तामिळनाडू : पलानीस्वामी यांनी वारंवार पराभूत होऊनही जयललिता यांचा पक्ष कसा ताब्यात घेतला?

जयललिता यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनीच AIADMK पक्षाचे दोन तुकडे झाले होते.

एका गटाचं नेतृत्व ओ पनीरसेल्वम करत होते, जे सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्रीसुद्धा राहिले. तर शशिकला यांच्या नेतृत्वाखालील गटानं पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदी बसवलं. एका छोट्या पण नाट्यमय घडामोडीनंतर पलानीस्वामी मुख्यमंत्री बनले होते.

AIADMK नं ओ पनीरसेल्वम यांनी तीनदा मुख्यमंत्रिपद दिलं. पण ते सत्ता आणि पक्षाला आपल्या नियंत्रणात ठेवण्यात अयशस्वी ठरले.

दुसरीकडे ईके पलानीस्वामी यांनी मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर काही महिन्यांच्या आतच सरकार आणि पक्षाला आपल्या नियंत्रणाखाली आणलं. जयललिता यांचा मृत्यू हे यामागचं एक कारण सांगितलं जात असलं, तरी आपण एक कसलेले राजकारणी आहोत, हेसुद्धा पलानीस्वामी यांनी सिद्ध केलं आहे.

त्यांनी केवळ आपले प्रतिस्पर्धी ओ पनीरसेल्वम यांना स्वत:च्या गटात सामील करून घेतलं नाही, तर पक्षाला शशिकला यांच्या कुटुंबाच्या तावडीतून बाहेर काढलं. पण, पलानीस्वामी यांना त्यांच्या राजकीय जीवनात अनेकदा पराभवाचा सामना करावा लागला, हा विरोधाभासच म्हणावा लागेल.

पलानीस्वामी यांचा जन्म 12 मे 1954ला सेलम जिल्ह्यातील इडापड्डी भागात करूपा गौंडर आणि दावूसायम्माल यांच्या घरी झाला. ते त्यांच्या आई-वडिलांचे दुसरे पुत्र होते.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इरोड वासावी कॉलेजमधून झूलॉजी विषयात पदवी प्राप्त केली. सुरुवातीपासूनच त्यांना राजकारणाची आवड होती. त्यांनी त्याच वेळी आकारास आलेल्या AIADMK पक्षासोबत काम सुरू केलं होते.

ते आपला खर्च भागवण्यासाठी गुळाचा व्यापारही करत होते. पण, त्यांना राजकारणाची आवड असल्याकारणाने त्यांचा बहुतांश वेळ राजकीय कामातच जात होता. त्यामुळे मग पक्षानं त्यांना कोनेरीपट्टी शाखेच्या सचिवपदाची जबाबदारी दिली. पक्षानं त्यांना दिलेलं हे पहिलं राजकीय पद होतं.

1989मध्ये एमजीआर यांच्या मृत्यूनंतर झालेल्या निवडणुकीत पक्षात दोन गट पडले. एक जयललिता आणि दुसरा जानकी. पलानीस्वामी जयललिता यांच्यासोबत होते आणि त्यांना इडापड्डीमधून तिकिट देण्यात आलं. त्या निवडणुकीत डीएमकेला बहुमत मिळालं होतं आणि पलानीस्वामी यांचा विजय झाला होता.

त्यांचा 1364 मतांनी विजय झाला होता. 1991मधील निवडणुकीत त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आणि 41 हजारांहून अधिक मतांनी त्यांनी विजय मिळवला.

1996मध्ये त्यांनी निवडणूक लढवली, तेव्हा मात्र सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण होतं. पक्षातील इतर उमेदवारांसहित त्यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतरच्या काळात त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक अडथळे आले आणि त्यांना एकानंतर एका पराभवाचा सामना करावा लागला.

1998मधील लोकसभा निवडणुकीत त्यांना थीरूचेंदूर इथून उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. पण, त्यानंतर काही महिन्यांच्या आतच संसद भंग करण्यात आली. त्यानंतर 1999मधील लोकसभा निवडणुकीत त्यांचा डीएमके उमेदवार एण कनप्पम यांनी जवळपास साडे चार हजार मतांनी पराभव केला होता. 2004मध्ये त्यांनी निवडणूक लढवली, पण डीएमकेच्या उमेदवारानं पुन्हा त्यांचा पराभव केला.

पण पक्षप्रमुख जयललिता यांचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास होता. 2006मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना इडापट्टीमधून उमेदवारी देण्यात आली. यावेळी पीएमके पक्षाच्या कावेरी यांनी त्यांनी 6347 मतांनी पराभव केला.

पक्षानं त्यांना प्रत्येक वेळी संधी दिली, पण 1991 ते 2011 मधील निवडणुकांमध्ये एक निवडणूक वगळता प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पलानीस्वामी यांच्याऐवजी दुसरा राजकारणी असता तर त्याने राजकीय अपेक्षा सोडून दिल्या असत्या किंवा राजकारणही सोडलं असतं. पण, पलानीस्वामी यांनी आपले प्रयत्न सुरुच ठेवले आणि राजकीय काम बंद केलं नाही.

2011मध्ये पुन्हा त्यांना इडापट्टीमधून उमेदवारी मिळाली आणि तब्बल 20 वर्षांनी ते विधानसभेत पोहोचले. यावेळी त्यांच्यावर परिवहन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. या काळात पलानीस्वामी यांचा समावेश AIADMKच्या चार प्रमुख नेत्यांमध्ये केला जात होता.

2016मध्ये पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि पक्ष सत्तेत आल्यानंतर मंत्रीपदही देण्यात आलं. अनकेदा पराभूत होऊनही त्यांना उमेदवारी मिळत राहिली आणि पक्षाच्या प्रमुखांचा पाठिंबा मिळत राहिला. याचं एक कारण म्हणजे शशिकला या पलानीस्वामी यांना विश्वासाचा माणूस समजत होत्या.

जयललिता यांनी जेव्हा केए संकोटायन यांच्याकडे दुर्लक्ष केलं, तेव्हाही इडापड्डी यांना विश्वासार्ह मानलं गेलं. जयललिता यांच्या मृत्यूनंतर पलानीस्वामी यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवण्यात आलं होतं , पण तेव्हा मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या ओ पनीरसेल्वम यांच्याकडेच हे पद सोपवण्यात आलं.

पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे ओ पनीरसेल्वम यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपद सोडलं, तेव्हा शशिकला यांची AIADMK च्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याचा आग्रह केला होता.

पण राज्यपालांनी शपथ देण्यासाठी अनेक दिवस वाट पाहायला लावली आणि या काळात सर्वोच्च न्यायालयाचा उत्पन्नासंदर्भातला निर्णय आला. या प्रकरणात माजी मुख्यमंत्री जयललिता आणि त्यांच्या निकटवर्तीय शशिकला यांच्यावर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती मिळवल्याचा आरोप होता. सत्र न्यायालयानं या प्रकरणी सगळ्या आरोपींना शिक्षा सुनावली होती, पण उच्च न्यायालयानं मात्र सगळ्यांची सुटका केली.

फिर्यादीच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिथं अनेक वर्षं हे प्रकरण प्रलंबित राहिलं. यादरम्यान जयललिता यांचा मृत्यू झाला.

दोन दशकांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाचा निकाल लागला आणि तो शशिकला यांच्यासाठी खूप वाईट काळ घेऊन आला. राज्यपालांकडून सरकार स्थापनेच्या आमंत्रणाची वाट पाहणाऱ्या शशिकला यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं.

या काळात शशिकला यांनी इडापड्डी पलानीस्वामी यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. शशिकला यांना वाटलं त्यांचं कुटुंब पडद्यामागून मुख्यमंत्र्यांना नियंत्रित करेल. पलानीस्वामी यांनी 14 फेब्रुवारी 2017ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

शशिकला यांच्यासहित कुणीही हा अंदाज लावला नसेल की पलानीस्वामी पक्षाला आपल्या नियंत्रणात घेईल. शशिकला आणि टीटीवी दीनाकरण यांच्या प्रभावाखालील पक्षावर त्यांनी एकछत्री अंमल प्रस्थापित केला.

पलानीस्वामी यांनी सुरुवात हळूवारपणे केली आणि मग वेग वाढवला. सरकार आणि पक्षातला प्रत्येक तत्व आपल्यासाठी काम करेल हे त्यांनी सुनिश्चित केलं. त्यांनी ओ पनीरसेल्वम यांना आपल्या गटात खेचलं आणि टीटीवी दीनाकरण यांच्या समर्थक आमदारांचे राजीनामे घेतले.

शशिकला यांनीही कधीच असा विचार केला नसावा की पलानीस्वामी एक दिवस सत्ता आणि पक्षावर नियंत्रण प्रस्थापित करतील.

पलानीस्वामी यांनी सरकार चालवण्यासाठी आवश्यक आमदारांची संख्याही जुळवली. येत्या निवडणुकीत स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यासाठी त्यांनी आवश्यक त्या सगळ्या गोष्टींची तयारी केली आहे.

इडापड्डी पलानीस्वामी हे तामिळनाडूमध्ये कामराज, बक्तावत्सलम, करुणानिधी, एमजीआर आणि जयललिता यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहिलेले व्यक्ती ठरले आहेत.

पण हेही तितकंच खरं आहे की त्यांनी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करून कधी निवडणूक जिंकलेली नाहीये. पलानीस्वामी यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदावर कायम राहणं आणि राजकारणात टिकून राहणं सोपी गोष्ट नव्हती.

2021मधील विधानसभा निवडणूक राज्यातील अनेक नेते आणि पक्षांचं भविष्य ठरवणार आहे. इडापड्डी पलानीस्वामी त्यांच्यापैकी एक आहेत. पण काही वेळासाठी रिकामी जागा भरण्यासाठी बोलावलं जावं आणि मग विसरण्यात यावं, अशी व्यक्ती आपण नाही आहोत, हे पलानीस्वामी यांनी सिद्ध केलं आहे. राज्यातल्या सत्तेत त्यांनी आपली जागा तर बनवलीच आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)