वरवरा राव: रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर

फोटो स्रोत, Twitter
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेले कवी वरवरा राव यांची अखेर जामिनावर सुटका झाली आहे. 81 वर्षांचे वरवरा राव यांना प्रकृतीच्या कारणांवरून मुंबई उच्च न्यायालयाने 22 फेब्रुवारी रोजी 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर केला होता.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी वरावरा राव गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 22 फेब्रुवारी रोजी जामीन मिळाल्यानंतर ते काल रात्री उशिरा नानावटी रुग्णालयातून बाहेर पडले.
वरवरा राव यांच्या वकील इंदिरा जयसिंग यांनी ट्विटरवर वरवरा राव हॉस्पिटलमधून बाहेर येत असल्याचा फोटो टाकत ते जामिनावर सुटल्याची पोस्ट केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आपल्या पोस्टमध्ये त्या लिहितात, "अखेर सुटका! 6 मार्च 2021, रात्री 11.45 मिनिटांनी वरावरा राव नानावटी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना."
वरावरा राव यांच्यासाठी जामिनाची मागणी करताना इंदिरा जयसिंग यांनी कोर्टाला त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं होतं. गेल्या फेब्रुवारीपासून या फेब्रुवारीपर्यंत म्हणजे 365 दिवसांपैकी 149 दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यांचं वय आणि प्रकृती बघता त्यांना तळजो तुरुंगातून बाहेर पडून हैदराबादला आपल्या घरी जाण्याची परवानगी मिळावी, असं जयसिंग यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
यावर निर्णय देताना वरवरा राव यांना जामीन दिला नाही तर ते मानवाधिकारांच्या तत्त्वांचं आणि प्रत्येक नागरिकाला असेलेल्या जगण्याच्या आणि आरोग्याच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन ठरेल, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं होतं.
त्यानंतर 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, मुंबईबाहेर न जाण्याचे आणि तपासासाठी गरज असेल तेव्हा उपलब्ध होण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. वरावरा राव यांना आपला पासपोर्टही एनआयए कोर्टात जमा करावा लागणार आहे. तसंच, या प्रकरणातील सहआरोपींशी संपर्क करू नये, असेही कोर्टाचे आदेश आहेत.
कोण आहेत वरवरा राव?
वरवरा हे रिवॉल्यूशनरी रायटर्स असोसिएशनशी संलग्न आहेत. वरवरा यांना हैदराबाद इथं अटक करण्यात आली आणि त्यांना पुण्याला आणण्यात आलं.
सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, नागरी हक्कांसाठी काम करणारे गौतम नवलखा, सामाजिक कार्यकर्ते अरुण फरेरा, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते व्हर्नोन गोन्सालव्हिस यांनाही अटक करण्यात आली. या सगळ्यांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला असा त्यांच्यावर आरोप आहे. वरवरा यांनी त्यांना आर्थिक मदत पुरवली, असा त्यांच्यावर आरोप आहे.
पुण्यातल्या विश्रामबाग पोलीस स्थानकात वरवरा यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या 153 (ए), 505 (1) (B), 117, 120 (B) आणि बेकायदेशीर घडामोडी रोखण्यासाठीची कलमं 13, 16, 17, 18(B), 20, 38, 39, 40 गुन्हे दाखल करण्यात आले.
भीमा कोरेगाव प्रकरणात हिंसा भडकवणारे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यापासून लक्ष दूर हटावं यासाठी पोलीस कपोकल्पित आरोप लावत आहेत, असं वरवरा यांनी तेव्हा बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
या पाचही कार्यकर्त्यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं.

न्यायालयाने गेल्या वर्षी आदेश देताना या सगळ्यांना घरीच नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला.
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या मुद्यावरून वरवरा यांना याआधीही अटक करण्यात आली होती. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांना फसवण्याचं हे षडयंत्र असल्याचं डाव्या विचारसरणीच्या लोकांनी म्हटलं होतं.
वरवरा यांच्या पत्नी हेमलता यांनी गेल्या वर्षी भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशांना एक पत्र लिहून त्यांच्या सुटकेची मागणी केली होती.
वरवरा यांना पुण्यातल्या येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. अटक झाल्यानंतर वर्षभरानंतरही खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली नव्हती.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








