You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
MPSC ची उद्याची पूर्वपरीक्षा देत असाल तर या 5 गोष्टी तुमच्यासाठी आहेत
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी
उद्या म्हणजे रविवारी 21 ऑगस्टला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा म्हटलं की टेन्शन असतंच. पण तरीही या पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
केंद्रावर जाताना
केंद्रावर जाताना एकाच वाहनाने शक्यतो जावं. स्वत:ची गाडी असल्यास उत्तम. कॅबने जात असल्यास वेगवेगळ्या लोकांबरोबर जाणं टाळावं. म्हणजे जाताना एक गट आणि येताना वेगळा गट असं करू नये. एकटं गेल्यास उत्तम. साधारणत: परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षा केंद्र पाहून यावं असा संकेत असतो. जमल्यास तसं करावं.
गुगल मॅपचा आधार घेऊन साधारण अंदाज घ्यावा आणि तसं नियोजन करावं. केंद्रावर जाताना बाहेरचं खाणं आणि पिणं शक्यतो टाळावं.
केंद्रावर पोहोचल्यावर
केंद्रावर गेल्यावर परिस्थितीचा आढावा घ्या. उगाच परीक्षेशी संबंधित वायफळ चर्चा करू नका. त्यांना अभ्यासाचे प्रश्न विचारू नका तुम्हाला विचारले तर गोंधळून जाऊ नका.
आपला वर्ग कुठे आहे, याची नोंद उमेदवार घेतातच. शांतपणे एका ठिकाणी बसून रहा, नवीन ओळखी करणं टाळा. त्याचा काही फायदा होत नाही. आपल्या ओळखीचे असतील तर फार गप्पा मारू नका. त्याचाही काही फायदा होत नाही. केंद्रावर जाताना फार मौल्यवान गोष्टी घेऊन जाऊ नका.
परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर...
परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर. आपल्या हॉलमध्ये योग्य सुविधा आहेत किवा नाही याची काळजी घ्या. नसल्यास लक्षात आणून द्या.
एकदा पेपर सुरू झाला की इतर फारसा विचार करू नका. आपण किती अभ्यास करायला हवा होता, किती नाही, पश्चातापाचे कढ, स्वत:ला परिस्थितीला शिव्या हे सगळं टाळावा. प्रत्येक प्रश्नाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करा. फार तणाव आला तर दीर्घ श्वास घ्या आणि पुढचे प्रश्न घ्या.
दोन पेपरच्या मध्ये...
परीक्षेत दोन पेपर असतात आणि दोन पेपरमध्ये ब्रेक असतो.परीक्षेला स्वत:चा डबा नेणं अतिशय उत्तम. जर तसं शक्य नसेल तर हलका आहार घ्या. आजूबाजूला जेवणाची केंद्र असतील तर तिथलं वातावरण पाहून मगच निर्णय घ्या. फार तेलकट खाऊ नका, कारण एक लढाई अजून लढायची आहे.
प्रश्नपत्रिकेची चर्चा करायची कितीही इच्छा झाली तरी ती टाळावी. नंतर फोनवर ती अखंड करता येईल. आपल्या मित्र मैत्रिणींशी प्रत्यक्षात कमी संवाद झाला तरी हरकत नाही. ते तुमचे खरे मित्र मैत्रिणी असतील तर ते नक्कीच समजून घेतील.
परीक्षा संपल्यानंतर
परीक्षा पडल्याचा आनंद वेगळा असेल हे मान्यच. मात्र परीक्षा संपल्यानंतर थेट घरचा रस्ता पकडावा. कारण हा पहिलाच टप्पा आहे.
एवढी मोठी परीक्षा झाल्यानंतर मन सैल सुटण्याची ग्वाही देत असतं. मात्र मनावर ताबा मिळवा. गेल्या एक वर्षात तो तसाही आपण मिळवलेला आहेच.
ही परीक्षा झाल्यानंतर थोडा ब्रेक घ्या. लगेच मुख्य परीक्षेचा अभ्यास करू नका. परीक्षा झाल्यानंतर त्याची चर्चा करणं टाळावं. कारण आता पेपर तुमच्या हातातून गेला आहे. त्यामुळे ब्रह्मदेव आला तरी ते बदलू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही कितीही काथ्याकूट केला तरी काही फायदा होणार नाही.
दोन तीन दिवस परीक्षेचा विचार करू नका. मुख्य परीक्षेची योजना मनात आखा आणि कामाला लागा. गावी जाणार असाल तर फार रमून जाऊ नका.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)