MPSC : हा संताप फक्त परीक्षा पुढे ढकलल्याचा नाही

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी

MPSCच्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्यानंतर राज्यातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं करत आपली नाराजी व्यक्त केलीय. नेमकं काय सुरू असतं MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनात? बीबीसी मराठीचे प्रतिनिधी रोहन नामजोशी यांचा हा ब्लॉग.

मार्च महिना हा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी निर्णायक असतो. सगळीकडे तात्याचा ठोकळा, के. सागर प्रकाशनाची पुस्तकं हातात वागवत उजळणी, चाचण्यांच्या चक्रात अडकून, अखंड चर्चा, चेहऱ्यावर ताण असा टिपिकल हावभाव घेऊन विद्यार्थी वावरत असतात.

मग हळूच एक दिवस कुजबूज सुरू होते... आयकार्ड आलं! सगळी जनता मग सायबर कॅफेत धाव घेऊन सेंटर कोणतं, मग तिथे जायचे प्लॅन वगैरे आखू लागते.

मी जेव्हा परीक्षार्थी होतो तेव्हा एक दिवशी दुपारी चहा पिऊन आपापल्या अभ्यासिकेत येऊन स्थिरावलो होतो. परीक्षा जवळ आली होती. आम्ही आयकार्ड येण्याची वाट पाहत होतो.

तेवढ्यात बातमी आली की MPSC च्या वेबसाईटचा सर्व्हर उडाला आणि सगळा डेटा करप्ट झाला. पोटात खोल खोल खड्डा पडला. सगळी माहिती पुन्हा भरावी लागणार होती, मग आयकार्ड मिळणार होतं.

आम्ही सगळे विद्यार्थी जमा झालो. काय करायचं याच्या चर्चा सुरू झाल्या... आयोगाला यथायोग्य शिव्या देऊन झाल्या. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असल्याने अतिरिक्त ज्ञान पाजाळून झालं.

पण शेवटी माहिती भरावीच लागणार होती. तेव्हा परीक्षेचा फॉर्म भरणं इतकं सोपंही नव्हतं. तो भरायला फार वेळ लागायचा. सरकार दरबारीही गोंधळ उडाला होता. अडीच तीन लाख विद्यार्थ्यांचाी सगळी माहिती उडणं ही मोठी घटना झाली होती.

यथावकाश ही समस्या सुटली, आम्ही माहिती भरली, परीक्षा झाली... पण परीक्षा काहीतरी कारणाने स्थगित होण्याची अचानक झालेली घोषणा ऐकून जी कालवाकालव होते, ती आज पुन्हा अनुभवायला मिळाली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व-परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली गेल्यामुळे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले आणि हा सगळा घटनाक्रम झरझर डोळ्यासमोरून गेला.

शास्त्री रोडवर भयंकर संतापलेल्या विद्यार्थ्यांच्या वाक्या-वाक्यातून सांडणारी अगतिकता, त्यांच्या मानसिक अवस्थेचं वर्णन करणार होती. दोन दिवसांवर परीक्षा आली असताना, ओळखपत्र पाठवलं असताना अचानक हा निर्णय येणं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किती निराशाजनक आहे, हे त्या मांडवातून गेलेल्या व्यक्तीला कळू शकतं.

राज्यसेवा, PSI-STI-ASO या परीक्षांवर महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अवलंबून असतं. ही परीक्षा एक दिवसाची नसते. ती पूर्ण वर्षभराची प्रकिया असते. पूर्व परीक्षाच पुढे गेल्यामुळे आता पुढचे टप्पे पुढे जाणं क्रमप्राप्त आहे.

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग एका विचित्र स्थितीला सामोरं जात आहे. त्यात एमपीएससी देणारा विद्यार्थी अतिशय जास्त प्रमाणात भरडला गेला आहे. एक म्हणजे यावर्षी परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली. त्यात वयोमर्यादेची अट घालण्यात आली. आधी ज्या नियुक्त्या झाल्या त्या काही ना काही कारणाने रखडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आधीच चिंतेत आहेत.

हे सगळं होत असताना मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. शासन दरबारी काही लोकांनी हा विषय उचलून धरला आणि कोरोनाचे कारण देत परीक्षा लांबणीवर नेली.

मध्यंतरीच्या काळात भारतात होत्या नव्हत्या त्या सगळ्या परीक्षा झाल्या. UPSC, CA, JEE, NEET सगळ्या परीक्षा झाल्या, मग MPSCलाच वेगळा न्याय का या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ सरकारवर येऊन ठेपली आहे.

परीक्षेचं चक्र हा एकमेव मुद्दा नाही.

एमपीएससीच्या परीक्षांशिवाय अनेक मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत. विद्यार्थी आपल्या घरापासून दूर राहतात. कोरोना रुग्णांची संख्या सतत वरखाली होत असते. त्यानुसार निर्बंधही कमी जास्त होत असतात. त्यामुळे परीक्षेचा पेपर हाती येईपर्यंत धाकधूक असणारच.

त्यात पुण्यासारख्या शहरात अनेक विद्यार्थी राहतात. लॉकडाऊनमध्ये घरी गेलेली मुलं आता कुठे परतली नाहीत तोच परीक्षाच स्थगित झाली. त्यामुळे फक्त परीक्षाच नाही तर इतर गोष्टीही जटील होऊन बसल्या आहेत.

MPSC करणारे सगळेच विद्यार्थी पुण्यात नसतात. काही आपल्या गावी असतात. त्यांचे पालक आता आपला मुलगा किंवा मुलगी नोकरी करेल, या अपेक्षेवर आहेत. कोरोनामुळे बिघडललेली आर्थिक घडी पाहता ही अपेक्षा जास्तच वाढली असेल.

मुलगी जर एमपीएससी करत असेल आणि तिथे काहीही कमी-जास्त झालं की तिच्या घरचे आधी लग्नाचं हत्यार बाहेर काढतात.

म्हणजे परीक्षेच्या तारखेचा, परीक्षेचा, निकालाचा आणि अनिश्चितितेचा ताण घेऊन हे उमेदवार दिवस काढताहेत.

महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना 'टाईमपास' असं कुत्सित लेबल लावायलाही अनेक लोक कमी करत नाहीत. मात्र विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आता खरोखर विचार करण्याची वेळ आली आहे.

कोरोनाचा कहर सुरू असला तरी जगातले बव्हंशी व्यवहार आता सुरळीत सुरू झाले असताना एका परीक्षेलाच वेगळा न्याय का, हा प्रश्न पडतो.

सरकारी अनास्था

ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचं कारण देत परीक्षा पुढे ढकलली होती. तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दाही गाजत होता. तेव्हा नक्की कोणत्या कारणाने परीक्षा स्थगित केली हे कारण अद्यापही गुलदसत्यात आहे.

सध्याचा निर्णयही सरकारने विद्यार्थ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवूनच घेतला असेल. परीक्षांची केंद्रे अनेकदा वेगळ्या शहरात असतात. तिथले निर्बंध वेगळे असू शकतात. काही शहरांत आता लॉकडाऊनही लागला आहे.

त्यामुळे सरकारलाही अनेक पातळीवर लढावं लागत आहे. मात्र कोरोनाचे आकडे एका दिवसात वाढलेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हीच परिस्थिती आहे. तेव्हाच सरकारने हे संकेत दिले असते, काही अतिरिक्त उपाययोजना केल्या असता, तर हा संताप रस्त्यापर्यंत आला नसता. तो पचला असता. हॉल तिकीट हातात आल्यावर परीक्षा स्थगित होणं ही एक प्रकारची क्रूर थट्टा आहे.

याच परीक्षेमधून उत्तीर्ण झालेल्या सचिन वाझे यांच्यामुळे गेले आठ दिवस अधिवेशन गाजलं. आता या भावी अधिकाऱ्यांना रस्त्यावर यायची वेळ आली. याच सरकारमध्ये राहून ते पुढे अधिकारी होतील.

आता अनेक राजकीय नेते या आंदोलनात उतरले आहेत. त्यात अगदी सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारही आहेत.

पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनाही घडल्यात. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करताना या पोलिसांना त्यांच्या उमेदवारीचे दिवस आठवले असतील का? की कर्तव्यपूर्तीच्या नावाखाली ते सगळं विसरले असतील?

बीबीसी मराठीच्या फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना एक विद्यार्थी म्हणाला की, आता हेच आमचं शाहीनबाग आहे. पुढच्या काही दिवसांत काही जिल्ह्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. फक्त परीक्षा स्थगित करण्याचा मुहूर्त मात्र चुकला.

एमपीएसचीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, प्रत्यक्ष परीक्षेपेक्षा कठीण होऊन बसलेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)