चंद्रकांत पाटील : 'अजित पवारांना झोपेत सरकार बनवायचं माहितीये, टिकवता येत नाही' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images/Twitter
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) अजित पवारांना झोपेत सरकार बनवायचं माहितीये, टिकवता येत नाही - चंद्रकांत पाटील
"अजित पवार यांना झोपेत सरकार कसं बनवतात ते माहिती आहे. पण ते टिकवता येत नाही," असं खोचक उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना दिलं आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
अजित पवारांनी कालच (5 जून) पुण्यात माध्यमांशी बोलताना 'पहाटेच्या शपथविधी'वरून भाजपवर निशाणा साधला होता. त्याला चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलंय.
अजित पवार म्हणाले होते, "चंद्रकांत पाटील मोठा माणूस आहेत. ते म्हणाले आहेत की, मी जर बोलायला लागलो तर फार फटकळ आहे. अमकंय तमकंय. कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचं. आपलं दुरून डोंगर साजरे."
"मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार? लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव. कितीदा सांगायचं की, हे तीन नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही," असं अजित पवार म्हणाले होते.
या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली.
"अजित पवार यांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती आहे. पण ते टिकवता येत नाही. 54 आमदारांच्या सह्यांचं पत्र ड्रॉवरमधून कुणी काढलं? राज्यपालांना कुणी सांगितलं की 54 आमदारांचा पाठिंबा आहे? अशाप्रकारे सरकार बनवणाऱ्यांनी खरं तर जपून बोललं पाहिजे," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
2) तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल - उद्धव ठाकरे
महाविकास आघाडी लवकरच कोसळणार असल्याचा दावा भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताच्या 'दृष्टी आणि कोन' या कार्यक्रमात त्यांना उत्तर दिलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, "जशी युती टिकली तशी आघाडी टिकेल. तीन पक्ष एकत्र आले आहेत. तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल."

फोटो स्रोत, Twitter
"युती किंवा आघाडी चांगल्या कामासाठी असेल, कामं होत असतील तर ती का टिकू नये? आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही. पण काम करण्याची जिद्द असेल, तर पुढच्या कित्येक वर्षांसाठी जशी काम होईल तशी आघाडी टिकवू शकतो," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप-शिवसेना युतीवरही भाष्य केलं. भाजप-सेना एकत्र येणार का, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, "हे दोन्ही पक्ष वेगळे का झाले, यात त्याचं उत्तर आहे."
3) नियम पाळा किंवा कारवाईस तयार, भारताचा ट्विटरला इशारा
भारतातील नव्या माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार भारतात अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ट्विटरला भारत सरकारनं 'अखेरची नोटीस' पाठवलीय. यानंतर ट्विटरकडून कुठले पाऊल उचललं गेलं नाही, तर फौजदारी कारवाईचा इशारा भारत सरकारनं दिलाय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
केंद्र सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना 26 मे 2021 पर्यंत भारतात निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक होते.

फोटो स्रोत, Getty Images
ट्विटरला वारंवार सूचना देऊनही ट्विटरने नियमांच पालन करण्यास नकार दर्शवलाय. त्यामुळे 'अखेरची नोटीस' भारत सरकारकडून पाठवण्यात आलीय.
यानंतर अद्याप ट्विटरनं आपली भूमिका जाहीर केली नाहीय. त्यामुळे ट्विटरकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
4) मोदींची हिटलरशी तुलना अयोग्य, कारण... - नितीन राऊत
भारतातील आर्थिक परिस्थितीवरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले, "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिटलरशी तुलना अयोग्य ठरेल. कारण हिटलरच्या काळात जर्मनी हा देश आर्थिक महासत्ता बनला होता."

फोटो स्रोत, Twitter
काही दिवसांपूर्वी क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचं नाव दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदींची हिटलरशी तुलना केली होती. हाच धागा पकडत नितीन राऊत यांनी हे विधान केलं आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिलीय.
"काही लोक पंतप्रधानांची तंतोतंत तुलना हिटलरशी करतात ते 100 टक्के बरोबर नाही. इतर गोष्टी अलाहिदा, हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता हे विसरता येणार नाही," असं नितीन राऊत म्हणाले.
5) राष्ट्रवादीनं मला साथ दिलीय, मग त्यांना का सोडू? - एकनाथ खडसे
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मला साथ दिली. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत मी राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही," असं माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. 'सकाळ' वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.
"भारतीय जनता पक्षात काही लोकांनी माझा भरपूर छळ केला, माझ्यावर खोटे आरोपे लावून चौकशा लावल्या आणि त्यामुळे पक्ष सोडला," असंही खडसे म्हणाले.

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोनच दिवसांपूर्वी जळगाव दौऱ्यावर असताना एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगरमधील निवासस्थानी गेले होते. तिथे त्यांनी भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली होती.
यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार का, असे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आले होते. मात्र, स्वत: खडसेंनी यावर स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिलाय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता. )








