून पुन्हा वर जावं लागतं. मग ती स्वतःचं आवरून पवारपाड्याहून दीड तास प्रवास करून जव्हारला जाते. तिथल्या कॉलेजमध्ये ती सध्या BA करते आहे."

कॉलेजहून संध्याकाळी घरी आलं की सॅक टेकवायची आणि पुन्हा हंडा उचलायचा. आणि हे फक्त यशोदाचंच नाही. तिच्या ITI करणारी लहान बहिणीचं, प्रियंकाचंही, वेळापत्रक असंच.

तरीही या भागातल्या इतर मुलींपेक्षा प्रियंका आणि यशोदा सुदैवी म्हणायच्या कारण त्यांना निदान शिकता तरी येतंय. नाहीतरी घरची काम करण्यासाठी आणि पाणी भरण्यासाठी शाळा सोडणाऱ्या मुली कमी नाही या देशात.

'पाण्याचा प्रश्न नाही तर स्त्रियांचा प्रश्न'

गंमत म्हणजे जव्हार आणि आसपासच्या भागात भरपूर पाऊस पडतो. इथल्या पावसाची वार्षिक सरासरी तब्बल 3,287 मिमी एवढी आहे. "चार महिने इतका पाऊस पडतो की घराबाहेर पडणं मुश्किल होतं. आसपासच्या अनेक गावांचा संपर्क पण तुटतो," यशोदा सांगते.

पावसाळा एवढा एकच ऋतू असतो जेव्हा जव्हार आणि त्याच्या आसपासच्या भागाला ग्लॅमर येतं. मुंबई, ठाणे, नाशिक अशा शहरातून अतिउत्साही पर्यटक येतात. हिरव्यागार झाडांचे, भातशेतांचे, खळाळत्या धबधब्यांचे, धुक्याचे आणि स्वतःचे फोटो ते काढतात.

अर्थात जानेवारी महिन्याच्या शेवटी शेवटी जेव्हा त्या आटत चाललेल्या विहिरीपाशी आम्ही बसलो होतो, तेव्हा तिथे चितपाखरूही नव्हतं. कशाला असेल? फोटो काढण्यालायक तिथं नव्हतंच काही.

कधी कधी वाटतं की या हौशी पर्यंटकांच्या लेखी जव्हार म्हणजे फक्त पावसाळी सहल करायची जागा. बाकी आठ महिने ते कुणाच्या खिजगणतीतही नाही.

मग प्रश्न पडतो की इतका प्रचंड पाऊस पडणाऱ्या भागात पाणीटंचाई का? याचं साधं सरळ उत्तर नाही.

"हा पाण्याचा प्रश्न नाही तर स्त्रियांचा प्रश्न आहे," प्राध्यापक प्रज्ञा कुलकर्णी सांगतात. जव्हारच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्रज्ञा आणि त्यांचे सहकारी प्रा. अनिल पाटील जव्हार तालुक्यातल्या आदिवासी गावांमध्ये पाणी, शिक्षण अशा प्रश्नांवर काम करतात.

"सरकारने या भागात सिंचनाच्या सुविधा दिल्या नाहीत, हे खरंय. इथली भौगोलिक परिस्थितीही कठीण आहे. हा भाग सपाट नाही, उंचसखल आहे. त्यामुळे इथे जलसंवर्धनाचे प्रकल्प राबवणंही सोपं नाही. पण सगळं माप सरकारच्या खात्यात टाकूनही चालणार नाही. त्याला पुरुषी मानसिकताही तेवढीच जबाबदार आहे. पाणी आणणं, भरणं हे बाईचंच काम समजलं जातं. त्यामुळे पाणी आणताना बाईला किती त्रास होतो, याचा कुणी विचारच करत नाही," त्या म्हणतात.

त्यांचे सहकारी प्रा. पाटीलही आपले अनुभव सांगतात. "इथल्या एका गावात आम्हाला एक इनरवेल बांधायची होती. मी पुढाकार घेतला कारण त्या गावात एक सात महिन्यांची गरोदर महिला डोक्यावर दोन हंडे घेऊन डोंगर चढून येताना मला दिसली होती. मला तिची परिस्थिती पाहून खूप वाईट वाटलं.

"सरकारकडून 90 टक्के अनुदान मिळवण्यातही आम्हाला यश आलं. गावकऱ्यांनी 10 टक्के वर्गणी देणं अपेक्षित होतं. तसा सरकारचा नियम आहे. पण गावातल्या पुरुषांनी तेवढी वर्गणी द्यायला सपेशल नकार दिला. त्यांचा प्रश्न होता की जे पाणी आम्हाला फुकट मिळतं, त्याच्यासाठी आम्ही पैसे का मोजावे?"

पण पाणी खरंच फुकट मिळतं का?

The World's Women 2015: Trends and Statistics या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार जगभरात महिला रोज 20 कोटी तास पाणी आणण्यासाठी खर्च करतात. म्हणजे तब्बल 22,800 वर्षं. त्याच अहवालात हेही नमूद केलंय की भारतातल्या 46 टक्के महिला रोज सरासरी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाणी आणण्यासाठी खर्च करतात.

या महिला जेवढा वेळ पाणी आणण्यासाठी खर्च करतात त्यामुळे देशाचं वर्षाला 1,000 कोटींचं नुकसान होत आहे. ही आहे 'फुकट' पाण्याची किंमत!

काम महिलांचं, निर्णय पुरुषांचे

यशोदाशी बोलता बोलता मला काही शाळेतल्या मुली दिसल्या, ज्या पाणी भरायला आलेल्या. त्या शाळेच्या युनिफॉर्ममध्येच होत्या.

"या मुली शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठी पाणी भरायला आल्या आहेत," यशोदा सांगते.

साहाजिक आहे, शाळेत ज्या ताई जेवण शिजवतात, त्यांना एकटीला एवढ्या मुलांना पुरेल एवढं पाणी कसं आणता येईल? एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं, शाळेतूनही ज्यांना पाणी भरायला सोडलं त्या सगळ्या मुली होत्या. त्यात एकही मुलगा नव्हता. अर्थ स्पष्ट होता - "पाणी आणणं हे बाईचंच काम."

दुर्दैव हे की काम बाईचं असलं तरी तो निर्णय घेण्याचा अधिकार बाईला नाही. आम्ही जवळच्याच नांगरमोडा गावात गेलो. तिथले माजी सरपंच धानूभाऊ यांनी आमचं प्रेमानं स्वागत केलं.

त्या गावात बांधलेली पाण्याची टाकी स्पष्ट दिसत होती. धानूभाऊंनी सांगितलं की गावात पाण्याची पाईपलाईनही होती आणि नळही. गाव डोंगरावर होतं, पण पायथ्याशी असलेल्या विहिरीतून पाणी उपसून ते टाकीत साठवायचं आणि नळाने लोकांच्या घरी पोहोचवायचं, अशी योजना होती.

मग असा सुनियोजित आराखडा असूनही या गावातही महिला पाणी खालून का भरून आणत होत्या?

"मी पाण्याचे नळ बंद करून टाकलेत. बायकांना खालूनच पाणी आणू दे," धानूभाऊ म्हणाले. "नळाने पाणी आलं की बायका ते वाया घालवतात. आम्हाला पाणी वाचवायला हवं. अजून उन्हाळा जायचाय. पाणी भरून आणावं लागलं की बायका ते वाया घालवणार नाहीत," ते म्हणाले.

पाणी जपून वापरायला हवं हे खरं, पण त्यासाठी दोन हंडे डोईवर घेऊन ही पायपीट करणाऱ्या माऊल्यांना एकदाही विचारावंसं वाटलं नाही की "बायांनो, पाणी वाचवायला काय करायचं, तुम्ही सांगा."

हे फक्त एक उदाहरण आहे. पण भारतभर अशी अनेक उदाहरण सापडतील.

यशोदाच्या गावातही पाणी नाहीये, कारण गावातल्या पुरुषांनी पाणीपट्टी भरली नाही. "आमच्या गावातले नळ पार मोडून गेलेत," ती सांगते.

या भागातल्या महिलांशी बोला, त्या पाणी प्रश्नावर भरभरून बोलतील, कारण पाणी आणण्याच्या सततच्या त्रासाचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर, शिक्षणावर आणि मनावरही होतो.

"पाणी भरण्याचा माझा वेळ वाचला तर मी कितीतरी गोष्टी करू शकते. अभ्यास करू शकते, काही नाही तर आराम करू शकते," यशोदा म्हणते.

"सरकार या प्रश्नावर गांभीर्याने काही करत नाही, कारण सरकारही महिलांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघत नाही. तिथेही महिला मंत्री जास्त नाहीत, मग महिलांचं म्हणणं ठामपणे कोण मांडणार?" ती विचारते.

यशोदाला पोलिस काँस्टेबल व्हायचं आहे. ती दोनदा शारीरिक चाचणीत पासही झाली आहे, पण लेखी परीक्षेत नापास झाली. "माझा अभ्यास कमी पडला. मला अजून जास्त अभ्यास करावा लागेल."

पण प्रश्न हा आहे की तिला अभ्यास करायला वेळ मिळेल का? इथला पाणी प्रश्न इतका गंभीर झालाय की बायकांना तर आता पाण्याचं स्वप्नंही पडतात.

"माझ्या स्वप्नातही पाणी येतं. माझी मनापासून इच्छा आहे की अशा शहरात जाऊन राहावं, जिथे भरपूर पाणी असेल. नळ सोडला की वाहात पाणी घरात येईल," ती सांगते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)