चंद्रकांत पाटीलांनी अजित पवारांवर शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून 54 आमदारांचं पत्र चोरल्याचा आरोप केला, कारण...

अजित पवार

फोटो स्रोत, Twitter

राज्याच्या राजकारणात सध्या सरकार पाडा-पाडीच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत दोन्ही बाजुंनी अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कलगीतुरा चांगलाच रंगलेला पाहायला मिळत आहे.

जवळपास दोन महिन्यांपूर्वी पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीची धामधूम सुरू होती. त्यावेळी पंढरपूरच्याच प्रचारसभेमध्ये बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं.

"जनतेनं पंढरपुरात यांचा कार्यक्रम करावा, मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो," असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. अर्थातच महाविकास आघाडीबाबत ते विधान होतं.

या घडामोडीपूर्वी राज्यात प्रामुख्याने कोरोना संकटाचीच चर्चा आणि आरोप प्रत्यारोपही त्याच्याशी निगडीत असेच होते. पण या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण पूर्णपणे बदललं आणि सरकार पाडापाडीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं. महाविकास आघाडी सरकार आणि भाजप अशा दोन्ही बाजुनं यावरून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरू झाले.

यानंतर अनेकदा अनेक नेत्यांनी यावरून टीका आरोप प्रत्यारोप केले आहेत. पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात यावरून चांगलंच वाक्युद्ध रंगलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना, "सगळे झोपेत असतानाच सरकार कोसळेल आणि कुणाला कळणारही नाही," अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. या वक्त्यावर टीका करताना "चंद्रकांत पाटलांनी ते वक्तव्य जागेपणी केलं की झोपेत?" असं विचारात अजित पवारांनी पाटलांना टोला लगावला.

पुढे मग अजित पवारांना लक्ष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी, "अजित पवारांना सत्ता स्थापन करता येते पण टिकवता येत नाही," अशी टीका केली.

अजित पवार - देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, ANI

अजित पवार यांनी यावर प्रत्युत्तर देताना, "ज्यांना काही कामं नाहीत, ते हे सर्व उकरून काढत आहेत. 14 महिन्यांनतर गोष्ट उकरून काढण्यात काय अर्थ आहे., असं म्हटलं.

त्यावर "14 महिने झाले तरी जे चुकीचं ते चुकीचेच असतं. शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते शहाणपणा शिकवतात," असा सवाल चंद्रकात पाटलांनी केला.

या दरम्यानच्या काळात हे आरोपप्रत्यारोप सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवांरांची भेट घेतली. त्यामुळे इतरही चर्चा सुरू झाल्या. खरंच राजकीय हालचाली होणार का, या चर्चांना बळ मिळालं.

खरंच पडद्यामागे काही हलाचाली होत आहेत का, या दोन्ही नेत्यांमध्ये रंगलेली ही शाब्दिक चकमक त्याचाच एक भाग आहे का, असेही प्रश्न विचारले जाऊ लागले.

केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न

यामगे नेमकं काय राजकारण आहे असा प्रश्न आम्ही राजकीय विश्लेषक जयदेव डोळेयांना विचारला. त्यांनी सरकार पडापाडीच्या शक्यता फेटाळून लावल्या.

"माध्यमांचा वापर करून चर्चेत राहण्याचा भाजपचा हा केवीलवाणा प्रयत्न आहे. काही तरी करून चर्चेत राहायचं यासाठी भाजप हे सर्व करत आहे," असं डोळे यांनी म्हटलं आहे.

अजित पवार

फोटो स्रोत, Twitter

जयदेव डोळे यांच्या मते, "आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज सध्या संभ्रमाच्या अवस्थेत आहे. अशावेळी हा समाज भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस दोघांपैकी कोणाच्याही पाठिशी राहू शकतो. अजित पवारांवरील रोष वाढवून या समाजाचा पाठिंबा मिळवण्याचा हा प्रयत्न असू शकतो."

पण या आरोपप्रत्यारोपांमधून मात्र एक गोष्ट स्पष्ट जाणवतेय ती म्हणजे अजित पवार आणि भाजपमध्ये निर्माण झालेलं अंतर. राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनीही असंच काहीसं वाटतं.

"अजित पवार आणि भाजप यांच्यात आता पूर्णपणे दुरावा आला आहे. पुन्हा ते एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. सत्तेसाठी भाजप दिवसेंदिवस अधीर होत असल्यामुळे उद्विग्नतेतून या प्रतिक्रिया येत आहेत," असं ते सांगतात.

"याउलट अजित पवार यांचा आता सरकारमध्ये जम बसत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचा समन्वय दिसत आहे. लोकांचा विश्वास वाढत आहे. त्यामुळं ते आत्मविश्वासानं आणि तेवढ्याच आक्रमकपणे प्रतिहल्ला करत आहेत," असं निरिक्षण उन्हाळे नोंदवतात.

मिशन पुणे महानगरपालिका

तर ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांनी बीबीसी मराठीबरोबर बोलताना पवार विरुद्ध पाटील वादाला स्थानिक रंग असण्याची शक्यता व्यक्त केली.

अजित पवार - देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, ANI

"पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकांची ही नांदी असू शकते. दोन्ही महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे. तर राज्यात राष्ट्रवादीचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे हे मिशन पुणे महापालिका असू शकतं," असं मेहता म्हणाले.

"अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असल्यामुळे यात सध्यातरी त्यांचं पारडं जड दिसतंय," असंही मेहता यांना वाटतं.

पहाटेच्या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याचं मान्य केलं आहे. पण अजित पवार यांनी मात्र त्या मुद्द्यावर नंतर फारसं बोलणं टाळलं आहे.

त्याचं विश्लेषण करताना दैनिक दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे सांगतात,

"चंद्रकांत पाटील यांच्या या ताज्या विधानांचा संबंध राजकीय हालचालींशी जोडण्याचं कारण नाही. पहाटेच्या शपथविधीमुळं देवेंद्र फडणवीस तोंडावर आपटले. अजित पवार मात्र पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. अजित पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हा प्रयत्न आहे. अजित पवारांकडे त्यामुळे संशयानं पाहिलं जाणं चंद्रकांत पाटील यांना अपेक्षित असावं. आणि तसं घडू शकतं."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)