You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'महाराष्ट्र सरकारनं वारंवार केंद्राकडे बोट दाखवू नये' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. महाराष्ट्र सरकारनं वारंवार केंद्राकडे बोट दाखवू नये - देवेंद्र फडणवीस
"राज्यात जिथं बलशाली नेते तिथं ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठा योग्य प्रमाणात होतो. पण हा पुरवठा रुग्णसंख्येनुसार होणं अपेक्षित आहे. मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं, पण त्यांनी आपण राज्याचे मंत्री आहोत हे विसरू नये," असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
शुक्रवारी (30 एप्रिल) नाशिक येथील जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, "केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन मिळालं आहे. त्याचं समान वाटप राज्यात झालं पाहिजे. ज्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे, तिथं अधिक पुरवठा करण्यात यावा."
"राज्य सरकारने वारंवार केंद्राकडे बोट दाखवू नये. आपल्याकडे उपलब्ध साधनांचा योग्य प्रमाणात वापर करायला हवा," असं फडणवीस यांनी म्हटलं. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.
2. शाळांना 1 मेपासून सुट्ट्या, 14 जूनपासून सुरू होणार नवं वर्ष
महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 1 मे पासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे. 1 मे ते 13 जून दरम्यान शाळांना सुट्टी राहणार आहे. तर 14 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल, असा आदेश राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिला आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द करून व त्यांना पास करून पुढील वर्गात प्रमोट करण्यात आलं आहे.
तर इयत्ता 9 वी, 10 वी आणि 11 वीच्या परीक्षा सुद्धा रद्द केल्या आहे. तरीसुद्धा, अनेक शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग शिक्षकांकडून घेतले जात होते. त्यामुळे यंदाचं शैक्षणिक वर्ष समाप्त करून सुट्टी जाहीर करावी, अशा आशयाचं पत्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येत होते. याची दखल घेत, शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय जाहीर करण्यात आला.
नवे शैक्षणिक वर्ष जरी 14 जूनपासून सुरू होणार असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याबाबतचा निर्णय कालांतराने कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत कळवण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.
3. मुख्यमंत्री सहायता निधीला राष्ट्रवादी काँग्रेसची 2 कोटींची मदत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दोन कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर याबाबत पक्षाला सूचना केली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ट्विट करून याबाबत सर्वांना माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला साहाय्य करण्यास कटीबद्ध आहे. म्हणूनच करोनासोबत लढण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत आहोत, असे पक्षाने जाहीर केलं आहे.
नुकतीच काँग्रेस पक्षानेही लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत दिली आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
4. दोन लाख मृत्यू, जबाबदारी शून्य, सिस्टिमने केलं आत्मनिर्भर - राहुल गांधी
देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
"देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या दोन लाख झाली असून सरकारची त्याबाबत जबाबदारी शून्य आहे. सिस्टिमने लोकांना आत्मनिर्भर केलं," अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
"कोविडच्या दुसऱ्या लाटेचा चौथा आठवडा, दोन लाखांपेक्षा जास्त मृत्यू उत्तरदायी शून्य..केलं सिस्टिमने 'आत्मनिर्भर'!" असं राहुल गांधींनी ट्विट केलं आहे.
"सिस्टम' फेल आहे, म्हणून आता 'जन की बात' करणं महत्वाचं आहे. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची आवश्यकता आहे. माझी सर्व काँग्रस सहकाऱ्यांना विनंती आहे की, सर्व राजकीय कामं सोडून केवळ लोकांना सर्व मदत करा, सर्व प्रकारे देशवासियांचं दुःख दूर करा. काँग्रेस परिवाराचा हाच धर्म आहे." असंही राहुल गांधी म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
5. आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का? - पडळकर
राज्यात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातल्या नागरिकांना लसीकरण सुरू करता येणार नसल्याच्या मुद्द्यावरून भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का, अशी टीका पडळकर यांनी राजेश टोपे यांच्यावर केली.
सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना पडळकर बोलत होते. या टीकेवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पडळकर म्हणाले, "राजेश टोपे यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 1 तारखेपासून 18 ते 44
वयोगटातल्या लोकांना लसीकरण करणार असल्याचं सांगितलं. पण संध्याकाळी 4 वाजता ते करता येणार नसल्याचं सांगितलं.
हे इतके गोंधळलेले लोक आहेत. यांना लोकांचं घेणं-देणं नाही. सकाळी तुम्ही घेतलेली पत्रकार परिषद मग गांजा ओढून घेतली होती का? तुम्हाला माहीत नव्हतं का? सकाळी सांगता मोफत लस देणार आहोत आणि 4-5 तासांनी सांगता की आमच्याकडे तेवढ्या लसी उपलब्ध नाहीत", असं पडळकर म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)