कोरोना : मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रोजची रुग्णसंख्या 8 ते 9 लाखांवर जाण्याची शक्यता - भ्रमर मुखर्जी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देशातल्या कोरोना रुग्णांची दररोजची संख्या 8 ते 9 लाखांवर जाण्याची शक्यता असल्याचं डॉ. भ्रमर मुखर्जी यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेतल्या मिशिगन विद्यापीठात संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. भ्रमर मुखर्जी भारतातील कोव्हिड परिस्थितीचा सखोल अभ्यास करत आल्या आहेत. त्या एक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत.
साथीच्या आजाराच्या आकडेवारीवरून मॅथेमॅटिकल मॉडेल तयार करण्यात त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. या मॉडेल्सच्या आधारे साथीच्या आजारांविषयी बऱ्याचअंशी अचूक भविष्यवाणी करता येते.
आपल्या अभ्यासाच्या आधारे डॉ. भ्रमर मुखर्जी यांनी भारतासाठी एक अंदाज वर्तवला आहे. लवकरात लवकर योग्य आणि पुरेशी पावलं उचलली नाही तर मे महिन्याच्या मध्यापर्यंत भारतातली परिस्थिती आणखी चिघळू शकते, असं डॉ. मुखर्जी यांचं म्हणणं आहे.
मुखर्जी गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून भारतातील कोव्हिड परिस्थितीचा अभ्यास करत आहेत. याआधीही सरकारी आकडेवारी आणि मॅथेमॅटिकल मॉडेलच्या आधारे डॉ. भ्रमर मुखर्जी यांनी भारतात कोरोनाची दुसरी लाट संहारक ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला होता.
नुकतंच त्यांनी पुन्हा एक भविष्य वर्तवलं आहे. यात भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक मे महिन्याच्या मध्यापर्यंत येऊ शकतो आणि त्यात दररोज 8 ते 9 लाख कोरोनारुग्ण आढळू शकतात आणि मृतांची संख्या साडे चार हजारांच्याही वर असू शकते, असं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, FACEBOOK/BHRAMAR MUKHERJEE
बीबीसी प्रतिनिधी जुबैर अहमद यांनी त्यांच्याशी झूमवरून केलेल्या चर्चेचा हा सारांश.
प्रश्न - भारत भविष्यात उद्भवणाऱ्या कोरोना लाटेसाठी किती सज्ज आहे?
उत्तर - मॅथेमॅटिकल मॉडेल तयार करणारा तज्ज्ञ कुठलाही अंदाज बांधतो तेव्हा त्यामागे काही विचार असतो. जनता आणि धोरणकर्ते या अंदाजांना गांभीर्याने घेऊन संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करतील, असा तो विचार असतो. अंदाज वर्तवल्यानंतर मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे, मोठ्या सभा किंवा कार्यक्रमांवर बंदी आणणे, शक्यतो विशिष्ट भागात लॉकडाऊन लागू करणे, यासारख्या उपायांवर भर दिला गेला पाहिजे.
मी वर्तवलेला अंदाज खरा ठरू नये, अशीच माझी इच्छा आहे. मात्र, आपण दुर्लक्ष करत बसलो तर माझ्याच नाही तर इतर अनेक मॉडेल्सनेही धोका खूप मोठा आहे, असा अंदाज वर्तवला आहे. मोठ्या प्रमाणावर पसरणारा संसर्ग आणि ज्यांची गणनाच होत नाही, अशा केसेस बघितल्या तर संसर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणावर पसरल्याचं मान्य करावंच लागेल. आजघडीला भारतात ज्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि ज्यांना लक्षणं दिसत आहेत, त्यांची संख्या डोळे विस्फारणारी आहे.
प्रश्न - तुमच्या कार्यपद्धतीवरही काहीजण प्रश्न उपस्थित करतात?
उत्तर - मला वाटतं काही लोक कायमच नाखुश असतील आणि विज्ञान आणि वैज्ञानिक यांच्याविषयी ते कायमच तक्रार करतील.
आम्ही गेल्या 380 दिवसांपासून रोज या जागतिक साथीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही कधीच मागे हटलो नाही. कारण, दुसरी किंवा तिसरी लाट येईल, हे आम्हाला माहिती होतं. सार्वजनिक आरोग्यविषयक माहितीचे विश्लेषण करणारे शास्त्रज्ञ, या नात्याने उपलब्ध माहितीची सुसंगत मांडणी करून ती देणं, हे आमचं काम आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न - भारत आणखी एका साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का?
उत्तर - अजिबात नाही. मी एक लेख लिहिला आहे. भारताने पुढच्या लाटेसाठी प्रत्यक्षात कशापद्धतीने सज्ज असण्याची गरज आहे, याचा उहापोह त्या लेखात करण्यात आला आहे. ही शेवटची लाट नाही. या साथीवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला तिला नियमित मॉनिटर करण्याची गरज आहे. नियमित लक्ष ठेवल्यास वाढणारा ग्राफ लगेच लक्षात येऊन तशी तयारी करता येते.
बरेचदा असं होतं की आजाराचं प्रमाण वाढतंय, हे लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो. खरंतर आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक व्यापक आणि उत्तम करण्याची गरज आहे. डेटा आणि मॉडलिंग, याचं प्रमाणही वाढवण्याची गरज आहे. यातून संसर्गाचं प्रत्यक्ष प्रमाण कळण्यात मदत होते.
डेटा सायन्स क्षेत्रात काम करणारे प्रशिक्षित तज्ज्ञ तयार करावे लागतील आणि ते जी शास्त्रीय भविष्यवाणी करतील, त्याला गांभीर्याने घ्यावं लागेल.
प्रश्न -डेटा आणि मॉडलिंग यात भारत मागासलेला आहे, असं तुम्हाला वाटतं का?
उत्तर - होय. भारतात विज्ञानाविषयक पायाभूत सुविधा खरोखरंच निकृष्ट आहेत. डेटा मिळवणं खूप कठीण आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अशक्त लोकांचं वय आणि लिंग यासंदर्भात कुठलीही माहिती उपलब्ध नाही.
प्रश्न -सरकारने प्रसिद्ध केलेल्या डेटाच्या आधारे तुम्ही अंदाज कसा वर्तवता?
उत्तर - सर्वांत वाईट डेटाच्या आधारे उत्तम मॉडलिंग कसं तयार करता येतं, हे भारत मॉडलिंग प्रकल्पावरून दिसून येतं. आम्ही ज्या बाधित व्यक्तींची नोंद होत नाही त्या संख्येच्या आधारे अंदाज बांधलेले नाही. तो सगळा भाग अज्ञात आहे आणि तो मोठा आहे.
निरीक्षण पातळी, रिपोर्ट करण्यात आलेले केस पॅटर्न आणि मृत्यूचा पॅटर्न या सर्वांचा अभ्यास करून आम्ही अंदाज वर्तवले आहेत. संकटाचा केवळ एक छोटा भाग आपण बघू शकतो. त्यामुळे हे संपूर्ण संकट किती मोठं आहे, याची केवळ कल्पना करता येते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








